निवडणुकीच्या काळात वर्तमानपत्रे वाचू नयेत व दूरचित्रवाणी वृत्तवाहिन्या पाहू नयेत असे वाटते, इतकी ती माध्यमे खऱ्या खोट्या, बऱ्या वाईट प्रचाराने बरबटलेली असतात. त्यात समाजमाध्यमे आल्याने गोंधळ, गलबला आणखीच वाढतो. पण तशातही काही लेखन मनाला भिडते, मन प्रक्षुब्ध करते. तसेच एक सदर दीपा कदम नावाची तरुण-तडफदार पत्रकार ‘सकाळ’च्या रोजच्या अंकात लिहिते. खरे तर, तो आँखो देखा हाल वर्णन करून सांगितलेला असतो. दीपा कदम निवडणूक काळात विदर्भातील गावोगावी फिरत आहेत व तेथून रोज एक प्रसंगचित्र शब्दांकित करून पाठवतात. त्यामधून राजकीय नेत्यांची बेफिकिरी, प्रशासनाचे क्रूर वाटावे असे औदासीन्य आणि जनसामान्यांची हताशता प्रकट होते. जनता अधिकाधिक परावलंबी होत चालली आहे आणि राजकारण्यांना तेच हवे आहे. त्यांना लोकांचे प्रश्न सोडवायचेच नाहीत...