दुबईतील ईद झाली व्हर्च्युअल (Dubai, EId Goes Virtual)

जगभर कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. लोकांना त्याच्या बातम्या, हकिकती वर्तमानपत्रे, टीव्ही आणि समाजमाध्यमे यांवरून कळतात. पण त्या सर्वांवर वाचक/प्रेक्षकांचा विश्वास बसतो असे नव्हे. भारतातील हकिकती आपल्याला अन्य विविध मार्गांनीही कळत असतात. परदेशस्थ जी मराठी मंडळी आहेत त्यांना स्थानिक परिस्थितीचा प्रत्यय आगळा येत असावा. तो थिंकच्या वाचकांपर्यंत पोचवावा म्हणून आम्ही प्रत्यक्ष परिस्थिती अनुभवातून लिहिण्याबाबत वेगवेगळ्या देशातील लोकांना सुचवत आहोत. या संयोजनाची जबाबदारी संध्या जोशी सांभाळत आहेत.

 

          या पद्धतीने प्राप्त झालेले विनीता वेल्हाणकर (इंग्लंड), अनघा गोडसे (ऑस्ट्रेलिया), रूपा जोशी(जपान), सोनाली जोग आणि अमेय वेल्हाणकर (इंग्लंड) यांचे अनुभव प्रसिद्ध केले आहेत. सोबत दुबई आणि इस्रायलचे अनुभव प्रसिद्ध करत आहोत.
———————————————————————————————————————–
दुबईतील ईद झाली व्हर्च्युअल (Dubai, EId Goes Virtual)

 

प्रिया सहानी परिवारासोबत
दुबईत बंधुभाव वाढवणारा ईद उल फितर हा सर्वात मोठा उत्सव, जसा महाराष्ट्रात दिवाळी किंवा गणपतीचा सण. रमझानच्या महिन्यात सर्व मुस्लिम बांधव सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत उपवास करतात. दुबईतील रमझानचा महिना म्हणजे शॉपिंग मॉल्समध्ये भव्य सेल्स, भव्य इफ्तारचे डिनर मेळावे, मस्जिदीत दररोज प्रार्थना, चॅरिटी आणि दानधर्म.
          मी 2019 ला प्रथम रमझानमध्ये दुबईला आले. तेव्हा ईद सेलिब्रेशनचा पहिल्यांदा अनुभव घेतला. मी एका मित्राच्या घरी ईद साजरी केली. त्यांच्या घरी आम्ही पंधरा-वीस मित्र-बांधव मिळून खूप मज्जा केली; गप्पा मारल्या; बिर्याणी, शीर-कुर्मा (रमझान स्पेशल खिरीचा प्रकार), मिठाई आणि चॉकलेट्सवर ताव मारला. परंतु या वर्षी कोरोनामुळे ईद आणि रमझान सणाचे एकदम वेगळे रूप दिसून आले. रमझानच्या आधी एक महिनाभर दुबईत चोवीस तास लॉकडाऊन होते. फक्त आवश्यक कारणासाठी घराबाहेर फिरणे; तेसुद्धा ऑनलाइन परमिटद्वारेच शक्य होते. लॉकडाऊनचा कालावधी दुबईचे प्रशासन व लोक यांनी कोरोना व्हायरस विरुद्ध लढण्याची क्षमता वाढवण्यासाठी वापरला. पूर्ण दुबईचे अनेक वेळा निर्जंतुकीकरण केले गेले. मोटारीतून जाऊन कोरोना व्हायरसची चाचणी करणारी केंद्रे चोवीस तास चालू होती. त्याशिवाय घरी येऊन तपासणी करण्यासाठी फिरती प्रयोगशाळा उपलब्ध करुन देण्यात आली होती. दुबई हा जगातील सर्वाधिक कोरोना व्हायरस चाचण्या (लोकसंख्येच्या तुलनेत) करणाऱ्या देशांपैकी एक आहे. दुबईमध्ये दर दहा लोकांच्या मागे दोन लोकांच्या कोरोना व्हायरस चाचण्या केल्या गेल्या आहेत (भारतामध्ये सध्या एक हजार लोकांच्या मागे दोन चाचण्या केल्या जात आहेत). कोरोना व्हायरसपासून संरक्षण मिळवण्यासाठी दुबईने तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर केला आहे. दुबई पोलिस लोकांची थर्मल स्क्रिनिंग करण्यासाठी ‘स्मार्ट हेल्मेट’चा वापर करत आहेत. डॉक्टरांच्या हाताखाली वैद्यकीय सेवा देणाऱ्या व्यक्तींच्या (पॅरामेडिकल)सुरक्षिततेसाठी ‘सेल्फ सॅनिटाईझेशन वॉक’ साधने देखील उपलब्ध केली गेली. तेथे फक्त वीस सेकंदात लोकांच्या कपड्यांना निर्जंतुक केले जाते.

