गझल : दुसऱ्याच्या भूमीवरची शेती (Borrowing Gazal Ideas)

0
415

‘मोगरा फुलला’ या सदरात एक भाषांतरित लेख देत आहे. ‘गझल : दुसऱ्याच्या भूमीवरची शेती’ हे लेखाचे नाव थोडे विचित्र वाटू शकेल. प्रत्येक भाषेची स्वत:ची संस्कृती असते. उर्दूमध्ये आपल्यापेक्षा ज्येष्ठ असलेल्या कवी/शायर यांच्या गझलमधल्या ओळी घेऊन त्यापुढे स्वतःच्या ओळी जोडण्याची सर्रास पद्धत आहे. यात वाङ्मयचौर्य वगैरे न समजता ही ज्येष्ठ कवीला दिलेली मानवंदना आहे असे समजतात.

हिंदीतले प्रसिद्ध कवी आणि सिनेगीतकार देवमणी पांडेय यांच्या ह्या लेखाचे मराठी कवयित्री रेखा शहाणे यांनी भाषांतर केले आहे. अनेक सुप्रसिद्ध गझल आणि गीतांमधील देवमणी पांडेय यांनी दाखवून दिलेले साम्य मननीय आहे.  

‘मोगरा फुलला’ या सदरातले इतर लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

-सुनंदा भोसेकर

गझल : दुसऱ्याच्या भूमीवरची शेती

तुम्ही शायर आहात, म्हणून भले दावा कराल; की तुम्ही नवीन भूमीचा शोध लावलेला आहे. पण सत्य हे आहे, की तुम्ही दुसऱ्यांच्या जमिनीवरच शायरीचे पीक घेत आहात! असा एकही काफिया, रदीफ किंवा बहार शिल्लक नाही, की ज्याचा वापर शायरीमध्ये केला गेलेला नाही. काही काही जागा तर अशा आहेत की ज्यांचा अति वापर होऊन गेलेला आहे  आणि यापुढेही निरंतर होत राहील. 

उदाहरणार्थ, क्वचित कोणी असा शायर असेल ज्यांनी मोमीनसाहेबांच्या या भूमीवर, गझलचे पीक घेतलेले नाही.

तुम मेरे पास होते हो गोया,
जब कोई दूसरा नहीं होता.

तुम हमारे किसी तरह न हुए,
वर्ना दुनिया में क्या नहीं होता.

एक शायर लखनौमध्ये स्वातंत्र्यपूर्व काळात होऊन गेले, अर्सी लखनवी. त्यांचा एक शेर मुशायऱ्यांमध्ये फार लोकप्रिय होता.

कफ़न दाबे बगल में घर से मैं निकला हूँ ऐ अर्सी,
न जाने किस गली में ज़िंदगी की शाम हो जाए.

डॉ.बशीर बद्र यांनी स्वत:ची कलाकारी दाखवत कमाल केली. त्यांनी वरचा मिसरा मोठ्या नजाकतीने बाजूला सारला नि स्वतःचा मिसरा सादर केला. हा सुंदर शेर नंतर शायर बशीर बद्र यांचे ओळखपत्रच होऊन गेला, हे तर तुम्ही जाणत असणारच.

उजाले अपनी यादों के हमारे साथ रहने दो,
न जाने किस गली में ज़िंदगी की शाम हो जाए.

मी डॉ. बशीर बद्र यांना व्यक्तिगत प्रश्न विचारला होता, की अर्शी लखनवीचा हा मिसरा तुम्ही जाणूनबुजून उचलला होता का? त्यांनी उत्तर दिले, “हो, ही आमची परंपरा आहे. बघा, मी एक मिसरा बदलून हा शेर किती सुंदर बनवून टाकला.”

भोपाळचेच शायर डॉ. बशीर बद्र यांचा एक जानामाना शेर पाहा.

वो मेरा नाम सुनकर कुछ ज़रा शर्मा से जाते हैं
बहुत मुमकिन है कल इसका मुहब्बत नाम हो जाए

शेरी भोपाली बशीर बद्र यांना ज्येष्ठ होते. त्यांच्या मिसरावरूनच बशीर बद्र यांनी त्यांची गझल रचली असावी. मला वाटते की विचारांना सरहद्द नसते. म्हणजे जगातील कोणतेही दोन शायर एकसारखा विचार करू शकतात. ओळखपाळख नसलेले दोन कलाकार शायरीच्या एकाच जमिनीवर एकसारखी पिके घेऊ शकतात. मी 1975 मध्ये कोणाच्या तरी ओळी ऐकल्या होत्या, ज्या कदाचित अशा होत्या –

भीग जाती हैं जो पलकें कभी तनहाई में
कांप उठता हूं कि मेरा दर्द कोई जान न ले
ये भी डरता हूं कि ऐसे में अचानक कोई
मेरी आंखों में तुम्हें देख के पहचान न ले

पाकिस्तानच्या प्रसिद्ध कवयित्री परवीन शाकीर यांनीही या कल्पनेवर एक शेर लिहिला आहे.

