आर्केओगिरी : माझा पुरातत्त्वाचा शोध (Archaeogiri – My Passion)

3
109

आर्केओगिरीया संकल्पनेचे पहिले बीज माझ्या मनात नेस्पेरेन्नूब या, तीस शतकांपूर्वी मरण पावलेल्या इजिप्शियन धर्मगुरूने रोवले.

नेस्पेरेन्नूबच्या मृतदेहाची, शुभ्र कापडाच्या चाळीस मीटर लांबीच्या पट्ट्यांमध्ये गुंडाळलेली ममी, सुसज्ज व अलंकृत अशा लाकडी शवपेटीत, लक्सर येथील एका पिरामिडमध्ये गेली सुमारे तीन हजार वर्षे शांतपणे विसावली होती. ती शवपेटी ब्रिटिशांनी 1899 साली उचलून आणली व ब्रिटिश म्युझियममध्ये ठेवली. त्या काळी शवपेटी उघडून व त्यातील ममीवरील कापडी पट्ट्या उलगडून प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय आत काय आहे ते कळणे शक्य नव्हते. पण तसे केल्याने ती ममी कायमची नष्ट होत असे. तो महत्त्वपूर्ण ऐतिहासिक पुरावा कायमचा नष्ट होऊ नये यावर उपाय सापडला 2002 मध्ये. शवपेटीस बारीकसे भोकसुद्धा न पाडता, आतील ममी, त्यातील मृतदेह आणि इतर सर्व काही पूर्णपणे सुरक्षित ठेवून स्पष्टपणे पाहता यावे यासाठी म्युझियमच्या लोकांनी वैद्यकीय क्षेत्रात वापरण्यात येणाऱ्या CT Scan, supercomputing 3D Videography हे अत्याधुनिक तंत्रज्ञान उपयोगात आणले आणि नेस्पेरेन्नूबच्या शवपेटीवर पहिला यशस्वी प्रयोग केला. त्या कॅमेऱ्याने शवपेटीच्या बाहेर राहून, आतील सुमारे पंधराशे फोटो काढून, त्यांची व्यवस्थित जोडणी करून, मृत्युसमयी व ममी बनवतानाचा नेस्पेरेन्नूब बारीकसारीक हुबेहूब तपशिलांसह जगासमोर उभा केला. त्या अद्भुत, रोमांचकारी प्रयोगाबद्दलचा 3D चष्मा लावून पाहण्याचा छोटासा माहितीपट, मूळ शवपेटी, त्यातील ममी व त्यातील माणसाची माहिती, शवपेटीवर सर्वत्र लिहिलेला मजकूर व त्याचा अर्थ, भरपूर चित्रे, पोस्टर्स, audio visuals  आणि हे सर्व समजावून सांगणारा एक मार्गदर्शक वाटाड्या अशा स्वरूपाचे प्रदर्शन ब्रिटिश म्युझियमच्या सहकार्याने मुंबईत प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियमने 2012 मध्ये भरवले. त्यापूर्वी तेच प्रदर्शन जगभरात अनेक ठिकाणी फिरवण्यात आले होते.

त्या प्रयोगाने सप्रमाण दाखवून दिले, की चाळिशीच्या नेस्पेरेन्नूबचा एक दात किडका होता. त्याच्या कवटीला असलेल्या खड्डयावरून त्याला क्षयरोग किंवा ब्रेन ट्युमर झालेला असावा. तसेच, मृत्यूनंतर ममी बनवणाऱ्यांनी कसा हलगर्जीपणा केला आणि त्यावर झाकपाक करण्यासाठी काय जुगाड केले! नेस्पेरेन्नूबच्या एकेका मणक्यात, प्रत्येक हाडाच्या पोकळीत शिरलेल्या त्या कॅमेऱ्याने त्याचे कोणतेही गुपित खाजगी राहू दिलेले नव्हते!

तंत्रज्ञानाचा तो जादुई वाटावा असा आविष्कार पाहून मी प्रभावित तर झालेच, पण बेचैनही झाले. कशामुळे त्यावर नेमके बोट ठेवता येईना. मी मला तशा संभ्रमित अवस्थेत जी कविता स्फुरली, ती कागदावर उतरल्यावर त्याचा उलगडा झाला.