 

बंगळोर आयआयएमच्या दीक्षांत समारोहप्रसंगी

दुबईने रमझानच्या सुरुवातीला लॉकडाऊन किंचित शिथिल केला; तीस टक्के दुकाने आणि रेस्टॉरंट्स उघडली गेली. एका कुटुंबातील पाचपर्यंत लोकांना एकत्र भेटून खाण्याची आणि प्रार्थना करण्याची परवानगी देण्यात आली. परंतु मशिदींमध्ये एकत्रित प्रार्थना करण्यास परवानगी नव्हती. रमझान आणि ईद दरम्यान मशिदी बंदच राहिल्या. साठ वर्षांवरील लोक आणि बारा वर्षांखालील मुलांना मात्र बाहेर फिरायला सतत मनाई आहे. लॉकडाऊनच्या एकूण परिस्थितीचा परिणाम वेगवेगळ्या लोकांवर वेगवेगळा झाला आहे. माझ्या ऑफिसमधील एका सहकाऱ्याला नुकतीच मुलगी झाली. ती त्याच्या मुलीची पहिली ईद होती. त्यांनी ती ईद त्यांच्या मुली आणि बायको यांच्याबरोबर घरीच साजरी केली. त्यांनी मॉलमध्ये जाऊन नवीन कपडे आणि भेटवस्तू घेण्याऐवजी अॅमेझॉनवर शॉपिंग केले. ‘ईद नेहमीपेक्षा वेगळी असली तरीही कुटुंबासमवेत घालवलेल्या वेळामुळे ती अधिक चांगली वाटली’ असे त्याने मला सांगितले. परंतु माझ्या दुसर्‍या मित्राला रमझान हा सन एकट्यानेच साजरा करावा लागला. त्यांची पत्नी फेब्रुवारी महिन्यात त्यांच्या मुलाच्या बारावीच्या बोर्ड परीक्षेसाठी भारतात गेली होती. ती विमानसेवा बंद असल्याने भारतातच अडकून पडली. तो ईदच्या दिवशी, त्याच्या चुलतभावाच्या घरी गेला आणि त्याने त्यांच्या कुटुंबीयांसह ईद साजरी केली.

