डॉ. बाळ भालेराव
विश्राम बेडेकर यांच्या अध्यक्षतेखाली अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दादरच्या (मुंबई) राजा शिवाजी विद्यालयाच्या प्रांगणात भरले होते. त्यात एका संध्याकाळी ‘साष्टांग नमस्कार’ हे नाटक रंगले होते. काम करणारे सगळे होते पत्रकार! दिग्दर्शक होते विहंग नायक. नायिकेच्या भूमिकेत वसुंधरा पेंडसे अन् त्यात छोट्या चंदूची भूमिका केली होती विहंगच्या मुलाने. संमेलनात पत्रकारांचे नाटक असावे ही संकल्पना डॉ. बाळ भालेराव यांची. त्या संबंधातूनच पुढे भालेराव यांनी विहंग यांना साहित्य संघाच्या नाट्यशाखेत ओढून घेतले. वेगळी, अनोखी संकल्पना राबवणे, माणसांना पारखून संस्था मोठी करणे आणि स्वत:च्या डॉक्टरी पेशाचा/पैशांचा आधार नाट्यसृष्टीतील असंख्यांना देणे ही बाळ भालेराव यांची वैशिष्ट्ये. डॉक्टरांचे तसे ऋण तर माझ्यावरही होते. माझ्या वहिनी हिंदुजा हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांच्या भरवशावरच दाखल झाल्या होत्या. तेव्हा साहित्य संघाचे महानगर साहित्य संमेलन बोरिवलीला चालू होते. संमेलन आटोपल्यावर घरी परतायचे; तर भालेराव मला म्हणाले, “चला, जाता जाता तुमच्या वहिनींना बघून पुढे जाऊ.” डॉक्टरी पेशाच्या सहाव्या इंद्रियामुळे म्हणा की माझ्या वहिनीच्या जबरदस्त इच्छाशक्तीने म्हणा; आम्ही अगदी वेळेवर पोचलो. वहिनीच्या पोटात पाणी खूप साठले होते तेव्हा. भालेराव यांनी तातडीचे उपचार केले अन् मी त्यांची ऋणी झाले, कायमची. माझ्या भावाला, डॉ. सुनीलला त्यांनी जी.एस. मेडिकल कॉलेजमध्ये शिकवले होते.
भालेराव यांच्याशी माझा जवळचा स्नेहबंध ‘मुंबई मराठी साहित्य संघा’तील माझ्या कामामुळे आला. माझ्या मोठ्या मुलीचे- अनुराधाचे लग्न ठरले तेव्हा त्यांनी एक कुटुंबीय असल्यासारखी जातीने चौकशी केली, काळजी घेतली. त्यांच्या सौभाग्यवती डॉ. विजया (विजुताई) यादेखील त्यात सहभागी असत. त्या अनुराधाच्या पहिल्या गरोदरपणात वरचेवर फोन करून चौकशी करत. ती बाळंतीण झाली तर त्यांनी आपणहून मला घरी बोलावून त्यांच्या घरचा (इंग्लंडहून आणलेला) दुधाची बाटली धुण्याचा ‘स्टरलायझर’ भेट दिला होता! बाळ भालेराव यांचे दुसरे कुटुंब म्हणजे मुंबई मराठी साहित्य संघ. त्या संस्थेत काम करणारी मी. म्हणून मी जणू त्यांची कुटुंबीयच !

![]() |
कार्यमग्न डॉ. भालेराव |
मी मुंबई मराठी साहित्य संघाच्या ‘साहित्य’ या त्रैमासिकाची संपादक पाच वर्षे होते. तेव्हा मी त्या मासिकात कोणते विषय घ्यावेत, विशेषांक कोणता व कसा असावा, मुद्रणाचे काम कोणाला द्यावे… इत्यादीबाबत त्यांची धारणा निश्चित असायची. त्यांना साहित्य संघाला सुरुवातीच्या उमेदीच्या काळात ज्यांनी ज्यांनी तनमनधनाने हातभार लावला, त्यांच्या ऋणांतून उतराई व्हावे असे वाटायचे. त्यानुसार त्या मासिकाची आखणी असायची. त्यांच्या तशा ‘उतराई व्हावे’ या भूमिकेतूनच स्मरण व्याख्यानमाला, अमृत व्याख्यानमाला असे उपक्रम आखले गेले. नवीन सभागृह उभे राहिले ते ‘अमृत नाट्यभारती सभागृह’ म्हणूनच. त्या कृतज्ञतेपोटी भालेराव कुटुंबीयांतर्फे पंचवीस, पंचवीस हजारांचे ‘यशवंत पुरस्कार’ आणि ‘सहचारिणी पुरस्कार’ देण्यात येऊ लागले. ‘वा.रा. ढवळे स्मृतिदालन’ म्हणून अक्षर साहित्य दालन उभे राहिले. त्या दालनाची प्रमुख म्हणून माझी कामगिरी वाखाणताना ते सभेत म्हणाले होते, “वा.रा. ढवळे स्वर्गातून बघताहेत तुझ्याकडे खुश होऊन.” कारण मी वाङ्मयीन परीक्षावर्ग घेण्याच्या निमित्ताने, चर्चासत्रांच्या निमित्ताने वा.रा. ढवळे यांचेच बोट धरून साहित्य संघात गेले होते. ते त्याचा उल्लेख कौतुकाने असा करत.
