अनुताई वाघ या ताराबाई मोडक यांच्या सहकारी. त्यांनी कोसबाडच्या आदिवासी भागातील बालशिक्षणाचे- ताराबाई मोडक यांचे कार्य जोमाने पुढे नेले. त्या कार्याला अनेक पदर जोडले. अनुताई यांचे वैयक्तिक आयुष्य दु:खद होते. त्यांना मातृत्व तर सोडाच; पण विवाहितेचे सौभाग्यही क्षणिक लाभले ! त्यांचे लग्न वयाच्या तेराव्या वर्षी झाले व त्यानंतर काही महिन्यांतच त्यांच्या पतीचे निधन झाले. मात्र अनुताईंनी आदिवासींच्या व दलितांच्या मुलांना वात्सल्याने स्वत:च्या कवेत घेतले. त्या समाजातील मुलांचे खरे शिक्षण ‘त्यांना माणसात आणण्याचे’ होते. ती मुले केवळ शिक्षणापासून वंचित नव्हती, तर त्यांचे शिक्षणाशी जणू शत्रुत्व तयार झाले होते. त्यांनी तशा मुलांच्या गळी शिक्षण उतरवण्याचा लोकविलक्षण खटाटोप केला.
अनुताई वाघ यांनी बोर्डी येथे 1945 सालापासून बारा वर्षे काम केले. त्यानंतर (1957), त्यांनी ताराबाई मोडक यांच्या बरोबर डहाणू तालुक्यातील ‘कोसबाड’ या गावात बालशिक्षणातील पायाभूत कार्याला सुरुवात केली. तेव्हा ताराबाई पासष्ट आणि अनुताई सत्तेचाळीस वर्षांच्या होत्या. तेथे आदिवासी वस्ती होती. अनुताईंनी ताराबाईंची प्रत्येक कल्पना उचलून धरली व ती प्रत्यक्षात आणली. त्यांना आदिवासी पाड्यांवर चालत किंवा बैलगाडीतून जावे लागत असे. ताराबाईंनी बोलावे व अनुताईंनी झेलावे, असे त्यांचे गुरुशिष्यत्वाचे विलक्षण नाते होते. ताराबाई अनुताईंना ‘घरातील कर्ता पुरुष’ असेच म्हणत असत. ताराबाईंनी देह 1973 साली ठेवला. ताराबाईंची इच्छा अनुताईंनी त्यांना अग्नी द्यावा, अशी होती.
अनुताईंनी मुलांना नुसते शिकवले नाही. त्यांना अंघोळी घातल्या, मुलींच्या डोक्यांतील उवा काढल्या, त्यांच्या खरजेला औषधे लावली, संडास तयार करून त्यांचा वापर कसा करावा याचे प्रात्यक्षिक करवून घेतले. त्यांनी मुलांना शाळेपर्यंत आणण्यासाठी बैलगाडीतून मिरवणुका काढल्या. तरीही मुले शाळेत येत नाहीत असे जाणवले तर स्वत: मुलांकडे जावे, या निकषानुसार त्यांनी वस्तीतच झाडाखाली अंगणवाड्या सुरू केल्या.
ताराबाई आणि अनुताई यांनी निसर्गातून बनवलेल्या किंवा परिष्कृत केलेल्या साधनांचे अपूर्व असे जग मुलांपुढे निर्माण केले ! झाडे, पाने, फुले, गुंजा, शंख, शिंपले हे सर्व त्यांच्या शिक्षण प्रयोगात कामाला आले. गेरू, चुनखडी, पिवळी माती यांचा उपयोग रंगकामासाठी झाला. त्यांनी वडाच्या कोवळ्या पारंब्या ठेचून त्यांचे ब्रश तयार केले. अनुताईंच्या अनौपचारिक अभ्यासक्रमात गाणी, गप्पा, खेळ, ओढ्यात अंघोळी, फुले जमा करणे इत्यादींचा समावेश असे. अनुताईंनी त्यांच्या शैक्षणिक पद्धतीचे तत्त्वज्ञान “शाळा म्हणजे मुलांच्या अंगणातलं झाड झालं पाहिजे” अशा साध्यासोप्या शब्दांत सांगितले आहे.
