जळगाव येथे भरलेल्या बाविसाव्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कवी माधव त्र्यंबक पटवर्धन ऊर्फ माधव ज्यूलियन होते. माधव ज्यूलियन आधुनिक उत्तम कवी, छंदोशास्त्राचे अभ्यासक, फार्शीभाषेचे उत्तम जाणकार, भाषाशुद्धीला स्वत:चे आयुष्य अर्पण करणारे, फार्शी-मराठी कोशाचे जनक होते. पण एक श्रेष्ठ कवी म्हणून माधवरावांनी त्यांच्या कालखंडावर छाप टाकली. त्यांनी मराठी कवितेत गझल, सुनीत आणि खंडकाव्य हे प्रकार अधिक संपन्न केले. उत्तम कीर्ती आणि मानसन्मान लाभलेल्या माधवराव पटवर्धन यांचे वैयक्तिक आयुष्य संघर्षाने भरलेले होते. वैयक्तिक पातळीवर त्यांना सतत विरोध पत्करावा लागला, पण त्याचा त्यांच्या साहित्यावर परिणाम झालेला दिसत नाही. त्यांचा उत्कर्ष सहन न होणारी काही माणसे त्यांच्या भोवती, ते प्राध्यापक असताना होती. त्यामुळे माधवरावांना कारण नसताना मानसिक त्रास सहन करावा लागला.
काही तरुण कवींनी एकत्र येऊन ‘रविकिरण मंडळा’ची स्थापना 1920-21 च्या दरम्यान केली. त्यात माधवराव पटवर्धन होते. मराठी कवितेच्या इतिहासात ‘रविकिरण मंडळा’ला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले. माधवरावांनी त्यांची कविता त्याच काळात समृद्ध केली. त्यांचे साहित्यिक आणि कवी म्हणून एकूण तीन कालखंड पडतात. त्यांतील पहिला कालखंड जो आहे त्यात त्यांच्यावर केशवसुत, चंद्रशेखर, टिळक, गोविंदाग्रज यांसारख्या कवींचा प्रभाव होता, पण माधवरावांनी मराठी कवितेत स्वत:ची म्हणून वेगळी वाट काढली. मारी कॉरेलीच्या God’s Good Man या कादंबरीतील ज्यूलियन अॅडरले या नावाच्या पात्रावरून माधवरावांनी स्वत:साठी माधव ज्यूलियन हे टोपणनाव घेतले. त्यांना ‘छंदोरचना’ ह्या ग्रंथाबद्दल मुंबई विद्यापीठाने डी लिट ही पदवी दिली. त्यांनी विपुल लेखन केले, नवा मार्ग चोखाळला आणि ते सतत प्रयोगशील राहिले.
माधव त्र्यंबक पटवर्धन यांचा जन्म 29 जानेवारी 1894 रोजी बडोदे येथे झाला. त्यांचे एम ए (फार्शी-इंग्रजी), पर्यंतचे शिक्षण झाले. ते 1918 साली एम ए झाल्यावर न्यू इंग्लिश स्कूलमध्ये अध्यापक होते. त्यांनी फर्ग्युसन कॉलेजात 1919-1924 पर्यंत शिकवले. पण तेथे त्यांच्या कॉलेजातीलच वरदा नायडू ह्या विद्यार्थिनीबरोबरच्या मैत्रीचा विपर्यास झाला. त्याचा माधवरावांच्या मनावर जबर आघात झाला. ते 1924-1926 अंमळनेरला गेले. तेथे त्यांनी प्रताप हायस्कूलमध्ये नोकरी केली. ते पुन्हा पुण्यात आले. त्यांनी तेथे भावे हायस्कूलात नोकरी केली, ती 1928 पर्यंत आणि नंतर ते कोल्हापूरला राजाराम कॉलेजात फारशीचे प्राध्यापक म्हणून गेले. तेथे ते शेवटपर्यंत म्हणजे 1939 साली त्यांच्या निधनापर्यंत होते.
माधव ज्यूलियन यांनी ‘दित्जू’, ‘मा.जू’ आणि ‘एम. ज्यूलियन’ या नावांनीसुद्धा लेखन केले आहे. त्यांपैकी काही लिखाण त्यांनी इंग्रजीमध्ये केले आहे. माधव ज्यूलियन यांनी कविवर्य भा.रा. तांबे यांच्या कवितांचे संकलन आणि संपादनसुद्धा केले आहे. उत्कृष्ट संपादनाचा नमुना म्हणून त्याकडे पाहिले जाते. माधव ज्यूलियन यांनी भाषाशास्त्रीय लेखनसुद्धा केले आहे. ते सोप्या व शुद्ध मराठीचा पुरस्कार करत आणि म्हणूनच त्यांनी भाषाशुद्धी-विवेक हा ग्रंथ लिहिला. त्या ग्रंथात कालबाह्य ठरलेल्या शेकडो मराठी शब्दांची सूची समाविष्ट करण्यात आली आहे.
त्यांनी फार्शी-मराठी कोश (1925), छंदोरचना (1927), सुधारक (1928), उमर खय्यामकृत रुबाया (1929), द्राक्षकन्या (1931), गज्जलांजली (1933), स्वप्नरंजन (1934), तुटलेले दुवे (1938), पद्यप्रकाश (1938), भाषाशुद्धिविवेक (1938), नकुलालंकार (1939), मधुलहरी व इतर कविता (194०), काव्यविहार (1947), स्वप्नलहरी (1953), खंडकाव्ये – विरहतरंग (1953), काव्यचिकित्सा (1964) अशी विपुल ग्रंथनिर्मिती केली.
ते अध्यक्षीय भाषणात म्हणाले, ‘शेवटी विनंती हीच की महाराष्ट्राचा विचार करा, मराठीचा सांगोपांग अभ्यास आपुलकीने करा आणि प्रभावसंपन्न व्हा…’
त्यांना नासिक येथे 1933 साली भरलेल्या कविसंमेलनाचे अध्यक्ष, बडोदे येथे 1934 साली भरलेल्या विसाव्या साहित्य संमेलनातील काव्यशाखेचे अध्यक्ष, जळगाव येथे 1936 साली भरलेल्या बाविसाव्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि मुंबई विद्यापीठाची 1938 साली डी लिट ही पदवी असे मानसन्मान मिळाले. त्यांचा मृत्यू 29 नोव्हेंबर 1939 रोजी झाला.
– वामन देशपांडे 91676 86695, अर्कचित्र – सुरेश लोटलीकर 99200 89488
———————————————————————————————————————————————-