वसईतील बावखलांचे निसर्गचक्र (Bavkhals In Vasai – Traditional Water Tank)

3
133

बावखल

बावखल हा शब्द वसईच्या बोलीभाषेतील आहे. त्याचा अर्थ आहे – पाण्याने भरलेला, छोट्या तलावासारखा मोठा खड्डा होय (बाव म्हणजे विहीर आणि बावखल म्हणजे विहिरीजोगा मोठा खड्डा). तशी बावखले वसई परिसरात गावागावात असायची. पावसाळ्यात पडणारा पाऊस ओहळाच्या रूपाने बावखलात साचून राहायचा. त्या पाण्यात कमळे उगवायची. जलचर वाढायचे. गोड्या पाण्यातील माशांची निपज अल्प प्रमाणात व्हायची. बावखलातील साचलेल्या पाण्यामुळे गावातील, त्याच्या परिसरातील विहिरींच्या पाण्याची पातळी टिकून धरली जायची. बावखलावर कोठे कोठे रहाट उभे करून आजुबाजूच्या शेतीला पाणीपुरवठा केला जायचा. बावखलाची मदत परिसरातील जमिनीचा ओलसरपणा टिकून ठेवण्यास व्हायची. हे रहाट गावातील पोराटोरांच्या पोहण्यासारख्या क्रीडेचे ठिकाण असायचे. वयस्कर शेतकऱ्यांच्या वामकुक्षीची जागा असायची. रहाटाच्या फलाटीवर मंद वार्‍याच्या झुळकीत मस्त झोप लागायची. तरुण शेतकरी जोडप्यांना तर ते प्रणय-शृंगाराचे हक्काचे स्थान वाटायचे. वसई परिसरातील गावांच्या शेतीभोवती बावखले अजूनही आहेत. बावखले ही निसर्गचक्राची प्रतिकृती होय या विधानाचा अर्थ तेथे कळतो.

जीवजंतू, जलचर, पशुपक्षी, माणसे यांच्याशी निगडित एक निसर्गचक्र बावखलांच्या रूपाने अस्तित्वात असायचे.

माणसांना घरे बांधण्यासाठी जमिनी वाढत्या लोकसंख्येमुळे कमी पडू लागल्या. बावखले बुजवली गेली. त्यावर इमले उभे उभारले. निसर्गचक्राला बाधा आली. पर्यावरण धोक्यात आले. गावे पावसाळ्यात तुंबू लागली. त्यातून भिन्न समस्या निर्माण झाल्या. समुद्राचे पाणी झिरपून गावातील पिण्याच्या पाण्याच्या विहिरी खाऱ्या होऊ लागल्या. साधने गंजू-सडू लागली. स्वास्थ्याचा प्रश्न बिकट होत गेला.

ते दुष्टचक्र थांबवतादेखील येत नाही. तसेच, प्रगतीदेखील थांबवता येत नाही. तेव्हा, यातील सुवर्णमध्य म्हणून सुनियोजित विकास साधण्यास हवा. त्यात निसर्ग रक्षणाचा विचार हवा. गावातील तरुणांनी एकत्र येऊन व वयस्करांची मने वळवून गावात सार्वजनिक स्वरूपाची बावखले निर्माण करण्यास हवीत. जी जुनी अस्तित्वात आहेत, ती सार्वजनिक करून त्यांची जोपासना करण्यास हवी. आध्यात्मिक भूक भागवण्यासाठी आळीआळीत क्रूस, मंदिरे बांधतात तशीच नैसर्गिक गरज म्हणून बावखले निर्माण व्हावीत. पावसाळ्यातील कमी पावसात छतावरून पडणारे पाणी वाया न घालवता छोट्या ओहोळाच्या रूपात बावखलात साठवण्यास हवे.

वसईत बावखल बचाव मोहीम क्षीण स्वरूपात सुरू आहे. भुईगावचे सचिन मर्ती हे गेली वीस वर्षे त्यासाठी झटत असतात.  बावखलांची ‘कोबो’ (KoBO) कलेक्ट अॅपवर नोंद होते. युवा विकास संस्थेमार्फत बावखले स्वच्छ करणे व त्यांचे पुनर्भरण करणे अशी कामे चालतात असे सचिन यांनी सांगितले. त्यांच्या सांगण्याप्रमाणे वसई-विरार पट्टयात एक हजार तरी बावखले असतील. शेती व घरगुती पाणीपुरवठा याकरता दोनशे वर्षांपूर्वी ही जलव्यवस्था निर्माण झाली असावी. वाढत्या मुंबईच्या छायेखाली तिकडे दुर्लक्ष झाले.

(स्वेद, दिवाळी अंक 2013 वरून उद्धृत, संपादित-संस्कारीत)

– जोसेफ तुस्कानो 9892107216 haiku_joe_123@yahoo.co.in
————————————————————————————————————————————— 

बावखल स्वच्छता मोहीम

————————————————————————————————————————-

About Post Author

3 COMMENTS

  1. वसई च्या वास्तव्यात ही बवखले पहिली आहेत ,निसर्ग ,परंपरा,संस्कृती या संगमावर राहणीमान अवलंबून असायचे पुढे काँक्रेट च्या वाढत्या जंगल आणि मानसिक जगण्याची वृत्ती बदलत जाताना याचे परिणाम दिसू लागले आहे.निसर्ग समतोल राखण्यासाठी आजची पिढी झटते आहे हे वाचून छान वाटले.

  2. पूर्वी खूप मोठ्याप्रमाणात बावखले वसई-विरार भागात होती , पावसाळ्यात तर रस्ता व बावखले ओळखण्यास पण गोंधळ उडत असे . वसई मधील विहिरींना 10-15 फुटावर पाणी असण्याचे कारण हि बावखले होत .पाण्याची हि व्यवस्था जपणे फार आवश्यक आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here