रमाबाई नगर धारावीच्या दिशेने? (Ramabai Nagar On way to Dharavi?)

2
48
समाजात वेगळे वेड घेऊन जगणारी माणसे असतात. तशा चौतीस व्यक्तींचा परिचय 30 एप्रिलपर्यंत ‘लॉकडाऊनच्या काळातील धावत्या नोंदी’ या शीर्षकाखाली करून दिल्या. त्यांतील काही व्यक्तींच्या कामांना, विचारांना विशेष दाद मिळाली. नोंदी 1 मे पासून थांबवल्या होत्या, तो एकूण परिस्थितीचा अंदाज घेण्यासाठी. आम्ही तो घेत असताना काही सामाजिक-सांस्कृतिक प्रश्न भिडत गेले. त्यावर उपाय सुचवले जात होते, त्यावर चर्चाही होत असे. सगळ्यात ज्वलंत प्रश्न सतत चर्चेत/बोलण्यात येई तो ‘कोरोना – सद्यस्थिती व नंतरच्या शक्यता’. निदान शंभर व्यक्तींशी इमेल, व्हॉट्सअॅप आणि फोनसंभाषणे यांद्वारा दहा दिवसांत बोलणे झाले. ते प्रश्न एकेक करून आठवडा-दहा दिवसांत मांडण्याचा बेत आहे. त्यांतील एक प्रश्न, सरकारी यंत्रणेला कोरोना परिस्थिती भीषण झाली तर ती हाताळता येईल का, हा असे.
          तर परिस्थिती हाताबाहेर जाण्याचा संभव कसा आहे हे दर्शवणारा प्रत्यक्षदर्शी अनुभव माझा सहकारी नितेश शिंदे याने वर्णन करून लिहिला आहे. कोरोनाने किरकोळ आजारी लोकांना उपचार घरीच घेणे कसे शक्य आहे ते डॉ.उडवडिया यांनी सुचवले आहे. ते टिपण आमच्या हाती सोशल मीडियावर लागले.
          आजपासून आपला संवाद पुन्हा सुरू करूया.
दिनकर गांगल 9867118517 dinkargangal39@gmail.com
(दिनकर गांगल हे थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक आहेत.)
—————————————————————————————————
रमाबाई नगर धारावीच्या दिशेने? Ramabai Nagar On way to Dharavi?
वसाहतीतील नागरिकांनी स्वतः गल्ल्या बंद केल्या

मी घाटकोपरच्या पूर्वेला रमाबाई नगरातील एका विभागात राहतो. विभागातील एकाने शुक्रवारी सकाळी ऑनलाईन लिस्ट पाहिली. त्यात कोव्हिड पॉझिटिव्हच्या यादीत आमच्या वस्तीचे आणि पेशंटचे नाव होते. त्यानंतर ती बातमी वेगाने अनेकांच्या व्हॉट्सअॅप ग्रूपवर पसरली. त्यामुळे सर्वांची एकमेकांना फोनाफोनी सकाळी सकाळीच सुरू झाली. काही लोक सकाळी सात वाजता बाधित व्यक्तीच्या घराजवळ जमा झाले. त्. त्यांचे घर दोन गल्ल्यांत पसरलेले आहे, परंतु खाणे-पिणे एकाच रूममध्ये होते. ते लोक तेव्हा झोपलेले होते. लोकांनी त्यांना उठवून विचारले, तुमच्या घरी कोणी आजारी आहे का? कोणाच्या टेस्ट केल्या आहेत का? बाधित व्यक्तीच्या सुनेने सासऱ्यांची टेस्ट केली आहे असे सांगितले. मात्र त्या कुटुंबाला टेस्ट पॉझिटिव्ह आहे, की निगेटिव्ह याचा पत्ताच नव्हता किंवा त्यांनी तसे भासवले तरी. लोकांनी त्यांची टेस्ट पॉझिटिव्ह आली असल्याचे त्या परिवाराला त्यावेळी सांगितले. बाधित व्यक्तीच्या छातीत गेले काही दिवस दुखत होते. त्यामुळे ती व्यक्ती डॉक्टरकडे गेली. डॉक्टरांनी त्या व्यक्तीला कोविड-19 ची टेस्ट करायला सांगितली. त्यांच्या घरात दहा-बारा माणसे आहेत. त्यात पाच मुलेही आहेत. ती सतत बाहेर उघड्यावर खेळत असतात. लोकांनी त्यांना एकाच रूममध्ये थांबा असे सांगितले. बाधित व्यक्ती सार्वजनिक बाथरूम सतत वापरत होती. शुक्रवारी सकाळीसुद्धा ते गृहस्थ बाथरूमला जाऊन आले. तेव्हा वस्तीत थोडी चलबिचल सुरू झाली. एक शेजारी म्हणाला, की आम्ही मागील गल्लीतील चेन्नईवरून आलेल्या आणि हातावर होम क्वारंटाईनचा स्टॅम्प असलेल्या व्यक्तीला संशयित म्हणून रवानगी करण्याच्या विचारात आहोत आणि तुमच्या तर घरी पॉझिटिव्ह रुग्ण आहे!

