आम्ही जपानमध्ये 2007 साली मुंबईहून आलो आणि गेली बारा वर्षे तेथे वास्तव्यास आहोत. नैसर्गिक आपत्ती जपानला नवीन नाहीत. वारंवार होणारे भूकंप -त्यामुळे येणाऱ्या त्सुनामी, टायफून(सागरी वादळ), पावसाने 2019 साली केलेला कहर… या गोष्टी आम्हाला नित्यनियमाच्या झाल्या आहेत. घरातील वस्तू हलण्याएवढा मोठा भूकंप नाही झाला तर उलट काळजी व भीती वाटते! तर अशा अनेक नैसर्गिक आपत्तींना वेळोवेळी सामोरे जाऊन परत खंबीरपणे उभा राहणारा हा देश. प्रखर राष्ट्राभिमान आणि भाषाभिमान असलेले जपानी लोक फार हेल्पफुल,परफेक्शनिस्ट आणि नियमांचे काटेकोर पालन करणारे म्हणून ओळखले जातात.
|
अतुल जोशी |
आम्ही 2019च्या वर्षाअखेर भारतदौरा करून जानेवारीत टोक्योत परतलो, ते कोरोनाची बातमी घेऊनच. त्यावेळी असे वाटले, की तो प्रश्न फक्त चीनपुरता मर्यादित असेल, पण जानेवारीच्या शेवटी टोकियोजवळच्या बंदरात चीनहून आलेले डायमंड क्रूझ नावाचे जहाज देशविदेशाचे पर्यटक घेऊन थडकले. त्यात बऱ्याच प्रवाशांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे लक्षात आले. त्यामुळे त्या सर्व प्रवाशांचे क्रूझवरच विलगीकरण केले गेले. परिणाम असा झाला, की त्या जहाजावर कोरोनाची लागण फार पटकन झाली आणि जवळपास सातशेपन्नास प्रवासी कोरोनाबाधित झाले. त्यावेळी जर थोडी जास्त काळजी घेऊन परिस्थिती नीट हाताळली असती तर कोरोनाबाधितांचा आज जो काही आकडा आहे तो अजून कमी असता. जपान सरकार या वैश्विक संकटाबद्दल फार जागरूक असल्याचे दिसत नव्हते. जपान सरकारचा प्रयत्न ऑगस्ट 2020 मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर जपानमध्ये सगळे आलबेल आहे असेच चित्र जगासमोर दाखवण्याचा होता. परंतु दक्षिण कोरियातील त्यावेळी वाढलेला कोरोनाबाधितांचा आकडा आणि फेब्रुवारीच्या मध्यावर जपानमध्ये झालेली कोरोनाबाधितांची संख्या त्यामुळे सरकार थोडे जागे झाले. जपानमधील या कोरोनाबाधितांचा चिनी लोकांशी संबंध आलेला नसताना ही लागण झालेली होती. सरकारने फेब्रुवारीच्या शेवटी सगळ्या शाळा मार्च महिन्यात बंद राहतील असा महत्त्वपूर्ण पण तडकाफडकी निर्णय घेतला.
आमच्यासारख्या असंख्य पालकांची शाळा बंद केल्यामुळे तारांबळ उडाली. सुरुवातीला मी दोन दिवस, मिस्टर दोन दिवस सुट्टी घेऊन मुलीसाठी मॅनेज करत होतो. तिची घरून शाळा सुरु झाल्यामुळे तिला मदत म्हणून कोणा एकाला घरी राहणे आवश्यक होते. सरकारनेही ज्यांना घरून काम करणे शक्य नसेल त्यांना कार्यालयांनी साठ टक्के पगार देणे बंधनकारक केले. तंत्रज्ञानात एवढा प्रगत असलेला देश अजूनही ‘वर्क फ्रॉम होम’ला सरावलेला नाही, रुळलेला नाही. याचे कारण येथील वर्ककल्चरमध्ये आहे. वरिष्ठांच्या आधी पोचायचे आणि ते ऑफिसातून निघाल्यावर निघायचे, पेपरवर्कवर खूप अवलंबून असणे, पेपरवर सहीवजा स्टॅम्प हेही बंधनकारक असणे ही त्यातील काही महत्त्वाची कारणे आहेत. आमची मार्च महिन्यात ऑफिस, घर आणि मुलीची घरून शाळा हे सांभाळताना फार धावपळ झाली.
