‘काकडे’ घराण्याची झुंजार परंपरा सतत चारशे वर्षे जपली गेली आहे. काकडे यांचे मूळ गाव काकडेची किन्ही. ते बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यात आहे. काकडे घराण्याचे मूळ पुरूष ‘सूर्याजी काकडे’ हे आहेत. ते शिवरायांचे एकनिष्ठ सरदार होते. त्यांचे एकविसाव्या शतकातील वंशज आहेत शिवाजीराव काकडे. ते काकडे यांच्या अनेक शिक्षणसंस्था सांभाळत आहेत आणि त्या बरोबर त्यांनी कापसाची आधुनिक गिरणी सुरू केली आहे. त्यांचे पिताजी आबासाहेब यांनी या घराण्यास आधुनिक दृष्टी दिली. ‘काकडे’ घराणे सहा पिढ्यांपूर्वी मंगरूळ (तालुका शेवगाव, जिल्हा अहमदनगर) येथे स्थलांतरित झाले. कुटुंबाचा चरितार्थ नीटनेटका चालावा हा त्यांचा त्यामागे हेतू होता.
घराण्याचा आधुनिक काळातील इतिहास सुरू होतो एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस कान्होजी महादजी काकडे यांच्यापासून. ते धार्मिक वृत्तीचे, शेतीवाडी आणि शिक्षण यांवर श्रद्धा असलेले गृहस्थ होते आणि तसेच, त्यांचे कुटुंबही होते. कान्होजी यांचे व्यक्तिमत्त्व बलदंड असे होते. त्यांच्या घराण्याला पुढारपणाची, पाटीलकीची परंपरा होती, मात्र कान्होजी पाटलांनी पाटीलकीचा तोरा कधी मिरवला नाही. त्यांचे वजन सरकार दरबारी होते. ते दुसऱ्या बाजूस अडल्या-नडलेल्या लोकांनाही मदतीचा हात देत. कान्होजी पाटील यांच्याकडे एक उंच, धिप्पाड घोडी होती. ते त्या घोडीवर स्वार होऊन फिरत. ती घोडी अहमदनगरचे ब्रिटिश जिल्हाधिकारीदेखील ग्रामीण भागात प्रवासासाठी म्हणून मागवून घेत.
कान्होजी पाटील यांच्या पत्नी लक्ष्मीबाई. कान्होजी आणि लक्ष्मीबाई यांना पाचव्यांदा मुलगा झाला (25 जून 1919 रोजी) तो जगन्नाथ म्हणजेच आबासाहेब. मात्र मुलाचे पाळण्यातील नाव होते ‘भागुजी’ ! लहान भागुजी अबोल होता. शाकाहारी, वडीलधाऱ्यांचा मान ठेवणारा- त्यांचा शब्द प्रमाण मानणारा आणि आईवडिलांवर नितांत श्रद्धा व प्रेम असणारा, धार्मिक वृत्तीचा, अभ्यासू, शांत व विचारी स्वभावाचा… ! भागुजीचा वेगळेपणा त्याच्या लहानपणापासूनच जाणवू लागला. तो लहान मुलांना जमवून कीर्तने करी. त्या काळी कीर्तन माध्यमास समाजात मोठे स्थान होते. म्हणून कान्होजी पाटलांनी भागुजीला ‘कीर्तनकार’ करण्याचे ठरवले. भागुजीने हरिपाठ, व्यंकटेश स्तोत्र मुखोद्गत केले होते.
भागुजीने पहिली ते तिसरीपर्यंतचे शिक्षण मंगरूळ येथेच घेतले. त्याला चौथीसाठी चापडगावला पाठवले. मंगरुळ ते चापडगाव हे अंतर पाच किलोमीटरचे. भागुजी रोज पाय तुडवत शाळेला जाई. भागुजी त्याच्या अंगच्या हुशारीने चौथीची बोर्ड परीक्षा मुदतीपूर्वीच उत्तीर्ण झाला. तो सहावीसाठी शेवगावला राजाराम म्हस्के गुरुजी चालवत असलेल्या वसतिगृहात दाखल झाला. त्याची हुशारी म्हस्के गुरुजींच्या लक्षात आली. त्यांना तो मुलगा कुशाग्र बुद्धीचा आहे, त्याला योग्य शिक्षण दिले तर तो प्रगती करेल- नावलौकिक मिळवेल असा विश्वास निर्माण झाला. त्यांनी कान्होजी पाटलांना ते सर्व पटवून दिले. त्यामुळे भागुजी यास पुढील शिक्षणासाठी अहमदनगरला सोसायटी हायस्कूलमध्ये दाखल केले गेले. तो भागुजी याच्या आयुष्यातील मोठा टप्पा ठरला. भागुजी याला स्वातंत्र्य लाभले. तो काळही देशात स्वातंत्र्य लढ्याने पेटलेला होता. भागुजीने स्वतःला तेथे चिंतन, मनन, नियमित व्यायाम व अभ्यास यांत झोकून दिले. भागुजीने नगरच्या शेतकरी बोर्डिंगमध्ये राहून परीक्षेत नेत्रदीपक यश मिळवले. तो कुस्त्या, हुतुतू, शरीरसौष्ठव स्पर्धा या मैदानी खेळांतही अग्रेसर राहिला. त्याने अनेक पदके, खेळाची चॅम्पियनशिप मिळवलीच; त्याचा नावलौकिक अग्रगण्य खेळाडू म्हणून होता.
