अशोक कुंभोजकर
वसंत जोशीचा मृत्यू – जो आवडे सर्वांना… (Vasant Joshi, Yogic Man Liked by All)
वसंत जोशी वयाच्या शहाऐंशीव्या वर्षी शांतपणे झोपेत मरण पावला. तो त्या आधी चार दिवस थोडा अस्वस्थ होता. तसे तर, त्याने त्याचे सार्वजनिक कार्य वयाच्या ब्याऐंशीव्या वर्षी थांबवले होते. वयोमानाने शरीर थकत होते. त्याच्या पत्नीचे, सुनीताचे देहावसान त्या आधी, तीन वर्षांपूर्वी झाले. त्या काळात, त्याला काही व्याधींनी घेरले, विस्मृती जाणवू लागली होती, पण गंभीर असे काही नव्हते. त्यात सोसायटी पुनर्विकासानंतर मिळालेला फ्लॅट मोठा; अपत्याविना जीवन एकाकी होते. त्याचे पुतणे रविंद्र जोशी व सूनबाई अश्विनी यांनी त्याच्या नाश्ता-जेवणाची व्यवस्था केली होती. पुतणी ज्योती पानसे जाऊन-येऊन लक्ष ठेवायची. तो स्वतः उठून शनिवार, रविवार पुतण्या व पुतणीकडे जाई. वसंतचा स्वभाव ‘सोशल’; सर्वांशी मिळूनमिसळून वागण्याचा, हसतमुख राहण्याचा होता. त्याने जीवनाबद्दल तक्रार कधीही, अगदी शेवटच्या काळातही केली नाही. परंतु घरात तो एकटा असे. सोसायटीतील काही परिवारांचा त्याला आधार होता...