भीमसेन जोशी
ग्वाल्हेर, आग्रा, जयपूर अशा घराण्यांतील किराणा घराण्याचे पांथस्थ म्हणजे भारतरत्न संगीताचार्य स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी हे होत. त्यांचा जन्म कर्नाटकातील धारवाड जिल्ह्यातील रोण या त्यांच्या मावशीच्या गावी 4 फेब्रुवारी 1922 रोजी झाला. त्यांचे मूळ गाव गदगजवळचे होंबळ असून आजोबा भीमाचार्य हे गदगमध्ये स्थायिक झाले होते. ते कीर्तनकार-गायक होते. वडील गुरुराज जोशी उच्चशिक्षित, एका विद्यालयाचे प्राचार्य होते. त्यांच्या आईचे नाव गोदावरीदेवी होते. भीमसेन जोशी त्यांच्या दहा भावंडात सर्वात मोठे होते. युवावस्थेतच त्यांच्या आईचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांना त्यांच्या सावत्र आईने सांभाळले. भीमसेन यांच्या वडिलांची इच्छा त्यांच्या मुलानेही उच्च शिक्षण घेऊन शिक्षण क्षेत्रात नाव कमावावे अशी होती. परंतु भीमसेन यांना अभ्यासाची मुळीच आवड नव्हती. त्यांना संगीताची गोडी त्यांच्या घरासमोरील भजनी मंडळातील गायनाने लागली. त्याच वेळी त्यांनी अब्दुल करीम खाँसाहेबांची ‘पिया बिन नही आवत चैन’ ही ठुमरी ऐकली. तेव्हा त्यांचा संगीत शिकण्याचा निर्धार पक्का झाला. संगीत शिकणे हेच त्यांच्या जीवनाचे उद्दिष्ट ठरले आणि त्यांनी गुरूच्या शोधात वयाच्या अकराव्या वर्षीच घरादाराचा त्याग केला.
घरातून निघून गेल्यावर ते ग्वाल्हेरला पोचले. तेथे सरोदवादक उस्ताद अमजद अली खाँ यांचे वडील उस्ताद हाफिज़अली खाँ यांनी त्यांची सोय केली. सुरुवातीला, भीमसेन यांनी पंडित कृष्णराव शंकर यांच्याकडे शास्त्रीय गायनाचे धडे घेतले. नंतर त्यांचा प्रवास खरगपूर, कोलकाता, दिल्ली व जालंधर असा संगीत शिक्षणाच्या निमित्ताने झाला. पंडितजी अब्दुल करीम खाँ यांचे शिष्य सवाई गंधर्व यांच्याकडे जालंधर शहरी गेले. त्यांनी सवाई गंधर्वांकडून किराणा घराण्याचे शिक्षण दोन वर्षे घेतले. त्यातून पंडितजींच्या गायनाला अलौकिक सामर्थ्य प्राप्त झाले. त्यांनी गुरूची सेवा आज्ञाधारक मुलाप्रमाणे केली. त्यांच्या चिकाटीचे उदाहरण म्हणजे त्यांनी तोडी, मुलतानी आणि पुरिया हे तीन राग आत्मसात करण्यासाठी तीन वर्षांपेक्षा जास्त काळ घेतला! त्यांनी तंत्रामध्ये अडकलेले ख्यालगायन लोकांसमोर सहजपणे आणले. त्यांनी समाजातील सर्वसामान्यांपर्यंत संगीत पोचवले. त्यांनी त्यांच्या गायनात किराणा घराण्याला प्राधान्य देत इतर घराण्यांच्या खुबीदेखील समाविष्ट करून त्यांच्या गायकीत गहिरेपण आणि वैचित्र्य यांचा संगम साधला. बासष्ट वर्षे त्यांनी ठुमरी आणि मुलतानी शैलीत त्यांची योग्यता सिद्ध केली व त्याचबरोबर त्यांनी त्यांच्या असामान्य विविधतेने व लवचीकतेने श्रोत्यांना आनंद दिला.