          सध्याच्या कोविद-19 परिस्थितीत धार्मिक उत्सवांमध्ये कसा बदल होईल ह्याचे उदाहरण दुबईतील ईद सण ज्या तऱ्हेने साजरा झाला त्यामुळे कळले. ईदिया म्हणजे ईदच्या दिवशी लहान मुलांना दिलेले पैसे/भेटवस्तू. ती कोरोना काळात ‘व्हर्च्युअल’ बनली; शुभेच्छा एकत्र भेटून देण्याऐवजी झूम कॉलच्याद्वारे दिल्या गेल्या, लोकांनी मशिदीत जाण्याऐवजी कुटुंबासमवेत घरीच प्रार्थना केल्या. या बदललेल्या पद्धतींचा परिणाम दीर्घकाळ होत राहील अशी शंका काही समाजचिंतकांना वाटते. समाजाच्या गरजेनुसार धार्मिक सण आणि उत्सव वर्षानुवर्षे बदलत आलेले आहेतच. टिळकांनी स्वातंत्र्यलढ्यासाठी गणेशोत्सव सार्वजनिक केला होता. पण महाराष्ट्रात त्या गणेशोत्सवाचे स्वरूप काळाच्या ओघात किती बदलले! लोकांचे सण कोरोनाव्हायरसमुळे डिजिटलाइझ होणार का? हे वेळच सांगेल. पण सणांमधील आनंद आणि नात्यांमधील ओलावा अशा अडचणींमुळे कधीच कमी होऊ शकणार नाही.
प्रिया सहानी priyasahani101@gmail.com
प्रिया सहानी या मूळ मुंबुईतील दादरच्या. त्यांनी बंगळोर आयआयएममधून एमबीए केले आहे. त्यांनी शैक्षणिक कारकीर्दीमध्ये सतत अव्वल दर्जा मिळवला. त्या दुबईतील इवाय पार्थीनॉन कंपनीमध्ये कन्सल्टंट म्हणून काम करतात. त्यांना पर्यटनाची व खाद्यपदार्थ बनवण्याची हौस आहे.
——————————————————————————————————————–
इस्रायल: धर्मांधतेची बाधा
मोजेस चांडगावकर त्यांच्या मुलासोबत
इस्रायल या राष्ट्रामध्ये नव्वद लाख जनता आहे. ह्या राष्ट्राचे राहणीमान उच्च दर्जाचे आहे.  वर्षभरात लाखो स्त्री-पुरुष परदेशी जातात. तसेच, इतर राष्ट्रांमधूनही लाखो लोक पर्यटक म्हणून इस्रायलमध्ये येत असतात. इस्रायलमध्ये कोरोनासदृश्य परिस्थिती निर्माण होताच बाहेर देशांमधून आलेल्या लोकांना दोन आठवडे अलिप्त ठेवण्यात आले. त्यांची तपासणी पंधरा दिवसांनंतर करण्यात येत होती. सबंध इस्रायलमध्ये पंधरा मार्चपासून संचारबंदी लागू करण्यात आली. त्यांना चेहऱ्यावर मास्क आणि हातमोजे घातल्याशिवाय बाहेर पडता येत नसे. इटली, स्पेन, फ्रान्स, ब्रिटन, अमेरिका इत्यादी देशांत या विषाणूची लागण होऊन हजारो माणसे मृत्युमुखी पडत आहेत, हे लोकांना कळत होते. इस्रायल प्रशासन कोरोनापासून दूर राहण्यासाठी आरोग्य विभाग आणि पोलीस खात्याकडून सतत काळजी घेत आहे. त्याला जनतेची चांगली साथ मिळत आहे.
          तेथे यहुदी (धर्मपंथ) लोक आहेत. त्यांनी प्रथम कोरोनाकडे दुर्लक्ष केले. ज्या गावात रब्बाय लोक राहतात, तेथे कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर आहे. इस्रायलमध्ये धार्मिक पुजारी लोक आहेत, त्यांना रब्बाय म्हटले जाते किंवा मराठीमध्ये दाती असेही म्हणतात. त्यांनी खूप गोंधळ घातला होता. ते तेथील मंदिरामध्ये जाऊन प्रार्थना करू नका, असे सांगितले तरी एकत्र जमत होते. सरकारने त्यांच्यावर इतकी कठोर कारवाई केली; की त्या मशिदी, प्रार्थना मंदिरे बंद करून टाकली. तरीसुद्धा ते लोक जुमानत नव्हते. पण सरकारने खूप कठोर अॅक्शन घेतली. धर्मांधता किती असावी त्याचे हे उत्तम उदाहरण आहे.
          इस्रायलचे आकाश आता मोकळे झाले आहे. तेथे शाळा, ऑफिसेस, सिनेबॉक्स सर्वकाही सुरू झाले आहे. त्यामुळे तेथे आता आनंदी आनंद आहे.
 मायबोली स्नेह संमेलनात माधव गडकरी
भाषण करताना शेजारी बसलेले
मोजेस चांडगावकर व फ्लोरा सॅम्युअल
मोजेस चांडगावकर, yosefyosefa@yahoo.com
मोजेस चांडगावकर हे इस्रायलमध्ये पंचेचाळीस वर्षांपासून राहत आहेत. ते इस्रायलमधील रांमले या गावात राहतात. ते मूळ भारतीय मराठी भाषिक बेने इस्रायल ज्यू आहेत. त्यांचे मूळ गाव खालापूर आहे. त्यांनी पनवेल येथे तहसीलदार म्हणून काही वर्षे नोकरी केली. ते हिब्रू भाषेसोबत मराठी उत्तम बोलू आणि लिहू शकतात. त्यांचा जेरुसलेम येथे 1996 मध्ये भरलेल्या ‘जागतिक मराठी परिषदे’मध्ये सहभाग होता. त्यांनी मराठी भाषा आणि महाराष्ट्रावर अत्यंत प्रेम असल्यामुळे मायबोली या मराठी मासिकाचे कार्य केले. मायबोली हे मासिक इस्रायलमध्ये मराठीत प्रकाशित होते. त्यांना लोकमान्य समाजसेवक ही पदवी दिली गेली आहे. त्यांची मराठीत पुस्तकेही प्रकाशित झाली आहेत. ठाणे येथील इव्हस असोसिएशनतर्फे प्रसिद्ध होणाऱ्या ‘शायली’ या मासिकामध्ये त्यांचे लेख प्रकाशित होतात. 
 
