उत्तमराव शिंदे
उत्तमराव खंडेराव शिंदे हे नाशिकच्या अंबड औद्योगिक वसाहतीमधील लघुउद्योजक. त्यांनी त्यांच्या उद्यमशील वृत्तीविषयी एक कथा सांगितली. एका बरणीत शंभर शिंपले असतात. त्यांपैकी एका शिंपल्यात मोती असतो. तो मोती उद्योजकाला शोधायचा असतो. तो मोती पहिल्या शिंपल्यात सापडू शकतो किंवा शंभराव्या शिंपल्यात! मोती सापडणाऱ्याला यश शंभर टक्के आहे. फक्त त्याने मोत्याचा शोध लागेपर्यंत तो शोधला पाहिजे. उत्तमराव शिंदे यांच्या गोष्टीचे प्रात्यक्षिक म्हणजे त्यांनी स्वतः वीस वर्षांत उभा केलेला आणि विस्तारलेला ‘प्रमोद फायबर प्लास्ट प्रा.लि.’ हा उद्योग. तो अंबड औद्योगिक वसाहतीत सुरू झाला आणि इगतपुरी तालुक्यातील गोंदे वसाहतीपर्यंत विस्तारत गेला आहे.
उत्तमराव शिंदे यांच्या कारखान्यात पवनचक्कीसाठी लागणारे मजबूत कव्हर तयार होते. म्हणजेच शिंदे यांच्या कारखान्यात हवेचा दाब, ऊर्जा निर्माण करणारी पाती आणि यंत्रसामग्री यांचे सुरक्षा कवच तयार होते. पवनचक्कीचे पाते वाऱ्याने सारखे फिरत असते. त्याची देखभाल आणि दुरुस्ती यांचे काम ‘प्रमोद फायबर प्लास्ट इंडस्ट्रीज’कडून केले जाते. त्यांनी त्यासाठी लागणारी दुरुस्तीची सामग्री आणि तंत्रज्ञान आयात केले आहे. भारतात फिरत्या पवनचक्कीची दुरूस्ती आणि देखभाल लघुउद्योगांपैकी फक्त ‘प्रमोद फायबर प्लास्ट इंडस्ट्रीज’कडे उपलब्ध आहे. त्यांना त्या क्षेत्रात अधिक काम करायचे आहे.
मात्र उत्तमरावांनी वेगवेगळ्या वाटा चोखाळल्या आहेत. त्यांनी एकच एक उत्पादन केले नाही. ते यश सततच्या नाविन्यपूर्ण उत्पादनांतून मिळवत राहिले. त्यांची ‘प्रमोद फायबर प्लास्ट इंडस्ट्रीज’ कंपनी भारतातील आणि जगातील कंपन्यांना जे हवे आहे ते उत्पादन करणारी आहे. ती एफ आर पी (Fiberglass Reinforced Products) प्लास्टिक मोल्डिंग, पी.यु.फोम प्रॉडक्ट यांचे उत्पादन आणि सेवाक्षेत्र यांत काम करते. त्यांच्या कंपनीत पंधरा पैशाला विकला जाणारा नवा ‘पार्ट’ तयार होतो आणि पंधरा लक्ष रुपये किंमतीचा ‘पार्ट’ही तयार होतो!
ते म्हणतात, “मी गोव्याच्या कंपनीला जो माल पुरवत होतो ती कंपनी बंद पडली आहे. दमणच्या कंपनीलाही टाळे लागले आहे. मी मात्र चालू आहे. मला उत्पादनात नाविन्य असल्याने कायम आव्हान मिळत राहिले व मी विस्तारत गेलो. माझी प्रॉडक्ट रेंज वाढत गेली.” ‘प्रमोद फायबर’ची उत्पादने दक्षिण कोरिया, जर्मनी, नेदरलँड, अमेरिका या देशांत निर्यात होतात. त्यांची उत्पादने फोक्स वॅगन, जनरल मोटर्स, सिमेन्स, बेंज, पवन ऊर्जा क्षेत्रातील नामवंत कंपन्या यांना पुरवली जातात. उत्तमराव शिंदे यांनी नवी उत्पादने जागतिक अर्थव्यवस्था, गुणवत्ता यांचा अभ्यास करून, ग्राहकांची गरज ओळखून तयार केली. ते त्यांच्या यशाचे सूत्र आहे. ते म्हणाले, की “व्यवसायातील माणूस धूर्त-लबाड असून चालत नाही. त्याच्याकडे उद्यमशीलता आणि अंगात विनम्रता असावी लागते.”
