सुभाष जगताप हे दावलवाडी गावचे उपसरपंच आहेत. ते शेती कसतात. त्यांचे शिक्षण बारावीपर्यंत झाले आहे. त्यानंतर त्यांनी एक-दोन छोटे अभ्यासक्रम केले. त्यांना सामाजिक व राजकीय कार्याची ओढ आहे. ते समर्थ बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष आहेत.
दावलवाडी हे गाव जालना जिल्ह्याच्या बदनापूर या तालुक्यात आहे. ते जालन्यापासून आठ किलोमीटर तर बदनापूर या तालुक्याच्या केंद्रापासून दहा किलोमीटर अंतरावर वसले आहे. या गावाने आर.आर. पाटील ग्रामविकास मंत्री असताना, ‘संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियाना’त जिल्ह्यात 2002 मध्ये दुसरा क्रमांक तर पुढच्याच वर्षी 2003 मध्ये पहिला क्रमांक मिळवला होता. गावाला राष्ट्रपती पुरस्कार 2000 ते 2005 या काळातील उल्लेखनीय कामाबद्दल मिळालेला आहे...