पहिली सहा मराठी साहित्य संमेलनेपुण्यात भरली होती. तिसरे साहित्य संमेलन मात्र साताऱ्यात 1905 साली झाले, तो अपवाद होता. सातवे साहित्य संमेलन प्रथमच महाराष्ट्राबाहेर आयोजित करण्यात आले! ते बडोद्यात 1909 साली ऑक्टोबरमध्ये भरले होते. ते बडोदे न्यायमंदिरासमोर मोकळ्या मैदानात झाले. त्याचे अध्यक्ष लेफ्टनंट कर्नल कान्होबा रणछोडदास कीर्तीकर होते. स्वागताध्यक्ष बॅरिस्टर संपतराव गायकवाड तर उद्घाटक सयाजीराव गायकवाड होते.
त्या संमेलनापासून ‘मराठी ग्रंथकारांचे संमेलन’ हे मूळचे नाव बदलून ‘महाराष्ट्र साहित्य संमेलन’ असे व्यापक नाव देण्यात आले. त्या संमेलनाच्या वेळी साहित्य दिंडीत लहान मुलेही सहभागी झाली होती.
सातव्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कर्नल कीर्तीकर हे पेशाने डॉक्टर. त्यांनी औषधी वनस्पतींचा चांगला अभ्यास केला होता. त्यांनी वनस्पतिशास्त्र ह्या विषयात ग्रंथरचना केली. त्यांचा जुने व अर्वाचीन मराठी काव्य यांबाबतचा अभ्यास चांगला होता. ते स्वत: कवी होते. त्यांनी उत्तमोत्तम संस्कृत काव्याचे भाषांतर मराठीत केले. ते जळगाव येथे झालेल्या पहिल्या कविसंमेलनाचे अध्यक्ष होते. ती गोष्ट 1907 सालची. त्याच कविसंमेलनात बालकवी ह्या कवीचा उदय झाला. कर्नल कीर्तीकर यांनी भारावून जाऊन त्र्यंबक ठोमरे या मुलाची पाठ थोपटली आणि त्याला ‘बालकवी’ ही पदवी तेथल्या तेथे बहाल केली. त्यावरून कीर्तीकर यांची गुणग्राहकता ध्यानात येते. कीर्तीकर आयुर्वेदाचे अभ्यासक असल्यामुळे, ते मथुरा येथे भरलेल्या आयुर्वेदिक संमेलनाचेही अध्यक्ष होते.
कर्नल कीर्तीकर यांचे पूर्ण नाव कान्होबा रणछोडदास कीर्तीकर. त्यांचा जन्म मुंबई येथे 24 मे 1849 रोजी झाला. त्यांनी एल्फिन्स्टन कॉलेजातून इंग्रजी विषयाची पदवी मिळवली. त्यांनी ग्रँट मेडिकल कॉलेजमधून वैद्यकीय पदवी प्राप्त केली. त्यांनी लंडनमध्ये जाऊन शस्त्रक्रियेचे शिक्षण घेतले व वैद्यकीय पदवी मिळवली.
त्यांनी ठाणे येथे इंडियन मेडिकल सर्व्हिसमध्ये सिव्हिल सर्जन म्हणून सुरुवातीला नोकरी केली. ते सर्जन या पदावर जे जे हॉस्पिटलमध्ये नंतर काही वर्षांनी रूजू झाले. ते ग्रँट मेडिकल कॉलेजात प्रोफेसर होते. ते मुंबई विद्यापीठात वैद्यकशास्त्राचे प्रमुख झाले. त्यानंतर लष्करात डॉक्टर म्हणून रूजू झाले. तेथूनच ते 1904 साली निवृत्त झाले.
त्यांनी ‘ज्ञानेश्वर वाचनामृत’, ‘ब्राह्मधर्म प्रतिपादक वाक्यसंग्रह’, ‘भक्तिसुधा’, ‘विलाप लहरी’, ‘जलाधिजवर्णन’, ‘इंद्रियविज्ञानविचार’ ही पुस्तके लिहिली. लॉर्ड टेनिसनच्या प्रिन्सेसचे ‘इंदिरा’ हे भाषांतर केले. त्यांनी डार्विन यांचे चरित्रही लिहिले आहे.
त्यांनी संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणात महत्त्वाचा एक विचार मांडला. ते म्हणाले, “ज्याने अखिल भूलोक आपल्या मस्तकी धारण केला आहे, तो सहस्रवदन शेष, जिची अखिल शब्दसृष्टी आपल्या मस्तकावर धारण करण्याची योग्यता आहे, ती सहस्रवदन मराठी भाषा! अशा भाषेचा योग्य उपयोग करणे हे ग्रंथकारांचे कर्तव्य आहे.”
वाङ्मयाचा भोक्ता, कलेचा भोक्ता आणि सदैव ज्ञानाच्या परिसरात हिंडणारा हा कर्नल दुसऱ्या अफगाणयुद्धात (1878 ते 1880) आघाडीवर होता. त्यांचा 9 मे 1917 रोजी मृत्यू झाला.
– वामन देशपांडे 91676 86695, चित्रकार – सुरेश लोटलीकर 99200 89488
वामन देशपांडे हे ज्येष्ठ लेखक व संत साहित्याचे अभ्यासक आहेत. त्यांनी कथा, कादंबऱ्या, समीक्षा, भावगीते, भक्तिगीते, संत साहित्य अशा विविध विषयांवर विपुल लेखन केले आहे. त्यांची एकशे नऊ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांनी विविध ठिकाणच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये रसिक वाचक म्हणून हजेरी लावली आहे. ते डोंबिवली येथे राहतात.
———————————————————————————————-——————————–