पुस्तकांचा संग्रह आणि त्यांची देवघेव करण्याचे ठिकाण म्हणजे ग्रंथालय, एवढाच विचार लोकमानसात असतो. परंतु बदलत्या काळ-परिस्थितीत ग्रंथालयांना तेवढेच कार्य करून पुरेसे ठरणार नाही. त्यांना सांस्कृतिक केंद्राचे नवे, विस्तारित रूप घ्यावे लागेल. तेथे केवळ वाङ्मय नव्हे तर विविध विद्याशाखांचा पाठपुरावा करावा लागेल- वेगवेगळी माध्यमे वापरावी लागतील- ज्ञान संकलन व ज्ञान प्रसारण हे त्यांचे मुख्य कार्य राहील असा अभिप्राय चिपळूण येथे ‘लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर’ आणि ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’ यांनी आयोजित केलेल्या ‘ग्रंथालय मित्र मंडळ’ मेळाव्यात व्यक्त झाला. लेखक व विविध विषयांचे तज्ज्ञ व्यावसायिक आणि रत्नागिरी जिल्हा बँकेचे अध्यक्ष तानाजीराव चोरगे यांनी मेळाव्याचे उद्घाटन केले.
चोरगे म्हणाले, की मोबाईलच्या आभासी विश्वात आजकालची तरुण पिढी वाचन विसरली आहे. आईवडिलांनाही त्यासाठी वेळ नाही. त्यामुळे ग्रंथालयात पुस्तकांना वाचक नाहीत. अशा कठीण स्थितीत ‘ग्रंथालय मित्र मंडळा’सारखी संस्था समाजजागृतीसाठी कार्य करत आहे हे कौतुकास्पद आहे. त्यांनी रत्नागिरी जिल्हा बँक आणि अशा अनेक संस्था याकामी नक्कीच सहकार्य करतील अशा शब्दांत उपस्थितांना आश्वासित केले.
‘ग्रंथालय मित्र मंडळा’चे प्रवर्तक सुधीर बडे, ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’चे मुख्य संपादक दिनकर गांगल आणि ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’चे संचालक गिरीश घाटे यांनी दिवसभराच्या चर्चासत्राचे प्रास्ताविक मांडले. त्यांचा प्रस्ताव एवढाच होता, की वाचन कमी झाले आहे. ते पुढील काळात आणखी घटणार आहे. केवळ छांदिष्ट लोक वाचत राहतील. त्यामुळे ग्रंथालयांचा लोकाश्रय कमी होणार हे स्वाभाविक आहे. म्हणूनच या टप्प्यावर ग्रंथालयांनी त्यांची भूमिका जाणावी आणि कार्यविस्तार करावा. ज्ञानाची; तसेच, मनोविनोदनाची नवनवीन साधने उपलब्ध होत जाणार आहेत- त्यांचा फायदा घेऊन, ग्रंथालयांनी त्यांच्यापुढे ज्ञानप्रसार हे व्यापक उद्दिष्ट ठेवावे. वाचन ही सुद्धा ज्ञानसाधनाच होती.
मेळाव्यास चिपळूण व जवळच्या तालुक्यांतील ग्रंथालयांचे पदाधिकारी, ग्रंथपाल आणि लेखक-प्राध्यापक उपस्थित होते. ‘ग्रंथालय मित्र मंडळा’च्या गावोगावी मेळावे घेण्याच्या मोहिमेचे अध्यक्ष डॉ. रविन थत्ते यांनी मोहिमेतील या पहिल्या कार्यक्रमास संदेशपर भाषण लिहून दिले होते. ते ‘लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर’च्या सभासद मनीषा दामले यांनी वाचून दाखवले. तर ‘लोटिस्मा’चे कार्याध्यक्ष धनंजय चितळे यांनी सर्व प्रतिनिधींचे स्वागत केले.
चर्चेस प्रत्यक्ष आरंभ करताना देवरुखचे गजानन केशव जोशी यांनी ग्रंथालये नवनवीन वाचकांना आकृष्ट करण्यासाठी कसे अनेक उपक्रम योजू शकतात हे विविध उदाहरणांनी दाखवून दिले. राजापूर येथील पाचल या दुर्गम भागातील गावी ग्रंथालय निष्ठेने चालवणारे किशोर नारकर यांनीही मुख्यत: स्पर्धांच्या माध्यमातून बालवाचकांना खेचून कसे घेता येते ते सांगितले. त्यांनी त्यांच्या ग्रंथालयाने सलून, देवळे, बाजार येथे ‘वाचनकट्टे’ चालवले असल्याची अभिनव माहिती दिली.