काँप उठती हूँ मैं ये सोचके तनहाई में,
मेरे चेहरे पे तेरा नाम न पढ़ ले कोई.

विचारांची ही समानता दर्शवते, की विचारांच्या सीमा माणसाने निर्माण केलेल्या देशाच्या सरहद्दींपेक्षा भिन्न आहेत. शायर कैफी आझमी यांनी तरुणपणी एक गझल लिहिली होती. ती अशी आहे:

मैं ढूँढ़ता जिसे हूँ वो जहाँ नहीं मिलता
नई ज़मीन नया आसमाँ नहीं मिलता
वो तेग़ मिल गई जिससे हुआ है क़त्ल मेरा
किसी के हाथ का इस पर निशां नहीं मिलता

निदा फाजली यांनी तारुण्यात पदार्पण केले आणि त्यांनी कैफीसाहिबांचा हा मामला अशा प्रकारे पुढे नेला:

कभी किसी को मुकम्मल जहां नहीं मिलता
कभी ज़मी तो कभी आसमां नहीं मिलता

फिल्म ‘आहिस्ता-आहिस्ता’ मधे समाविष्ट असलेली निदासाहेबांची ही गझल भूपिंदर सिंहच्या आवाजात लोकांना एवढी आवडली, की लोक कैफीसाहेबांची गझल विसरून गेले ! मुशायरा रंगमंचावरही मनाला भावणारे प्रयोग पाहायला मिळतात. कधी कधी दोन शायर एकाच क्षेत्रात एकासारखाच दुसराही वाटावा असे समान शेर एकमेकांच्या उपस्थितीत वाचतात. श्रोते अशा शायरीचा खूप आनंद घेतात. कवी मुशायऱ्यांमध्ये मुनव्वर राणा यांचा एक शेर असा समोर आला:

उन घरों में जहाँ मिट्टी के घड़े रहते हैं.
क़द में छोटे हैं मगर लोग बड़े रहते हैं.

डॉ.राहत इंदोरी यांनी त्यांच्या अनोख्या शैलीत त्यांचा ध्वज असा फडकावला:

ये अलग बात कि ख़ामोश खड़े रहते हैं.
फिर भी जो लोग बड़े हैं वो बड़े रहते हैं.

या दोन्ही शायरांचे अभिनंदन करा, की त्यांनी त्यांचे कसब, कौशल्य यांनी लोकांना महान बनवले आहे. मुंबईतील मुशायरा रंगमंचावर सर्वात आधी हसन कमाल यांनी ही रचना ऐकवली:

ग़ुरूर टूट गया है, ग़ुमान बाक़ी है.
हमारे सर पे अभी आसमान बाक़ी है.

याच जमिनीवरचा शुजाउद्दीन शाहिदचा एक शेर समोर आला.

घरों पे छत न रही सायबान बाक़ी है.
हमारे सर पे अभी आसमान बाक़ी है.

यावर डॉ.राहत इंदोरी यांनी निकाल दिला:

वो बेवकूफ़ ज़मीं बाँटकर बहुत ख़ुश है,
उसे कहो कि अभी आसमान बाक़ी है.

यानंतर राजेश रेड्डी यांच्या तरन्नुमने चमत्कार दाखवला-

जितनी बँटनी थी बँट गई ये ज़मीं,
अब तो बस आसमान बाक़ी है.

राजेश रेड्डी हे अप्रतिम शायर आहेत. त्याच्याबद्दल हे प्रसिद्ध आहे, की तो मोठ्या जुन्या भूमीत मोठा नवा शेर म्हणतो. उदाहरणार्थ, जोश मल्सीयानी यांचा  शेर आहे:

बुत को लाए हैं इल्तिजा करके
कुफ़्र टूटा ख़ुदा ख़ुदा करके.

