अरुण महाजन – शिखर त्याचा साथी ! (Arun Mahajan – A Man of Mountains)

2
89

अरुण महाजन हा तुर्कस्थानातील (टर्की) ‘अरारट’ या पर्वताचे सर्वात उंच शिखर गाठणारा तरुण. तो तेथे पोचलेला बहुधा पहिला व एकमेव मराठी तरुण असावा. महाराष्ट्रीय तरुण जगात वेगवेगळ्या ठिकाणी जातात आणि त्यांच्या बुद्धीची, पराक्रमाची चुणूक वेगवेगळ्या क्षेत्रांत दाखवतात, पण गिर्यारोहणाचे क्षेत्र सर्व धाडसी तरुणांना मोहवते असे जाणवते आणि तेथील आव्हानेही अगदीच वेगळी असतात ! तेथे अंगात धाडस, हिंमत असणे गरजेचे आहेच; शिवाय, जोखीम पत्करण्याची मनस्थिती असावी लागते आणि पैसा व वेळ, दोन्ही बरेच आवश्यक असतात. तो छंद जोपासायचा म्हणजे त्यासाठी जिद्द व सातत्य हवे असते. ते अरुणमध्ये सहजपणे जाणवते. अरुण महाजन हा उमदा मराठी तरुण इलेक्ट्रिकल आणि संगणक या दोन शाखांमधील पदवीधर आहे, तो आयटी क्षेत्रात कार्यरत आहे. सध्या तो कॅलिफोर्नियातील ‘पालो अल्टो’ या शहराचा निवासी आहे. त्याची आणि माझी भेट तेथे, मी माझ्या मुलाकडे गेली असताना झाली.

त्याने अरारट मोहिमेबद्दल सांगितले, की अरारट हे तुर्की शिखर सतरा हजार फूट उंचीचे आहे. तो सुप्त ज्वालामुखी आहे. अरूणला ते शिखर पाहून किलिमांजारो पर्वतशिखराची काहीशी आठवण झाली. अरारट तसेच आहे. मात्र ते पादाक्रांत करण्यास कुदळी-दोरखंड अशी साधने घ्यावी लागत नाहीत. अरारटसंबंधी आख्यायिका अनेक आहेत. त्या ग्रीक पुराणातील ‘नोहाज आर्क’शी जोडून सांगितल्या जातात.

अरूण सांगतो, की अरारट चढून जाताना थंडी तर खूपच लागली. रस्त्यात आम्हाला दोन मुक्काम करावे लागले. आम्ही प्रत्यक्ष शिखरावर जाण्यासाठी मध्यरात्री डोक्याला दिवे बांधून निघालो. सकाळ रस्त्यातच झाली आणि दुपारी शिखरावर पोचलो. तेथून लगेच परतलो. मध्ये विश्रांती घेतली आणि बेस कॅम्पला येऊन विसावलो. त्यामुळे तो दिवस लांबच लांब जवळजवळ छत्तीस तासांचा झाला !

माझा मुलगा स्नेहल ‘बे एरिया’त राहतो. त्याच्याकडे माझे जाणे झाले तेव्हा आश्चर्याचे एकदोन सौम्य धक्के बसले. त्यातच अरुणच्या भेटीचा योग जुळून आला. आणखी एक विशेष असे, की अरुण हा माझ्या, एकेकाळी प्रिन्सिपल असलेल्या मॅडमचा मुलगा. त्यामुळे व्यक्ती परिचयातील असेल तर जरा जास्त कौतुकाने व आत्मीयतेने विचारपूस होते; माझे तसेच झाले. मी त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा दुसरा पैलू, म्हणजे गिर्यारोहणाचा छंदही ऐकून अचंबित झाले. मला त्याच्याविषयी अधिक जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण झाली. अरुणची आई गीता महाजन या सात बंगला (अंधेरी-मुंबई) येथील ‘वर्सोवा वेल्फेअर’ या शाळेत 1980-90 च्या दशकात मुख्याध्यापक होत्या. मीही त्या दरम्यान त्याच शाळेत शिक्षकपदावर होते. महाजनमॅडम यांचे वय आहे नव्वद वर्षे. पण त्यांचा उत्साह तरुणाला लाजवेल असा असतो. मुख्य म्हणजे अरुणचे स्फूर्तिस्थान त्याची आई हे आहे. म्हणूनच तो तिच्यासोबत राहून त्याचा आगळावेगळा असा गिर्यारोहणाचा छंद जोपासू शकला.