भीमसेन जोशी त्यांच्या सहकाऱ्यांसह संगीत सराव करताना |
सवाई गंधर्व ‘एचएमव्ही’साठी ध्वनिमुद्रिका 1936 ते 1940 या काळात तयार करत होते. गुरूजींचा विविध रागांचा सराव ऐकताना त्यांचे वेळेचे अचूक भान व त्यांची स्वयंशिस्त या सर्वांचा भीमसेन यांना जवळून अभ्यास करता आला. त्याच काळात त्यांची त्यांच्या गुरूभगिनी गंगुबाई हनगल यांच्याशीही संगीताची देवाणघेवाण झाली व वेगळा कलाबंध तयार झाला.
एकदा, ते मुंबईत ऐकण्यास मिळालेल्या बनारस-लखनौच्या उपशास्त्रीय गाण्याच्या ओढीने उत्तर प्रदेशातील रामपूर येथे गेले. त्यांनी रामपूर गायकीचे मर्म तेथील उस्ताद मुस्ताक हुसेन यांच्याकडून आत्मसात केले. ते सुनंदा कट्टी यांच्याशी 1943 साली विवाह होऊन गृहस्थाश्रमी झाले. त्यांचा बडे गुलामअली खाँ, कुमार गंधर्व व पु.ल.देशपांडे अशा मोठ्या व्यक्तींशी परिचय 1944 साली मुंबईत झालेल्या विक्रमादित्य संगीत समारोहात झाला. पंडितजींनी स्वतःची ठुमरीची शैली बडे गुलामअली खाँसाहेबांकडून ठुमरी शिकता शिकता विकसित केली.
भीमसेन जोशी त्यांच्या पत्नी आणि गंगुबाई हनगल |
पंडितजींच्या आयुष्यात मोठे परिवर्तन 1952 ते 1958 ह्या काळात घडून आले. त्यांची वत्सला मुधोळकर यांच्याशी ओळख झाली, ती सातत्याने होणाऱ्या संगीत मैफिली, कार्यक्रम व समारंभांदरम्यान. दोघांच्या सहवासाचे रूपांतर प्रेमात झाले व ती दोघे 20 मे 1951 रोजी नागपूर येथे विवाहबद्ध झाले. तो काळ पंडितजींच्या आयुष्यातील गावोगावी होणाऱ्या मैफिली, त्यातून उत्तरोत्तर विकसित होणारी गायकी, पाठोपाठ येणारे मानसन्मान व लोकप्रियता या सर्वांमुळे बहारीचा ठरला. पंडितजी त्यांच्या गायनाने बंगाली रसिकांच्या गळ्यातील ताईत 29 नोव्हेंबर 1953 रोजी कोलकात्याच्या एण्टाली संगीत संमेलनातील झाले. त्यांची ख्याती महाराष्ट्राबाहेर पसरू लागली. पंडितजींचे विमानपर्व दीर्घ पल्ल्याचे भारतभ्रमण तेव्हापासून सुरू झाले. पु.ल. देशपांडे यांनी त्यांना गंमतीने ‘हवाईगंधर्व’ अशी पदवी दिली होती.
