लेखन हलकेफुलके पण नुसताच टाइमपास नव्हे, वैचारिक पण वाचकांना वाचतानाच डुलकी आणणारे नव्हे. निबंधात जसा नुसता निबंध, लघुनिबंध, ललित निबंध असा प्रवास झाला आहे, त्याप्रमाणे ‘गंध अंतरीचा’ हे आहे भानू काळे यांचे ललित चिंतन. काळे हे मराठीतील आघाडीचे लेखक. पण ‘अंतर्नाद’ या त्यांच्या मासिकाचे मराठी साहित्यातील योगदान एवढे मोठे आहे, की काळे हे ‘अंतर्नाद’चे संपादक किंवा सर्वेसर्वा म्हणून ओळखले जातात, पण त्यामुळे त्यांनी समर्थपणे हाताळलेल्या विविध साहित्यप्रकारांकडे वाचकाचे दुर्लक्ष होते.
‘गंध अंतरीचा’ या पुस्तकात आहेत चव्वेचाळीस छोट्यामोठ्या घटना आणि व्यक्ती. लेखकाने व्यक्ती आणि घटना निवडताना खेडेगाव, शहर, देश, परदेश असा आपपर भाव ठेवलेला नाही. छोट्या घटनेत मोठा आशय लपलेला असतो आणि फार मोठ्या घटना, आंदोलने, संघटना यांचे पाय शेवटी मातीचेच असतात ! हे सारे हसतखेळत, सहजपणे समजावून देत प्रत्येक प्रकरण पुढे जाते. वाचक प्रत्येक प्रकरण वाचल्यावर अस्वस्थ होऊन विचार करतो. नकळत अधिक समंजस होतो.
पुस्तकातील प्रत्येक प्रकरण महत्त्वाचे आहे, पण मला अधिक अस्वस्थ करणारी सात प्रकरणे आहेत. वाचनसंस्कृती आणि शहामृग, विनी मंडेला – शमू न शकलेली आग, गोरी गोरी पान, खार आणि हनुमान, मुनाफची बिर्याणी, चंदुभाईची फिलॉसॉफी, मोबाइल आणि लेखणी… प्रत्येक प्रकरणाचे शीर्षक हे वाचकांच्या मनात कुतूहल निर्माण करणारे आहे. त्यामुळे तो नकळत पुढील मजकूर वाचण्यास सुरुवात करतो. चिंतन किती वेगळे आहे हे लक्षात यावे म्हणून वाचक त्यातील कोणताही लेख विचारात घेऊ शकतो. ‘हा अप्रामाणिकपणा येतो कोठून?’ हा लेख एका मामुली नगण्य घटनेवर आहे. ‘लोकसत्ते’त- खरे तर, सगळ्या मराठी वृत्तपत्रांत 12 मे 2017 रोजी एक चटपटीत बातमी आली. रत्नागिरी येथील एका शेतकऱ्याने त्याचे आंबे पिकअप जीपमधून नाशिकला पाठवले. वाटेत आळेफाट्यावर एका महाविद्यालयासमोर जीप उलटली. आंब्याच्या पेट्या रस्त्यावर फेकल्या गेल्या. चालक आणि त्याचा साहाय्यक जखमी होऊन रस्त्यावर पडले. त्यांना दवाखान्यात नेण्यात दिरंगाई झाली. तो व्यवस्थेचा एक भागच झाला आहे आणि आपण तो कुरबूर न करता नकळत स्वीकारलाही आहे. पण भयपर्व तेथे संपत नाही. भोवतालची माणसे गर्दी करून तेथे आली. त्यांनी आपापसांत धक्काबुक्की करून सारे आंबे पळवले ! ही बातमी वाचल्यावर काही जणांना हसू येते, काही जण अस्वस्थ होतात, मात्र ‘काढूनी चश्मा डोळ्यांवरचा, स्वत:स आपण पुन्हा पाहवे’ असे काही वाचकाला वाटत नाही; लेखकाला तसे वाटते.