 
 
 
 
 
मोजेस चांडगावकर यांनी लिहिलेले पुस्तक
मोजेस चांडगावकर यांच्या पत्नी सिपूरा चांडगावकर
शायली मासिकात त्यांचे लेखन प्रसिद्ध होत असते.
             ———————————————————————————————————-

About Post Author

Previous articleदेवाघरची बाळे (Gifted Children)
Next articleस्थलांतर ऊर्फ घरवापसी! एक टर्निंग पॉइंट (Migration can be a Turning Point)
मोजेस चांडगावकर हे इस्रायलमध्ये पंचेचाळीस वर्षांपासून राहत आहेत. ते इस्रायलमधील रांमले या गावात राहतात. ते मूळ भारतीय मराठी भाषिक बेने इस्रायल ज्यू आहेत. त्यांचे मूळ गाव खालापूर आहे. त्यांनी पनवेल येथे तहसीलदार म्हणून काही वर्षे नोकरी केली. ते हिब्रू भाषेसोबत मराठी उत्तम बोलू आणि लिहू शकतात. त्यांचा जेरुसलेम येथे 1996 मध्ये भरलेल्या ‘जागतिक मराठी परिषदे’मध्ये सहभाग होता. त्यांनी मराठी भाषा आणि महाराष्ट्रावर अत्यंत प्रेम असल्यामुळे मायबोली या मराठी मासिकाचे कार्य केले. मायबोली हे मासिक इस्रायलमध्ये मराठीत प्रकाशित होते. त्यांना लोकमान्य समाजसेवक ही पदवी दिली गेली आहे. त्यांची मराठीत पुस्तकेही प्रकाशित झाली आहेत. ठाणे येथील इव्हस असोसिएशनतर्फे प्रसिद्ध होणाऱ्या ‘शायली’ या मासिकामध्ये त्यांचे लेख प्रकाशित होतात.

1 COMMENT

  1. दुबई आणि इस्राएल मधील माहिती अत्यंत उपयुक्त आहे।तुमचा उपक्रम फार चांगला आहे। आधीच माहिती देत चला। आमच्या शुभेच्छा।मोहन पांडे (इस्राएल मित्र) नागपूर ,महाराष्ट्र,भारत8जून2020

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here