डफावर चालणाऱ्या नाटकाचे प्रकार आहेत – त्यात प्रामुख्याने गोंधळी नाटक, राधा नाटक, काशिबाई, तांब्रट ध्वज व नंद गोपाळ यांचा समावेश होतो. त्यांचा बाज प्रबोधन व जनजागृतीपर असा असतो. चव्हाण बंधू यांची नाटके पंचक्रोशीत प्रसिद्ध आहेत. ती परंपरा त्यांची चौथी-पाचवी पिढी सांभाळत आहे. राम, बाळराम, फकिरा ही पूर्वपिढी गोंधळी नाटक सादर करण्यात पारंगत होती. नाटक कन्नड व मराठी या दोन्ही भाषांत असते. पुरातन काळी लाईटची व्यवस्था नव्हती. नाटक त्याकाळी बत्ती लावून, कंदिल-मशालींच्या प्रकाशात होत असे. परमेश्वर कुस्ती आखाडा तुडुंब भरून जात असे. चव्हाणबंधू यांचे नाटक त्यांच्या घरात दुःखद घटना घडली तरी कधी चुकले नाही. जणू ‘शो मस्ट गो ऑन’ हे सूत्र त्यांना माहीत होते! एकदा ढोलकी, डफ, संगीतपेटी व संबळ आणि तुणतुणे वाजले, की गोंधळी कलाकार वैशिष्ट्यपूर्ण पोशाख व झगे घालून तयार होत. ते त्यांच्या तोंडाला रंग लागले, की नाटकात दंग होऊन जात असत. गोंधळी नाटक सुरू रात्री अकराच्या सुमारास होई, ते सकाळपर्यंत चालत असे. त्यातील कधी पात्रांचे दुःख लोकांच्या डोळ्यांत पाणी आणे, तर हास्य लोकांना खदखद हसवायला भाग पाडत असे. त्यात शब्द आणि वैशिष्ट्यपूर्ण हावभाव यांची प्रभावी जोड असे. बोलणे-चालणे, कार्यक्रमांतील निवेदने, संभाषणे मराठीबरोबर कन्नड भाषेतही होत असतात. जत्रा किंवा यात्रेदरम्यान गावातील लोक एकत्र येतात. त्यांचे मनोरंजन करण्यासाठी नाटक हे एकमेव परंपरागत साधन होय.
स्त्री वेशभूषेतील कलाकार |
अक्कलकोट संस्थानचे नरेश राजा श्री फत्तेसिंग भोसले महाराज एकदा गोंधळी नाटक पाहण्यासाठी आले असता, राजांना खळखळून हसायला भाग पाडल्याबदल भोसले महाराजांनी नाटक करणाऱ्या कलावंतांवर खूश होऊन स्वतः त्यांना पोशाख भेट म्हणून दिले होते असे चव्हाणबंधू अभिमानाने सांगतात.
– धोंडप्पा मलकप्पा नंदे 9850619724
लेखक परिचय – धोंडप्पा मलकप्पा नंदे हे वागदरी येथे राहतात. त्यांनी मराठी विषयात बीए केले आहे. त्यांना लेखन, फोटोग्राफीचा छंद आहे. त्यांनी विविध विषयांवर लेखन दैनिके, साप्ताहिके व दिवाळी अंक यांतून केले आहे. त्यांचे सहा हजार लेख प्रसिद्ध झाले आहेत. त्यांना ग्रामीण संस्कृतीबद्दल विशेष आवड आहे.
व्हिडिओ क्लिप टाका ना .
Super
वेगळी माहिती आहे, इंटरेस्टिंग आहे.
नंदे छान आहे पारंपरिक कला जोपासणे गरजेचे आहे. मी ती नाटके पाहिलेली आहेत.अतिशय सुंदर आणि सामाजिक संदेश असणारी ती नाटके असायची. आमचे मामा गुंडू चवण विनोदी भूमिका करत असे. त्यांचे आगमन झाले की लोक खळखळून हसायचे.अभिनंदन छान लेख लिहिला आहे.मी सध्या शिवाजी विद्यापीठ येथे प्राध्यापक म्हणून काम करीत आहे. धन्यवाद
आपला मी ऋणी आहे असेच प्रेम राहुदया