लेखकाला त्याच्या लहानपणी, पन्नास-साठ वर्षांपूर्वीही असेच होते ते आठवले. मुंबई बंदरावर गोदीतील सामान पोत्याला हूक लावून लंपास करणे हा तेथे नियमित व्यवहार होता, ते आठवते आणि मग लेखक लिहितो, ‘‘याचा अर्थ आपण यापूर्वीही अप्रामाणिक होतो आणि आजही आहोत असा करायचा काय? हा अप्रामाणिकपणा येतो कोठून?’’ जपानमध्ये अशा वेळी याच्या नेमके उलट घडते, याची काही उदाहरणे देऊन लेखक चिंतनात मग्न होतो. तो लिहितो, ‘‘हा अप्रामाणिकपणा कोठून येतो? पिढ्यान् पिढ्यांच्या दारिद्र्यातून निर्माण झालेली ही मानसिकता असेल काय? यामागे भौगोलिक- ऐतिहासिक कारणे असतील का? का अप्रामाणिकपणा भारतीय रक्तातच आहे? त्याला जनुकीय किंवा वांशिक काही कारणे असतील का?’’
… त्यानंतर लेखक उत्तराच्या शोधात पुढे जातो. तो लिहितो, ‘‘गुणार म्युरडाल (Gunnar Myrddal) या नोबेल पुरस्कारप्राप्त स्वीडिश अर्थतज्ज्ञाने 1968 मध्ये ‘Asian Drama – an enquiry into the poverty of nations’ हा मुख्यत: भारतातील दारिद्र्याचे विश्लेषण करणारा त्रिखंडी ग्रंथ लिहिला आहे. त्यात त्याने काही महत्त्वाचे निष्कर्ष काढले आहेत. भारतीय समाजाचे समानीकरण अद्याप झालेले नाही, त्या समाजाचे वर्तुळ अजूनही व्यक्ती आणि कुटुंब यांच्यापुरते सीमित आहे असाही एक निष्कर्ष लेखकाने काढला आहे. सामाजिक मालकीच्या वस्तू वा यंत्रणा वा अस्थापना यांच्याविषयीची दिसून येणारी कमालीची अनास्था त्यातूनच येत असेल का? समाजाच्या किंवा समाजातील इतरांच्या मालकीचा पैसा स्वत:कडे वळवण्यामागे, म्हणजे भ्रष्टाचारामागील मानसिकता त्यातून येत असेल का?’’- मात्र लेखक तेथेच थांबत नाही. तो अस्वस्थ होऊन एक प्रश्न विचारतो, ‘‘साहित्यातून मनोरंजन जरी होत असले, तरी अंतिमत: साहित्यातून सांस्कृतिक समृद्धी साधली जावी असे म्हणतात, हे जर खरे असेल, तर आपण साहित्यिक काय करतोय?’’
महत्त्वाचे म्हणजे हे सारे चिंतन सहज-सोप्या, प्रवाही भाषेत दीड-दोन पानांत संपते. ज्यांच्याजवळ सांगण्यासारखे काही नसते ते शब्दांचा फाफटपसारा किंवा उधळण करतात का? यातील तीन-चार लेख वगळता बाकी सारे लेख मजेत, गप्पा मारत मारत पुढे जातात व दीड-दोन पानांत संपतातदेखील. त्यामुळे वाचक विचारात पडतो आणि वाचतही जातो. वानगीदाखल आणखी एक लेख. लेखाचे नाव ‘दूधवाला, कचरेवाला, पेपरवाला’ प्रत्येक घरी दररोज सकाळी न चुकता येणारी सर्वसामान्य, नगण्य दुर्लक्षित माणसे. मात्र सकाळी दुधाचा चहा आणि बरोबर वाचण्यास पेपर नसेल, तर दिवस खऱ्या अर्थाने सुरू होणार नाही. अत्यल्प पगार, अनेक अडचणी- पण ही माणसे एकही खाडा न करता काम का करतात? ही कर्तव्यनिष्ठा, बांधिलकी, सवय की अगतिकता? की हे आहेत या देशातील पुसून टाकले गेलेले संस्कार आणि रचना? ही अशी वैचारिक चर्चा हसत-खेळत करत असतानाच लेखक लक्षात आणून देतो, या देशात ऱ्हासपर्व अजून सुरू झालेले नाही. ‘ब्रेड आणि सर्कस’ हा डोळ्यांत अंजन घालणारा लेख. कोणीतरी रोमन सम्राट दोन हजार वर्षांपूर्वी असे म्हणाला होता, की ‘‘लोकांना खूश करण्यासाठी फक्त ब्रेड आणि सर्कस यांची गरज असते’’ नंतरच्या दोन हजार वर्षांत माणसांच्यात फारसा बदल झालेला नाही, हे लक्षात आणून देणारा तो लेख आहे.