राजेश रेड्डी यांनी या जुन्या भूमीत नवे पीक काढण्याची अशी कमाल दाखवली, की त्यांच्या कारागिरीला जगजीत सिंगसारख्या प्रसिद्ध गायकाने त्यांच्या सुरांनी सजवले: 

घर से निकले थे हौसला करके
लौट आए ख़ुदा ख़ुदा करके

आकाश अजून शिल्लक आहे… अद्याप हे ठरलेले नाही की या जमिनीचा खरा मालक कोण आहे? याचा उल्लेख मी शायर निदा फाजली यांच्याकडे केला. ते हसले, “अजूनपर्यंत यांना पत्ता लागलेला नाही की आकाशाचेही तुकडे झाले आहेत. यांना एका विमानात बसवा आणि सांगा की परवानगीशिवाय दुसऱ्या देशात जाऊन दाखवा. त्यांना तात्काळ पत्ता लागेल की आकाशाची वाटणी झाली आहे की नाही.”  

तरुण शायर आलोक श्रीवास्तव यांच्या ‘आमीन’ या काव्यसंग्रहात प्रकाशित झालेल्या गझलमध्ये ‘आई’ या विषयावर एक शेर आहे: 

बाबू जी गुज़रे, आपस में सब चीज़ें तक़्सीम हुई तब-
मैं घर में सबसे छोटा था, मेरे हिस्से आई अम्मा.

आईविषयी शायर मुनव्वर राणा यांचा एक मतला आहे, ज्याला अमर्याद लोकप्रियता मिळाली:

किसी को घर मिला हिस्से में या कोई दुकां आयी.
मैं घर में सबसे छोटा था मेरे हिस्से में माँ आयी.

मला माहीत नाही, की यावर राणासाहेबांची प्रतिक्रिया काय आहे; पण आलोकजींचा दावा आहे, की त्यांचा शेरा नंतर पाच वर्षानी राणाजींचा मतला त्यांच्या नजरेस पडला. गझलच्या क्षेत्रात नेहमीच काही न काही मनोरंजक प्रयोग शतकानुशतके होत राहिले आहेत. कधी शायरांचे कल्पना-विचार एकमेकांशी टक्कर घेतात; तर कधी मिसरे. (शेरोशायरीमध्ये कुशल असलेल्या) खुदा-ए-सुखन मीर यांनी लिहिले होते:

बेख़ुदी ले गई कहाँ हमको,
देर से इंतज़ार है अपना.

हा विचार गालिबसाहेबांनी त्यांच्या शैलीत पुढे नेला:

हम वहाँ हैं जहाँ से हमको भी,
ख़ुद (कुछ) हमारी ख़बर नहीं आती.

मला वाटते, मिर्झा गालिब यांच्यावर ‘खुदाए-सुखन मीर’ यांचा प्रभाव खूप होता. मीरचा प्रभाव त्याच्यावर स्वच्छ-स्पष्टपणे दिसून येतो. उदाहरणार्थ, त्या दोघांमधील दोन शेर पाहा: 

तेज़ यूँ ही न थी शब आतिशे-शौक़,
थी ख़बर गर्म उनके आने की.
-मीर तकी मीर

थी ख़बर गर्म उनके आने की,
आज ही घर में बोरिया न हुआ.
-मिर्ज़ा ग़ालिब

होता है याँ जहां में हर रोज़ो-शब तमाशा.
देखा जो ख़ूब तो है दुनिया अजब तमाशा.
-मीर तकी मीर 

बाज़ी-चा-अतफ़ाल है दुनिया मेरे आगे.
होता है शबो-रोज़ तमाशा मेरे आगे.
-मिर्ज़ा ग़ालिब

‘उमराव जान’ या चित्रपटात, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते शायर शहरयार यांच्या गझलेचा मतला आहे:

दिल चीज़ क्या है आप मेरी जान लीजिये.
बस एक बार मेरा कहा मान लीजिये.

या गझलेने शहरयारला एका रात्रीत लोकप्रियतेच्या शिखरावर पोचवले. या कवितेतील दोन्ही शेर बिहारी शायर बिस्मिल अजीमाबादी यांच्या एका गझलशी संबंधित आहेत. त्यांच्या त्या गझलेतील ओळी पाहा:

दिल चीज़ क्या है आप मेरी जान लीजिये.
ख़ंजर को अपने और ज़रा तान लीजिये.
बेशक़ न मानियेगा किसी दूसरे की बात,
बस एक बार मेरा कहा मान लीजिये.
मर जायेंगे मिट जायेंगे हम कौम के लिए,

मिटने न देंगे मुल्क, ये ऐलान लीजिये.