त्यांच्या सांगितिक कर्तृत्वाला पहिले यश प्राप्त झाले ते 1943 साली पुणे येथील म्युझिक सर्कलमध्ये झालेल्या त्यांच्या गायनाच्या कार्यक्रमात. त्यांना पुण्याच्या रामेश्वर राममंदिरातर्फे ‘पंडित’ या उपाधीने 1954 साली सन्मानित करण्यात आले. त्यांना उस्ताद बडे गुलामअली खाँ पुरस्कार 1961 साली मिळाला तर त्यांना 1964 साली अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयातर्फे ‘गायनाचार्य’ उपाधी देण्यात आली. त्यांच्या मैफली 1954 ते 1972 या कालावधीत उत्तर भारत, मध्य प्रदेश, कर्नाटक आणि दिल्ली अशा विविध ठिकाणी झाल्या. त्याचेच फळ म्हणून त्यांना भारत सरकारकडून ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित 25 मार्च 1972 रोजी केले गेले. त्याच वर्षी गुरू शंकराचार्य यांनी त्यांना ‘स्वरभास्कर’ व ‘संगीतरत्न’ ह्या उपाधी दिल्या तर जयपूर गंधर्व महाविद्यालयाने त्यांना 26 नोव्हेंबर 1982 रोजी ‘महामहोपाध्याय’ हा बहुमान प्रदान केला. तितकेच नव्हे तर त्यांना गुलबर्गा विश्वविद्यालयातर्फे ‘डी लिट’ ही पदवी 4 मार्च 1986 रोजी प्रदान करण्यात आली. त्या अगोदर, 1976 साली, ते संगीत नाटक अकादमी पुरस्काराचे मानकरी ठरले होते. पद्मश्री पुरस्कारानंतर, पंडितजींना 16 मार्च 1989 रोजी भारत सरकारच्या ‘पद्मभूषण’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांना ‘पद्मविभूषण’ हा बहुमानाचा पुरस्कारही त्यानंतर 2001 मध्ये देण्यात आला.
त्यांच्या आवाजाची जादू चित्रपटातही अनुभवण्यास मिळाली. त्यांना उत्कृष्ट पार्श्वगायकाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार ‘अनकही’ या चित्रपटासाठी 1985 साली प्राप्त झाला. पंडितजींना शासकीय पुरस्कारांबरोबरच इतरही अनेक पुरस्कार मिळाले. मध्य प्रदेश शासनाचा ‘तानसेन पुरस्कार’ 6 डिसेंबर 1991 रोजी, दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानतर्फे मिळालेला दीनानाथ मंगेशकर पुरस्कार 24 एप्रिल 1992 रोजी, विश्वभारती संस्थेतर्फे मिळालेला देशिकौतम पुरस्कार 1993 मध्ये व पुणे महानगरपालिकेचा गौरव सन्मान 6 मे 1996 ला हे प्रमुख पुरस्कार आहेत. त्यांना महाराष्ट्र शासनानेसुद्धा ‘महाराष्ट्र गौरव’ 1990 मध्ये व ‘महाराष्ट्र भूषण’ 2002 मध्ये या पुरस्कारांनी सन्मानित केले. त्यांना मिळालेल्या पुरस्कारांची यादी अजून बरीच आहे. त्यांतील महत्त्वाचे पुरस्कार पुढीलप्रमाणे-
1. 2000 चा आदित्य विक्रम बिर्ला कला शिखर पुरस्कार
2. 2001 चा कन्नड सरकारचा नदोजा पुरस्कार
3. 2003 चा केरळ सरकारचा स्वाती संगीता पुरस्कार
4. 2005 चा कर्नाटक सरकारचा कर्नाटक रत्न पुरस्कार
5. 2008 चा स्वामी हरिदास पुरस्कार
6. 2009 चा दिल्ली सरकारचा जीवन गौरव पुरस्कार
7. 2010 चा बंगळूरच्या राम सेवा मंडळाचा एस.व्ही. नारायणस्वामी राव राष्ट्रीय पुरस्कार.