पुस्तकात मोठे लेख तीन-चार आहेत. मोठे म्हणजे सात-आठ पानांचे ! त्यांतील दोन मला अधिक महत्त्वाचे वाटतात. एक- ‘विनी मंडेला – शमू न शकणारी आग’ आणि दुसरा- ‘हर हर नर्मदे’. नेल्सन मंडेला यांचे अलौकिक मोठेपण कोणीच नाकारू शकणार नाही. त्यांचे नाव महात्मा गांधी यांच्याबरोबर जगभर आदराने घेतले जाते. बराक ओबामा यांनी त्या दोघांना त्यांचे प्रेरणास्थान मानले आहे. मात्र त्यांपैकी मंडेला यांना साथ सर्वस्व उधळून, विलक्षण ताकदीने, हिमतीने आणि जिवाच्या कराराने देणाऱ्या विनी मंडेला यांना इतिहासाने खलनायक ठरवले आहे. अकरा वर्षांच्या संसारानंतर घटस्फोट घेऊन एकाकी जीवन जगणाऱ्या नेल्सन मंडेला यांच्या आयुष्यात त्यांच्याहून सतरा वर्षांनी लहान असलेली विनी आली. त्या कृष्णवर्णीय, पण फार श्रीमंत घराण्यातील होत्या. त्या सुंदर आणि पदवीधर होत्या. त्या नेल्सन यांच्याबरोबर लढ्यात उतरल्या. त्यांनी लग्न केले. त्यांना दोन मुले झाली. नेल्सन मंडेला यांना अटक झाली, त्या वेळी त्या फक्त चोवीस वर्षे वयाच्या होत्या. नेल्सन मंडेला सत्तावीस वर्षे तुरुंगात होते. विनी यांनी जवळजवळ एकहाती ती चळवळ आणि मंडेला यांचे नाव जगभर जागते सत्तावीस वर्षे ठेवले. मात्र नेल्सन यांनी त्यांना घटस्फोट तुरुंगातून परत आल्यावर दिला. त्यांच्याहून सत्तावीस वर्षांनी लहान असलेल्या विधवेशी लग्न केले. नेल्सन मंडेला यांनी त्यांना तुरुंगात टाकणाऱ्या क्लार्कबरोबर शांततेचा पुरस्कार स्वीकारला. विनीला मात्र आतंकवादी, हिंसाचारी ठरवून तुरुंगात डांबण्यात आले. नेल्सन आणि विनी या दोन्ही व्यक्ती तुमच्या-माझ्यापेक्षा अनेक पटींनी मोठ्या आहेत. पण मानवी भावना, परस्पर संबंध या सर्वांत ‘मानवाचे अंती गोत्र एक’ असे काही आहे का, हे लेखक अनेक घटना व संदर्भ देऊन समजावून देतो. लेख वाचल्यावर ‘माणूस नावाचा अनाकलनीय प्राणी आहे’ हे लक्षात येऊन वाचक खूप काळ अस्वस्थ राहतो.
तसाच दुसरा लेख आहे ‘हर हर नर्मदे’. माणसांप्रमाणेच माणसांनी सारे आयुष्य उधळून जिवाच्या कराराने भोवतालच्या माणसांचे, समाजाचे भले व्हावे, म्हणून उभारलेल्या चळवळींचे प्राक्तनही अनाकलनीय आहे, ही गोष्ट हा लेख समजावून देतो. मेधा पाटकर यांनी जिवाच्या कराराने व अतिशय कल्पकतेने देशाच्या नव्हे, तर जागतिक पातळीवर नेलेले ‘नर्मदा बचाओ आंदोलन’ माहीत आहे. बाबा आमटे यांच्यासारखी अनेक असामान्य कर्तृत्वाची माणसे त्यात सामील झाली. मात्र तेवढ्याच ताकदीच्या माणसाने धरणाच्या बाजूने गुजरातमध्ये चळवळ उभारली होती. तीपण जिवाच्या कराराने. तो दुसरा माणूस गुजराती नव्हता, तर मराठी माणूस होता. चळवळ व आंदोलने यांच्या क्षेत्रांत केवढ्या अशक्य कोटीतील घटना अचानकपणे घडतात याचे दर्शन त्या लेखात होते. खरे तर, शरद जोशी ‘शेतीमालाला रास्त भाव’ या एककलमी कार्यक्रमात गुंतलेले होते. महाराष्ट्र आणि थोडेफार कर्नाटक व पंजाब हा भाग त्यांच्या चळवळीचा असावा. पण शरद जोशी यांना हृदयविकाराचा झटका 1999 मध्ये आला. त्यांना