कोंडाणे लेणी रायगड जिल्ह्यात कर्जत तालुक्यात त्याच नावाच्या गावात आहेत. बोरघाटातील राजमाची किल्ल्याच्या पायथ्याशी घनदाट अरण्य आहे. मोठे वृक्ष, महाकाय वेली आणि जंगली श्वापदे यांचा वावर तेथे असतो. त्यात वृक्षवेलींच्या-झाडझाडोऱ्यांच्या गुंत्यात लपल्या होत्या कोंडाणे लेण्यांच्या अप्रतिम शिल्पकृती. लेणी इसवी सनापूर्वी पहिल्या-दुसऱ्या शतकांत साकारण्यात आली. परंतु ती लेणी किर्र रान, मुसळधार पाऊस आणि भूकंप यांनी झालेली पडझड यांमुळे ओसाड होऊन गेली आणि विस्मृतीच्या पडद्याआड सारली गेली.
आधुनिक काळात लेणे प्रथम 1830 च्या सुमारास विष्णुशास्त्री बापट यांच्या नजरेस पडली. त्यांनी माहिती दिल्यावर ठाण्याचे तत्कालीन कलेक्टर लॉ यांनीही त्यास भेट दिली. विष्णुशास्त्री बापट यांनी लेण्यांच्या सौंदर्याचे वर्णन करून लेण्यांकडे जाण्याचा रस्ता अवघड असल्याचे नमूद केले होते. विष्णुशास्त्री यांना संस्कृत भाषेचे, तसेच ब्राह्मी लिपीचे ज्ञान होते. त्यांनी लेण्यांवरील शिलालेख वाचून त्यांचे मराठी भाषांतर केले होते.
लेण्यांचे ठिकाण दुसऱ्या बाजूने पुणे जिल्ह्यातील राजमाची या किल्ल्याच्या पायथ्याशी येते. राजमाची किल्ला परिसरातील घाटमाथ्यावरील कोकण दरवाजा पुणे व कोकण (रायगड जिल्हा) यांना जोडणारा आहे. कोकणातील कल्याण, सोपारा या प्राचीन बंदरांपासून बोरघाटमार्गे जुन्नर, पैठण या तत्कालीन महत्त्वाच्या व्यापारी नगरांत जाणाऱ्या मार्गाच्या परिसरात कार्ले, भाजे, बेडसे व कोंडाणे अशा जवळ जवळच्या चार ठिकाणी लेणी आहेत. कोंडाणे लेणी व भाजे लेणी समकालीन आहेत. त्या परिसरात जुन्या काळात झालेल्या मोठ्या भूकंपांमुळे लेण्याची पडझड झाली आहे. तसेच, व्यापारी मार्ग बंद झाल्यावर व्यापाऱ्यांकडून मिळणारा आश्रय संपल्याने त्या लेण्यांचे काम अपूर्ण राहिले. लेणी बौद्ध धर्मातील हीनयान पंथाची आहेत. त्यात स्तूप, चैत्यगृह, विहार अशी स्थानके आहेत. बौद्ध भिक्षूंना राहण्यासाठी लेण्यांचा वापर केला जात असे. प्रवास करणाऱ्या व्यापाऱ्यांनादेखील वाटेत विसावण्यासाठी लेणी उपयोगी ठरत. बुद्धाच्या महानिर्वाणानंतर बौद्ध धर्मगुरूंची पहिली महासभा बिहारमधील वेभार पर्वतावरील सप्तपण्णी या नैसर्गिक प्रशस्त गुहेत भरली होती. त्यावेळी बौद्ध धर्म प्रचारकांना बौद्ध भिक्षूंच्या निवासासाठी कृत्रिम गिरीगृह म्हणजेच लेणी खोदण्याची कल्पना सुचली असे म्हटले जाते. महाराष्ट्रातील पर्वतात असलेला पाषाण उत्तम पोताचा, घट्ट असल्याने महाराष्ट्रात सर्वात जास्त लेणी कोरली गेली आहेत.
कोंडाणे लेणी उल्हास नदीच्या खोऱ्यात, मर्कट पर्वताच्या कड्यामध्ये खोदलेली आहेत. ती इसवी सनापूर्वी दुसऱ्या शतकात खोदण्यात आली. हीनयान पंथातील साधा स्तूप हे बौद्ध धर्मातील मूल व शुद्ध स्थितीचे प्रतीक मानतात.
लेणीसमूह पश्चिमाभिमुख आहे. त्यात एक चैत्यगृह, सात विहार, एक पाण्याचे कुंड आणि ब्राह्मी भाषेतील दोन शिलालेख आहेत. लेण्यातील चैत्यगृह सुमारे सहासष्ट फूट लांब, चोवीस फूट रुंद व पंचवीस फूट उंच आहे. चैत्यगृहातील स्तंभ अष्टकोनी असून कोरीव कामाचे स्तंभ शीर्ष नसलेले आहेत. कलते खांब, झुकत्या भिंती, चैत्याचे अर्धवर्तुळाकार छत आणि लाकडी कड्या या लेणी निर्मितीमधील खुणा तेथे आढळतात. चैत्यगृहात एक व विहारात एक असे दोन स्तूप आहेत. चैत्य कमानीला पिंपळपानांसारखा आकार आहे. ते बौद्ध धर्माचे प्रतीक होय. बौद्ध लेण्यांमध्ये कमानींना पिंपळपानासारखा आकार केला जातो. कारण गौतम बुद्धाला अश्वत्थ म्हणजे पिंपळवृक्षाखाली ध्यानस्थ असताना ज्ञानप्राप्ती झाली. चैत्य कमानीच्या दोन्ही बाजूंस शिल्पपट कोरले आहेत. नृत्य करणाऱ्या युगुलांची शिल्पे तेथे आहेत. पुरुषांच्या हातात धनुष्यबाण, ढाल अशी आयुधे आहेत. चैत्यगृहाच्या दर्शनी भागातील डावीकडील भिंतीवर यक्षाचे शिल्प आहे. शिल्प भग्नावस्थेत आहे. त्या यक्षशिल्पाजवळ ‘कन्हाचा शिष्य बलक याने तयार केलेʼ या अर्थाचा ब्राह्मी लिपीतील मजकूर कोरलेला आहे.
विहारांमध्ये भिंतीत खोल्या आहेत. खोल्यांमध्ये काही ठिकाणी दोन दगडी बाक आहेत. बौद्ध भिक्षूंना राहण्यासाठी केलेली लेणी बौद्ध धर्माचा ऱ्हास झाल्यावर ओस पडली. कोंडाणे येथील लेण्यांची मुसळधार पाऊस, खडकांतील झिरपणारे पाणी आणि लेण्यांवर असलेला धबधबा यामुळे झीज झाली. लेणी कड्याच्या पायथ्याशी व धबधब्यालगत खोदू नयेत हे ज्ञान कारागिरांना कोंडाणे येथील आद्य लेण्यांमुळे मिळाले. कार्ले, भाजे, बेडसे येथील लेणी कोंडाणे लेण्यांहून उंचावर आहेत. मात्र कार्ले, भाजे या लेण्यांकडे असलेला पर्यटकांचा ओढा कोंडाणे येथे नाही.
– रजनी देवधर 7045992655 deodharrajani@gmail.com