अरुण महाजनचा जन्म मुंबईचा. त्याचे शालेय व महाविद्यालयीन शिक्षण मुंबईत झाले. त्याचे वडील 1985 साली निवर्तले. त्यानंतर त्याचा जीवनप्रवास आईच्या संस्कारांखाली सुरू झाला. तो ‘आऊटडोर अॅक्टिव्हिटीज’मध्ये हिरिरीने भाग घेऊ लागला –सह्याद्रीतील वेगवेगळ्या डोंगरकड्यांवर वारंवार जाऊ लागला. त्याचे पर्वतीय आकर्षण विशेषतः पावसाळ्यात सह्याद्रीच्या शिखरावरून दिसणारा निसर्गरम्य नजारा पाहून अजूनच वाढले. ‘युथ होस्टेल असोसिएशन’तर्फे गिर्यारोहणाच्या तशा मोहिमा आखल्या जात असत. त्याच दरम्यान हरीष कपाडिया यांनी लिहिलेले ‘ट्रेक द सह्याद्रीज’ हे पुस्तक वाचले आणि त्यातून गिर्यारोहणाची आवड त्याच्यात अधिकच मुरली. दरम्यान, त्याला शिक्षण पूर्ण होताच अमेरिकेमध्ये नोकरीची संधी मिळाली. पहिली चार वर्षे मॅसॅच्युसेट्स, त्यानंतर तो सॅनफ्रान्सिस्को (बे एरिया, सिलिकॉन व्हॅली) येथे मोठ्या कंपन्यांत सॉफ्टवेअर डेव्हलपरचे काम करू लागला. स्वाभाविकच, गिर्यारोहणाचा त्याचा छंद मागे पडला. पण त्यानंतर मात्र त्याच्या मनात असलेली सुप्त इच्छा उफाळून आली आणि त्याचा पर्वतारोहणाचा प्रवास नव्याने सुरू झाला.

अरुणने त्या इच्छेला वाट देण्यासाठी ‘आपलाचियन माउंटन क्लब’मध्ये (Appalachian Mountain Club) नाव नोंदवले आणि त्याचे गिर्यारोहण जोमात पुन्हा सुरू झाले.त्याने क्लबतर्फे काही मोहिमा मित्रांसोबत तर काही एकट्याने केल्या. तो शिखरे चढताना काही वेळा अपघातांचे प्रसंग आले, पण ते जीवावर बेतणारे नव्हते. ते आठवले की धस्स होते असे अरुण सांगतो. मागे डोंगर पुढे आकाश आणि मनात काहीशी भीती असे ते अफाट दृश्य असते.

अरुण म्हणतो, गिर्यारोहणात साहस असते; ते मला आवडते. गिर्यारोहण नेहमीच आव्हानात्मक असते- ते आकर्षणही मोठे असते. शिवाय, नवनवीन प्रदेश पाहण्यास मिळतात.