महाराष्ट्रात शेतकरी विश्रांती घेण्यास देणार नाहीत, म्हणून पूर्णपणे गांधीवादी असलेले पिता-पुत्र गुणवंतभाई व परिमलभाई हे त्यांना विश्रांतीसाठी गुजरातमध्ये घेऊन गेले. दोघेही ‘नर्मदा बचाव आंदोलना’च्या बाजूचे होते. शरद जोशी यांनी तेथे आंदोलन, भारतातील शेतकऱ्यांचे भले करायचे असेल तर ते धरण केवळ पुरे करून चालणार नाही, तर त्याची उंची वाढवावी लागेल म्हणून सांगत सुरू केले. गुजरात सरकारने त्यांच्या आंदोलनाला विरोध केला. मात्र शरद जोशी स्वत:च्या प्रकृतीची काळजी न करता खेड्यापाड्यांत हिंडले. त्यांनी शेतकरी संघटित केले. तुरुंगवासाची तमा बाळगली नाही. महत्त्वाचे म्हणजे त्यांचे यजमान गुणवंतभाई आणि परिमलभाई हे धरणाच्या बाजूने झाले. मेधा पाटकर यांच्या जवळच्या सहकारी दर्शनी भट शरद जोशी यांच्याबरोबर त्यांच्या बाजूने आंदोलनात उतरल्या. दर्शनी भट ह्या मेधा पाटकर उपोषणाला बसल्या, की त्यांच्या त्या उपोषणाला विरोध म्हणून उपोषणाला बसत ! मेधा पाटकर यांनी धरण होऊ नये म्हणून जलसमाधी घेतली, तर दर्शनी ‘‘ते पाणी शुद्ध व्हावे आणि धरण व्हावे म्हणून मी त्यानंतर जलसमाधी घेणार’’ म्हणून सांगत गुजरातमध्ये हिंडल्या!
मानवी जीवन, आंदोलने, चळवळी यांतील कंगोरे असे सहजपणे सांगत हे पुस्तक पुढे जाते. त्यामुळे पुस्तकात नव्या सुभाषितांची रेलचेल आहे. उदाहरणार्थ-
1. विचारांच्या विश्वात आजच्या माध्यमांना जराही रुची नाही. बातमी हीसुद्धा एक करमणूक बनली आहे!
- All the darkness in the world cannot extinguish the small flame of truth – जगातील सगळा काळोख सत्याची एक छोटी ज्योत विझवू शकत नाही.
- आजकालच्या आंदोलनांमधील नैतिकतेचे व निष्ठेचे स्खलन हे मुळात एकूण समाजातील स्खलनाचे प्रतिबिंब आहे.
- समाजपरिवर्तन हे तुमचा सुट्टीचा वेळ मागत नाही, ते तुमचे आयुष्य मागते.
- कोटीच्या कोटी उड्डाणे घेणारा, सबंध द्रोणागिरी पर्वत एका तळहातावर पेलणारा हनुमान हा महत्त्वाचा खराच- पण छोट्याशा खारोटीशिवाय रामायण पुरे होत नाही.
- अनेकदा चांगल्या वागण्यातही आपला अहंकार दडलेला असतो. आपल्या चांगुलपणानेही समोरचा चांगला माणूस कधी कधी दुखावला जाऊ शकतो.
- जीवनात पूर्णविरामापेक्षा प्रश्नचिन्हे अधिक असतात.
- यशापेक्षा अपयशातून व उत्तरांपेक्षा प्रश्नांतून मानवी जीवन समृद्ध होते.
- निबर मने आणि गोठलेल्या भावना हे आपले वास्तव आहे.
10. देवालयाच्या खूप जवळ राहणाऱ्यांची श्रद्धा लवकर नाहीशी होते, पण हे त्यांना सांगता येत नाही.
अशी नवी सुभाषिते पानापानांवर विखुरली आहेत. मात्र अधिक महत्त्वाचे आहे, ते पुस्तकातील प्रत्येक प्रकरणातील हटके चिंतन. त्यातील काही उदाहरणे लक्षात घ्यावी-
- पंढरपूरबद्दल कोणाची मते काहीही असोत, एक गोष्ट मात्र नक्की- येथे भले-बुरे जे काही आहे, तेच शेवटी भारताचे वास्तव रूप आहे. तोच भारत देश आहे, तेच आपले आहे. एखाद्या माणसाला आपले मानले, की त्याच्या सर्व गुणदोषांसकट त्याला स्वीकारावे लागते. समाजाचे आणि देशाचेही तसेच असावे.
