वारीची परंपरा (Wari Tradition)

0
125

 

श्री ज्ञानेश्वर महाराज स्वत: ज्येष्ठ वद्य अष्टमीला माझ्या जीवीची आवडी। पंढरपुरा नेईन गुढी।।असे म्हणत पंढरपुरास साडेसातशे वर्षांपूर्वी प्रस्थान ठेवते झाले. तेथपासून वारीची परंपरा सुरू झाली असे मानले जाते.
वारीचा सोहळा एकशेएकोणनव्वद वर्षांपूर्वी पुनरुज्जीवित केला गेला. त्या वेळी जी घराणी होती त्या आळंदीकर, वासकर, हैबतीबाबा यांचे वंशज; आणि निंबाळकर व शितोळे सरदार यांचा पहिल्या दिंडीमध्ये समावेश असतो.
परंपरा असे सांगते, की शितोळे सरदारांनी माऊलींच्या पादुका हातात घेऊन टाळी वाजवावी, गुढी उभारावी। वाट ही चालावी, पंढरीचीअसे म्हणत मंदिर प्रदक्षिणा केली. ज्ञानोबा माऊली-तुकारामच्या गजरात वारकऱ्यांनाही सामील करून घेत ते गांधीवाड्यात, त्यांच्या आजोळघरी माऊलींना मुक्कामास घेऊन आले.
आरंभीच्या संस्थापकांच्या दिंड्यांनंतर पुढे मग खंडोजीबाबा, शेडगेबाबा यांच्या दिंड्या असतात. माऊलींच्या रथाच्या मागेपुढे शंभरच्यावर नोंदणीकृत दिंड्या वारीमध्ये असतात. आता वारीचे स्वरूप खूपच विशाल झाले आहे. ते दिवेघाटात प्रत्ययाला येते. तेथे दिंडीचे पहिले टोक घाट चढून वर पोचते तेव्हा दुसरे टोक घाटाच्या पायथ्याशी असते. घाट अठरा ते वीस किलोमीटर लांबीचा आहे आणि वारीत लाख-दोन लाख वारकरी असावेत. असा तो जनांचा प्रवाहो! ते वारकरी पुऱ्या महाराष्ट्रातून वेगवेगळ्या दिंड्यांमधून आलेले असतात आणि वारीच्या मुख्य यात्रेत ठिकठिकाणी समील होऊन जातात.
वारीत सर्वात पुढे झेंडेकरी, पताकाधारी, टाळकरी, नंतर वीणेकरी, पखवाजी आणि मागे तुळशी वृंदावन डोक्यावर घेतलेल्या महिला व लहान मुले असा क्रम असतो. माऊलींच्या मागून चालणारा वारकरी हा खांद्यावर भगवी पताका घेतलेला, गळ्यात तुळशीमाळ घातलेला, कपाळी गोपीचंदनाचा टिळा लावलेला, हातात टाळ-मृदंग घेतलेला, मनात सात्त्विक भाव उचंबळून आलेला; आणि विठ्ठलाच्या ओढीने माऊलींच्या मागे पंढरीच्या वाटेवर मार्गस्थ होणारा असा असतो.
वारीचा प्रारंभ ज्येष्ठ वद्य अष्टमीला होतो तेव्हा आळंदीला कळसहलतो आणि माऊली प्रस्थान करतात. तो सोहळा अप्रतिमअसतो. दिंड्या दुसऱ्या दिवशी निघतात.
प्रस्थानाच्या वेळी माऊलींच्या चांदीच्या पादुका ठेवलेला रथ दिंड्यांच्या मध्यभागी असतो. माऊलींच्या रथापुढे मानाच्या सत्तावीस दिंड्या असतात. त्यात पहिली दिंडी म्हणजे नगारा, सनई-चौघडा आणि माऊलींचा अश्व असणारी साक्षात माऊलींची दिंडी! सोबत चोपदारांचा घोडा असतात.

माऊलींचा आळंदीनंतरचा पहिला मुक्काम पुण्यात होतो. वारीचा प्रवास पुणे, सातारा, सोलापूर अशा तीन जिल्ह्यांतून होतो. ते जणू लाखो वारकऱ्यांचे चालतेबोलते शहरच असते. प्रत्येक मुक्कामी पोचल्यावर माऊलींची आरती होते. दुसऱ्या दिवसासाठीच्या चोपदाराच्या सूचना होतात. त्या सूचनांच्या वेळी तेथे शांतता पाळली जाते. प्रत्येक दिंडीचा हरिपाठ त्यांच्या त्यांच्या सोयीने संध्याकाळी होतो. रात्री जागर-कीर्तने व खेळ होतात. नंतर वारकरी झोपी जातात. असे म्हणतात, की रात्री स्वतः माऊली येऊन त्यांच्या लाडक्या भक्तांच्या थकल्याभागल्या शरीरावरून मायेने हात फिरवतात. त्यामुळे भक्तांचा सगळा शीण तेथल्या तेथे नाहीसा होतो आणि भक्त दुसऱ्या दिवशी भल्या पहाटेच सज्ज होऊन दामदुप्पट उत्साहाने चालू लागतात!

