अमेरिका – स्थलांतरितांचा देश (America, The Migration Story)

0
41

पृथ्वीतलावरील अनेक देशांतील लोक 1840 सालापासून अमेरिकेच्या भूमीवर येऊन थडकत आहेत. कॅलिफोर्निया या अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्यावरील राज्यात सोने सापडल्याची बातमी 1848 च्या सुमारास जगभर पसरली. त्यामुळे सोन्याच्या मोहाने त्यावेळी तीन लाखांपेक्षा जास्त लोक अमेरिकेत येऊन ठेपले. त्या विषयी एक सिनेमाही विसाव्या शतकाच्या मध्यावर निघाला होता. नंतर रेल्वे बांधणीसाठी चिनी लोक मोठ्या संख्येने आले. युरोपच्या आयर्लंडमध्ये दुष्काळामुळे असंख्य लोक मृत्युमुखी पडले तेव्हा पाच लाख आयरिश आले. अमेरिका हा प्रचंड मोठा व त्याच बरोबर मोकळा देश असल्याने तेथे येऊन चरितार्थ शोधणे सोपे होते. नंतर हजारो पोलिश आणि रशियन हे युरोपीयन लोक आले. इटालीतील अवर्षणामुळे चाळीस लाख लोक 1880 च्या सुमारास अमेरिकेत आले. मात्र अमेरिकेतील स्थलांतर या विषयाची छाननी केली तर बहुतेकांना अनिच्छेनेच अमेरिकेला जावे लागले होते असे दिसून येते.

दुसऱ्या महायुद्धाच्या काळात युरोपातील अनेकांना त्यांचे त्यांचे देश सोडून पळावे लागले होते. अनेक देशांतील प्रतिभावान आणि मेहेनती तरुण त्या काळात अमेरिकेत दाखल झाल्याने अमेरिका श्रीमंत होण्यास मदत झाली ! किंबहुना तेव्हापासूनच अमेरिकेची धारणा अशी बनत गेली, की जगातील हुशार लोकांनी अमेरिकेत यावे ! आणि त्यांच्या बुद्धिप्रतिभेला व कार्यशक्तीला तेथे वाव होताही. दुसऱ्या महायुद्धानंतर दहा लाख जर्मन लोकांची स्थलांतराची लाट अमेरिकेत आली. त्यांना त्यांच्या देशातील आर्थिक, सामाजिक आणि राजकीय गडबडीपासून दूर जायचे होते. त्याचे ठळक उदाहरण म्हणजे बाहाउस. ती जर्मन शिक्षण संस्था तिच्या आधुनिक विचारांनी जगभर गाजली. तेथे काम करणाऱ्यांना ‘मास्टर्स ऑफ फॉर्म्स’ असे म्हणत. त्यात पॉल क्ली, वासिली कॅण्डिस्की, महोली नागी असे ‘दादा’ लोक होते. प्रत्येकाचा प्रभाव इटाली देशाच्या मायकेल अँजेलोसारखा साऱ्या जगावर होता, पण नाझी राजवटीच्या काळात बाहाउस या संस्थेची स्थापना करणाऱ्या वॉल्टर ग्रोपियस आणि लुडविग मीस व्हॅन डर रोहे या दोघांना, वयाची पन्नाशी उलटल्यावर अमेरिकेला परागंदा व्हावे लागले होते. त्यांनी अमेरिका हीच कर्मभूमी मानली ! आधुनिक वास्तुकलेला वेगळेच वळण देणारे ते महत्त्वाचे वास्तुकलाकार. ते शिकागोला आणि जगाला वेगळा मार्ग दाखवण्यासाठी प्रसिद्ध झाले. त्यांच्या कर्तबगारीची ख्याती अमेरिकेला लाभली. लुडविग मीस व्हॅन डर रोहे हे ‘इलिनॉय इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी’चे प्रमुख झाले. त्यांच्या दोन कल्पना (LESS IS MORE – ‘थोडक्यात गोडी’ आणि GOD IS IN DETAILS – ‘बारकाव्यात देव असतो’) जगाने उचलून धरल्या. त्यात भारताचाही समावेश होता. त्यांच्या सिद्धांताची छाप शिकागोच्या विकासात दिसते. पॉल क्ली (1879-1940) हा स्विस वंशाचा जर्मन कलाकार होता. त्यांची अत्यंत वैयक्तिक शैली प्रसिद्ध आहे. ती अभिव्यक्तिवाद, क्युबिझम आणि अतिवास्तववाद यांचा समावेश असलेल्या कलेतील हालचालींनी प्रभावित झाली.

आशियामध्ये अमेरिकेत स्थलांतर करण्याची लाट गेली तीन-चार दशके उसळली आहे. भारतातील लोक अमेरिकेत स्थलांतर बहुसंख्येने सत्तरच्या दशकांत करू लागले. त्यास नव्वदच्या दशकात ‘ब्रेनड्रेन’चे स्वरूप आले. आजच्या परिस्थितीत ‘वॉशिंग्टन टाइम्स’च्या वृत्तानुसार पंधरा कोटी ऐंशी लाख लोकांना अमेरिकेत स्थलांतर करण्याची इच्छा आहे. त्यात आफ्रिका खंडातील लोक आणि मध्यपूर्व भागातील लोक यांची संख्या जास्त आहे. त्या देशांची नावे वाचली तर त्यांची अमेरिकेत जाण्याची इच्छा समजून घेता येते. पण भारताचा विचार केला तर अमेरिकन सरकारचा अहवाल सांगतो, की दरवर्षी दोन कोटी वीस लाख लोक व्हिसाच्या लॉटरीत नाव नोंदवतात. व्हिसा मिळण्यातील अनिश्चिततेचा त्यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबावर मानसिक परिणाम होतच असणार. भारतातील दहा लाखांपेक्षा जास्त उच्चशिक्षित तरुण अमेरिकेतील नोकऱ्यांसाठी रांगेत उभे आहेत. तरुण डॉक्टरांनाही अमेरिकेला जायचे आहे. कारण भारतातील कॉर्पोरेट हॉस्पिटल्स कमी पगार देतात. पण आशियातील डॉक्टरांना नोकरी-व्यवसायासाठी अमेरिका परवानगी देत नाही. भारतीयांना अमेरिकेचे वेड आहे. आकडेवाऱ्या वाचल्या की ते खरे मानावे लागते. त्यांना स्वतःसाठी भारतात भविष्य दिसत नाही !