नेस्पेरेन्नूब

काल मी दिवसाढवळ्या राजरोसपणे उचकटले तुझ्या शवपेटीचे झाकण

. . . केले तुझे वस्त्रहरण

खेचली फराफरा लक्तरे तुझ्या लाजेची जपलेली तीन सहस्रके झाकून

पाहिला तुला पापणी न लवता उघडानागडा

अधाशीपणाने चाचपला तुझ्या कवटीतला खिळा, दातातला किडा

ओरपली जखम तुझ्या हरवलेल्या हृदयावरची

चघळल्या इतःस्ततः विखुरलेल्या खपल्या तुझ्या चटकमटक

शिरले तुझ्या हाडात माझे निर्ढावलेपण

मणकानमणका खरा कि खोटा पाहिला तपासून

हसले तुझा अंत्यसंस्कार करणाऱ्यांच्या हलगर्जीपणावर फिस्स्स्कन

पाहिली तुझी स्वर्गाच्या दारातील अग्निपरीक्षा गारेगार एसीत खुर्चीत बसून

तुझी घालमेल, चलबिचल, तुझे स्फोटक मौन

आले बाहेर देऊन एक ढेकर संस्कारशून्य

उतरवला काळा चष्मा अन ढोसली कॉफी शांतचित्तानं

त्याचाच सूड घेतलास काय रे?

का शिरलास तीन हजार वर्षांनी, चोरपावलांनी बुलडोझरच्या ताकदीनं

माझ्या मनांत, मेंदूत, हृदयात, रक्ताच्या हरेक थेंबात?

का वळवळतोस माझ्या असंख्य केसांच्या जाऊन मुळात?

का उभे करतोस त्यांना पुन्हा पुन्हा?

किती काळ राहणार आहेस इथे? कधी जाशील निघून?

नको जाऊस प्लीज. राहा इथेच कायमचा

मला आवडलास तू

आपण मृत व्यक्तीस नखशिखांत झाकून त्याच्या व जगाच्या मध्ये एक भिंत उभी करतो, त्याच्या dignityचा मान ठेवून त्याला ऐहिक सुखदुःखांपासून मुक्त करतो, यापुढे तुला त्रास देणार नाही असे मूक आश्वासन देतो. ज्याच्या त्याच्या समजुतीप्रमाणे अंत्यविधी करून त्याला कायमचा निरोप देतो. त्याचे दहन-दफन करतो, श्राद्ध करतो, समाधीवर फुले ठेवतो, शांततेत विश्रांती घे असे सांगतो. नेस्पेरेन्नूबच्या बाबतीतही तेच घडले. पण त्याच्या नशिबात शांततेत विश्रांती घेणे नव्हते. त्याचा किडका दात, संधिवाताने वाकलेला कणा, गायब झालेले हृदय, सर्व अवयवांचे पोटाच्या पोकळीत कोंबलेले गाठोडे, अंत्यविधीत झालेल्या घोडचुका सगळे वेशीवर टांगलेले! त्याला ते आवडले असते का? पुरातत्त्वीय पुराव्याखाली दबलेला माणूस व त्याचा दडपलेला आवाज… हा किडा नेस्पेरेन्नूबने माझ्या मेंदूत सोडला.

