भारतरत्न पां.वा. काणे (BharatRatna P.V. Kane)

0
619

भारतरत्न पांडुरंग वामन अर्थात पां.वा. काणे हे अलौकिक व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी एका मानवी आयुष्यात विविध तऱ्हांचे ज्ञानसंशोधनात्मक व संघटनात्मक अफाट कार्य केले. त्यांचे सर्वात मोठे काम म्हणजे त्यांनी भारतीय धर्मशास्त्राचा कोश आधुनिक काळात संकलित केला. तो पाच खंडांत व काही हजार पृष्ठांत आहे…

पां.वा. काणे यांचे मूळ गाव रत्नागिरी जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील मुरडे हे होय. त्यांचा जन्म त्यांच्या आजोळी, चिपळूण तालुक्यातील पेढे ऊर्फ परशुराम या गावी 7 मे 1880 रोजी झाला. काणे यांच्या आईचे वडील चितळे (आजोबा) हे वैदिक पंडित आणि वैद्य होते. विद्वत्तेची परंपरा त्यांच्या पितृकुळातही होती. पां वा यांचे पणजोबा सदाशिवराव हे पंचांगकर्ते होते. पणजोबांना तीन अपत्ये- शंकर, लक्ष्मण व रघुनाथ. पैकी शंकर हे पां वा यांचे आजोबा. ते वैदिक पंडित, ज्योतिषी आणि निष्णात वैद्य होते. त्यांची उपजीविका भिक्षुकी वर चालत असे. त्यांनाही तीन अपत्ये – भास्कर, केदार व वामन. पैकी वामनराव हे पां वा यांचे वडील.

वामनरावांचा संस्कृतचा अभ्यास होता. त्यांना ऋग्वेद जवळपास मुखोद्गत होता. त्यांचे उपनिषदे आणि भगवद्गीता यांचे ज्ञान व संदर्भही सखोल व सूक्ष्म होते. वामनराव यांना भिक्षुकी हा वडिलांचा व्यवसाय पसंत नव्हता. त्यामुळे ते वयाच्या अठराव्या वर्षी पुण्याला गेले आणि वयाच्या तेविसाव्या वर्षी मॅट्रिक झाले. ते वकिलीची परीक्षाही तेव्हाच उत्तीर्ण झाले आणि दापोली न्यायालयात तालुका वकील म्हणून 1878 पासून काम करू लागले. ते त्या न्यायालयात इंग्रजीतून काम करणारे पहिले मराठी वकील होत. वामनरावांना तीन मुली व सहा मुलगे अशी नऊ अपत्ये होती. त्यांतील दुसरे अपत्य म्हणजे पांडुरंग (पां.वा.). पां वा यांचे प्रारंभिक शिक्षण वडिलांजवळ झाले. त्यांची स्मरणशक्ती दांडगी होती. ते एकपाठीच होते ! त्यांना अमरकोशाचे चारशे श्लोक लहान वयातच मुखोद्गत होते.

त्यांनी शालेय शिक्षणासाठी दापोलीच्या ए.जी. हायस्कूलमध्ये (त्या वेळचे एस.पी.जी. मिशन स्कूल) वयाच्या अकराव्या वर्षी (1891 साली) प्रवेश घेतला. तेथून ते ‘बॉम्बे’ विद्यापीठाची बी ए परीक्षा मुंबईच्या विल्सन कॉलेजमधून उत्तीर्ण (1901) झाले. त्यांना संस्कृत विषयासाठीची प्रतिष्ठित समजली जाणारी भाऊ दाजी लाड शिष्यवृत्ती पदवी शिक्षणासाठी मिळाली होती. ते एलएल बी 1902 मध्ये आणि वेदांत पारितोषिकासह एम ए 1903 मध्ये झाले. त्या शिवाय त्यांना ‘दक्षिणा फेलोशिप’, ‘मंडलिक सुवर्णपदक’ (दोन वेळा) अशी अनेक पारितोषिके व सन्मान शैक्षणिक जीवनात प्राप्त झाले होते.