संबंधित लेख –
आबासाहेब काकडे – झुंजार लोकनेते
आबासाहेब काकडे – सर्वसामान्यांचे नामांकित वकील
आबासाहेब काकडे : क्रांतिकार्यातून विधायकतेकडे
भागुजी मॅट्रिकची परीक्षा (दहावी) प्रथम श्रेणीत 1939 या वर्षी उत्तीर्ण झाला. त्याने चित्रकलेच्या प्रथम आणि द्वितीय परीक्षाही पास केल्या होत्या. त्याच्या अंगच्या विविध गुणांचे दर्शन तेथे झाले. त्याने निसर्गचित्राबद्दल प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले; अभ्यासातील यशाबद्दल सरकारी स्कॉलरशिपही मिळवली. चतुरस्र यश भागुजीला शालेय दिवसांत लाभले व तो त्या काळच्या रीतीप्रमाणे महाविद्यालयीन शिक्षणासाठी पुण्यात प्रवेश करता झाला. एका शेतकऱ्याचा मुलगा खेडेगावातून येऊन, 1940 साली विद्येच्या माहेरी, फर्ग्युसन महाविद्यालयात दाखल होतो हेच मुळी अभिमानास्पद होते ! भागुजीने स्वतःचा वेगळा ठसा महाविद्यालयीन जीवनामध्येही उमटवला. त्याच्या जीवनाचे सूत्र ‘साधी राहणी आणि उच्च विचारसरणी’ हे तेथपर्यंत बनले होते. कारण त्याच्यावरील भाऊराव पाटील यांचा संस्कार. भागुजीने ‘कमावा आणि शिका’ हा संदेश अंगीकारला होता. तो पडतील ती कामे शिक्षण मिळवण्यासाठी त्या योजनेत करू लागला.
शिक्षणाची धडपड अशी चालू असताना, भागुजीच्या मनात दुसरीकडे वेगळ्याच गोष्टी घडत होत्या. काळ पारतंत्र्याचा होता ! भागुजीचे मन पुण्यात बैठका, गुप्त सभा, संमेलने, चर्चा, परिसंवाद, मोर्चे आदि कार्यक्रमांतून बदलू लागले. तो देशभक्तीने प्रेरित होऊन प्रगट आणि भूमिगत रीत्या भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीत भाग घेऊ लागला. तशात तो इंटरची परीक्षाही पास झाला. त्याच सुमारास, भागुजीची भेट कोल्हापूरच्या संस्थानिकांशी झाली. तो भागुजी याच्या आयुष्यातील वळणाचा दुसरा टप्पा होता. ती भेट त्याच्या जीवनात क्रांती घडवून आणणारी ठरली. तेथेच, त्याने ‘भागुजी’ हे स्वत:चे नाव बदलून ‘जगन्नाथ’ असे नामकरण करून टाकले. जणू पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजात भागुजी काकडे या नावाने प्रवेश घेतलेला विद्यार्थी ‘जगन्नाथ’ या नावाचा कर्ता पुरुष बनून, पदवीधर होऊन बाहेर पडला ! ते पदवीधर ‘जगन्नाथ काकडे’ ! त्यांचे कार्यकर्तृत्व व लौकिक, दोन्ही एवढे वाढले, की लोक त्यांना ‘जगन्नाथ’ या नावाऐवजी ‘आबासाहेब’ असे म्हणू लागले.
जगन्नाथ यांच्या मनावर कोल्हापूरचा फार प्रभावी ठसा उमटला. वैचारिक परिवर्तनाचे केंद्र, कुस्त्यांचे माहेरघर आणि तेथील संस्थानिकांनी नोकरीसंबंधीच्या राखीव धोरणांची केलेली अंमलबजावणी ही कोल्हापूरची वैशिष्ट्ये होती, त्यांचा प्रभाव पडला. आबासाहेब कोल्हापुरी गेले. त्यांनी एलएल बी साठी प्रवेश कोल्हापूरच्या स्पाइस कॉलेज येथे घेतला. त्यांनी एलएल बी ची पदवी 1945 मध्ये संपादन केली.
तो काळ कोल्हापुरात भारलेला होता. भाई माधवराव बागल यांनी कोल्हापूर संस्थानात प्रजा परिषदेच्या माध्यमातून भारतीय स्वातंत्र्याचे आंदोलन केले होते, पण आबासाहेबांना तेथे लाभला तो सामाजिक परिवर्तनाचा वसा. राजर्षी शाहू महाराजांनी गरीब, शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांना शिक्षणातील ज्ञानाची कवाडे खुली केली होती. संस्थानात दलितांना हुद्याच्या जागांवर नोकर्या दिल्या होत्या. त्यांनी ते कार्य सामाजिक परिवर्तनाची दृष्टी ठेवून साधलेले होते. आबासाहेबांच्या विचारांची आणि सामाजिक व राजकीय कार्याची जडणघडण कोल्हापूर संस्थानामधील त्या सर्व घटनाक्रमांतून होत गेली. आबासाहेब कोल्हापूरवरून नगर जिल्ह्यात- स्वमुलखात नुसतेच मल्लविद्या घेऊन परतले नाहीत तर मानवतावादी विचार घेऊन आले ! त्यांनी त्यांच्या आयुष्यभर तो विचार नगर जिल्ह्यातील प्रत्यक्ष कार्याच्या रूपाने जोपासला. त्यांनी त्यांच्या आयुष्यातील तब्बल पस्तीस-चाळीस वर्षे सर्वसामान्यांची आणि गोरगरिबांची सेवा केली; त्यामागे मूळ प्रेरणा होती फक्त आणि फक्त ‘कोल्हापूरची’ !
– सुभाष खर्चन 9823794489 skharchan3@gmail.com
———————————————————————————————————————————-