पंडितजींनी वयाची पंच्याहत्तर वर्षे पूर्ण केली तरीसुद्धा त्यांच्या गळ्याला इवलासा देखील कंप नव्हता. त्यांना दोन ऑपरेशनना सामोरे 1998 च्या ऑक्टोबर महिन्यात जावे लागले. त्यांना पायाची घडी घालून बसता येत नव्हते. त्यानंतर जवळजवळ दीड वर्षे गायनात खंड पडला. भीमसेन यांनी गायनास पुन्हा प्रारंभ 1999 साली ‘रगवाणी’मधून केला. पंडितजींना नाट्यसंगीताची जाण मुळातच असल्यामुळे त्यांनी नाट्यसंगीतातील अभिजाततेचे दर्शन प्रभावीपणे घडवले. ‘स्वयंवर’मधील ‘मम आत्मा गमला’, ‘मानापमान’मधील ‘प्रेम सेवाशरण’, ‘तुलसीदास’मधील ‘रामरंगी रंगले मन’, ‘मूकनायका’मधील ‘उगीच का कांता’, ‘संत कान्होपात्रा’मधील ‘अगा वैकुंठीच्या राया’ व ‘चंद्रिका ही जणू’ आणि ‘करीन यदुमनी सदना’ ही त्यांची नाट्यपदे अजरामर झाली.
भीमसेन जोशी यांना ‘ख्यालगायकी’चा राजा म्हणून ओळखले जाते. त्यांनी त्यांच्या चाहत्यांना सुखद धक्का दिला तो ‘संतवाणी’ने. संगीतकार राम फाटक यांनी ‘स्वरचित्र’मधून पंडितजींकडून संतवाणी गाऊन घेतली आणि भावस्पर्शी गीतांचे, अभंगांचे नवे पर्व उदयास आले. त्यांना त्यानंतरच्या प्रत्येक कार्यक्रमात वा मैफलीत संतवाणी गाण्याचा आग्रह होत असे. ‘ज्ञानियाचा राजा’, ‘तुका आकाशाएवढा’, ‘माझे माहेर पंढरी’, ‘रम्य ही स्वर्गाहून लंका’, ‘तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल’, ‘इंद्रायणी काठी देवाची आळंदी’, ‘रूप पाहता लोचनी’, ‘टाळ बोले चिपळीला’, ‘बिजलीचा टाळ नभाचा मृदंग’ अशा शेकडो अभंगांची व भक्तिपर गाण्यांची यात्राच भरली असे वाटते. त्यांच्या अभंगांनी लोकप्रियतेचे शिखर 1968 पासून आजपर्यंत सतत गाठले आहे. ‘संतवाणी’ सर्वाधिक खपाच्या ध्वनिमुद्रिकांमध्ये सतत आघाडीवर असे.
भीमसेन जोशी माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्यासमवेत |
पंडितजींचा ‘अमृतमहोत्सव’ पुण्यात साजरा झाला. त्या सोहळ्याला अटलबिहारी वाजपेयी उपस्थित होते. पंडितजींची कीर्ती भारतभरात व विदेशातही पसरली होती. त्याचीच दखल घेऊन भारत सरकारने त्यांना ‘भारतरत्न पुरस्कार’ प्रदान केला. पंडितजींनी तो पुरस्कार शास्त्रीय संगीताच्या ख्याल गायकीमध्ये योगदान देणाऱ्या समस्त दिग्गजांतर्फे स्वीकारला व आनंद व्यक्त केला.