उत्तमराव शिंदे हे सिन्नर तालुक्यातील हरसुले या गावचे. त्यांचे आजोबा वामनराव गोपाळा शिंदे हे भगूरमध्ये गवंडीकाम करत, तर वडील खंडेराव वामनराव शिंदे हे ओझरच्या ‘हिंदुस्थान एरोनॉटिक लिमिटेड’ या कारखान्यात नोकरी करत होते. उत्तमराव शिंदे बारावीनंतर पुण्यात पोचले. ते मेकॅनिकल इंजिनीयरची पदविका घेऊन ‘टेल्को’मध्ये दाखल झाले. त्यावेळी त्यांना महिना आठशे रुपये पगार होता आणि ‘टेल्को’मध्ये नोकरी म्हणजे प्रतिष्ठा होती. तरी ते नाशिकमध्ये ‘महिंद्रा अॅण्ड महिंद्रा’मध्ये संधी मिळताच परतले. त्यांना ‘महिंद्रा’त नोकरी करत असताना, जपान येथे ट्रेनिंगला सहा महिने जावे लागले. तेथे त्यांना वेगळ्या श्रमसंस्कृतीचा परिचय झाला. भारतीय अधिकारी सरकारी असो वा खासगी कंपनीतील, तो कपड्याला घाण लागू न देता व्यवस्थापन करतो किंवा व्यवस्थापनाचे धडे देतो. जपानमध्येतसे नव्हते. अधिकारी स्वतः काम शिकतो आणि नंतर तो मार्गदर्शक बनतो. जपानी माणूस कामात वक्तशीर असतो. साधी कात्रीला धार लावायची असेल, तर अधिकारी त्या कामाचे प्रात्यक्षिक करून दाखवतो. ही जपानी माणसाची तऱ्हा उत्तमरावांनी अनुभवली. उत्तमराव शिंदे स्वयंपूर्ण व्यवस्थापनाचे धडे घेऊन भारतात परतले.
उत्तमराव यांना स्वतःचे काहीतरी करावे असे वाटत होतेच. त्यांनी त्या हेतूने ‘अंबड औद्योगिक वसाहतीत’ इ-97 हा प्लॉट घेऊन ठेवला होता. त्यावेळी ते अविवाहित होते. त्यांनी पुतण्या प्रमोदच्या नावाने कंपनीची नोंदणी करून ठेवली. कंपनीचा आरंभ मात्र योगायोगाने झाला. उत्तमराव शिंदे यांचा मित्र श्रीकांत पाटील सिमेन्स कंपनीचा पुरवठादार होता. त्याला कंपनीने एका प्रॉडक्टचा सप्लाय करण्याची सूचना केली. त्याने उत्तमराव शिंदे यांना आव्हानात्मक विचारणा केली. ती त्यांच्या उद्योगाची सुरुवात झाली. त्यावेळी त्यांच्याकडे स्वतःचा पगार, उधार-उसनवार, बँकेचे कर्ज असे चार-साडेचार लाख रुपयांचे भांडवल होते. उत्पादन तीन कामगार घेऊन सुरू करताच ते महिंद्रामधून बाहेर पडले. ते म्हणाले, “मी नोकरीचा राजीनामा देऊन परतीचे दोर कापून टाकल्याने मला माझी क्षमता सिद्ध करता आली. मी संधी मिळेल तसे काम करत गेलो आणि माझ्यासाठी संधी निर्माण झाल्या/ मी त्या केल्या. एकातून एक मार्ग मिळत गेले. नवे रस्ते, नव्या वाटा, नवी वळणे घेत प्रवास करावा लागला. त्यातून यश मिळत गेले.”
उत्तमराव शिंदे यांना प्रारंभीच्या काळातील सहकाऱ्याने फसवणूकही केली. दिवाळखोरीत निघण्याची वेळ आली होती. बँकेचे कर्ज थकले, फ्लॅट विकावा लागला. लाखो रुपयांचा फटका बसला. तशा वेळी सारे कुटुंब त्यांच्या मागे उभे राहिले. त्यांची पत्नी विद्या यांनी त्या काळात त्यांना बळ दिले, भावंडांनी आधार दिला. शामराव शिंदे या भावाने ते पोलिस दलात अधिकारी असल्याने ‘भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे’ असा धीर दिला. मेरी येथे अभियंता असलेले बंधू च॔द्रकांत हेही मागे उभे राहिले.
उत्तमराव ‘पी यु फोम प्रॉडक्ट’च्या क्षेत्रात अनुभवी उत्पादक, कारखानदार आहेत. त्यांनी गोंदे ‘एमआयडीसी’ येथील त्यांच्या कारखान्यात Solace या नावाने आकर्षक, कम्फर्ट असे चपलेचे उत्पादन केले आहे. पी यु सोलची दर्जेदार चप्पल नाशिकमध्ये तयार होऊन देशभर जाऊ शकेल हा त्यांचा विश्वास आहे. चप्पल-बूटांचे कारखाने दिल्ली, कोलकाता, अमृतसर असे दूर दूर आहेत. तेथून येणारी पादत्राणे दक्षिणेत दूर दूर वापरली जातात. पूर्वी नाशिकमध्ये पटवर्धन यांची चप्पल प्रसिद्ध होती. तिचा फार प्रचार-प्रसार झाला नाही. मात्र ‘Solace’चे उत्पादन महाराष्ट्रभर जाऊ शकेल. दक्षिणेकडील राज्यांतही जाईल. उत्तमरावांसमोर नवे आव्हान आहे. ‘सोलेस’ची ‘बाटा’, ‘पॅरागॉन’ ‘अॅक्शन’ यांच्याशी तुलना होऊन ‘सोलेस’ पादत्राणांना उत्तम प्रतिसाद मिळेल असा विश्वास उत्तमरावांना वाटतो.
