‘ग्राममंगल’च्या तीन शाळा ह्या नव्या शिक्षणपद्धतीचा ब्रँड आहेत. म्हणजे शिक्षणविषयाची ती संकल्पना जुनी आहे, पण सध्या त्यांबाबतचे औत्सुक्य वाढले आहे. त्या शाळा पाहण्याचा योग आला. डहाणू तालुक्यातील ऐना, पालघर तालुक्यातील विक्रमगड, पुण्यातील कोथरूडची अशा तीन शाळा पाहण्यात आल्या आणि समाधान वाटले. ‘ग्राममंगल’ने नेमके केले काय? तर त्यांनी आधी विद्यार्थ्यांना शिक्षणात गुंतवण्यासाठी साधने तयार केली. विद्यार्थी कायम स्वरूपात वापरू शकतील अशी ती साधने वर्गातच कपाटात ठेवण्यात आलेली असतात. विद्यार्थी त्यां आधारे गटात कृती करतो. त्यामुळे संबोध स्पष्ट होतात व गृहपाठाची गरज पडत नाही. स्वाभाविकच, मुलाच्या पाठीवरचे ओझे राहत नाही.
|
ग्राममंगल शाळेतील विद्यार्थी जमिनीवर बसतात आणि सामूहिक गटाने काम करतात. |
‘ग्राममंगल’ने शैक्षणिक साधन निर्मितीची अनेक प्रशिक्षणे शिक्षकांसाठी घेतली आहेत. शैक्षणिक साधने विक्रीसाठीही त्यांच्याकडे उपलब्ध आहेत. ‘ग्राममंगल’च्या शाळांत विद्यार्थ्यांना बसण्यास बाक नाहीत, विद्यार्थी जमिनीवर खाली बसतात, विद्यार्थी सामूहिक गटाने काम करतात आणि शिकतात. शाळेत वर्गावर पहिली, दुसरी, चौथी, पाचवी, नववी, दहावी अशा पाट्या नाहीत. वर्गांना विषयानुसार नावे दिलेली आहेत. मराठी, इतिहास, गणित, भूगोल, विज्ञान वगैरे… विद्यार्थी प्रत्येक तासाला त्या त्या वर्गात जातात, त्यामुळे विद्यार्थ्यांची शारीरिक हालचाल होते व त्यांना मानसिक थोडा बदलही मिळतो- विद्यार्थ्यांना कंटाळा येत नाही. शाळेचे काम शांतपणे चाललेले जाणवते, कोठेही गडबड नाही, गोंधळ नाही, शिक्षक फक्त मार्गदर्शकाची भूमिका निभावतात.
मुलाला योग्य वयात, त्याच्या शरीरावयवांची वाढ झाल्यानंतर त्याच्या हातात पेन्सिल, पेन ही साधने दिली जातात. तेथील प्रत्येक विद्यार्थ्याचे अक्षर सुंदर आहे. शिकवण्याचा एक तर्फे मारा बंद झाला तरच विद्यार्थी शिकतील हा त्या शिक्षणपद्धतीचा बोध. कवितेच्या तासात कविता ही करायची असते हे सहावीतील मुलांकडे पाहून कळाले, त्याने छान कविता बोर्डावर लावल्या होत्या. भाजीपाला शाळेत लावल्यामुळे, मुले शिकता शिकता त्याचा हिशोब करण्यास शिकतात. बहुतेक सर्व गोष्टी या कृती व अनुभव यांवर आधारित अशा आहेत. खरेच, सगळ्या शाळांत असे होऊ शकते का? शहरांतील शाळांत विद्यार्थ्यांच्या चर्चा, गट, समूहकार्य होऊ शकणार नाहीत. कारण तेथे प्रथम वर्गातील डेस्क हलवायला पाहिजेत. मुलांना जागा आणि विचार करण्यास भरपूर वाव असेल तर काहीही करता येते !
|
ग्राममंगलच्या शाळांत मुलांच्या अवांतर वाचनासाठी पुस्तके मांडून ठेवलेली असतात व मुलेही पुस्तके वाचतात. |
खेळाची साधने बागेतच असतात हे मुलांना ठाऊक; पण शाळेत खेळण्याची साधने असल्यामुळे, तेथे मुले मनसोक्त खेळतात, खेळण्यातून संवाद, शारीरिक श्रम हे सगळे सहज साध्य होते. सर्व शाळांमध्ये खेळाचा एक ‘तास’ असतो, त्यावेळी मुले खेळतात असेही नाही. गडबड करतात, गोंधळ करतात. ‘ग्राममंगल’ शाळेत मुले मात्र विषयानुसार खेळत शिकतात.