त्यांनी नोकरी शिक्षक म्हणून रत्नागिरी येथील शासकीय हायस्कूलमध्ये तीन वर्षे केली. ते संस्कृतचे शिक्षक म्हणून मुंबईच्या एल्फिन्स्टन हायस्कूल येथे 1907 मध्ये रूजू झाले. त्यांची संस्कृतचे प्राध्यापक म्हणून लगेच दोन वर्षांत (1909) पदोन्नती झाली. ते एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये दाखल झाले. पण ते काम त्यांनी दोन वर्षे, 1911 पर्यंत केले. त्यांनी त्या दोन वर्षांत विद्यार्थ्यांकरता दोन पुस्तके संस्कृतमधून हायस्कूल-कॉलेजसाठी लिहिली. त्यांनी त्यांची आर्थिक गरज भागावी म्हणून इतरही अनेक शैक्षणिक पुस्तके लिहिली.

त्यांना बॉम्बे हायकोर्टाचे वकील म्हणून सनद 5 जुलै 1911 रोजी मिळाली. ते त्या वेळी बत्तीस वर्षांचे होते. त्यांचा हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही कायद्यांचा अभ्यास विशेष होता. त्यांनी त्या विषयांत एलएल एम ची परीक्षा 1912 मध्ये दिली. त्यांनी मुंबई विद्यापीठाने आयोजित केलेल्या भाषाशास्त्र विषयक व्याख्यानमालेत (विल्सन फिलॉलॉजिकल लेक्चर्स) संस्कृत आणि तत्संबंध भाषांतर या विषयावर सहा व्याख्याने 1913 मध्ये दिली. त्यांना ‘स्प्रिंगर संशोधन शिष्यवृत्ती’ महाराष्ट्राच्या प्राचीन भूगोलाच्या विशेष संशोधनासाठी प्राप्त झाली होती.

त्यांनी संस्कृत पुस्तके जवळपास दरवर्षी एक याप्रमाणे संपादित करून 1911 ते 1918 या काळात प्रकाशित केली. त्याच काळात त्यांनी कायद्याचे खासगी शिकवणी वर्गही घेतले. त्यांनी कायद्याचे प्राध्यापक म्हणून नोकरी मुंबईच्या शासकीय विधी महाविद्यालयात 1917 ते 1923 अशी सहा वर्षे केली. त्यांनी ‘व्यवहारमयूख’ची सटीप आवृत्ती तीन मुद्रित प्रती आणि आठ हस्तलिखिते यांचा आधार घेऊन 1924-1926 मध्ये तयार केली. ती भांडारकर संशोधन संस्थेने प्रकाशित केली आहे. त्यांचे धर्मशास्त्राचे चिंतन ‘व्यवहारमयूख’च्या आवृत्तीकरता माहिती गोळा करत असताना अधिक वाढले. तेव्हा त्यांच्या लक्षात आले, की त्या विषयाची मोठी माहिती त्या छोट्या प्रस्तावनेत संदिग्ध वाटेल. वाचकांना त्या विषयाचे समृद्धत्व, प्राचीन काळातील समाजरचना, तुलनात्मक न्यायदान पद्धत आणि ज्ञानाच्या इतर शाखा ह्या बाबी स्पष्ट होणे गरजेचे आहे. त्यामुळे त्यांना वाचकांच्या दृष्टीने धर्मशास्त्राच्या इतिहास लेखनाचे महत्त्व जाणवले. त्यांनी धर्मशास्त्राचा संपूर्ण इतिहास स्वतंत्र रीतीने प्रसिद्ध करण्याचा निश्चय केला. त्यांचा तो ज्ञानयज्ञ 1924 साली सुरू झाला. ते काम इतके अफाट होते, की ते त्यांच्या निधनापर्यंत (1972 सालापर्यंत), तब्बल अठ्ठेचाळीस वर्षे सुरूच राहिले ! धर्मशास्त्राच्या इतिहासाच्या पाचव्या खंडाची दुसरी आवृत्ती त्यांच्या मृत्यू पश्चात, 1975 साली प्रकाशित झाली.

