बकुळीचे झाड हे मूळचे भारतीय उपखंडातील झाड आहे. त्याच्या फुलांचा सुगंध मोहक आहे आणि रूप मनोवेधक आहे. हे झाड औषधी वनस्पतीही आहे. पूर्ण वाढलेले बकुळीचे झाड त्याच्या भरगच्च आकारामुळे दिसतेही सुंदर. बारमाही हिरवेगार असणाऱ्या त्या झाडाखाली दाट सावली असते. बकुळीच्या फुलांचे वेड सर्वांना, विशेषत: मुलींना असते. त्या फुले गोळा करत बकुळीच्या झाडाखाली तासचे तास रमू शकतात. या बहुगुणी झाडाविषयी डॉ. मंजूषा देशपांडे त्यांच्या आठवणी आणि अनुभव सांगत आहेत. वाचकांपैकी अनेकांपाशी असे अनुभव असतील. त्यांतील वेगळे अनुभव ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ वेबपोर्टलवर प्रसिद्ध करता येतील.
‘मोगरा फुलला’ या सदरातील इतर लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
– सुनंदा भोसेकर
बकुळफुलांचा अक्षयगंध…अक्षयरंग
बकुळफुलांची आणि माझी ओळख खूप जुनी आहे. आमच्या शाळेत बकुळीचं एक झाड होतं. खूप जुनं. त्यामुळे त्याची फुलं टपोरी नसत. थोडीशी चिमुकली. शाळेत कधी उशिरापर्यंत थांबण्याची वेळ आली आणि आम्ही बकुळीच्या झाडाखाली खेळत असलो, की ती फुलं हळूहळू जमिनीवर पडत असलेली दिसत. आम्ही ती फुलं वेचून पुस्तकात ठेवत होतो. आमच्या दहावीच्या बॅचने त्या झाडाखाली पार बांधून दिला आहे. पावसाळ्यातील संध्याकाळी तो पार त्या चिमुकल्या बकुळफुलांनी भरून जातो. आमच्या नाती शोभतील अशा वयाच्या मुली त्या झाडाखाली चिवचिवत असतात.
खरं सांगायचं तर मला बकुळीचा वास लहानपणी अजिबात आवडायचा नाही. पण बाकी सगळ्यांना जे फारच आवडतं, ते आपल्याला आवडत नाही असं म्हटलं तर पंचाईत होईल असं वाटून मी तो सुगंध अक्षरशः आवडून घेऊ लागले. अर्थात असं असलं तरी मला शाळेतील ते झाड आवडायचं आणि ती फुलंसुद्धा. बकुळीचं फुल देखणं नसतं असं काही माणसं म्हणतात. पांढरी किंवा ऑफव्हाईट रंगाची किंचित चॉकलेटी कडा असलेली बारीक केसराची नाजूक बकुळफुलं किती सुंदर दिसतात ! मला बकुळीच्या सुगंधाच्या अगोदर तिचं रूपच आवडत असे.
पण त्या फुलांना बहुधा मला त्यांच्या सुगंधाच्या प्रेमात पाडायचं होतं. आमच्या वाड्याच्या मालकीणबाई, ताई मुडशिंगीकर यांचे डॉक्टर भाऊ, भूपालमामा पन्हाळ्याला राहत असत. त्यांना राहण्यासाठी मोठ्ठे क्वार्टर होते. आम्ही एकदा ताईंबरोबर त्यांच्या घरी राहायला गेलो होतो. त्यांच्या आवारात आणि पन्हाळ्याच्या आतील रस्त्यावर बकुळीची अक्षरशः हारीने मोठाली झाडे होती. रोज संध्याकाळी त्या झाडांखाली फुलांचा एवढा सडा पडायचा की बस ! बकुळीची फुलं जेव्हा झाडावरून गळून पडतात तेव्हा अगदी सूक्ष्म असा अगदी कोवळ्या गंधाराचा हळुवार नाद येत असतो. तो नाद मला अजूनही चांगला ऐकायला येतो…पण तो नाद मला कोणाला ऐकवता मात्र येत नाही !