पुरातत्त्व या विषयाशी माझा संबंध दिल्ली विद्यापीठात प्राचीन भारतीय इतिहास या विषयात एम. ए. करताना आला होता. इतिहासाच्या त्या काळाच्या अभ्यासासाठी पुरातत्त्वीय पुराव्यांचा पुष्कळ आधार घ्यावा लागतो. पण ते पुरावे तेथे प्रचलित असलेल्या मार्क्सवादी विचारसरणीमुळे दुर्लक्षित राहतात याची अंधुकशी जाणीव कोठेतरी होऊ लागली. मी ते पुरातत्त्वीय पुरावे म्हणजे काय या कुतूहलापोटी त्या अभ्यासाकडे वळले. एम. ए. झाल्यानंतर Archaeological Survey of India च्या School of Archaeology मधून एक वर्षाचा डिप्लोमा केला. त्या एका वर्षात रामायण प्रकल्पांतर्गत अलाहाबादजवळ शृंगवेरपूर या ठिकाणी उत्खननाचा अनुभव, दीड महिन्यांचा भारत दौरा, लेखी परीक्षा व practicals अशा भरगच्च अभ्यासक्रमातून खूप शिकण्यास मिळाले, विषयाच्या प्रचंड व्याप्तीची कल्पना आली. त्यातच पुढे काही करून पहावे, करता येईल असा आत्मविश्वास वाटू लागला. त्यासाठी पुण्यातील डेक्कन कॉलेजमध्ये पीएच.डी.साठी दाखल झाले. प्रो. म.के. ढवळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली इनामगाव येथील जगप्रसिद्ध उत्खनन प्रकल्पात सलग तीन वर्षे काम करण्याची संधी मिळाली. मला ती करियर त्यानंतर काही अपरिहार्य परिस्थितीमुळे सोडून द्यावी लागली. उपजीविकेसाठी काही काम शोधणेही तातडीची गरज होती. व्याकरणशुद्ध इंग्रजी लिहिता येणे ही पात्रता एखाद्या दैनिकाच्या संपादकीय विभागात डेस्कवर नोकरी मिळवण्यासाठी चाळीस वर्षांपूर्वी पुरेशी होती. ती मिळवण्यास मला काहीच अडचण आली नाही. मी विविध वर्तमानपत्रांत व इतरत्र लेखन-संपादनाचे काम पुढील तीसेक वर्षे केले, पण शेवटपर्यंत पोटार्थीच राहिले. मला पुरातत्त्वाने तीन वर्षांत जो आत्मविश्वास दिला होता, तो मी तीस वर्षांच्या पत्रकारितेतून कमावता आला नाही.

Academics करू शकले नाही याची जखम खोल होती, वेदना तीव्र होत्या. अनेक वर्षे त्याबद्दल वाईट वाटत राहिले. पण आज असे वाटते, की तो राजमार्ग बंद झाल्यामुळेच मला आर्केओगिरीची आडवळणाची पायवाट खुली झाली. पत्रकारितेतून वेगळे संस्कार घडले; नजरेचा फोकस सर्वसामान्य माणसावर स्थिरावला व त्या दोन्ही प्रवाहांच्या संगमामुळे पुरातत्त्व व सर्वसामान्य माणूस यांना जोडणाराआर्केओगिरीनावाचा सेतू मला बांधता आला. तीस वर्षांपूर्वी हुकलेली नव्या-जुन्या गुरुजनांची शाबासकी मिळाली. कोणताही Precedent नसलेले नाविन्यपूर्ण काम केल्याचे समाधान लाभले. आणखी काय अपेक्षा ठेवावी माणसाने?

नेस्पेरेन्नूब मला भेटला त्याच्या चार-सहा महिने अगोदर मुंबई विद्यापीठात पुरातत्त्वाचा एक प्रमाणपत्र अभ्यासक्रम चालवण्यात येतो व त्याचे वर्ग दर रविवारी असतात असे ऐकले होते. मी तेथे नाव आनंदाने व उत्साहाने नोंदवले. पीएच.डी. करून जर माझी करियर रीतसर झाली असती तर जे लोक माझे विद्यार्थी असते, ते तेथे माझे शिक्षक होते! त्यांच्याकडून तो विषय पुन्हा नव्याने शिकून तीस वर्षांतील Updates अधाशासारखे खाऊन पचवले. जुन्यांची उजळणी झाली व कित्येक नवीन गोष्टी पाहण्यास, शिकण्यास मिळाल्या. दोन वर्षांचा तो काळ अतिशय आनंदात गेला. कित्येक जुने सहकारी, गुरुजन व मित्र-मैत्रिणी पुन्हा एकदा जोडले गेले, तरुण पिढीच्या पुरातत्त्वज्ञांशी मैत्री झाली. तसेच, त्या सर्व संचिताचा व पत्रकारितेच्या संस्कारांचा संयोग झाल्याने त्याच काळातआर्केओगिरीने आकार घेण्यास सुरुवात केली.

पत्रकार असताना डावी चळवळ, स्त्री चळवळ व पर्यावरणवादी चळवळ यांच्याशी जवळचा संबंध आला. Practical काम कमी पण वाचण्यास भरपूर मिळाले. दिल्लीत शिक्षण घेत असतानाचा मार्क्सवादी दृष्टिकोनाचा पाया भक्कम होता, त्यामुळे त्या चळवळी समजून घेण्यास मदत झाली. तीस वर्षांत गोळा केलेले ते गाठोडे घेऊन मी पुन्हा एकदा पुरातत्त्वाच्या अभ्यासवर्गात पाऊल टाकले आणि मला वेगळेच काही दिसू लागले!