काणे यांना लहानपणापासून अल्सरचे दुखणे होते. त्यावर इलाज अनेक डॉक्टर-वैद्यांना दाखवून देखील मिळाला नव्हता. अखेर, त्यांनीच काही उपाय शोधले व अनुमाने काढून स्वतःला पथ्ये घातली; परंतु त्यांचे दुखणे वयाच्या पंचेचाळिशीनंतर आत्महत्येचा विचार मनाला चाटून जाईपर्यंत वाढले होते, तरीही त्यांनी धर्मशास्त्राच्या इतिहासाचे अवघड व प्रचंड काम पूर्णत्वाकडे नेले. त्या कार्यामागील एक प्रेरणा म्हणजे ब्रिटिशांची भारतातील धर्मव्यवहाराबाबतची संतापजनक भूमिका. त्यांना ‘इंग्रज कवीची एकच कविता संपूर्ण संस्कृत काव्यापेक्षा श्रेष्ठ आहे’ असे म्हणणारा मेकॉले किंवा ‘भारतीयांना सत्याची कल्पनाच नाही’ असे विधान करणारा लॉर्ड कर्झन आणि भारतीय संस्कृतीकडे तुच्छतेने पाहणारे समस्त पाश्चिमात्य यांचा खरपूस समाचार घ्यावासा वाटे. त्यासाठी भारताचा समृद्ध वारसा उपलब्ध असणे महत्त्त्वाचे होते. त्यांनी त्याकरता ‘धर्मशास्त्राचा इतिहास’ या ग्रंथाचा घाट घातला. म्हणूनच त्यांनी धर्मशास्त्राचा इतिहास इंग्रजीत लिहिला. त्या ग्रंथास सुमारे सात हजार पृष्ठे खर्ची पडली.

धर्मशास्त्रावरील कोणत्याही विवादामध्ये विदेशी; तसेच, भारतीय विद्वान त्या ग्रंथातील मताला प्रमाण मानतात, एवढा तो ग्रंथ विद्वत्तापूर्वक लिहिला गेला आहे ! भारत सरकारने त्यांना ‘भारतरत्न’ हा पुरस्कार त्या ग्रंथाचे भारतीय समाजव्यवस्थेतील स्थान लक्षात घेऊन 1963 मध्ये प्रदान केला. त्या ग्रंथामुळे अनेक धार्मिक वाद सोडवले गेले.

काणे यांना दीर्घायुष्य लाभले. काणे यांचे जीवन आणि कार्य यांचा आढावा घेतला असता नजरेत भरते ते त्यांचे संस्कृतविषयीचे प्रेम आणि सखोल ज्ञान, त्यांचा स्वाभिमान, कठीण परिस्थितीतून मार्ग काढण्याची विजिगीषू वृत्ती, कार्याप्रती असलेली अढळ निष्ठा, चिकाटी, जिद्द, परिपूर्णतेचा ध्यास आणि त्यासाठी अपरिमित कष्ट सोसण्याची तयारी. महामहोपाध्याय पांडुरंग वामन काणे आणि त्यांचा History of Dharmashastra हा खंडात्मक ग्रंथ हे बुद्धी व परिश्रम यांच्या मिलाफातून केवढे उत्तुंग कार्य उभे राहू शकते, याचे अजोड असे उदाहरण आहे.