मी तिथं अक्षरशः टोपल्या भरभरून फुलं वेचून आणत असे आणि रात्रीची जेवणं होईपर्यंत फुलांच्या माळा करत बसे. बकुळीच्या फुलाला आपसूकच छिद्रं असतात. त्यामुळे केळीच्या सोपाच्या दोऱ्यात ओवून माळा करता येत. तिथं शेजारी राहणारी एक मुलगी सुट्टीच्या दिवशी पन्हाळ्याच्या स्टँडवर माळा विकत असे. तिला दोन, तीन आणि चार पदरी अशा बकुळीच्या माळा विणता येत असत.
त्यावेळी नेमकं तिथं कुठल्या तरी मराठी सिनेमातील नाचाचं शूटिंग होतं. त्या नाचातील सगळ्या मुलींना हातात, दंडात, पायात, केसांत आणि गळ्यातही बकुळफुलांच्या माळा घालायच्या होत्या. त्या दिवशी आमच्या त्या नव्या मैत्रिणीला आणि मलाही मनसोक्त फुलं वेचून भरपूर माळा गुंफायला मिळाल्या.
त्यानंतर कितीतरी दिवस बकुळीच्या माळा करून मीही त्या माझ्या हातात, दंडात आणि केसांत बांधत असे. माझी आई अशा वेळी ‘काय हा नादिष्टपणा !’ म्हणून कपाळावर हात मारी. पण माझी असली कुठलीही वेडं फार काळ टिकत नाहीत हे तिला माहीत होतं. मी साधारण बारातेरा वर्षांची असताना, सांगली आकाशवाणीवर एका मुलीने ‘बकुळफुलांची अक्षयगंधा… तुझी नी माझी मैत्री असावी’ अशी एक कविता म्हटली होती… झालं..! आम्ही मैत्रिणी एकमेकींना वाढदिवसाला किंवा गट्टी फू नंतर बोलाबोली झाली की हमखास ती ओळ ऐकवत असू…
आमच्या कोल्हापूरात गावाबाहेर कात्यायनीचं मंदिर आहे. आम्ही तिथं वनभोजनासाठी अनेकदा जात असू. देवळाच्या मागे बकुळीचं मोठ्ठं झाड आहे. तिथलीही फुलं आकारानं लहान असली तरी त्यांचा सुगंध दूरवर येत असतो. बकुळफुलं अशी कुठेतरी भेटायचीच. हळूहळू बकुळफुलांची आणि माझी मैत्री अधिक घट्ट होत होती. एकदा आमच्या शाळेची ट्रीप चाफळला राममंदिरात गेली होती. त्या मंदिराच्या भोवतीही बकुळीची भरपूर झाडं आहेत. तिथल्या श्रीराम, सीतामाई, लक्ष्मण यांच्यासह सर्व देवांना बकुळीचे मोठाले हार घातलेले असतात.
मी साधारण बारावीत असताना माझ्या अगदी जवळच्या मैत्रिणीच्या भावाचं लग्न गोव्यात केरीला त्यांच्या मंदिरात होतं. मंदिराच्या आजुबाजूला नारळीपोफळीचं हिरवंगार आगर होतं. त्यांच्याकडे प्रत्यक्ष लग्न लागण्याच्या अगोदर नवरानवरी त्या आगरात जाऊन, बकुळफुलांच्या मोठाल्या माळा एकमेकांना घालतात. नव्या नवरीच्या अंबाड्यावर बकुळ, अबोली, पांढरी फुलं आणि हिरवी पानं माळलेली असतात. मला तो विधी इतका आवडला की बस ! ती नवरानवरी आठवली की मला कसलासा आनंद होतो ! फुललेल्या बकुळीचे आणि माझे काय ऋणानुबंध आहेत, देव जाणे ! विशेषतः माझं मन अस्वस्थ असेल किंवा मी काही चुकीचा विचार करत असेन तर ती जवळपास कुठेतरी असतेच. तिला पाहिलं की माझे मन शांत होतं. मी आणि माझी एक मैत्रीण आम्ही रोज युनिव्हर्सिटीत संध्याकाळी फिरायला जात असू. त्या दिवशी कशामुळे तरी मी विमनस्क मनस्थितीत होते. फिरताना, मी काहीच बोलत नव्हते. ती काहीतरी सांगत होती. माझं तिच्याकडे लक्ष नव्हतं. आम्ही नेहमीपेक्षा वेगळ्याच रस्त्याने फिरत होतो. तर अचानक मला समोर एक लहानसं अगदी हाताला येतील एवढ्या फुलांनी भरलेलं बकुळीचं झाड दिसलं. एरवी, बकुळीला फुलं येण्यास बरीच वर्षं लागतात पण कलमी झाडांना फुलं लवकर लागतात.