त्यांनी त्यांच्या वेगळ्या शैलीची चुणूक ‘मिले सूर मेरा तुम्हारा’ ह्या गाण्यात दाखवली. ते गाणे राष्ट्रीय एकतेला प्रोत्साहन देण्यासाठी व भारतातील सांगितिक विविधतेतील एकता दाखवण्यासाठी दूरदर्शनकरता केले गेले आहे. प्रसिद्ध संगीताचार्य बालमुरली कृष्णन यांच्यासोबतच्या पंडितजींच्या जुगलबंदीही गाजल्या. पंडितजींना स्वातंत्र्याच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त संसदेत झालेल्या ऐतिहासिक कार्यक्रमात ‘वंदे मातरम्’ सादर करण्याचा मान मिळाला. ते आयुष्याच्या अखेरच्या पर्वात पत्नी वत्सलाबार्इंच्या मृत्यूनंतर थकून गेले व शस्त्रक्रिया झालेली असल्यामुळे शांतपणे एकाकी जीवन जगू लागले. सतारीची तार अत्यंत सुंदर मैफलीमध्ये तुटताच समोर बसलेल्या श्रोत्यांमध्ये गंभीर वातावरण निर्माण व्हावे तसेच काहीसे वाटले. भीमसेन आजारी होतील आणि मैफलीत गाणार नाहीत असे कधी वाटलेच नव्हते. भीमसेन जोशी यांनी त्यांचा अखेरचा श्वास 24 जानेवारी 2011 रोजी घेतला व ते अनंतात विलीन झाले. पहाडी आवाजाने रसिकमनावर स्वरशिल्प साकारणाऱ्या किराणा घराण्याचा वारसा जपणारा ‘स्वरभास्कराचार्य’ कायमचा मावळता झाला. त्यांच्या जाण्याने शास्त्रीय संगीताच्या तसेच ख्यालगायकीच्या क्षेत्रात झालेली हानी कधीच भरून निघणार नाही. अटलबिहारी वाजपेयी त्यांच्याविषयी म्हणतात, “पंडितजींच्या गायनात करूणा आहे. त्यांच्या बुलंद आवाजात सुरांची जादू निर्माण करण्याचे सामर्थ्य आहे.”
भीमसेन हे एका व्यक्तीचे नाव राहिलेले नाही तर साधना, आराधना व संगीतातील वंदना यांचे ते नाव झाले आहे. गानसरस्वती किशोरी आमोणकर त्यांच्याविषयी बोलताना ‘एवढा डाऊन टू अर्थ कलाकार पाहिला नाही’ असे म्हणतात.
भीमसेन जोशी आणि कुमार गंधर्व |
पंडितजींचे गुरू सवाई गंधर्व यांचे निधन 12 सप्टेंबर 1952 रोजी झाले. पंडितजींनी पुढील वर्षी (1953) त्यांच्या पुण्यतिथीला एका संगीत समारंभाचे आयोजन करत पुण्यात ‘सवाई गंधर्व महोत्सव’ सुरू केला. त्या समारंभाने उत्तरोत्तर विशाल रूप धारण केले. अनेक नवोदित, उदयोन्मुख कलावंत तसेच आंतरराष्ट्रीय कीर्ती असलेल्या कलाकारांसाठी ते मानाचे व्यासपीठ बनले आहे.
त्यांचे वर्णन अत्यंत कष्टाळू, जिद्दी, मितभाषी, अलौकिक ग्रहणशक्तीचा, प्रेमळ, गुणग्राही असे कितीही केले तरी कमीच पडेल!
– रमेशचंद्र धीरे 9822922606
(आरती दिवाळी अंक, 2019 वरून उद्धृत, संपादित-संस्कारीत)
रमेशचंद्र धीरे हे उर्दू साहित्याचे व्यासंगी अभ्यासक; तसेच, उर्दू व मराठी भाषांतील अनुवादकही आहेत. त्यांचे मराठीआणि हिंदी भाषांत साहित्य प्रसिद्ध आहे. त्यांचे ‘स्पंदनांचे शब्दवेध’ हा लेखसंग्रह आणि ‘सावली पेटते तेव्हा’ हा कवितासंग्रह प्रकाशित आहेत. ते इंदूरच्या ‘सर्वोत्तम’ या त्रैमासिकात पंधरा वर्षांपासून ‘गझलरंग’ नावाचे सदर लिहीत आहेत. त्यांचे मूळ गाव हिंगणघाट (जिल्हा वर्धा) आहे. त्यांचे हायस्कूलपर्यंतचे शिक्षण तेथेच झाले. ते नोकरीस मध्यप्रदेशमध्ये होते. ते पाटबंधारे विभागात चीफ इंजिनीयरच्या ऑफिसमधून सेवानिवृत्त झाले. ते शहाऐंशी वर्षांचे आहेत.
———————————————————————————————-————————-