त्यांचा ‘हिस्टरी ऑफ पोएटिक्स’ हा आणखी एक गाजलेला ग्रंथ आहे. ‘हिस्टरी ऑफ संस्कृत पोएटिक्स’ – तिसरी सुधारित आवृत्ती (1961) हा त्यांचा दुसरा एक महत्त्वाचा ग्रंथ. त्यातील विवेचन दोन भागांत आलेले आहे. पहिल्या भागात भारतीय साहित्यविषयक महत्त्वाचे ग्रंथ, त्यांचे कर्ते आणि काल इत्यादीविषयक परामर्श घेतलेला आहे, तर दुसऱ्या भागात अलंकारशास्त्राचे विषय आणि भारतीय साहित्यशास्त्राच्या विकासाचे वेगवेगळे टप्पे दिलेले आहेत. त्यांनी धर्मशास्त्र आणि काव्यशास्त्र यांखेरीज प्राचीन ग्रह ज्योतिष आणि फलज्योतिष, भारत-महाराष्ट्र-कोकण-विदर्भ यांचा सांस्कृतिक इतिहास आणि भूगोल, मराठी भाषा– तिचे व्याकरण, परिभाषा आणि शुद्धलेखन, कौटिल्याचे अर्थशास्त्र, गणित, नाट्यशास्त्र अशा अनेक विषयांवर लेखन केले आहे. त्याशिवाय त्यांचे पूर्वमीमांसा, कात्यायन स्मृती, हिंदू कायद्याचा वैदिक मूलाधार, शंकराचार्यां पूर्वीचे वेदान्त भाष्यकार, विज्ञानेश्वरांचे पूर्वसुरी, कोहलाचे अवशेष, प्राचीन संस्कृत साहित्यातील पहलव आणि पारसिक, तंत्र वार्तिक व धर्मशास्त्र ग्रंथ इत्यादी विविध विषयांवरील लेखन-संकलन प्रसिद्ध झालेले आहे.

त्यांनी साहित्यदर्पण, कादंबरी, उत्तररामचरित, हर्षचरित, व्यवहारमयूख ह्यांसारख्या ग्रंथांचे संपादन केले. त्यांनी ‘महाभारत-रामायण कालीन समाजस्थिती’ (1911), ‘धर्मशास्त्रविचार’ (1935), कालिदासीय ज्योतिष, विदर्भ व महाराष्ट्र, कवी भास व त्यांची नाट्यसंपदा इत्यादी विषयांवर मराठीतून स्फुटलेखन केले. त्यांच्या नावावर एकशे अठ्ठ्याण्णव प्रकाशने आहेत. त्यात एकोणचाळीस ग्रंथ, एकशे पंधरा लेख, चव्वेचाळीस पुस्तक परिचय व परीक्षणे आहेत. काणे यांना त्यांच्या विद्वत्तेसाठी ब्रिटिश सरकारने ‘महामहोपाध्याय’ या पदवीने 1942 साली  सन्मानित केले. ते मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू 1947 ते 1949 या काळात राहिले. त्यांचा राष्ट्रपतींकडून गौरव 1958 साली झाला. त्यांनी संस्कृत, मराठी, हिंदी, इंग्रजी या भाषांबरोबरच फ्रेंच आणि जर्मन यांच्यासह आणखी काही भाषांवर प्रभुत्व मिळवले होते.

त्यांचे कुरुक्षेत्र विद्यापीठाच्या स्थापनेत महत्त्वाचे योगदान होते. त्यांची राज्यसभेवर नियुक्ती दोन वेळा झाली. त्यांनी विविध व्यासपीठे आणि माध्यमे यांतून लक्षणीय सामाजिक योगदान दिले. ए जी हायस्कूल (दापोली) आणि एज्युकेशन सोसायटी इंग्रजांकडून विकत घेण्यात पां.वा. काणे यांचा मोठा वाटा आहे. ते 1922 मध्ये स्थापन झालेल्या दापोली शिक्षण संस्थेच्या पहिल्या कार्यकारी व नियामक मंडळाचे सदस्य आणि त्या संस्थेचे अध्यक्षही 1938 ते 1946 पर्यंत होते.