बिस्मिल अजीमाबादी यांचा आणखी एक शेर आहे:

‘बिस्मिल’ ऐ वतन तेरी इस राह-ए-मुहब्बत में
इक आग का दरिया है और डूब के जाना है

त्याच भूमीवर जिगर मुरादाबादी यांचाही प्रसिद्ध शेर आहे:

ये इश्क़ नहीं आसां बस इतना समझ लीजे
इक आग का दरिया है और डूब के जाना है

मला माहीत नाही की दोन शायरांपैकी कोणी शेर आधी लिहिला आणि कोणी गझल लिहिली. प्रसिद्ध कवी-सिनेगीतकार शकील बदायुनी यांनाही इतरांचे मिसरे उचलताना त्यात काही चुकीचे आहे असे वाटले नाही. त्यांचे एक प्रसिद्ध चित्रपट गीत आहे:

ख़ुशी के साथ दुनिया में हज़ारों ग़म भी होते हैं
जहां बजती है शहनाई वहाँ मातम भी होते हैं…(बाबुल)

आता शायर दाग देहलवीचा हा शेर पाहा:

ख़ुशी के साथ दुनिया में हज़ारों ग़म भी होते हैं
जहां बजते हैं नागाड़े वहाँ मातम भी होते हैं

मी ‘ऐ मेरे वतन के लोगो’ या गाण्याचे प्रसिध्द गीतकार पं. प्रदीप यांना एकदा विचारले होते, की दोन लेखकांचे विचार एकमेकांशी टक्कर घेत असतील तर ते चुकीचे आहे का? त्यांनी उत्तर दिले, की कधी कधी एका रचनाकाराची रचना, दुसऱ्या रचनाकाराला एवढी आवडते, कौतुकास्पद वाटते, की त्यात गुंतलेली विचारांची मालिका पुढे न्यावी असे दुसऱ्या रचनाकाराला वाटते. म्हणजेच, त्याला त्याच्या आधीच्या रचनाकाराचा त्याच्या विचारांचा, कल्पनेचा आदर करायचा असतो. चरक दर्शनाचे सूत्र आहे – चरैवेति चरैवेति, म्हणजेच चला रे… चला रे…. 

कवी रवींद्रनाथ टागोरांनी हा विचार पुढे नेला: ‘एकला चलो रे.’  

लोकांना आणि मलाही एकटे फिरण्याची कल्पना आवडली. मी या कल्पनेचा सन्मान करत एक गाणे लिहिले आणि माझे गाणेही लोकांना खूप आवडले:

चल अकेला… चल अकेला… चल अकेला,
तेरा मेला पीछे छूटा साथी चल अकेला…

असे म्हटले जाते, की ‘साहित्यातूनच साहित्य निर्माण होते.’ मित्रांनो! दोन लेखकांचे विचार एकमेकांशी टक्कर घेत असल्याचा आरोप महान कवी निराला यांच्यावरही झालेला आहे (संबधित लेखाच्या शीर्षकानुसार ‘भावों की भिड़न्त’ चा आरोप) माझ्या मते एखाद्या कवीने दुसऱ्या कवीचा मिसरा वापरला तर त्याचा उल्लेख त्यांनी करायला हवा. मिर्झा गालिब यांच्यानंतर गझलमध्ये नवीन काही लिहिण्यासारखे राहिलेले नाही असे वाटत होते. पण त्यांच्या नंतरही त्या भूमीवर अनेक नव्या गोष्टी लिहिल्या, सांगितल्या गेल्या, सर्वांनीच त्यांच्या शैलीत त्यांचे म्हणणे मांडण्याचा प्रयत्न केला. असे वाटते, की इतरांच्या जमिनीवर स्वतःची शेती करण्याचा हा मामला पुढेही चालूच राहील. लोक त्यांच्या त्यांच्या मर्जीनुसार मनाला येईल त्या जमिनीवर मनासारखे हवे ते पीक घेत राहतील.

– देवमणी पांडेय

भाषांतर: रेखा शहाणे 9029004770 rekhashahane@gmail.com

देवमणी पांडेय यांचे चार कवितासंग्रह आणि ‘अभिव्यक्ति के इंद्रधनुष’, ‘सिनेगीतकार’ व ‘सिने जगत के शब्दशिल्पी’ अशी लेखांची पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांनी मुंबईतील सांजदैनिक, ‘संझा जनसत्ता’ मध्ये अनेक वर्षे ‘साहित्यनाम’ हा साप्ताहिक स्तंभ लिहिला आहे. त्यांनी लिहिलेल्या गझल नया ज्ञानोदय, हंस, कथादेश इत्यादी प्रमुख साहित्यिक नियतकालिकांमध्ये प्रकाशित होतात. काही राष्ट्रीय पुरस्कार त्यांच्या नावावर जमा आहेत. त्यांनी दूरदर्शनवरच्या मालिकांची शीर्षक गीते, चित्रपट गीते आणि खाजगी संगीत अल्बमकरता गीते लिहिली आहेत.

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here