दैनिकांमध्ये काम करताना सर्वांत ठळकपणे जाणवलेली गोष्ट म्हणजे वर्तमानपत्राचा सर्वसामान्य माणसावरील अढळ फोकस. सम्राट अशोकाने अफगाणिस्तानपासून कर्नाटकापर्यंत आणि गुजरातपासून ओडिशापर्यंत उभारलेल्या शिलालेखांवर मोठमोठी पुस्तके लिहिता येतात व त्याला इतिहास अशी मान्यताही मिळते. पण वर्तमानपत्र हे mass media आहे, massesना वगळून वर्तमानपत्र काढता येत नाही, सर्वसामान्य वाचक हा पत्रकारितेचा पाया असतो व तो मेंटेन करावा लागतो. नव्याने पुरातत्त्व शिकताना मला ती तफावत प्रकर्षाने जाणवू लागली. लोकचळवळीतील लोकआणि mass mediaतील ‘masses’ हा कळीचा घटक पुरातत्त्वातून गैरहजर होता, त्याची अनुपस्थिती मला जाणवत होती, काहीतरी अपुरे आहे असे सतत वाटत होते. होती ती केवळ खापरे, नाणी, ताम्रपट, शिलालेख, मूर्ती, दागिने, अवजारे, विटा, हाडे, सांगाडे, विष्ठा …

पण ते सर्व तेथे आले कसे? त्या सर्व वस्तू तयार करणारे व वापरणारे लोक, ते कोठे आहेत? ते या वस्तूंखाली दबलेले आहेत, त्यांचे आवाज दडपलेले आहेत, त्यांना मुक्त करा, बाहेर काढा, मोकळा श्वास घेऊ द्या, बोलू द्या, त्यांचे म्हणणे ऐकून घ्या असे काहीसे मंथन, बंडखोरी माझ्या डोक्यात सुरू झाली, पुरातत्त्वीय पुराव्यात गाडल्या गेलेल्या सर्वसामान्य माणसाचा शोध सुरू झाला… आणि माझ्या हाकेला ओ देऊन अनेक माणसे मला खुणावू लागली, बोलावू लागली! मी इतिहास काळात चोरपावलांनी प्रवेश करू लागले. रानावनात, गल्लीबोळात फिरून लोकांचे निरीक्षण करू लागले. झाडाआडून, खांबामागून त्यांची कुजबुज-गप्पागोष्टी ऐकू लागले. त्यात गवंडी होते, सुतार होते, शिलालेख कोरणारे होते, शिकारी, व्यापारी, प्रवासी, कुंभार, सैनिक, न्हावी, बांधकाम मजूर होते… स्त्रियाही मोकळेपणाने बोलत होत्या. सम्राट अशोकाने मांसाहार बंद करण्याचा फतवा काढला तेव्हा खानावळ चालवणाऱ्या एका माणसाच्या बायकोने त्याला काय सुनावले ते मी ऐकले. नवऱ्याला भंडावून सोडणाऱ्या एका हडप्पन बाईची कटकट मी ऐकली. सम्राट चंद्रगुप्ताच्या अंतःपुरात शिरून, त्याची महाराणी का रुसली ते पाहिले आणि सम्राटाने तिची मनधरणी कशी केली तेही ऐकले. मुलांनी अपेक्षाभंग केलेल्या बापांचा त्रागा ऐकला. चाकाचा शोध लावणाऱ्या माणसाच्या बायकोची प्रतिक्रिया बघितली. भारतात सासरी राहून कंटाळलेल्या एका सुकुमार ग्रीक राजकन्येची दर्दभरी कहाणी ऐकली. आर्यांच्या टोळ्यांनी पुरातत्त्वज्ञांना सतत दोनशे वर्षे हुलकावणी कशी दिली ते पाहिले. बाहेरून भारतात यावे की भारतातून बाहेर जावे याबद्दलची त्यांची चर्चा ऐकली. कोठेतरी उनाडायला गेलेली एक नदी कशी एका कुटुंबवत्सल माणसाला गोत्यात आणते आणि बायको त्याची कानउघाडणी मुलाबाळांसमोर कशी करते हे मी (देवाशप्पथ, स्वतःच्या डोळ्याने) पाहिले! त्यांतील काही माणसे मला धीटपणाने भेटू लागली, माझ्याशी बोलू लागली, माझ्याशी हितगुज-सल्लामसलत करू लागली!