अरुणने मग गिर्यारोहणाचा पद्धतशीर कार्यक्रम आखला. न्यू हॅम्पशायरमधील ‘व्हाइट माउंटन्स ऑफ न्यू हॅम्पशायर’ नावाने प्रसिद्ध असलेल्या चार हजार फूट उंच अशा अठ्ठेचाळीस शिखरांची यादी मिळवली. तो म्हणतो, की “मी ती शिखरे 1990 ते 1994 या काळात पादाक्रांत केली. मीच बहुधा ती यादी पूर्ण करणारा पहिला ‘देसी’ आहे.” तो आठवड्यातील पाच दिवस ऑफिसचे काम करत असे व विकेंडला डोंगरावर जाई.- अरूणने अमेरिकेत गेल्यावर तेथील व्यावसायिक मार्गदर्शकांकडून बर्फातील गिर्यारोहणाच्या क्लृप्त्या जाणून घेतल्या. बर्फात वापरण्याची विशिष्ट आधुनिक हत्यारे असतात. त्यामुळे त्यास बर्फ फोडणे, बर्फात खुंट्या ठोकणे, बर्फाळ प्रदेशातून पदभ्रमण, रॉक क्लायबिंग अशी तंत्रे येऊ लागली- तो त्यांत प्रवीणही झाला. त्याचे आवडते ‘खेळाचे मैदान’ म्हणजे कॅलिफोर्नियातील सिएरा-नेवाडा पर्वतश्रेणींतील सुंदर सुंदर शिखरे. त्याने काही कास्केड्समधील ज्वालामुखींची त्या सिएरामधील जवळपास चारशे शिखरे चढण्याचा विक्रम केला आहे. त्यातून त्याचे कौशल्य प्रत्येकवेळी वाढत गेले. परिणामस्वरूप त्याच्यात हिंमत आली, तो कणखर बनला आणि तो अमेरिकेच्या बाहेर जाऊनही शिखरे सर करू शकतो असा आत्मविश्वास त्याच्यात निर्माण झाला.

तो त्याच्या काही मित्रांसोबत स्वित्झर्लंड आणि फ्रान्स या दोन युरोपीय देशांत 2001 साली गेला; तेथे तो आल्पस् पर्वतावरील मॉण्ट ब्लांक आणि इतर दोन शिखरे यशस्वीपणे चढला. तेथे त्याला कोणीही मार्गदर्शक नव्हते. त्यावेळी माझे पती साव लगेच उद्गारले, भारताचे थोर अणुवैज्ञानिक होमी भाभा यांच्या विमानाला अपघात (की घातपात – काही लोक तो घातपात होता असे मानतात.) मॉण्ट ब्लांक याच शिखरावर झाला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला !

अरूणने दक्षिण अमेरिकेतील इक्वेडोर, मेक्सिको; तसेच, पूर्व युरोपातील कजाकिस्तानमधील ‘पामिर’ या ठिकाणांच्याही ट्रिप केल्या आहेत. त्याने दोन ‘ट्रिप’दरम्यानच्या काळात हिमालयात भारतातून आणि नेपाळमध्ये जाऊन गिर्यारोहण केले. त्याच्या हिमालयामध्ये भारतातून सात आणि नेपाळमधून तीन अशा एकूण दहा मोहिमा झाल्या आहेत. त्याने माउंट कैलासची परिक्रमा केली. त्याला त्या मोहिमांमध्ये काही वेळा शिखरापर्यंत पोचण्याच्या आधी परतावे लागले. वाईट हवामान, दरडी कोसळणे, तब्येत बिघडणे, सोबत्याला बरे नसणे अशा वेगवेगळ्या अडचणी त्यास कारणीभूत ठरल्या होत्या.

तरीही काही यशस्वी नोंदी आहेत- हिमाचल प्रदेशातील गँगस्टँग (West Face of Gangstang) येथे नवीन रस्ता तयार करायचा होता. ती ‘टेक्निकल क्लाइंब’ होती. अरुण त्या मोहिमेत ब्रिटिश टीमचा मेंबर होता. शिखर वीस हजार फूट उंच होते. तो नवीन रस्ता 2007 मध्ये तयार झाला. त्याची ती माहिती अमेरिकेतील जर्नलमध्ये 2008 मध्ये प्रसिद्धदेखील झाली.

