आजच्या परिस्थितीत, मला शेती आणि शेतकरी यांच्याशी निगडित विषयात कारकीर्द करायची आहे असे कोणी म्हणाले तर त्याला समाज सोडाच त्याच्या घरातील लोकसुद्धा वेडा ठरवतील ! पण जिरायत आणि दुष्काळी अशी ओळख असणाऱ्या नगरच्या शेवगाव तालुक्यातील आखेगाव या छोट्याशा गावातील आदिनाथ एकनाथ काटे या युवकाने मात्र तेच स्वप्न पाहिले ! आणि त्याच्या कुटुंबीयांनी ते स्वत: शेतकरी असल्याने त्याला शेती क्षेत्रात करिअर करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य दिले. तो देशात पाचव्या क्रमांकाने आयएएस, आयपीएस या परीक्षांच्या तोडीची आय आर एस (अॅग्रीकल्चरल रुरल सर्व्हिसेस) ही केंद्रीय परीक्षा उत्तीर्ण होऊन ‘कृषी संशोधक’ म्हणून शेतकऱ्यांचे स्वप्न जगत आहे !
तो शेवगावच्या बाळासाहेब भारदे हायस्कूलमधून माध्यमिक शिक्षण घेत उत्तम गुणांनी बारावी (विज्ञान) उत्तीर्ण झाला. इतर मित्रांनी डॉक्टर, इंजिनीयर होण्याचे ठरवले तेव्हा त्याने विचारपूर्वक आणि ठाम निर्णय घेत महात्मा फुले कृषी विद्यापीठात शेती अभियांत्रिकी (बी टेक) या शाखेची निवड केली. तो एकटा वर्गातील सव्वाशे मुलांमध्ये वेगळी वाट निवडणारा होता ! आदिनाथने अभ्यास करून पहिल्याच प्रयत्नात लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊन पी एस आय ही पोस्ट मिळवली. पण त्याने ग्रामीण भागात प्रचंड क्रेझ असलेली ती पोस्ट नाकारली.
त्याला विद्यापीठातून प्रथम वर्गात बी टेक पदवी मिळवणारा सर्वोत्कृष्ट विद्यार्थी हा किताब मिळाला. त्याने एम टेक साठी उत्तराखंड येथील जी.बी. पंत या विद्यापीठाची निवड केली. ते स्वतंत्र भारतातील पहिले कृषी विद्यापीठ. जगातील सर्वोत्तम विद्यापीठांपैकी एक असा त्याचा लौकिक आहे. त्याने त्या विद्यापीठात प्रवेश घेतल्यावर पहिल्याच वर्षी आय.सी.ए.आर.ची ज्युनिअर रिसर्च फेलो ही शिष्यवृती मिळवली. दुसऱ्या वर्षी सिनिअर फेलोशिप मिळवत त्या पैशातून स्वत:चा खर्च भागवला.
त्याने त्या दोन वर्षांतच आसपासच्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांचा अभ्यास करत त्यावर उपायही संशोधले. तेथील शेतकरी जर्दाळूच्या बिया जाड आणि टणक असल्याने फेकून देत. आदिनाथने त्या बिया फोडून त्यापासून तेल काढणारे छोटे यंत्र तयार केले. त्याचा वापर तेथील अनेक शेतकरी करत आहेत. त्या तेलापासून सौंदर्य प्रसाधने व औषधे तयार केली जातात. उत्तराखंड राज्य सरकारने युवा कृषीसंशोधक पुरस्कार त्याला देऊन 2013 साली सन्मानित केले. त्याने सोयाबीन बियांपासून तेल काढण्याच्या यंत्रात संशोधन करून तेल व बिया वेगवेगळ्या करण्यासाठी लागणारा सहा तासांचा कालावधी दहा मिनिटांवर आणला आहे. त्याने त्या संशोधनाचे पेटंट मिळण्यासाठी भारत सरकारकडे प्रस्ताव दाखल केले आहेत.
आदिनाथने एम टेक पदवी प्रथम वर्गात 2013 साली मिळवली. त्याने आय.सी.ए.आर. या संस्थेची रिसर्च फेलोशिप देशात चौदाव्या क्रमांकाने 2014 साली मिळवली. तो कृषी अभियांत्रिकी या विषयाची नेट परीक्षाही उत्तीर्ण झाला आहे. त्याने जागतिक बँक पुरस्कृत योजने अंतर्गत दरमहा पंधरा हजार रुपये शिष्यवृत्ती मिळवत त्याच विद्यापीठातून पीएच डी प्राप्त केली. पण त्याचे संशोधक होण्याचे स्वप्न अजून पूर्णत्वास आले नव्हते. अॅग्रिकल्चरल रुरल सर्व्हिसेस ही आय ए एस/ आय पी एस यासारखी परीक्षा उतीर्ण होणे हे त्याचे ध्येय आता त्याच्यापासून एक पाऊल दूर होते. तो ती परीक्षा देश पातळीवर पाचव्या क्रमांकाने उत्तीर्ण 2014 साली झाला. एका छोट्याशा खेड्यातील, जिरायती शेती कसणाऱ्या शेतकऱ्याच्या पोराची स्वप्नपूर्ती झाली ! त्याला ते स्वप्न स्वत:साठी नाही तर शेतकऱ्यांसाठी जगायचे आहे. त्याचे शेती आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर संशोधन सुरू झाले आहे. तो भोपाळच्या कृषी संशोधन केंद्रात कार्यरत आहे.
– उमेश घेवरीकर 9822969723 umesh.ghevarikar@gmail.com
———————————————————————————————————————