सर्वसामान्य माणसांचा गोतावळा बराच जमला, त्यांचे अंतरंग कळू लागले. आश्चर्य म्हणजे, इतिहासाच्या पुस्तकांतून गायब असलेली ती माणसे हास्यविनोद करत होती, चेष्टामस्करी, गंमतजंमत करत होती, दैनंदिन जीवनात विरंगुळ्याची साधने तयार करत होती, राज्यकर्त्यांच्या मनमानीपुढे आवश्यक तेवढी मान तुकवून नंतर त्यांची टिंगल टवाळी करत होती. आता प्रश्न होता त्यांच्या त्या मोकळेपणाला दाद देण्यासाठी व्यासपीठ तयार करण्याचा. तेथे माझ्या मदतीला धावून आली पत्रकारिता!         पत्रकारिता क्षेत्रात सर्वसामान्य माणसांचे सगळ्यात भक्कम प्रतिनिधित्व करणारा आर.के. लक्ष्मण यांचा कॉमन मॅन तोच होता. कोठेतरी ती लिंक जुळली आणि कार्टून्स हेच माध्यम मला सापडलेल्या माणसांना वाचा फोडण्यासाठी योग्य राहील, हा समज अभावितपणे मनात घर करू लागला. मी एका कार्टूनिस्टच्या भूमिकेत नकळत शिरले. माझे चित्रे काढण्याचे कौशल्य अतिसामान्य होते, पण मी मला सतत भेटणाऱ्या माणसांचे आवाज, त्यांचे जोक्स पुरातत्त्वज्ञांपर्यंत पोचवण्यास अधीर झाले होते. मी ती माणसे वेड्यावाकड्या रेघोट्यांमधून कशीबशी उभी करू लागले. पाचपन्नास रफ ड्राफ्ट्स फाडल्यानंतर एखादे छान नव्हे, पण भावना पोचवू शकेल असे चित्र तयार होऊ लागले. मला एकापाठोपाठ एक कार्टून्स सुचू लागली. चित्रकला कौशल्याच्या सुमार दर्ज्यामुळे तयार झालेली पोकळी पुरातत्त्वीय पुराव्यांशी शंभर टक्के इमान राखून असलेल्या समर्पक, नेमक्या कॅप्शन्सनी भरून काढली आणि त्या भांडवलावर मी माझे पहिले कार्टून अभ्यासक्रम सुरू झाल्याच्या महिन्याभरातच फेसबुकवर टाकले!         पुरातत्त्वज्ञांना तो approach अगदी नवीन होता. त्यांच्यात हास्याचे फवारे फुटले आणि माझ्यावर कौतुकाचा अक्षरशः पाऊस पडू लागला. आणखी कार्टून्स हवी अशी मागणी होऊ लागली. त्याने प्रोत्साहित होऊन मी दर शुक्रवारी एक नवीन कार्टून फेसबुकवर टाकू लागले. आर्केओगिरीहे नाव गांधीगिरीकिंवा गुंडगिरीच्या धर्तीवर फेसबुकवर खुल्या मतदानातून सार्वमताने निवडले. चित्रांचा दर्जाही थोडाफार सुधारू लागला.आर्केओगिरीच्या अनेक कार्टून्समध्ये स्त्रीवादी विचार किंवा सर्वसामान्य स्त्रीचा आवाज आहे. मोहम्मद गझनीवरील कार्टून हे तर मार्क्सवादी विचारसरणीची थेट अभिव्यक्ती आहे. सोविएत रशियाची पडझड होत असताना सोविएत क्रांतीने प्रखर स्त्रीवादाला कसे दडपून टाकले आणि पुरुषांच्या सोयीच्या स्त्रीवादाची पाठराखण कशी केली याबद्दल पूर्व युरोपमधील स्त्री कार्यकर्त्यांनी रान उठवले होते. प्रत्येक देशातून भरभरून लेख येत होते. पुरुष स्वतःच्या एखाद्या कामगिरीला त्याच्याच सोयीसाठी स्त्रियांचा विचार न करता क्रांतिकारक ठरवतो हे आर्केओगिरीच्या नवाष्मयुगीन स्त्रियांनी दहा हजार वर्षांपूर्वीच ओळखले होते! इनामगावातील एक पुरुष त्याच्या छोट्या मुलाला बुद्धिमान स्त्री आपल्या सोयीची नव्हे रे गड्याअशी शिकवण देतो. अश्मयुगातील छोटीशी मुलगी ती मोठी झाल्यावर कोण होणार हे धीटपणाने सांगते. स्वयंपाक येत नसलेली एक हुशार सून तिच्या पुरातत्त्वज्ञ सासऱ्याला खुश करून सासूला शह देते. संपूर्ण महाभारत मुख्यतः पंजाब व आसपासच्या भागात घडलेले असताना महाराष्ट्रात जिकडे तिकडे पांडव लेणीकशी काय आढळतात याचा शोधआर्केओगिरीघेते. बालसंगोपनावरून नवरा-बायकोंचे खटके अश्मयुगातही उडतात. या सर्व कार्टून्संना पुरातत्त्वीय पुराव्यांचा भक्कम आधार आहे आणि त्यांचे संदर्भ देणारा मजकूर पुस्तकात दिलेला आहे.