अरुण आणि त्याच्या साथीदारांनी हिमालयातील पहिल्या तीन चढाया करताना – पश्चिम सिक्कीममधील अर्लांग खोरे, कांचनगंगाजवळच्या शिखरांना (Aralang Valley of Western Sikkim, Near Kanchenjunga) नावे दिली. ती माहितीसुद्धा ‘अमेरिकन अल्पाइन जर्नल’मध्ये 2012 साली प्रसिद्ध झाली आहे. त्यांनी त्या शिखरांना (सिस्टर्स ग्रूप) नेपाळी भाषेत बहिणी ग्रूप (Bahini Group) असे नाव दिले आहे. अरुणने त्या ग्रूपमधील सर्वात उंच शिखराला ‘प्रभा बहीण’ हे नाव  सुचवले आणि ते मान्य झाले. ‘प्रभा’ हे त्याच्या आईचे माहेरचे नाव. हे त्याने आईला शिखर सर करून आल्यावर सांगितले व त्याचे आईला फार कौतुक वाटले. लडाखमधील चांगटांग पठार (फ्लॅटू) येथील उत्तरेकडच्या सहा हजार दोनशे मीटर उंच असलेल्या शिखरापर्यंत जाण्यासाठी ‘अल्पाइन स्टाईल’ने नवीन रस्ता तयार केला. अरुण त्याच्या आईसोबत मानसरोवर आणि कैलास पर्वतावर 2005 मध्ये गेला होता. ती त्या दोघांची वैशिष्ट्यपूर्ण ट्रिप होय. ते दोघे कैलास पाहू शकले -तसेच तेथील पवित्र तलावात डुबकी घेऊ शकले. ती त्या दोघांची इच्छा त्या ट्रिपने पूर्ण झाली होती.

अरुण सांगतो, की गिर्यारोहणाचा छंद जोपासण्यासाठी पैसा (निधी) खूप लागतो, आर्थिक पाठबळ लागते. तसेच, त्यासाठी लागणारे विशिष्ट कपडे, साधने, रोजचा खर्च असे खर्चच खर्च असतात. त्याशिवाय नोकरी सांभाळून मिळणाऱ्या सुट्टीचा कमीत कमी दोन आठवडे तरी वेळ हवा असतो. शिखर किती उंच आहे यावर चढाईचा वेळ ठरत असतो. त्याचा अंदाज साधारण असा असतो- शिखर जर सहा हजार मीटर उंच असेल तर तीन आठवडे, सात हजार मीटर उंच असेल तर चार ते पाच आठवडे; पण खर्चाचे बजेट आठ ते दहा आठवड्यांचे करावे लागते !

अरुण म्हणतो, की मेहनत आणि चांगले प्रशिक्षण घेतले तर त्याचे फळ मिळतेच. जरी शिखर गाठता आले नाही तरी अनुभव आणि शहाणपणा यांमुळे माणसामध्ये परिपक्वता येते. अरुणला गिर्यारोहण प्रवासात काही चांगले मित्र गमावावे लागले. तो म्हणतो, की ते दुःख तो कायम उराशी बाळगून आहे. पण त्याने गिर्यारोहणाचा ध्यास सोडलेला नाही. ‘शिखर माझा साथी’ हे जणू त्याच्या आयुष्याचे ब्रीद आहे. अरुणची आई महाजनबाई म्हणाल्या, की अरुण जेव्हा ट्रेकिंगला जातो तेव्हा तो परत येईपर्यंत माझ्या जीवात जीव नसतो. कोणत्याही आईच्या मनाची अशीच अवस्था होणार. पण तरी त्या मुलाच्या आवडीला प्राधान्य देतात – त्याला प्रेरणा, प्रोत्साहन देतात. 

अरुण महाजन +1(650)823 – 9058 arun.mahajan@att.net

संजीवनी साव 9969435094 saosanjiwani@gmail.com

About Post Author

2 COMMENTS

  1. वाचतानासुद्धा अंगात थरार आला. अशा मोहिमांसाठी किती धाडस लागत असेल याची कल्पना आली. इथे आपल्याला घराचे पाच जिने चढायचे तरी लिफ्ट लागते. हा लेख वाचून आता माझा तरी हात लिफ्टकडे जाणार नाही. लेख खूपच माहितीपूर्ण व ओघवत्या भाषेत आहे.

  2. I met Arun Mahajan and his mother Geeta Mahajan in my son Snehal Sao’s residence in USA.
    Salute to his passion of Mountaineering and daring feats to climb very dangerous peaks
    I wish him success in future endeavours of expeditions.
    Author has ably written Arun Mahajan’s Mountaineering exploits and deserves full compliments.
    N.L.Sao.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here