बातमी वाऱ्यासारखी पसरली. लोक ठिकठिकाणी गटागटाने जमू लागले. बीएमसीचे फवारणी करणारे कामगार दहा वाजता येऊन फवारणी करून गेले. त्यानंतर आशासेविका येऊन आजूबाजूच्या सर्व परिवारांची माहिती आणि संपर्क लिहून घेऊन गेल्या. काही कर्मचारी अकरा वाजण्याच्या सुमारास येऊन ‘प्रतिबंधित क्षेत्र’ असा मजकूर असलेला फलक लावून आणि पोर्टेबल स्पीकरवरून रेकॉर्डेड सूचना सांगून गेले. जाता जाता ते म्हणाले, की रुग्णाला नेल्यानंतर एरिया सील केला जाईल. दिवसभर गल्लीत धुसफूस होत राहिली. रुग्णाच्या परिवारातील व्यक्तींना घराबाहेर पडू नका असे सांगूनही त्यांची ये-जा दिवसभर सुरूच होती. त्यांच्या सुनेने ती ज्या हॉस्पिटलमध्ये काम करते तेथे रुग्णाला नेण्याची खटपट करून पाहिली. शेवटी, सून असफल होऊन पाच वाजता घरी आली. दरम्यान, मी दिवसभरात दोन-तीनदा हेल्पलाईनवर, वेगवेगळ्या नंबरांवर फोन करून पॉझिटिव्ह रुग्ण एरियात असल्याची माहिती कळवली. रात्री तब्बल आठच्या सुमारास अॅम्बुलन्स येऊन रुग्णाला घेऊन गेली. त्यानंतर वसाहतीतील मुलांनी परिसर सॅनिटाईझ केला.