पाड्यांवरील मुलांचे आई-वडील कामानिमित्त बाहेर जात असत. मोठी मुले वाडीतच विटांच्या भट्टीवर चार-दोन आणे रोजावर जात. मग आठ-दहा वर्षे वयाच्या मुलांना घर आणि लहान भावंडे सांभाळावी लागत; म्हणून अनुताईंनी पाळणाघरे सुरू केली. मोठ्या मुलांना शाळेत येता यावे म्हणून ही योजना ! मुलामुलींनी शाळेत त्यांच्या लहान भावंडांना घेऊन यावे, पाळणाघरात ठेवावे व घरी जाताना घेऊन जावे अशी कल्पना. त्यांना तेथे जेवणाची सोय होती. पाळणाघरातील बालकांची काळजीही आश्रमात प्रेमाने व बारकाईने घेतली जाई. मुंबई-पुण्यासारख्या शहरांतील कारखान्यांतून, गिरण्यांतून चालणाऱ्या ‘क्रेश’पेक्षा हे स्वरूप वेगळे होते. तेथे धाकट्या भावंडांना खेळवण्याचे काम थोरल्या मुलांना करावे लागत असे. पाळणाघरात भावंडे कशी खेळतात, त्यांना अंघोळ कशी घालावी, पेज कशी पाजावी वगैरे गोष्टी थोरल्या भावंडांना व अधूनमधून मुलांना भेटण्यास येणाऱ्या आयांना सांगितल्या जात.
अनुताई अंगणवाडीत वेगवेगळ्या प्रकारचे साधनसाहित्य घेऊन जात. बादलीत आरसा, फण्या, तेल, रुमाल, हस्तव्यवसायाचे सामान, खराटे असा थाट असे. कार्यकर्त्यांना त्यांचे अनुकरण करावे लागे. आदिवासींची मुले नागरी संस्कृतीपेक्षा वेगळी असत. त्यांच्या डोळ्यांतील चमक, चपळता, समयसूचकता, काटकपणा हे गुण लक्ष वेधून घेणारे असत. त्यांना भीती शहरी माणसांची वाटे. अनुताईंना कुरणशाळेत काम करताना तर फार आनंद होत असे. त्यांना निसर्गात जिकडे-तिकडे शैक्षणिक साधने विखुरलेली दिसत. तेव्हा त्यांना मुलांच्या शिक्षणातील त्रुटी सहज कळत व त्यावर उपाय सुचत. रिमझिम पाऊस पडत असताना, गुरे इकडेतिकडे चरत असताना मुलांना एकत्र करून गाणी, गोष्टी, कवायती, मैदानी खेळ, नकला वगैरे कार्यक्रम सुरू होत. त्यातून मुलांची मने शिक्षणाकडे आकर्षित होत, की मग गप्पागोष्टींद्वारा स्वच्छता, नागरिकशास्त्र, भूगोल, गणित, भाषा, सृष्टिविज्ञान असे अनेक विषय त्यांना शिकवले जात ! अधूनमधून ओढ्यांवर जाऊन सार्वजनिक अंघोळ, नखे कापणे, कपडे धुणे असे कार्यक्रम होत असत. दगडांच्या वजनावरून माणसाचे वजन… आणि त्यावरून एकूण आरोग्याकडे मुलांचे लक्ष वळवले जाई. असले सगळे खेळ व त्यातून शिक्षण- पाने, फुले, बिया, काटक्या, पिसे, घरटी ही सगळी माहिती त्यांना निसर्गाच्या शाळेतून मिळत असे.
अनुताईंनी ताराबाई यांच्यानंतर त्यांच्यापेक्षा काही नवीन कामे हाती घेतली. ‘विकासवाडी शबरी उद्योगालया’तून आदिवासी स्त्रियांकडून मसाले, पापड, लोणची वगैरे बनवून, त्यांची विक्री करून संस्थेला व त्या स्त्रियांना चार पैसे मिळू लागले. संस्थेने स्वतःचा छापखाना सुरू केला. बालसेविकांचे प्रशिक्षण चालू असताना, बालवाडीसाठी योग्य अशी गाणी, गोष्टी इत्यादी बालसाहित्य तेथे छापले जाई. ‘शिक्षण पत्रिका’ या मासिकाची छपाईही तेथेच होत असे. त्याचबरोबर बाहेरचे छपाईचे कामही छापखान्यात घेतले जाई. त्यामुळे संस्थेला आर्थिक मजबुती लाभली होती.
