1 POSTS
माधव गाडगीळ यांनी हार्वर्ड विद्यापीठात जीवशास्त्राचा लेक्चरर, बर्कले विद्यापीठात इन्डो- अमेरिकन डिस्टिन्ग्विश्ड लेक्चरर, स्टॅन्फर्ड विद्यापीठात व्हिजिटिंग प्रोफेसर म्हणून काम केले आहे. गाडगीळ १९७३ पासून २००४ पर्यंत इन्डियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये प्राध्यापक होते. त्यांनी तेथे परिसरशास्त्राच्या अभ्यासास सुरुवात करून दिली. सध्या ते गोवा विद्यापीठात कोसांबी अध्यागत प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे.
गाडगीळ हे निसर्गप्रेमी, साहित्यप्रेमी, संस्कृतिप्रेमी जीवशास्त्रज्ञ आहेत. सह्याद्रीच्या द-याखो-यांत, रानावनांत हिंडत परिसराचा व मानवी जीवनाचा अभ्यास करणे हा त्याचा छंद आणि व्यवसाय आहे. त्यांनी परिसरशास्त्र व उत्क्रान्ती या विषयांवर दोनशेहून अधिक शास्त्रीय निबंध प्रकाशित केले आहेत. त्यांनी राम गुहांसोबत 'धिस फिशर्ड लॅंड' हे भारताच्या पर्यावरणीय इतिहासाबद्दलचे पहिले पुस्तक लिहिले आहे. गाडगीळ यांनी डॉ. वर्तकांसोबत देवरायांच्या शास्त्रीय अभ्यासाची मुहूर्तमेढ रोवली. तसेच त्यांनी स्वतः भारतातील हत्तींची पहिली शिरगणती केली. गाडगीळ यांनी अनेक दशके इंग्रजीत व मराठीत नियमित वृत्तपत्रीय लिखाण केले आहे.