1 POSTS
श्रीपाद महादेव माटे यांचा जन्म विदर्भातील शिरपूर या गावी २ सप्टेंबर, १८८६ रोजी झाला. माटे यांना रँगलर परांजपे, वासुदेवराव पटवर्धन, देवधर यांच्यासारखे गुरू महाविद्यालयीन जीवनात अध्यापक म्हणून लाभले. त्यांच्यावर लोकमान्य टिळक, संस्कृत पंडित वासुदेवशास्त्री अभ्यंकर यांच्या विचारांचा प्रभाव होता.
माटे यांनी सातार्यातील आणि पुण्यातील ‘न्यू इंग्लिश स्कूल’मधून काही काळ अध्यापन केले. त्यानंतर, ते पुण्याच्या एस.पी. कॉलेजात इंग्रजी व मराठी विषयांचे प्राध्यापक म्हणून होते. माटे हे ‘रोहिणी’ या मासिकाचे पहिले संपादक होते. माटे यांनी ‘केसरी प्रबोध’, ‘महाराष्ट्र सांवत्सरिक’ (तीन खंड) या ग्रंथांचे संपादन करून, साहित्य क्षेत्रात स्वतःचे स्थान निर्माण केले. त्यांची ‘विज्ञानबोध’ या ग्रंथाची त्यांनी संपादित केलेली दोनशे पानी प्रस्तावना गाजली. त्या प्रस्तावनेतून त्यांनी विज्ञानयुगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन दिला.
माटे यांनी आयुष्यभर अस्पृश्योद्धाराचे काम केले. त्यांनी अनेक पुस्तके लिहिली. त्यांत काही चरित्रेसुद्धा आहेत. त्यांची ‘पक्षिकेचा वारा’ ही एकमेव कादंबरी आहे.त्यांचे देहावसान २५ डिसेंबर, १९५७ साली झाले.