त्यांच्या डोक्यात नव्या कल्पना व नव्या योजना कशा साकारत ते जाणण्यासारखे आहे. एकदा अनुताई रानशेत आणि वाणगाव या दोन गावांना जोडणाऱ्या गाडीरस्त्याने ‘दाभोण’ नावाच्या आदिवासी गावात गेल्या होत्या. त्यांची जीप पाहून आजूबाजूची आदिवासी मुले गोळा झाली. त्यांच्या अंगावर धड कपडे नव्हते. त्यांचे केस विस्कटलेले. पण त्यांचे चेहरे हसतमुख. अनुताईंनी त्यांना विचारले, “शाळेत जाता का रे?” तेव्हा एक मुलगा म्हणाला, “कोठची शाळा?” त्या म्हणाल्या, “इथे जवळच शाळा आहे ना…?” तो मुलगा म्हणाला, “ते तथ शाळा होती, पण मास्तर कोठं येत आहे?” मुलांचे ते उत्तर ऐकून त्या निरुत्तर झाल्या. तेव्हा त्यांच्या मनात विचार आला, की येथे शाळा असण्यास हवी. त्या तेथे जाऊन काही दिवस राहिल्या.
तेथूनच ‘दाभोणचा प्रकल्प’ सुरू झाला आणि ‘ग्राममंगल’ या संस्थेची स्थापना झाली. दाभोण येथे आदिवासी मुलांसाठी बालवाडी व शाळा सुरू झाली. या संस्थेची जबाबदारी अनुताईंनी त्यांचे मामेभाऊ प्राध्यापक रमेश पानसे यांच्यावर सोपवली. पानसे यांनी ती जबाबदारी समर्थपणे पेलली व अनेक कल्पक योजना अमलात आणल्या. दाभोण व आयना येथे आदिवासी मुलांसाठी उत्तम प्रकारच्या शिक्षणाची सोय झाली आहे. दाभोण प्रकल्पाच्या मूळ प्रणेत्या मंगला देशपांडे यांनी अनुताईंना डहाणू येथे मूकबधिर मुलांची शाळा सुरू करण्याचे सुचवले. त्यावर अनुताई म्हणाल्या, “हे खूप अवघड काम असून आपल्याला ते जमेल का? अशा मुलांशी माझा कधीही संबंध आलेला नाही.” त्यावर मंगला म्हणाल्या, “आदिवासी मूकबधिर मुलांच्या समस्या फार बिकट आहेत.” हे अनुताईंच्या लक्षात आल्यावर त्यांनी कंबर कसली व 1980 साली डहाणूतील मासोली भागात ‘मूकबधिर बालविकास केंद्र’ सुरू झाले. मंगला देशपांडे दाभोण प्रकल्पाच्या प्रेरणामूर्ती आहेत. त्यांनी तेथे मूकबधिर शाळा सुरू केली. त्यांनी ‘सावित्री’ हे मासिक सुरू केले. महाराष्ट्र शासनाने अनुताईं व मंगला देशपांडे यांचा गौरव ‘सावित्री पारितोषिक’ देऊन 1981 साली केला.
भारत सरकारने अनुताईंचा ‘पद्मश्री’ पुरस्कार देऊन गौरव केला आहे. प्रयोगशील शिक्षणतज्ज्ञ अनुताईंनी 1992 साली कोसबाड येथे देह ठेवला.
– सुरेश चव्हाण 9867492406 sureshkchavan@gmail.com
अनुताई नात्याने माझ्या मावशी लागत, एकदा आईच्या ईच्छेप्रमाणे मी सर्व कुंटुंबीयांना घेऊन बस करून कोसबाडला गेलो. माझ्या आईने अनुताईंना मी किती कष्ट करून शिक्षण घेतले आणि आता मोठ्या पदावर आहे वगैरे सांगितले त्यावर त्या मला फक्त एकच वाक्य बोलल्या “स्वत:साठी जगलास पण समाजासाठी काय केलेस ?” तीशीत असलेल्या माझ्या मनांवर गेली चाळीस वर्षे ह्या वाक्यांचा प्रभाव आहे व त्याचे परिणाम माझ्या जीवनात टिकून आहेत.