परंतु चर्चासत्राच्या मुख्य विषयाला तोंड फोडले ते श्रीवर्धनच्या ग्रंथालयाचे अध्यक्ष मनोज गोगटे यांनी. ते म्हणाले, की राज्यात बारा हजार ग्रंथालये आहेत. त्यांना असणारे सरकारी अनुदान जर बंद झाले तर त्यांपैकी दहा हजार ग्रंथालये बंद पडतील. त्यामुळे ग्रंथालयांना लोकांचा पाठिंबा मिळावा असे वाटत असेल तर त्यासाठी ग्रंथालयांनी नव्या वाटा शोधल्या पाहिजेत, त्यांनी नवा अवतार घेणे क्रमप्राप्त आहे. तो नवा अवतार सांस्कृतिक केंद्रांचा असेल तर विविध स्तरांतील लोक वेगवेगळ्या कारणांनी ग्रंथालयांकडे पुन्हा वळू लागतील. प्राची जोशी, विनिता नातू, राजकुमार सावंत, अरुण इंगवले, राष्ट्रपाल सावंत, सुहास बारटक्के, कैसर देसाई, विवेक कदम इत्यादींनी चर्चेत सहभाग घेतला.
ग्रंथालये स्वातंत्र्यपूर्व काळात सुरू झाली ती वाचनप्रसाराच्या ओढीने. पुस्तके-मासिके यांच्याबद्दल समाजात आकर्षण होते. ग्रंथवाचनातून माणूस सुजाण, सुसंस्कृत व ज्ञानी होतो असा विश्वास होता. नंतरच्या काळात नवनवीन माध्यमे आल्यावर लोकांचा तो विश्वास घरंगळत गेला आहे आणि गावोगावची जुनी ग्रंथालये या ऐतिहासिक वास्तू म्हणून शिल्लक राहिल्या आहेत. चिपळूणचे ‘लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर’ यासारखी जी ग्रंथालये नवनवीन उपक्रम करतात तेथे लोक वारंवार येत असतात असे आढळून आले आहे.
बडे यांनी गावोगावी ‘ग्रंथालय मित्र मंडळे’ कशी बनवता येतील याबाबत माहिती दिली. गावातील इच्छुक लोकांनी एकत्र येऊन मंडळ बनवावे. ते रजिस्टर करावे. अशा गावोगावच्या नोंदणीकृत ग्रंथालय मित्र मंडळांना नेटवर्कने जोडता येऊ शकेल. तो महाराष्ट्रव्यापी कार्यक्रम होईल. यापुढील असे मेळावे नांदेड, धुळे, अलिबाग येथे घेण्याच्या दृष्टीने विचारणा आल्या आहेत असेही बडे यांनी सांगितले. चर्चेत डॉ. रत्नाकर सीताराम थत्ते यांनी ते व्यक्तिश: करत असलेल्या ग्रंथप्रसार प्रयत्नांची माहिती दिली. त्यांचे प्रयत्न ‘ग्रंथालय मित्र मंडळा’साठी नमुना म्हणून उपयोगी वाटले. दातार-बेहेरे-जोशी महाविद्यालयाचे प्राचार्य माधव बापट यांनी चर्चासत्राचा अध्यक्षीय समारोप केला. ते म्हणाले, की महाविद्यालयीन ग्रंथालये विविध पुस्तकांनी भरगच्च अशी भरलेली असतात. तथापी, विद्यार्थी त्यांचा लाभ उठवत नाहीत असाच आमचा अनुभव आहे. ‘लोटिस्मा’चे जुने, खंदे कार्यकर्ते प्रकाश देशपांडे यांनी चर्चासत्र उपयुक्त ठरले असल्याचा हवाला देत दिवसभराच्या कार्यक्रमाचा शेवट केला.
– थिंक महाराष्ट्र
खर आहे. गावागावातली ग्रंथालये ओस पडत चालली आहेत.
नवीन तंत्रज्ञानाचाच हा परिणाम दिसतोय.
तरुण पिढी आकर्षित होईल, असे नवनवीन उपक्रम राबवले गेले तरच ग्रंथालयांना जीवनदान मिळेल.
चर्चासत्रातून चांगली माहिती मिळाली.
धन्यवाद. संजीवनी साव.
30 नोव्हेंबर 2024.