          लोकांनी बाधित व्यक्तीच्या घराबाहेर बांबू आणि पत्रे लावले. वास्तवात दोन-तीन घरांची ये-जादेखील त्याच मार्गाने होऊ लागली. त्यामुळे घोटाळा असा झाला, की रुग्णाच्या घरातील व्यक्ती ते पत्रे बाजूला सारून ये-जा करत राहिले आणि शेजाऱ्यांना बाहेर जायचे झाले तर त्यांनाही त्याच बांबू-पत्र्यांना हात लावून बाहेर पडावे लागत होते. त्यामुळे भांडणे सुरू झाली. नेमकी त्याच घरांबाहेर दोन झाडे आणि मोठी मोकळी जागा आहे. त्यामुळे अगदी कालपर्यंत पूर्ण वसाहतीतील सर्व लहान मुले आणि पंधरा-वीस तरुण तेथे ये-जा करत होते, रमत होते. विसंगती अशी, की बाधित व्यक्तीला शुक्रवारी रात्री नेण्यात आले तरी घरातील बाकीच्या दहा-बारा व्यक्तींना क्वारंटाइनसाठी म्हणून नेण्याकरता शनिवार दुपारचे तीन वाजले. बाकी वस्तीत कोणत्याही प्रकारची सावधगिरी घेतली गेली नाही.
          मी शनिवारी सकाळीच राष्ट्रीय, राज्य आणि मुंबई बीएमसीच्या हेल्पलाईनवर सदर घटनेची कल्पना दिली. रुग्णाला नेले आहे, पण परिवार घरीच आहे इत्यादी माहिती सांगितली. त्यांनी सर्व डिटेल्स लिहून घेतल्या आणि रुग्णाच्या परिवारातील सदस्यांना क्वारंटाईन केले जाईल असेही सांगितले. दरम्यान वस्तीत घराबाहेर सतत भांडणे होत राहिली. आजूबाजूचे सर्वच लोक बाधित रुग्णाच्या परिवाराच्या संपर्कात आले आहेत. त्यांची मुले अनेकांच्या घरी येऊनजाऊन होती. त्यांच्या मुलांसोबत खेळली. त्यामुळे वसाहतीतील नागरिकांमध्ये एक वेगळ्याच तऱ्हेची घबराट पसरली आहे. 
          आमच्या विभागातील वस्ती तीन-चार हजार लोकांची आहे. त्यांचा वावर संपूर्ण रमाबाई नगरात असतो. त्या नगरातील नागरिकांची संख्या लाखापेक्षा जास्त असावी. या परिसरातील घरांमध्ये एकेक फूटाचेही अंतर नाही. गल्ल्या तर फक्त दोन फूट रुंदीच्या आहेत. सार्वजनिक बाथरूम्स दूरवर आहेत. आमच्या घराजवळ एक सार्वजनिक बाथरूम आहे, पण त्याला त्या नगराच्या लोकांनी टाळे लावले आहे. फक्त त्यांच्याच विभागातील नागरिकांना त्याच्या चाव्या देण्यात आल्या आहेत. असे ठिकठिकाणी घडत असल्यामुळे एरवीही प्रचंड मानसिक ताप सर्वांना होतच असतो. त्यावर कधीच कोणाकडून कसलाही उपाय सुचवला गेला नाही.
          शासन कोरोनासंबंधात उपाययोजना करत आहे, असे म्हणते पण त्या कोठेही प्रत्ययास येत नाहीत असा माझा वैयक्तिक अनुभव आहे.
          मुख्यमंत्री महोदय वारंवार सांगत आहेत, की हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही. तरीही बाधित रुग्णाला नेण्यास चौदा तास लागावेत आणि घरातील लोकांना तर छत्तीस तास क्वारंटाईन केले गेले नाही. शासकीय कर्मचारी येऊन प्रोसिजर म्हणून कामे करतात, पण ते करत असलेल्या कामाचा उपयोग होत आहे की नाही त्याकडे दुर्लक्ष करतात असा आमचा अनुभव आहे. स्थानिक नगरसेवकाने त्या दोन दिवसांत वस्तीला दोनदा भेट दिली, परंतु तरीही तातडीने उपाययोजना करण्याची तसदी घेतली गेली नाही. त्यामुळे प्रशासनाने तातडीने पावले उचलून खबरदारीचे प्रयत्न करणे गरजेचे आहे, अन्यथा हा परिसर धारावी होण्यास वेळ लागणार नाही. कारण येथील जनता एवढी समजूतदार आहे, की घराबाहेर पडू नका असे सांगितले गेल्यावर काय सांगितले गेले हे पाहण्यासही लगेच घराबाहेर येतात! त्यामुळे सदर परिसर सत्वर सील केला जाण्याची गरज आहे.
– नितेश शिंदे info@thinkmaharashtra.com
———————————————————————————————-
डॉक्टर उडवडिया यांची उपाययोजना
          मुंबई स्थित ब्रीच कॅण्डीहॉस्पिटलचे डॉ.फरोख उडवडिया यांनी कोरोनाव्हायरसच्या चाचणी संदर्भात दिलेली महत्त्वाची सूचना.