- अर्थात उद्या याच्याबद्दल काय सांगतील याची खात्री कोणीच देऊ शकणार नाही. कारण जे प्रत्यक्षात घडले, तो केवळ भूतकाळ असतो आणि जे लिहिले गेले त्यालाच फक्त इतिहास म्हणतात. शंभर वर्षांनी लिहिल्या जाणाऱ्या इतिहासात काय लिहिलेले असेल, कोणी सांगावे ! दैवगती मोठी विचित्र असते.
- वृद्धाश्रमात काम करणारा एक परिचित मुलगा सांगत होता, ‘‘हे म्हातारे पक्के स्वार्थी असतात आणि जेवढे जास्त श्रीमंत तेवढे जास्त कंजूष ! एक दमडीसुद्धा मरताना आमच्यासाठी सोडत नाहीत. आमच्यातील बारीकसारीक दोष काढत बसणार; जसे त्यांच्यामध्ये काही दोषच नसतात आणि ज्यांच्यामुळे त्यांना येथे येण्यास लागले, त्या निष्ठुर आणि स्वार्थी मुलांसाठी शेवटी सगळी प्रॉपर्टी देऊन टाकणार!’’ स्वत:चा आणि स्वत:च्या कुटुंबाचा स्वार्थ याच्या पलीकडे भारतीय (काही अपवाद वगळता) सहसा विचारच करत नाही. अजून भारतीय समाजाचे अचूक समाजीकरण खऱ्या अर्थाने झालेले नाही का?
- श्रद्धा हे आध्यात्मिकतेचे मूळ आहे किंवा आध्यात्मिक वाटचालीची सुरुवात श्रद्धेपासून सुरू होते. ‘ज्याच्या सिद्धतेसाठी पुराव्याची गरज नाही, असा विश्वास म्हणजेच श्रद्धा!’ अशी एक व्याख्या केली जाते आणि पुराव्याची गरज नसल्यामुळेच श्रद्धेचे किंवा आस्तिकतेचे खंडन वा मंडन करता येत नाही.
- वाचनाशिवायही माणूस आरामात जगू शकतो हे एक कटू सत्य आहे. पण तसा तो गायन, वादन, चित्रकला, नृत्य, मित्र, शेजारी, आध्यात्मिकता, सुसंस्कृतता यांच्याशिवायही जगू शकतो. प्रश्न आहे, तो जगणे अधिक अर्थपूर्ण करण्याचा.
‘सोचो मत’ हाच आदर्श पाळणाऱ्या समाजाची निर्मिती होत आहे. समाजाला आवश्यक वाटते ते आपोआप चालते व जे कालबाह्य असते, ते आपोआप बंद पडते; हा बाजारी अर्थव्यवस्थेचा सिद्धान्त सांस्कृतिक-वैचारिक क्षेत्राला लावू पाहणे ही भयावह गोष्ट आहे. कारण सांस्कृतिक उपयुक्ततेच्या अनेक गोष्टी प्रयत्नपूर्वक टिकवाव्या लागतात. कारण मुळात संस्कृती हीच मुळी निसर्गदत्त वा जन्मत: जनुकांबरोबर येणारी गोष्ट नसून ती फार प्रयत्नपूर्वक अंगी रुजवावी लागते. कोठलाही संस्कार हा आपोआप होत नसतो. ते फलित स्वत:च्या किंवा अन्य कोणत्या प्रयत्नांचेच असते आणि शेवटी म्हणजे अशाच संस्कारांचे संचित.
पुस्तकाचे मुखपृष्ठ अप्रतिम आहे. रंगांची उधळण करणारे, म्हणजे पुस्तकाच्या अंतरंगातील गंधांची उधळण. ‘अंतर्नाद’ बंद केल्यावर किंवा (पडल्यावर?) भानू काळे यांचे हे चौथे पुस्तक. सांस्कृतिक समृद्धीसाठी त्यांची वाटचाल अजून अथकपणे सुरू आहे, म्हणून सांगणारे !
गंध अंतरीचा- लेखक भानू काळे
प्रकाशक : उन्मेष प्रकाशन, पुणे
पृष्ठे 192, मूल्य 250 रुपये
– दत्तप्रसाद दाभोळकर 7722074166 dabholkard155@gmail.com
(साधना, 21 ऑगस्ट 2021 वरून उद्धृत, संपादित-संस्कारित)
———————————————————————————————-