पुराणातील देवादिकांच्या मिथक कथांना मात्र तसा आधार नाही, तरीदेखील त्यांचा समावेश आर्केओगिरीत केला आहे. त्याचे कारण असे, की अनेक तोंडांचा, हातांचा किंवा इतर अनैसर्गिक गुणविशेष असलेला देव जरी काल्पनिक असला तरी त्याची मूर्ती किंवा चित्र हे वास्तव असते. देवाच्या त्या स्वरूपाची कल्पना करणारा व ती साकार करणारा कारागीर हा माणूस हाडामांसाचा असतो. ती मूर्ती देवाच्या नव्हे तर त्या कारागिराच्या अस्तित्वाचा डावलून टाकता न येणारा प्रत्यक्ष पुरावा असतो. माणसाच्या कल्पनाशक्तीला शरण गेलेले देव त्यांची कैफियत आर्केओगिरीत हताशपणे मांडतात. आर्केओगिरीही गजाननाच्या भक्तीत पूर्णपणे बुडालेल्या भक्तांना निबिड जंगलात, हत्तींच्या कळपात घेऊन जाते; बुद्धावर सारखीच श्रद्धा असणारे दोन शिल्पकार त्यांच्या त्यांच्या शैलींद्दल बढाया मारतात.          सुमारे पंधरा लाख वर्षांचे पुरातत्त्व पिऊन पुरता झिंगलेला माझा कॉमन मॅनआता माझे ऐकेना. त्या बेवड्याला आवरण्याची ताकद माझ्यात नव्हती. भूतकाळातून फेरफटका मारून आता त्याला वर्तमानाचे वेध लागले होते आणि तेथे शिरकाव करण्यासाठी त्याने दारावर धडका देणे सुरू केले. तो दार फोडून माजलेल्या बैलासारखा सैराट सुटला आणि वर्तमानकाळात थैमान घालू लागला. सभा-संमेलनांत जाऊन पुरातत्त्वज्ञांना कानपिचक्या देऊ लागला. त्याने उन्नाओला जाऊन एका साधूच्या सांगण्यावरून खजिन्याचा शोध घेणाऱ्या पुरातत्त्वज्ञांची हजेरी घेतली. तो मोहेंजोदडोची पोस्टरे पाहून चित्रपटगृहात घुसला व त्याने निर्माता-निर्देशकांचे वस्त्रहरण केले. त्याने देशाची फाळणी करणाऱ्यांना वारशाची फाळणी कशी कराल?’ असा रोखठोक सवाल विचारला. त्याने अलिकडील सत्ताधाऱ्यांच्या खुर्चीखाली फटाके फोडण्याचे सत्कर्मही केले… पण त्याचबरोबर प्रो. Walter Spink, डॉ शांती पप्पू व इतर महत्त्वाच्या पुरातत्त्वज्ञांच्या कार्याची ओळख वर्तमानकाळातील सर्वसामान्य माणसांना करून दिली. तो खटाटोप भूतकाळातील सर्वसामान्य लोक व वर्तमानकाळातील सर्वसामान्य लोक यांचा एकमेकांशी परिचय करून देण्यासाठी केला. त्या कार्टून्सचे संकलन करून, सोबत संदर्भ स्पष्ट करणारा मजकूर घालून पुस्तक काढावे अशा सूचना पुरातत्त्वज्ञांकडून येऊ लागल्या. त्याची फलश्रुती खरोखरीच एका पुस्तकात झाली.       भारताचा ऐतिहासिक वारसा हा समृद्ध आहे यात शंका नाही. त्याचबरोबर हेही खरे, की भारतीय, विशेषतः हिंदू लोक भूतकाळाबद्दल जितके हळवे अन भावूक आहेत तितके कोणतेही लोक जगात नाहीत आणि कोणासही भूतकाळास तितक्या गांभीर्याने घेणे आवश्यक वाटत नाही. भारतीय लोकांची ती खासीयत म्हणावी लागेल. त्यांचा भूतकाळ हा त्यांच्या कल्पनेतील, त्यांच्या सोयीचा असा रम्य व गोंडस बऱ्याचदा असतो. राजकीय हेतूने प्रेरित काही लोक तोच भूतकाळ किती वाईट व लाजिरवाणा होता हेही सिद्ध करण्याचा आटापिटा करतात. ऐतिहासिक सत्य त्या दोन्हींच्या मध्ये पिचून जाते, लोप पावते. त्या दोघांची हे मान्य करण्याची तयारी नसते, की इतिहास हा अभ्यास शास्त्रशुद्ध पद्धतीने करण्याचा गंभीर विषय आहे आणि त्यासाठी परिश्रम, चिकाटी, अलिप्तता व academic प्रामाणिकपणा आवश्यक आहे. मृत व्यक्ती त्यांचे म्हणणे जिवंत माणसांसमोर येऊन मांडू शकत नाहीत, याचा गैरफायदा घेऊन त्यांना स्वतःच्या सोयीच्या रंगांमध्ये रंगवणे चुकीचेच नव्हे; तर भारत देशात घातकही आहे, हे धडधडीत सत्य आहे. बॉलिवूड व टीव्ही मालिका इतिहासाचा अव्यावसायिक (unprofessional) गैरवापर करून आगीत तेल ओतण्याचे काम सतत करताहेत. जनसामान्य ऐतिहासिक स्थळांवर पिकनिकसाठी जातात व तेथील पुरावशेषांची विटंबना बिनधास्तपणे करतात. त्यांचे जतन करण्यासाठी ना पैसा उपलब्ध आहे ना मनुष्यबळ, ना इच्छाशक्ती. हे सर्व कार्टून्सच्या माध्यमातून मांडण्याची संधी मला आर्केओगिरीमुळे मिळाली.

