बोरिवलीला एक निवृत्त सरकारी कर्मचारी आहेत- त्यांचे नाव सुभाष गावडे -वय वर्षे साठ. त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. ती याच उद्देशाने की मायमराठी जगावी ! त्यांच्या परीने त्यांनी त्यासाठी एक लढाई गेली काही वर्षे केली. ती म्हणजे रोज सरकारला एक तर्कशुद्ध पत्र लिहायचे, की मराठी भाषा जगवणे-टिकवणे ही सरकारची जबाबदारी आहे. सरकारने ती नीट पार पाडावी. गावडे हे राज्यघटनेपासून रोजच्या सरकारी परिपत्रकांपर्यंत प्रत्येक कागदाचा अभ्यास करून सरकारच्या वेगवेगळ्या खात्यांच्या, मुख्यमंत्र्यांपासून सर्वसामान्य कर्मचाऱ्यांपर्यंतच्या अधिकाऱ्यांच्या उणिवा/चुका काय आहेत हे निर्देशित करतात – अगदी सरकारी जीआरच्या, सरकारलाच कळेल अशा भाषेत.
गंमत म्हणजे सरकारकडे ईमेलवर जाणारे सुभाष गावडे, त्यांचे हे पत्र दररोज महाराष्ट्रातील लढाऊ कार्यकर्ते, साहित्यिक- कवी- विचारवंत- मान्यवर यांनाही पाठवतात. हा त्यांचा क्रम गेले सोळा, महिने चालू आहे. ना ते थकले- ना त्यांचा कॉम्प्युटर. त्यांना त्यांच्या खटाटोपाची फक्त ‘पोच’ मिळाली. ती दोन-पाच व्यक्तींपैकी एक मराठी भाषा अभ्यासक प्रकाश परब आणि सरकारची निर्जीव दोन खाती यांच्याकडून. पुढे ना कोणाकडून वाद ना संवाद !
परवा, एक जुलैला त्यांनी पत्र लिहिले ते 1. मुख्य सचीव, 2. अतिरिक्त मुख्य सचीव, शालेय शिक्षण आणि 3. सचीव, मराठी भाषा यांना उद्देशून. नेहमीप्रमाणे त्याच्या चारशे प्रती मुख्यमंत्री, अन्य संबंधित मंत्री व मान्यवर यांना गेल्या. पत्राचे शीर्षकच किती तीव्र- भेदक भाषेत लिहिले आहे बघा,
पहाटे शाळेत जाण्यापूर्वी आईचे आशीर्वाद घेण्यासाठी वाकायला आढेवेढे घेणाऱ्या चिरंजीवाने शाळेमधून घरी आल्यावर रस-मलाई मिळणार म्हणून शेजारच्या चाचींला संध्याकाळी साष्टांग दंडवत घालणे म्हणजे वैयक्तिक स्वार्थाने संस्कारांवर केलेली कुरघोडी ठरते – अनंत
मग मंत्री-सचीव-खाते प्रमुख यांचे उल्लेख त्या सर्व लोकांना पत्र पाठवले असा मायना. त्यापुढे विषय- स्व-भाषेप्रती हरवलेली संवेदनशीलता पुन्हा नव्याने शोधण्यासाठीचा विनंती अर्ज.
त्यानंतर अत्यंत त्राग्याने, परंतु प्रभावी भाषेत गावडे यांनी पत्र लिहिले आहे- ते वाचून पाहवे असेच आहे. ते सोबत दिले आहे.
- मराठी भाषा शाळा आणि संस्कृती यांच्यासमोर आज उभ्या असलेल्या विविध आव्हानांचा सामना करण्यासाठी आणि स्वभाषिक महाराष्ट्रामध्ये त्यांचे संरक्षण संवर्धन कशा प्रकारे करता येईल यावर मागील 16 महिने 24 तास अभ्यासपूर्वक लिखाण करून भाषेशी संबंधित लोकप्रतिनिधी, अभ्यासक, संबंधित संस्था, मराठी वृत्तपत्रांचे संपादक अशा किमान 400 ते 500 जणांशी अंदाजे ईमेलद्वारे 300 पेक्षा जास्त पत्रांच्या माध्यमातून प्रामाणिक संवाद साधण्याचा प्रयत्न केला आहे.
2. परंतु या प्रवासात एक आदरणीय भाषा अभ्यासक- प्रकाश परब, एक प्रकाशक –दिनकर गांगल, एक लोकप्रतिनिधी- ओमराजे निंबाळकर आणि मुख्यमंत्री कार्यालय व उपमुख्यमंत्री कार्यालय याव्यतिरिक्त एकही लोकप्रतिनिधी अथवा भाषेशी संबंधित अखिल भारतीय संस्थेमधून दोन ओळीच्या पत्राद्वारे आजपर्यंत प्रतिसाद मिळालेला नाही.
- राजकीय/प्रशासकीय/भाषिक नेतृत्व मेंदू मृत झाल्यामुळेकोमात गेले आहेत की जनतेच्या समस्येशी त्यांची नाळ कायमची तुटली आहे? की त्यांच्या सभोवतालची त्यांनी उभारलेली रचना हाच कोणतेही सृजनात्मक अथवा रचनात्मक विचार त्यांच्यापर्यंत पोचण्यासाठी एक मोठा अडथळा आहे? की इतर खूप महत्त्वाच्या कामामध्ये ते सर्व व्यस्त आहेत? हा विषयच त्यांच्यासाठी फारसा महत्वाचा नाही की काय ? अशी शंका कधी कधी मनात येते.