          प्रिय देशवासीयांनो, कोरोनाविरुद्ध आपण सर्वजण मिळून लढा देत असताना आम्हाला मात्र सध्या एका प्रमुख समस्येचा सामना करावा लागत आहे. तो म्हणजे थोड्याशा सर्दी-खोकला किंवा साध्या फ्लू सदृश्य लक्षणांमुळेसुद्धा अनेक नागरिक भयभीत होऊन लगेच रुग्णालयात कोरोना व्हायरसच्या चाचणीसाठी धाव घेत आहेत. त्यामुळे वैद्यकीय सेवांवर मोठा ताण येतोय, कोरोना व्हायरस चाचणी संदर्भात हे वास्तव लक्षात घेणे गरजेचे आहे, की भारताची लोकसंख्या ही एकशेतीस कोटी आहे तर कोरोना किट टेस्टिंगची उपलब्धता संपूर्ण देशात दीड लाख आहे, मुळात चांगली प्रतिकारशक्ती असलेल्या सर्वसाधारणपणे पंच्याऐंशी टक्के लोकांसाठी कोरोना’चा संसर्ग हा एखाद्या साध्या फ्लूसारखाच असू शकतो ज्यातून ते सहज बरे होऊ शकतात, याचा अर्थ तुम्ही कोरोना व्हायरसच्या लक्षणांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करा असे अजिबात नाही. पण याच्या लक्षणांच्या पुढील टप्प्यांकडे लक्ष ठेवून मग कोरोना चाचणीचा निर्णय घ्या.
1) सर्वप्रथम तुम्हाला तुमच्यात शरीरात जर फ्लूसदृश्य लक्षणे आढळली तर स्वतःला विलगकरा म्हणजे इतर लोकांमध्ये मिसळू नका.
2) जर तुमच्या शरीरात कोरोनाच्या संसर्गाची सुरुवात झाली असेल तर पहिल्या व दुसऱ्या दिवशी तुम्हाला थकवा जाणवेल.
3) तिसऱ्या दिवशी तुम्हाला सौम्य ताप, घशात खवखव व खोकल्याचा त्रास होईल.
4) चौथ्या दिवशी वरील लक्षणांसोबत हलक्या डोकेदुखीचा त्रास सुरु होईल.
5) पाचव्या दिवशी पोटाच्या संदर्भात काही त्रास जसे, की अपचन किंवा जुलाबाचा त्रास होईल. सोबत डोकेदुखी व तापाचे प्रमाण कमी-जास्त होत राहील.
6) सहाव्या व सातव्या दिवशी अंगदुखीचा त्रास व्हायला लागेल, डोकेदुखी मात्र कमी होईल व पोटाचा त्राससुद्धा कमी-जास्त होत राहील.
7) आता यात सर्वात महत्त्वाचा टप्पा हा आठव्या व नवव्या दिवशी येईल जर त्यात तुमचा सर्दी व खोकला कायम राहून तुमची बाकीची लक्षणे जर कमी झाली, म्हणजे तापाचे प्रमाण कमी झाले, अंगदुखी कमी झाली, शरीरातील तरतरी वाढली, तर समजून जा की तुमच्या शरीरात कोरोनाविरुद्धची प्रतिकारशक्ती निर्माण झाली व तुम्हाला कोरोना चाचणीची किंवा काही अधिक खास उपचारांची आवश्यकता नाही. कारण तुमच्या शरीराने कोरोना प्रतिजैविक स्वतः तयार केले, पण जर तुमचा त्रास अधिक वाढला व फ्लूची लक्षणे अधिक तीव्र झाली तर मग मात्र तुम्ही प्रशासनाने उपलब्ध करून दिलेल्या कोरोना हेल्पलाईनची संपर्क करून कोरोनाची चाचणी नक्कीच करून घेतली पाहिजे, ही वरील संपूर्ण प्रक्रिया देशातील सर्व नागरिकांनी समजून घेणे अतिशय गरजेचे आहे. कारण आधीच सांगितल्याप्रमाणे भारतात कोरोना टेस्टिंग किट्सची संख्या सध्यातरी फक्त दीड लाख आहे ज्याच्याद्वारे सर्वसामान्य फ्लूची लक्षणे आढळत असलेल्या सर्व नागरिकांची तपासणी करणे असंभव आहे. त्यासाठी फ्लूची लक्षणे आलेल्या प्रत्येकाने प्रथम वरील प्रक्रियेद्वारे स्वतःला कोरोना चाचणीची गरज आहे का याचा अभ्यास करून मगच कोरोना चाचणीचा निर्णय घ्यावा आणि अजून एक महत्त्वाचे म्हणजे आवश्यकता नसताना विनाकारण N 95 मास्कचा वापर करू नका. कारण यामुळे वैद्यकीय क्षेत्रातील, ज्यांना खरंच या प्रकारच्या मास्कची गरज आहे. त्यांना ती उपलब्ध होत नाहीयेत. आशा आहे तुम्ही वैद्यकीय क्षेत्राला सहकार्य कराल.
डॉ. फरोख उडवडिया
—————————————————————————————————————–

About Post Author

2 COMMENTS

  1. या साऱ्याची खूपच काळजी वाटते. प्रत्यक्षात हे सर्व फार भयंकर आहे.

  2. भारताची एकूण लोकसंख्या आणि उपलब्ध कीट्सची संख्या यांची तुलना अप्रस्तुत वाटते …ती सद्धयाचे एकूण करोनाग्रस्त आणि संभाव्य करोनाग्रस्त यांची संख्या आणि उपलब्ध कीट्सची संख्या अशी असावयास हवी …अशा माहितीमुळे भीतीदायक वातावरण पसरते …याची कृपया दाखल घ्यावी …भारताची सारी लोकसंख्या करोनाग्रस्त नाही आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here