आर.के. लक्ष्मण यांनी ‘The Tunnel of Time’ या त्यांच्या आत्मचरित्रात म्हटले आहे – “For a long time I believed I was providing the readers with some comic relief in their dreary humdrum existence. The bespectacled Common Man in his checked coat had walked into my cartoons spontaneously, as if I had no hand in his creation. Equally effortlessly he became a silent spectator of events moving with ease from drought-stricken villages to the airport to watch foreign delegations arriving…

In the course of time I was surprised to discover that my readers looked upon me not merely as a cartoonist who tickled their sense of humour, but as a profound thinker, a social reformer, a political scientist, a critic of errant politicians and so on…

आर्केओगिरीही माझी एकटीची नसून सर्वांची आहे. म्हणून आर्केओगिरीहा शेवट नसून सुरुवात आहे असे मला वाटते.

(शुभा खांडेकर यांच्या आर्केओगिरी पुस्तकातील मनोगत)

(छायाचित्रे लेखिकेच्या संग्रहातून)

– शुभा खांडेकर 99694 39986 shubhakhandekar@gmail.com

————————————————————————————————————————————————-

 

About Post Author

3 COMMENTS

  1. खूप माहितीपूर्ण लेख आहे,आंतरिक सृजनता व्यवहारी जगात टिकून राहते हे खरे ,व्यंगचित्र निव्वळ विनोद निर्माण करत नाहीत तर जगणे उलगडत नेतात

  2. छानच लेख लिहिला आहेस, शुभा. आजकाल जे सत्ताधीशांच्या आवडीच्या विचारप्रणालीला धरूधरून काही पुरातत्त्वज्ञ बोलतात त्यावरही तुझी कार्टून्स नक्की येतील अशी खात्रीशीर आशा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here