काणे यांची धार्मिक व सामाजिक दृष्टी पुरोगामी होती. त्यांनी लोणावळा येथील धर्मनिर्णय मंडळाने चालवलेल्या हिंदू धर्म सुधारणेच्या चळवळीत मनःपूर्वक भाग घेतला. त्यांनी अस्पृश्यता, केशवपनादी अनिष्ट चालींचा निषेध केला. त्यांनी स्वतः सकेशा विधवेला पंढरपुरात विठ्ठल पूजेचा अधिकार मिळवून देण्यासाठी वकीलपत्र घेतले होते. त्यांनी आंतरजातीय विवाह, विधवा विवाह, घटस्फोट यांचा पुरस्कार केला. त्यांचा अस्पृश्यता निवारणाचा कायदा संसदेत संमत करून घेण्यातही पुढाकार होता. ते नागपूर येथे भरलेल्या अखिल भारतीय प्राच्यविद्या परिषदेचे अध्यक्ष होते. त्याचप्रमाणे ते आंतरराष्ट्रीय प्राच्यविद्या परिषदांनाही भारताचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहिले होते (1948- पॅरिस, 1951 – इस्तंबूल, 1954- केंब्रिज). ते वॉल्टेअर येथे भरलेल्या भारतीय इतिहास परिषदेचे अध्यक्ष होते (1953).

काणे यांचे बरेचसे संशोधनकार्य मुंबईच्या ‘एशियाटिक सोसायटी’त झाले. ते ‘एशियाटिक सोसायटी’चे फेलो आणि उपाध्यक्ष बरीच वर्षे होते. त्या संस्थेने संशोधनातील विशेष कामगिरीसाठी त्यांच्या स्मरणार्थ काणे सुवर्णपदक ठेवले आहे. ते पुणे येथील ‘भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिरा’च्या नियामक मंडळावर रेग्युलेटिंग कौन्सिल; तसेच, तेथील ‘महाभारत संशोधन मंडळा’वरही होते. ते ‘महाराष्ट्र साहित्य परिषदे’चे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापक मंडळाचे सदस्य काही काळ होते.

पां.वा. काणे यांना त्यांच्या हयातीतच अनेक मानसन्मान लाभले. त्यांना त्यांच्या षष्ठ्यब्दीपूर्ती निमित्त भारतविद्याविषयक विद्वत्तापूर्ण लेखांचा एक संग्रह त्यांच्या चाहत्यांनी 1941 मध्ये अर्पण केला. त्यांना डी लिट् ही सन्माननीय पदवी अलाहाबाद आणि पुणे विद्यापीठांनी अनुक्रमे 1942 व 1960 मध्ये दिली. त्यांना ‘लंडन स्कूल ऑफ ओरिएंटल अॅण्ड आफ्रिकन स्टडीज’ ह्या संस्थेचे सन्माननीय फेलो 1951 मध्ये करण्यात आले.

पां.वा. काणे यांचे निधन 18 एप्रिल 1972 रोजी मुंबई येथे झाले. पां.वा. काणे यांचे मूळ गाव मुरडे असले तरीही, त्यांचे शिक्षण दापोलीत झाल्यामुळे दापोलीतील लोक त्यांना आपले मानतात, म्हणूनच तेथील लोकांच्या मनात त्यांच्या प्रती असलेला आदर, प्रेम या भावना लोकांनी विविध उपक्रमांतून व्यक्त केल्या आहेत. त्यांनी महामहोपाध्याय भारतरत्न पां.वा. काणे स्मारक समिती’च्या माध्यमातून जन्मभूमी ते कर्मभूमी अशी संवाद यात्रा काढली. पां.वा.काणे स्मारक समितीच्या माध्यमातून जालगाव येथे परांजपे यांच्या जागेत स्मारक सुरू झाले आहे. ती इमारत त्यांनी दान केली आहे. पां.वा. काणे स्मारकाचे काम प्राथमिक स्थितीत असले तरीही दोन दालने प्रायोगिक तत्त्वावर सुरू झाली आहेत. काणे यांचे पणतू आणि त्यापुढील पिढ्या अमेरिकेत स्थिरावल्या आहेत.

प्रशांत परांजपे 9561142078 pakshiknivedita@gmail.com

——————————————————————————————————————————–

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here