वास्तविक ते सगळे चांगल्या परिस्थितीतील असणार, कारण इतक्या सगळ्या उचापती करण्यासाठी पैशांची गरज असते. महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्या का करतात? महाराष्ट्र अनेक क्षेत्रांत मागे का असतो? राजस्थानच्या वाळवंटी प्रदेशातील मारवाडी आणि माहेश्वरी श्रीमंत का असतात? असे अनेक प्रश्न मानवी जीवन व कर्तबगारी या संदर्भात पडत असतात.

काही देश गरीब का असतात आणि काही देश श्रीमंत का असतात? या विषयावर संशोधन करणाऱ्या डेरेन अजेमालू, सायमन जॉन्सन व जेम्स रॉबिन्सन या तीन प्राध्यापकांना अर्थशास्त्राचे नोबेल पारितोषिक 14 ऑक्टोबर 2024 रोजी प्रदान करण्यात आले. त्या तिघांना नोबेल पारितोषिक विभागून मिळाले आहे. त्यांच्या संशोधनात भारत आणि इतर देश यांचा उल्लेख आला आहे. विशेषकरून ज्या देशांवर काही युरोपीयन देशांचे राज्य होते त्या संबधीही माहिती आहे. डेरेन अजेमालू यांचा जन्म इस्तंबूल (1967) येथील. ते आर्मेनियन वंशाचे तुर्की-अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ आहेत. त्यांनी मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये शिकवले आहे, सायमन जॉन्सन हे ब्रिटिश-अमेरिकन. त्यांचा जन्म 1963चा आणि जेम्स रॉबिन्सन हेही ब्रिटिश-अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ आहेत. त्यांचा जन्म 1960 चा.  तिघांच्या जीवनाची पार्श्वभूमी वेगवेगळी असली तरी तिघेही अमेरिकन शिक्षण संस्थांशी निगडित आहेत.

त्या तिघांनी अनेक देशांचा अभ्यास केल्यावर त्यांच्या असे ध्यानात आले, की देश श्रीमंत होण्यासाठी मुक्त अर्थव्यवस्था, जास्त गुंतवणूक, चांगले हवामान, लोकांचे उत्तम आरोग्य, उत्तम शिक्षण आणि सोयीची बाजारव्यवस्था अशा अनेक गोष्टी असणे गरजेचे असते. युरोपातील अनेक देशांनी एकोणिसाव्या शतकापर्यंत अन्य देशांवर राज्य केले. पण ते त्या वसाहतींत तशा सोयी साध्य करू शकले नाहीत. त्यामुळे ते वसाहती देश गरीबच राहिले. जे वसाहती देश चांगल्या संस्था स्थापू शकले तेथे लोकांच्या प्रगतीला काही प्रमाणात वाव मिळाला- त्याचे उत्तम उदाहरण म्हणून कॅनडाचे नमूद करता येईल. तो बऱ्यापैकी श्रीमंत देश होऊ शकला आहे – आणि तसे घडले नाही तेथील लोकांना म्हणजे त्या त्या देशाला प्रगत होता आले नाही.

तिघांच्या म्हणण्याप्रमाणे श्रीमंत देशांपैकी वीस टक्के देश गरीब देशांपेक्षा तीसपट श्रीमंत आहेत. गरीब आणि श्रीमंत देशांमधील दरी ही जास्त मोठी आहे. सध्या जे देश श्रीमंत होण्यासाठी धडपड करत आहेत त्या देशांत गरीब आणि श्रीमंत लोकांमधील आर्थिक तफावत जास्त आहे. त्यामुळे ते देश श्रीमंतांच्या रांगेत जाऊन बसू शकत नाहीत.

2024 मध्ये देशाच्या आर्थिक परिस्थितीचे एकूण राष्ट्रीय उत्पादन देशातील वस्तू आणि सेवा यांच्या उत्पादनाची किंमत – अर्थात प्रमुख देशांचा – जीडीपी पुढीलप्रमाणे आहे – अमेरिकेचा जीडीपी पंचवीस ट्रिलियन, चीन चौदा ट्रिलियन, जपान सव्वाचार ट्रिलियन, जर्मनी 3.85 ट्रिलियन, भारत 3.41 ट्रिलियन, इंग्लंड 2.67 ट्रिलियन, फ्रान्स 2.63 ट्रिलियन, रशिया 2.24 ट्रिलियन. अन्य देशांतील अनागोंदी आणि गोधळ अमेरिकेला फायदेकारक ठरत आला आहे. अमेरिकेने समृद्ध होण्यात स्थलांतरितांचा मोठा वाटा आहे असे अमेरिकाही मानते.

– प्रकाश पेठे 9427786823 prakashpethe@gmail.com

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here