प्राची तावडे यांचे शिक्षण जुने अकरावी झाले आहे. त्यांचा जन्म 10 डिसेंबर 1953चा. त्यांचे माहेरचे नाव पुष्पलता सावंत होते. त्यांचे 'तिच्या जगण्याची गोष्ट' हे पुस्तक प्रकाशित आहे.
वाटूळ हे वारकऱ्यांचे गाव ! पवित्र तो देश, पावन तो गाव | जेथे हरीचे दास जन्मा येती || आषाढी-कार्तिकी पायी वारी. कीर्तनात रममाण होऊन नाचणारे कीर्तनकार आणि कीर्तन ऐकण्यासाठी जमलेले आबालवृद्ध... माझ्या आजी, काकी नऊवारी साडी नेसून, डोक्यावर पदर घेऊन कीर्तनात तल्लीन झालेल्या आठवल्या की जाणवते तोच खरा वाटूळगावचा इतिहास ! निसर्ग म्हणजे काय हे कळण्याइतके वय नव्हते तेव्हा ! पण पाखरांचा किलबिलाट, ऋषीमुनींप्रमाणे ध्यानस्थ बसलेले डोंगर आणि मध्येच झुळझुळ वाहणारी नदी दिसली की मन प्रसन्न होत असे. तांबडे फुटले, की पूर्व दिशा उजळून निघायची आणि थोड्याच वेळात ताऱ्यांचा लालभडक सखा डोके वर काढायचा... अहाहा !! खूप सुंदर सूर्योदय ...