शिक्षक अनेक गोष्टी प्रशिक्षण महाविद्यालयात शिकतात, पण किती शिक्षक शैक्षणिक साधनेवापरतात? प्रात्यक्षिक सिद्धांताप्रमाणे झाले तरच शिक्षण सुधारणार आहे. काही पालक विद्यार्थ्याचे गृहपाठसुद्धा पारंपरिक शिक्षणपद्धतीमध्ये करतात. शिक्षण शाळेमध्ये मुलाला शिक्षा होऊ नये म्हणून कृती नाही, आनंद नाही अशा प्रकारचे घेत आहेत. शिक्षक प्रशिक्षणात मानसशास्त्र शिकलेले असतात, पण मुलांचे मानसशास्त्र ओळखण्याची आणि ओळखले तरी त्याची अंमलबजावणी करण्याची संधी शिक्षकांना मिळत नाही. पारंपरिक शिक्षण पद्धतीमध्ये शिक्षक बोलतात, विद्यार्थी ऐकतात. ‘ग्राममंगल’मध्ये वर्गातच सर्व शैक्षणिक साधने असतात आणि ती विद्यार्थ्यांना दिली, की विद्यार्थी गटागटात काम सुरू करतात. शिक्षक फक्त निरीक्षण करतात. सगळे शांत, गडबड-गोंधळ न होता चाललेले असते. पारंपरिक शिक्षण पद्धतीमध्ये माहितीचे पाठांतर केले जाते, ज्ञान व त्याचे उपयोजन या गोष्टीही फार दूरच्या आहेत. मुले कोणत्याही प्रकारची कौशल्ये घेऊन शाळांतून बाहेर पडत नाहीत. विद्यार्थ्यांना साधे हिशोब येत नाहीत, दुरुस्तीचे काम जमत नाही, श्रमाचे काम जमत नाही, वाचन नाही, संवादाला वाव नाही. संबोध स्पष्ट झाल्याशिवाय ज्ञान मिळत नाही आणि तीच आजची शोकांतिका आहे. शासनाने काही शाळा ‘ग्राममंगल’ला चालवण्यास दिल्या तर निश्चित फरक दिसू लागेल. ‘ग्राममंगल’ने लोकसहभाग आणि देणगी यांतून शाळा चालू शकतात हे दाखवून दिले आहे.
|
रमेश पानसे म्हणतात, शाळा प्रत्येक दिवस ‘शाळा तपासणी’चा आहे अशा प्रकारे चालली पाहिजे. |
‘ग्राममंगल’चे काम वाई येथे विकास गटाच्या माध्यमातून चालू आहे. रमेश पानसे त्यासाठी शहरी भाग सोडून तेथे कायम वास्तव्यासाठी काही वर्षे गेले होते. ती शाळा सुंदर करण्याचे त्यांचे स्वप्न आहे आणि ते हळूहळू साकार होत आहे. त्यांना अनुताई वाघ यांनी कोसबाडच्या टेकडीवरून दिलेली हाक ऐकू आली व ते तिकडे गेले. रमेश पानसे यांनी आदिवासी भागात माणसे पेरली, मोठे काम उभे केले. त्यांची भूमिका शाळेचा प्रत्येक दिवस ‘शाळा तपासणी’चा आहे अशा प्रकारे चालली पाहिजे अशी आहे. ‘ग्राममंगल’ शाळांमध्ये कधीही, केव्हाही, मुलांच्या अवांतर वाचनासाठी पुस्तके मांडून ठेवलेली असतात व मुले पुस्तके वाचतात.
कृती, आनंद, परिसराशी समरसून असणे, त्यात गुंतून असणे, म्हणजेच शिक्षण ही संकल्पना तेथे राबवलेली पाहण्यास मिळते. ‘ग्राममंगल’मध्ये मुलांना शैक्षणिक साधनांच्या साहाय्याने कृती दिली जाते, त्यामुळे त्यांना ते करण्यात आनंद मिळतो. शैक्षणिक साधने बरेच दिवस वापरता येतात. ती पद्धत मुलांचे विविध संबोध स्पष्ट होण्यासाठी छान आहे. तीमध्ये मुलाचा जो भाग कच्चा आहे किंवा मागील वर्षी राहिलेला आहे तोसुद्धा मुले गटात पूर्ण करून इतर मुलांसोबत येऊ शकतात. ‘ग्राममंगल’ शाळांत परीक्षा नाहीत; तरी दहावीच्या परीक्षेला विद्यार्थी बाहेरून बसवले जातात. शाळेत परीक्षा नसते तरी मूल्यमापन आहे. गृहपाठ दिला जात नसला तरी शाळेतच गृहपाठ व गटातील काम पूर्ण करून घेतले जाते. ‘ऑनलाइन शिक्षण पद्धती’मध्ये होम स्कूलिंग व होम लर्निंग ही काळाची गरज ठरणार आहे. पालकांनाही त्यात सहभागी व्हावे लागेल, तरच मुले शिकतील ! पालकांना शिक्षकांचे कच्चे दुवे, शिक्षकांचे सदोष उच्चार ऑनलाइन शिक्षण पद्धतीमध्ये कळत आहेत, ते कळण्यासही हवेत. शिक्षक कमी पडतात तेथे त्यांची जागा पालकांनी भरून काढण्यास हवी. ‘ग्राममंगल’च्या आदिवासी भागातील शाळांमध्ये आदिवासी विद्यार्थीच शिक्षक म्हणून काम करत आहेत. ते बोली भाषेमधून बोलत असताना त्यांनी प्रमाणभाषाही शिकावी म्हणून आता ‘ग्राममंगल’मधील साठ शिक्षक पुण्याच्या ‘मराठी साहित्य परिषदे’च्या मराठीच्या ‘प्रथमा’ परीक्षेला बसले आहेत. ‘साहित्य परिषदे’च्या परीक्षांमधून त्यांच्यात मातृभाषेतील चांगली अभिव्यक्ती, शुद्धलेखन, व्याकरण या बाबींची सुधारणा होईल अशी संस्थेची अपेक्षा आहे. भाषा विषयाची तयारी कच्ची राहून गेलेले शिक्षक त्या परीक्षांना बसत आहेत. संगणक शाळांत उपलब्ध करून दिले आहेत, त्यामुळे विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाचीही ओळख होत आहे.