आमच्या युनिव्हर्सिटीत कलमी बकुळीची भरपूर झाडं लावली आहेत. ती सगळी झाडं बाहेरच्या दर्शनी रस्त्यांवर आहेत. ती फुलं टपोरी छान असतात पण त्यांना सुवास तेवढा नसतो. त्या आडरस्त्यावर फुललेलं बकुळीचं ते झाड पाहिलं आणि माझ्या मनातील सगळी अस्वस्थता संपूनच गेली ! मन उत्साहानं भरून गेलं… मी म्हटलं, “अरे, इथं हे बकुळीचं झाड… आपल्याला यापूर्वी कधी दिसलंच नव्हतं.” आम्हाला दोघींनाही फारच मजा वाटली. आम्ही त्या बकुळीला फेऱ्या काय मारल्या… आम्हाला येत असलेली अगदी ‘बकुळफुला कधीची तुला धुंडते बनात’… पासून ‘शब्द शब्द जपून ठेव बकुळीच्या फुलापरी’… ते ‘या बाई या, बकुळीच्या झाडाखाली फुले वेचू या…’ अशी सगळी गाणी म्हटली. कितीदा तरी बकुळीची बहरलेली झाडं मला अशी अचानक कुठेही भेटलेली आहेत !
अलिकडच्या काळात भारतातील स्थानिक झाडांचा अभ्यास करताना, हे बकुळीचं झाड अगदी अस्सल भारतीय असल्याचं लक्षात आलं. भवभूतीनं लिहिलेल्या ‘मालती माधव’ या बृहद संस्कृत नाटकात मालती नेहमी बकुळीच्या अनेक पदरी माळा माळत असे, असा उल्लेख आहे. ते झाड समुद्र किनाऱ्यालगतच्या उंच डोंगरावर आणि काहीशा दमट आणि थंड हवेतही साधारण एप्रिल ते जून महिन्यात खूप बहरतं. कलमी झाडं तर कधीही बहराला येतात.
बकुळीचं झाड बहुगुणी आहे. त्याची पानं आणि त्याच्या खोडाची साल आणि बकुळीची कच्ची फळं पाण्यात टाकून ते पाणी प्यायल्यास सर्व प्रकारच्या मूत्र रोगांवर उपयुक्त असतं. बकुळीच्या पानांचं चूर्ण दंतरोगावर वापरतात तर बकुळीच्या काड्या दंतधावन म्हणून वापरल्यास हिरड्या मजबूत होतात. अनेक आदिवासी लोक बकुळीच्या फुलांचं चूर्ण सुपारीत घालून खातात. त्यानं स्मरणशक्ती सुधारते. बकुळीची फुलं हे एक उत्तम ब्रेन टॉनिक आहे असं मानलं जातं. बकुळीची फुलं पाण्यात घालून ते पाणी प्यायल्यास आकलन शक्ती; विशेषत: लहान मुलांची वाढते, असं म्हणतात. बकुळीच्या वाळलेल्या फुलांमुळे वाळवी लागत नाही. बकुळीच्या पिकलेल्या पिवळसर फळातील गर पिठूळ असतो. पण ती फळं खाल्ली की बराच वेळ भूक लागत नाही. त्या फळांना ‘स्पॅनिश चेरी’ म्हणतात.
बकुळीची फुलं संध्याकाळी झाडाखाली पडतात. त्याचवेळी ती फुलं गोळा करून दुसऱ्या दिवशी देवाला वाहतात, त्यामुळे त्या फुलांना मालवणी कोकणीत ‘ओवळी’ म्हणतात. बकुळीचं फूल हे शिवपत्नी पार्वतीचं रूप आहे असं मानलं जातं. ते शिवाला अत्यंत प्रिय आहे. बकुळीची फुलं, सर्प आणि विंचू यांच्या दंशावर उपयुक्त असतात. बकुळीची फुलं आणि फळं, स्त्रियांची प्रजनन क्षमता वाढवण्यासाठी वापरतात. म्हणूनही लग्नात आणि वयात आलेल्या मुली बकुळीच्या माळा घालतात. तोडा जातीच्या आदिवासी लोकांमध्ये बकुळीच्या फळांचा रस, मुलं चित्रकार, गायन आणि नृत्य निपुण व्हावीत यासाठी वापरला जातो. ही सगळी माहिती कळल्यावर तर मला बकुळीविषयी प्रेमाबरोबर आदरही वाटू लागला.