उत्तमराव शिंदे म्हणाले, की त्यांनी त्यांचे चपलेचे उत्पादन प्रायोगिक तत्त्वावर यशस्वी झालेले पाहिले आहे. मात्र तो प्रयोग नंतरच्या कोरोना टाळेबंदीमुळे तेथेच स्थगित झाला आहे. तो मोकळ्या वातावरणात पुढे नेण्याचा प्रयत्न करूच. दरम्यान, याच काळात पवनचक्कीचे भाग जर्मनीला निर्यात करण्याची संधी आल्यामुळे त्या व्यवहारावर लक्ष जास्त केंद्रित केले.
इन्सुलेटिंग मटेरीयल |
उत्तमराव व्यवसायासाठी जगभर फिरून अभ्यास करत असतात. त्यांची कंपनी भारतीय रेल्वेला सीट फोम, पॅनल आणि ग्रीन टॉयलेट या सेवा देण्यासाठी सज्ज झाली आहे. उत्तमराव शिंदे यांनी सांगितले, की अंबड येथे एक व गोंदे येथे दोन असे तीन कारखाने चालू आहेत. तिन्ही ठिकाणी मिळून तीनशे कामगार काम करतात. कंपनीची एकूण वार्षिक उलाढाल शंभर कोटी रुपयांच्या आसपास आहे. कंपनीला ‘आय एस ओ9001 : 2015’ हा दर्जा प्राप्त झाला आहे. पर्यावरणासाठी ‘ई एम एस 14001 : 2015’ हे मानांकन मिळाले आहे. कंपनीकडे सुरक्षिततेच्या दृष्टीने असणारे ‘ओ एच एस ए एस 45001 : 2018’ हे प्रमाणपत्र आहे. त्या बाबत कंपनीतील कर्मचारी वर्गाशी बोलताना, उत्तमराव शिंदे यांच्या यशाचे रहस्य सापडते – कामाचे स्वातंत्र्य, नवकल्पनांचे स्वागत, तणावमुक्त वातावरण, प्रयोग करण्याला संधी, ताबडतोब निर्णय यांमुळे प्रमोद नावाच्या कंपनीत एक कुटुंब मोठ्या मजेत नवनिर्मिती करत आहे! उत्तमराव शिंदे यांनी स्थानिक आदिवासी, भटके, दलितयांना सेवेत सामावून घेतले आहे. उत्तमरावांचे विचारसूत्र – ‘ज्याने सीमोल्लंघन केले, स्थलांतर केले त्याने त्याचा अवकाश निर्माण केला!’
उत्तमरावांचे कुटुंब पत्नी विद्या, मुलगा संकेत व मुलगी साक्षी असे आहे. संकेत बी ई-एम बी ए झाला असून सध्या बाहेर ‘जॉब’ करत आहे, परंतु तो उत्तमरावांच्या उद्योगातच येणार आहे. साक्षीने कॉम्प्युटर सायन्समधील पदविका प्राप्त केली आहे. ती पदवीचा अभ्यास करत आहे.
उत्तमराव शिंदे md@pramodfibre.com
– शंकरबोऱ्हाडे 9226573798 shankarborhade@gmail.com
शंकर बो-हाडे हे पिंपळगाव, नाशिक येथील ‘कर्मवीर काकासाहेब वाघ महाविद्यालया‘त मराठीचे प्राध्यापक आहेत. ते सिन्नर गावात ‘साहित्य रसास्वाद‘ हे वाङ्मय मंडळ चालवतात. बो-हाडे हे ‘राष्ट्र सेवा दला‘चे सैनिक. बो-हाडे नामांतर चळवळीत सत्याग्रह करून शिक्षणावर तुळशीपत्र ठेवून जेलमध्ये गेले. ते परिवर्तनवादी, दलित चळवळ व साहित्य याचे अभ्यासक आहेत. त्यांनी पत्रकार ‘जागृति‘कार पाळेकर यांच्या साहित्याच्या संशोधनानिमित्ताने मराठी पत्रकारितेच्या इतिहासाचा अभ्यास केला. ते गेली तीन दशके नाशिकच्या वृत्तपत्रातून लेखन करतात.
———————————————————————————————————————–
आमच्या सिन्नर तालुक्यातील यशस्वी उद्योजक शिंदे साहेबांचा आम्हाला अभिमान वाटतो.त्यांची माहिती दैणाऱ्या शंकरराव बोऱ्हाडे सर यांचा पण आम्हाला अभिमान वाटतो.शंकरराव बोऱ््हाडे सर हे सिन्नरचे भुषण आहेत.सिन्नरचा अज्ञात इतीहास केवळ बोऱ्हाडे सरांमुळे आम्हाला ज्ञात होतो.शिंदे साहेब आणि बोऱ्हाडे सर दोघांना परिणाम.
परीणाम नव्हे प्रणाम
अभिमानास्पद कामगिरी. मराठी उद्योजकाची. सँल्यूट टू शिंदे फँमिली. आणि बो-हाडेसरना धन्यवाद.