‘ग्राममंगल’मध्ये आदिवासी विद्यार्थी बहुतांश असल्यामुळे तेथे सावित्रीबाई फुले दत्तक योजना मोठ्या प्रमाणात राबवली जाते. एका विद्यार्थ्याचा एका वर्षाचा जेवणाचा खर्च चौतीस हजार रुपये येतो, पण पंधरा हजार रुपये देऊन एका विद्यार्थ्याचे पालकत्व घेण्यासाठी पालक पुढे येत आहेत. रोटरी क्लब, लायन्स क्लब यांसारख्या संस्थांमार्फत शाळेच्या इमारती सुंदर, प्रशस्त उभारलेल्या आहेतच. शिक्षक स्थानिक असल्यामुळे ते कमी पगारावरही तेथे सेवा देत आहेत. ते स्वतःला व्हिडिओ कॉन्फरन्स, व्हाट्स् अॅप अशा माध्यमांतून अपडेटही करत आहेत.
अनुताई वाघ यांच्या प्रेरणेने उभा राहिलेला एवढा मोठा शैक्षणिक डोलारा, रमेश पानसे व त्यांचे कार्यकर्ते योग्य रीतीने सांभाळत आहेत. ऐना येथे जिल्हा परिषदेची व ‘ग्राममंगल’चीही शाळा आहे, तरी विद्यार्थ्यांचा ओढा व आवड मात्र ‘ग्राममंगल’ शाळेकडेच आहे! सरकारी अनुदानित शाळांपेक्षा समाजाच्या सहभागावर व वर्गणीवर शाळा चांगल्या चालत आहेत. त्याचे उदाहरण ‘ग्राममंगल’ शाळांत पाहण्यास मिळते. आदर्श शिक्षक, आदर्श कार्यकर्ते, आदर्श शाळा यांसाठी आदर्श माणसे तयार झाली पाहिजेत. चांगल्या व नाविन्यपूर्ण शाळा वाढल्या तरच समाजात अपेक्षित बदल दिसू लागतील.
– अनिल कुलकर्णी 9403805153 anilkulkarni666@gmai.com
—————————————————————————————–————————————————————
About Post Author
डॉ. अनिल कुलकर्णी हे जालना येथील वसंतराव नाईक अध्यापक महाविद्यालयात प्राचार्य होते. ते औरंगाबादच्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात विभागीय संचालक आणि महाराष्ट्र राज्य प्रौढशिक्षण संस्था साधन केंद्र येथे संचालक होते. ते शिक्षण क्षेत्रातील कल्पक व्यक्तीमत्त्वांचा शोध घेऊन त्यांविषयी लेखन करतात. त्यांचे लेखन विविध नियतकालिकांत प्रसिद्ध झाले आहे. ते पुणे येथे राहतात.
ग्राममंगल ऐना येथे 2000 साली दहा दिवस युनिसेफ कॕम्पच्या माध्यमांतून जिवंत अनुभव घेता आले. साहित्य निर्मिती ,मुक्त शाळा आणि विद्यार्थी , आदिवासी पाड्यातील सांस्कृतिक अभ्यास आणि परिसरातील समृद्ध सागरी किनारा ,मा.रमेश पानसे , निलेश निमकर आणि त्यांचे शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ मार्गदर्शकांचा सहवास , जिवंत अनुभव प्रेरणादायीच होते . आहेत सुद्धा !
खूप विचारपूर्वक लेख आहे,मी कलेच्या विषयाला कलामहविद्यालयीन काही प्रयोग करता येऊ शकतो का विचार करतोय
Thanks