बकुळफुलांनी माझं बालवय, नवथर किशोरवय, परिपक्व तारूण्य आणि आता संध्याछाया … सजलेल्या आहेत. माझ्या अवखळ मनापासून ते प्रौढ आणि काहीशा शांत झालेल्या मनाचे सगळे विभ्रम बकुळफुलांच्या साक्षीनं बदलत गेलेले आहेत. अगदी अलिकडे या बकुळीच्या झाडानं मला निसर्गाचा सुंदर आविष्कार दाखवला. सांगलीला माझ्या एका मैत्रिणीच्या घरच्या अंगणात तिच्या आजोबांनी लावलेली बकुळीची दोन मोठी झाडं आहेत. त्याच्या खाली सुंदर पार बांधलेला आहे. आम्ही वैशाख पौर्णिमेच्या संध्याकाळी त्या पारावर कॉफी पीत गप्पा मारत होतो. संध्याकाळ हळूहळू गडद होत होती. झाडावरून बकुळीची फुलं अलगद निसटून जमिनीवर येत होती. बकुळीच्या दाट पानांच्या आडून एकेक चांदणी आकाशात जणू उमलत येत होती. बकुळीची पानं त्या निळ्या चांदण्यात न्हाऊन निघाली होती. इतकं अद्भुत दृश्य होतं ते..! … बकुळीची ती फुलं, तो मंद सुगंध, ते निळं आकाश, त्या फिकटशा चांदण्या, त्या बकुळीची हिरवट काळी पानं… गप्पा मारता मारता आम्ही त्या दृश्यात कधी हरवून गेलो हे आम्हाला कळलंसुद्धा नाही.. किती वेळ झाला… निळं चांदणं शुभ्र झालं, आकाश निळं झालं… जणू त्या पौर्णिमेच्या चांदण्यात ती बकुळ आणि आम्ही त्या शुभ्र किनारीच्या निळ्या प्रकाशाचे कवडसे झालो होतो… आकाश, फुलं, तो गंध, ती पानं, चंद्र, चांदण्या आणि या सर्वातून निसर्गाचा एकच सूर वाहत आहे… आणि ते स्वर्गीय संगीत आपल्याच ह्रदयात वाजतं आहे याची जाणीव करून देणारे ते क्षण होते… बकुळीनं मला दिलेलं ते सर्वोच्च दान आहे.
– मंजूषा देशपांडे 9158990530 dmanjusha65@gmail.com
आज बऱ्याच वर्षांनी स्मृती चाळवल्या गेल्यात.
कारण मी ज्या ठिकाणी नोकरी करत होतो त्या विदर्भ मिल्सच्या गेस्ट हाऊस मधेही भल मोठ बकुळीचं झाड होतं.आम्ही लहानपणी बरेचदा तिथं फुलं गोळा करायला ( वडीलही तिथेच नोकरीस होते.माझा जन्मही तिथलाच व पुढे नोकरीही.)जात असू. सावली इतकी घनदाट की उन्हाळ्यातही चहापान खाणंपिणं तिथेच व्हायचं.महत्वाच्या मीटिंग ही तिथेच अर्थात प्रॉब्लेम्स वर सोल्युशन ही तिथेच मिळायचे.त्यामुळे त्याला कुणीतरी “बोधिवृक्ष” अशी उपमा दिली होती.आणि गमतीचा भाग असा की संपूर्ण NTC मधे अचलपूर च्या विदर्भ मिल्स चे बकुळीचं झाड बोधीवृक्ष याच नावाने प्रसिद्ध होत.पुढे नवीन मिल च्या बांधकामात ते तोडल्या गेलं त्यावेळी ते जवळपास ८० वर्षांचे होतं.
खूप आठवणी त्याशी निगडित आहेत.
प्रस्तुत लेख खूपच छान लिहिलाआहे.गतकाळात घेऊन गेल्याबद्दल धन्यवाद.
नमस्कार,खूप छान लेख मंजुषाताई…
आम्ही मैत्रिणी लहानपणी बकुळफुले वेचून कडुलिंबाच्या पानाच्या ओवायचो.. ती एकाबाजूने जाड असल्याने फुले ओघळून जात नसत. याफुलाला पाकळ्या किती असतात? उगीच पडलेला प्रश्न…