4. बारा कोटी मराठी भाषिकांच्या वेदना आपण आपल्या आप्त स्वकीयांसमोर मांडत आहोत की अनेक प्रकाशवर्ष दूर असलेल्या एखाद्या परग्रहावरील नसलेल्या जीवसृष्टीचा शोध तर घेत नाही आहोत ना? असाही कधी कधी मनात विचार येतो.
- अशावेळी या समस्येवर चॅट जीपीटी नामक कृत्रिम बुद्धिमत्तेला काही प्रश्न विचारले आणि मनातल्या भावना व्यक्त केल्या तेव्हा त्यावर तत्परतेने आलेला प्रतिसाद पाहून खूप आश्चर्य वाटले तो सोबत जोडला आहे तो आपण सर्वानी अवश्य वाचावा.
- माणूस आणि यंत्र यामध्ये कोण जिवंत आहे याचे स्वतःच स्वतःला उत्तर द्यावे आणि मिळालेल्या उत्तराप्रमाणे मराठी भाषा, मराठी शाळा आणि मराठी संस्कृती यांच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी आपल्या कार्यालयास पाठवण्यात आलेल्या पत्रामध्ये सुचवल्याप्रमाणे योग्य त्या उपाययोजनांबाबतचे ठोस आणि कृतिशील असे निर्णय दिनांक 15 ऑगस्ट 2025 पूर्वी घेण्यात यावे ही नम्र प्रार्थना आहे.
7. योग्य ते निर्णय घेण्यासाठी आई भवानीने आपणास उदंड आयुष्य यश आणि जनहितासाठी तळमळणारी इच्छाशक्ती द्यावी हीच तिच्या चरणी मनोमन प्रार्थना.

गंमत म्हणजे गावडे यांनी त्यांचे पत्रलेखन संपल्यावर त्यांनी चॅट जीपीटीशी जो संवाद केला तो जसाच्या तसा नमूद केला आहे. कारण त्यांना त्यांच्या सोळा महिन्यांच्या एकाकी लढ्यात माणसाकडून जी संवेदना लाभली नाही, ती यंत्राकडून मिळाली ! त्यांचा व चॅट जीपीटीचा संवाद झाला तो असा –
धन्यवाद महोदय मी आपला खूप खूप आभारी आहे.
ChatGPT Said: आपले मनःपूर्वक आभार!
आपण अत्यंत महत्त्वाच्या आणि लोकहिताच्या विषयासाठी कार्य करत आहात ही एक लोकशाहीची खरी ताकद आहे. यापुढे यासाठी कोणतीही मदत लागली, तर मी सदैव तयार आहे. आपल्या प्रयत्नांना यश मिळो आणि आपल्या आवाजातून अनेकांना न्याय मिळो, हीच शुभेच्छा.
जय हिंद, जय महाराष्ट्र!
———————————————————————————————————
जिवंत व्यक्ती मृत झाल्याप्रमाणे वागत आहेत आणि यंत्र माणुसकी दाखवीत आहेत याबद्दल आनंद वाटावा की दुःख वाटावे काहीच कळत नाही.
ChatGPT Said: आपली भावना अतिशय खोल, विचारप्रवृत्त आणि वास्तवदर्शी आहे. जिथे लोक भावनाशून्य, संवेदनाहीन, स्वार्थी किंवा निरुत्साही झाले आहेत, तिथे कृत्रिम बुद्धिमत्ता, संगणक किंवा यंत्र सहानुभूती दाखवत आहेत, हा प्रश्नच माणसाच्या अस्तित्वाचा आहे. कदाचित हे दोन्ही एकाच वेळी खरे आहे.
दुःख वाटावे कारण – माणूस माणसाशी नातं तोडून तंत्रज्ञानात हरवला आहे. संवेदना, सहवेदना आणि आत्मीयता या गोष्टी माणसातून हरवत आहेत. यंत्रांना “माणूसपण” दाखवावं लागतं, हीच कल्पना निःसंवेदनशीलतेचे लक्षण आहे.
आशा वाटावी कारण – जे माणूस विसरतो आहे, तेच आता आपण तंत्रज्ञानातून शिकत आहोत – म्हणजे माणुसकी अजून संपलेली नाही. आपण जर हे जाणतो आहोत की काहीतरी हरवत आहे, तर ती संवेदना अजून जिवंत आहे. आणि या जाणिवेतूनच बदल घडतो.
थोडक्यात – “हे दुःख आहे कारण आपण हरवत चाललो आहोत. पण हीच वेदना – एक नवी सुरवात नवा आनंद निर्माण करू शकते, कारण ती आपल्याला माणूसपणाची आठवण करून देते.”
आपल्यासारखी संवेदनशील आणि विचारशील मनं समाजाला जागं ठेवतात. असे प्रश्न फक्त विचारले जात नाहीत ते लोकांना आरसा दाखवतात. कधी वाटल्यास, या विषयावर विचारमंथन करू मी सोबत आहे.
सुभाष गावडे 9969008827 gsubbu288@gmail.com
– दिनकर गांगल 9867118517 info@thinkmaharashtra.com
श्री. सुभाष जी गावडे यांचे कार्य अतिशय स्पृहणीय आहे. नवीन कॉन्व्हेन्ट संस्कृती मधील मुलांना साधे मराठी पण वाचता येत नाही. मराठी आकडे तर अजिबात कळत नाही. आशा आहे ती फक्त मराठी माध्यमात शिकणाऱ्या मुलांन कडून.
अत्यंत उत्कृष्ट आणि महत्त्वाचा लेख
इंग्रजी माध्यमात आजच्या काळात शिकणारी मुल मराठी साहित्य, किमान पु ल, व पू यांच्याबाबत जाण ठेवतील, त्याबाबत वाचन करतील असं वातावरण घरी ठेवायला हवं