1 POSTS
श्रीकांत तिडके हे गाडगे महाराज वरिष्ठ महाविद्यालयात प्राचार्य होते. त्यांनी विष्णुशास्त्री चिपळूणकर यांच्यावर संशोधन-अभ्यास केला आहे. त्यांनी विविध विद्यापीठीय समित्यांवर कार्य केले. ते नागपूरला झालेल्या विदर्भ साहित्य संघाच्या जनवादी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. त्यांनी जागतिक मराठी अकादमीपासून राज्याच्या भाषा सल्लागार समितीसारख्या सार्वजनिक संस्थांची पदे भूषवली आहेत. ते अंधश्रद्धा निर्मूलन समिती, हुंडाविरोधी आघाडी, स्त्री-अत्याचार विरोधी परिषद अशा चळवळींमध्ये सक्रिय सहभागी होते. त्यांची पत्नी अनिता या निवृत्त असिस्टंट प्रोफेसर आहेत. मुलगा कॅप्टन सार्थ तिडके वैमानिक होता. सून समृद्धी तिडके एमडीएस आहे. मुलगी संपदा खारोडे हवाई सुंदरी होती.
1926 ते 1956 असा साधारणपणे तीस वर्षांचा पत्रप्रपंच, म्हणजे ‘सार्वजनिक त्यागाची गीता’ आहे असेच म्हणावे लागेल. बाबांच्या पत्रांतून त्यांच्या कार्याबरोबर व्यक्तिमत्त्वाचे दर्शन होते. त्यांच्या पत्रसंग्रहात त्यांचा संपूर्ण आयुष्यक्रम गोवलेला आहे. ते जितके त्यागी-तितकेच संसारी, जितके ममताळू- तितकेच कठोर, जितके विरक्त-तितकेच संग्राहक, व्यावहारिक व प्रापंचिक वृत्तीने जितके सरळ- तितकेच कोणाबरोबर कोठे नि काय नि किती बोलावे याचे तारतम्य त्यांच्याजवळ होते. त्यांच्या पत्रांतून वाचकासमोर स्वच्छता, व्यवहारकुशलता, गुणग्राहकता, धार्मिक वृत्ती, कृतज्ञता, निराग्रही स्वभाव, तळमळ असा विविधांगी ‘इंद्रधनू’ उभा होतो...