महत्त्वाकांक्षी ‘महाभूषण’ प्रकल्प
समाजकार्यकर्ते नानाजी देशमुख यांच्या जीवनकार्याचा परिचय करून देणारे संकेतस्थळ मंगळवारी, 8 जुलैला खुले झाले. हे संकेतस्थळ ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’च्या वतीने जन्मशताब्दीवीरांच्या प्रकल्पांतर्गत तयार केले आहे. (https://nanaji-deshmukh.mahabhushan.com). वेबसाइटचे लेखन ललिता घोटीकर यांनी केले आहे आणि संपादन गिरीश घाटे यांनी.
नानाजी देशमुख यांचे मूळ नाव चंडिकादास अमृतराव देशमुख. त्यांचा सामाजिक कार्यकर्ता आणि राजकारणी म्हणून मोठा लौकिक होता. त्यांनी शिक्षण, आरोग्य आणि ग्रामीण स्वावलंबन या तीन क्षेत्रांत मुख्यत: काम केले. नानाजी यांचे जीवन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत घडले. त्यांनी संघ प्रचारक म्हणून काम केले. त्यांचा भारतीय जनसंघ, जनता पार्टी आणि भारतीय जनता पक्ष यांच्या स्थापनेत सहभाग होता.
त्यांनी साठाव्या वर्षी राजकारणातून निवृत्ती घेतली आणि गोंडा, बीड, चित्रकूट येथे ग्रामविकास प्रकल्पांची उभारणी केली. त्यांचे ‘मैं अपने लिये नहीं, अपनों के लिये हूँ |’ हे ब्रीदवाक्य होते. नानाजी देशमुख हे महाराष्ट्रात जन्मले, पण त्यांनी उत्तरप्रदेश व मध्यप्रदेश येथे अधिकतर काम केले. त्यांच्यावर दीनदयाळ उपाध्याय यांच्या विचारांचा प्रभाव होता. भारत सरकारने पद्मविभूषण आणि मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देऊन त्यांना गौरवले.
‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’ हे 1900 ते 1930 या काळात महाराष्ट्रात जन्मलेल्या महनीय व्यक्तींची समग्र संकेतस्थळे तयार करत आहे. प्रकल्पात सुमारे तीनशे वेबसाइट तयार होणार आहेत. पैकी साने गुरुजी, स्वामी रामानंद तीर्थ, एस.एम.जोशी, व्ही. शांताराम, आबासाहेब गरवारे आणि इरावती कर्वे या सहा वेबसाईट पूर्ण झाल्या आहेत. नानाजी देशमुख यांचे संकेतस्थळ हे या मालिकेतील पुढची पायरी आहे. गोविंदभाई श्रॉफ आणि यास्मिन शेख यांच्या वेबसाइट महिनाभरात पूर्ण होणार आहेत. या प्रकल्पाचे नाव ‘महाभूषण’ संकेतस्थळे असे आहे.
प्रकल्प सूत्रधार गिरीश घाटे म्हणाले, की संकेतस्थळावर नानाजींच्या आयुष्यातील दुर्मीळ क्षण, कार्यक्षेत्रातील विविध टप्पे, त्यांचे विचार आणि प्रेरक कथा मांडल्या आहेत. या तीनशे वेबसाइटमुळे महाराष्ट्राचा गेल्या दोनशे वर्षांचा सामाजिक व सांस्कृतिक इतिहास झळाळून उठेल आणि त्याचबरोबर मराठी समाजाचे संस्कृतिसंचित रेखले जाईल. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या काळात या गोष्टीला फार मोठे महत्त्व आहे.
– प्रतिनिधी