‘वा.रा. ढवळे स्मृतिदालन’ म्हणजे ‘अक्षर साहित्य दालन’ ही आगळीवेगळी संकल्पना बाळ भालेराव यांचीच. त्या दालनात पंधरा-सोळा प्रकाशकांच्या सहकार्याने पुस्तके मांडली आहेत. त्यांची त्यामागील धारणा वाचकांनी यावे, पुस्तक वाचावे-हवे असल्यास विकत घ्यावे अशी आहे. त्याच दालनात महिन्याला किमान एक आणि पुढे कितीही कार्यक्रम सातत्याने होतात. रसिकांची वर्दळ ‘साहित्य संघा’त पूर्वीसारखी वाढावी म्हणून बाळ भालेराव यांचा प्रयत्न सदैव राहिला. त्या दालनातर्फे ‘अक्षरसाहित्य’ नावाची छोटी पुस्तिका प्रकाशित होते. त्या पुस्तिकेची संकल्पना, विषयाची निवड, लेखकांची निवड पूर्णपणे बाळ भालेराव यांची असायची. इतकेच नव्हे तर, पुस्तिकेसाठी मुद्रकही त्यांनीच शोधला आणि प्रकाशनाला लागणारा पूर्ण खर्चही तेच करायचे. त्या दालनातर्फे काही छोटी पुस्तके (पॉकेट बुक्स) यावीत हीदेखील त्यांची भविष्यवेधी कल्पना ! ‘ज्ञानेश्वरी’चे संक्षिप्त रूप ‘अमृतकण कोवळे’ नावाने रेखा नार्वेकर यांनी केले आणि त्याला उदंड प्रतिसाद मिळाला. त्या पुस्तकाची पहिली आवृत्ती तीन महिन्यांत संपली.
![]() |
राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांच्या हस्ते धन्वंतरी पुरस्कार स्वीकारताना डॉ. बाळ भालेराव |
डॉ. बाळ भालेराव यांना माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्या हस्ते धन्वंतरी पुरस्कार लाभला. त्यांना अखिल भारतीय नाट्यसंमेलनाचे अध्यक्षपदही लाभले. अशा सन्मानप्रसंगीच डॉक्टर मंचावर बसायचे. ते एरवी कोठल्याही समारंभाला प्रेक्षकांच्या सहाव्या रांगेतील खुर्चीत, दुरून पाखर घालावी त्याप्रमाणे. शेवटी शेवटी ते आय.सी.यु.त असतानाही त्यांना ध्यास होता तो साहित्य संघाच्या कार्याचा, म्हणूनच 21 फेब्रुवारी 2020 रोजी त्यांचा देह अनंतात विलीन झाला तरी साहित्य संघाशी जडलेली त्यांची चित्शक्ती अमर आहे. बाळ भालेराव यांचे बळ मोठेच. बा.भ. बोरकर यांच्या कवितेच्या शेवटच्या ओळींचा आधार घ्यावासा वाटतो.
देखणा देहान्त तो जो सागरी सूर्यास्तसा
अग्नीचा पेरून जातो रात्रगर्भी वारसा
(‘साहित्य’ त्रैमासिकावरून उद्धृत, संस्कारित)
– सुहासिनी कीर्तिकर 9820256976 vaijayanti.kirtikar@gmail.com
——————————————————————————————————

नि:स्वार्थ भावनेतून केलेल्या कार्याला शतशतनमन.
हि कल्पनाच वेगळी व आकर्षित करणारी आहे ती किती उत्साहाने साकारली असेल त्या प्रतिभावंत पत्रकार कलावंत यांना रसिक प्रेक्षक म्हणून सलाम च…..
खूप सुंदर महितीपूर्व लेख आहे माझा जन्म नानाचौकात ला पूर्वी १/२/३रुपये दर असणारी तिकितात नाटके पाहिली आहे साहित्य संघ आणि डॉ भालेराव यांचे महत कार्य या लेखातून अनुभवता आले.