 

     प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी माऊलींच्या पादुकांची शोडषोपचार पूजा झाल्यावर त्या पालखीत ठेवल्या जातात व माऊली पुढील प्रवासास निघतात. माऊलींसोबत इतरही दिंड्या निघतात. मध्ये मध्ये विसाव्याच्या ठिकाणी आसपासच्या गावकऱ्यांसाठी दर्शनाला म्हणून पालखी थांबते. त्या सर्व काळात सर्वत्र दानधर्म, भोजन, शिधा, उपासाचे पदार्थ यांची लयलूट असते. हडपसरनंतर माऊलींची पालखी दिवेघाटसासवडजेजुरीमार्गे जाते तर तुकोबांची पालखी पुणेसोलापूर रस्त्याने इंदापूरमार्गेजाते .पालखीचा मार्ग, मुक्काम यांचे वेळापत्रक आधीच प्रसिद्ध केलेले असते.

अठराव्या शतकात मल्लप्पा वासकर आणि पुढे इंग्रजांच्या काळात हैबतराव अरफळकर यांनी वारीला ऐश्वर्यसंपन्न केले. पुढे, दिंडीत म्हणण्याचे वाटचालीचे अभंग – त्यांच्या चाली – भजनाची सुरुवात आणि शेवट कोणत्या अभंगाने करायचा अशा बारीकसारीक गोष्टींत शिस्त लावली गेली.
बंकटस्वामी नेतनूरकर, लोधिया महाराज, साखरे महाराज, दांडेकरमामा; तसेच, धुंडा महाराज देगलूरकर आणि बाबा महाराज सातारकर यांनी वारकरी कीर्तनाची परंपरा विकसित केली. कीर्तनासाठी प्रसंगानुरूप अभंग, त्यांची विषयवार विभागणी करण्यात आली. त्यांच्या चाली, टाळकऱ्यांचा सहभाग, प्रवचनात म्हणण्याच्या ओव्या यांचेही दंडक घालण्यात आले. तुकोबांची गाथा, ज्ञानेश्वरी आणि एकनाथी भागवत ही ग्रंथत्रयी म्हणजे या संप्रदायाचे भूषण. वर्षातून पंढरीची आषाढी किंवा कार्तिकीपैकी एक वारी आणि आळंदीची समाधीसोहळ्याची वारी करणे हे वारकऱ्याला आवश्यक ठरवले गेले. परस्त्रीला रूक्मिणी मातेसमान आणि परपुरुषाला पांडुरंगासमान मानणे, पूर्ण शाकाहार, पान-तंबाखू वर्ज्य असे अनेक दंडक वारकऱ्यांसाठी घालून दिले गेले.

 

          नामदेवांपासून निळोबांपर्यंत सातशे वर्षांची वारीची उज्ज्वल परंपरा आहे. वारकरी संप्रदायातील बहुतांश लोक हे शेतकरी असतात. ते सर्वजण वारकरी संप्रदायातील तत्त्वज्ञान खऱ्या अर्थाने जगत असतात.
          ‘जयाने घातली मोक्षाची गवांदी। मेळविली मांदी वैष्णवांची।।असा अधिकार असलेले ज्ञानेश्वर माऊली, ‘मुंगी उडाली आकाशी तिने गिळले सूर्यासीअसा आत्मविकासाचा अनुभव सांगणाऱ्या संत मुक्ताबाई, ‘मुक्ता आत्मस्थिती सांडवीनअसे खणखणीतपणे ऐकवणारा देहूचा तुकया वाणी, ‘जोहार मायबाप जोहारम्हणणारे संत चोखामेळा, संत जनाबाई अशा लहानथोर साऱ्यांना एकत्र जोडणारे सूत्र, ते म्हणजे पंढरीरायाच्या ओढीचे सूत्र.
          पंढरी हे वारकरी संप्रदायाचे आदिपीठ, तर पंढरीराय विठ्ठल हे त्यांचे दैवत. लाखो वारकरी ज्येष्ठ वद्य अष्टमीला ज्ञानोबा-तुकारामअसे म्हणत पंढरीच्या दिशेने निघतात. त्यांना आषाढी एकादशीला विठ्ठल दर्शन होते. वारीची सांगता होते (आषाढ) गुरुपौर्णिमेला काल्याच्या कीर्तनाने.
त्यानंतर होते ती परतवारी. माऊलींची पालखी मोजक्या वारकऱ्यांच्या संगतीत आळंदीस परत येते. ते वेळापत्रकही ठरलेले असते.
(संकलित)

———————————————————————————————-

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here