मार्च शेवट ते एप्रिल शेवट असा संपूर्ण जपानमध्ये साकुराचा (चेरी ब्लॉसम) काळ असतो. पांढरा गुलाबी रंगाचा साकुरा बघणे हे एक फार मनोहारी दृश्य असते. जपानी लोक न चुकता साकुरा बघण्यास जातात. या वर्षी त्यात खंड पडला असता तर आश्चर्यच वाटले असते! साकुरा बघण्यास व्हायची ती गर्दी झाली आणि परिणामी कोरोनाबाधितांची संख्या वाढली! त्यामुळे सरकारने शेवटी ऑलिम्पिक स्पर्धा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आणि कोरोनासाठीची आणीबाणी जाहीर केली. त्यात अत्यावश्यक सेवा वगळल्या तर सगळे बंद करण्याचे आवाहन लोकांना होते. टोकियो मेट्रो पूर्ण क्षमतेनिशी आणि गर्दीनीशी एप्रिलमध्ये धावत होती. टोकियो मेट्रो म्हणजे मुंबई लोकलच्या गर्दीशी साधर्म्य असणारी लोकल सेवा. मी आता पूर्णपणे सुट्टीवर आहे, पण मिस्टरांना आठवड्यातून दोन-तीन दिवस ऑफिसला जावे लागते. जपानने आणीबाणी जाहीर केली पण लॉकडाऊन केले नाही त्यामुळे येथील व्यवहार अजूनही सुरळीत चालू आहेत. काम करणाऱ्यांची टक्केवारी कमी झाली एवढेच. भूकंप आणि टायफूनसाठी जी सावधता दिसते ती सावधता कोविदसाठी ना सरकारमध्ये दिसत होती ना नागरिकांमध्ये. लॉकडाऊन नसताना आणि सगळे व्यवहार चालू असतानाही जपानमधील कोरोनाबाधितांची संख्या इतर कोठल्याही देशापेक्षा कमी आहे. ह्याचा विचार केला तर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे मुळात जपानी लोक हे स्वच्छताप्रिय आहेत. मास्क घाला, सुरक्षितता पाळा हे बहुतेक जगासाठी आता ब्रीदवाक्य झाले आहे, पण मी गेली बारा वर्षे बघते, की जपानी लोक या ना त्या कारणाने मास्क घालून फिरतात. सर्दी, खोकला इतर संसर्गजन्य आजारांचा इतरांना संसर्ग होऊ नये म्हणूनही सावधानता बाळगतात. सुरुवातीच्या काळात टॉयलेट टिश्यू पेपरची कमतरता आणि जानेवारीपासूनच मास्कची कमतरता सोडली तर बाकी कोठली गोष्ट मिळत नाही असे येथे झाले नाही.
जपानमध्ये जागोजागी मॉलमध्ये, सार्वजनिक ठिकाणी सॅनिटायझर्स असणे हे अतिशय ‘कॉमन’ आहे. तेथे मूळात पाश्चिमात्य देशांसारखी जवळीक साधणे हा प्रकार क्वचितच बघण्यास मिळतो. आधीपासूनच थोडे सोशल डिस्टन्स ठेवणारे हे लोक वाकून नमस्कार करतात. त्यामुळेही खूप जवळ जाऊन आभार प्रदर्शन, शुभेच्छा देणे हे प्रकार तेथे नाहीत. लोकांचा त्यांचा परिसर स्वच्छ ठेवण्याकडे असलेला कल; त्यामुळे इतर देशांसारखे हायजिनसाठीचे वेगळे प्रयत्न येथे करावे लागले नाहीत. कोरोनाचा चीननंतर पहिला रुग्ण जपानमध्ये सापडूनही कोरोनाबाधितांची संख्या तशी आटोक्यात राहण्यात येथील स्वच्छता प्रेमाचा वाटा फार मोठा आहे.
|
रूपा जोशी त्यांचे पती
अतुल जोशी आणि मुलीसमवेत |
वृत्तपत्रातून असेही वाचण्यात आले, की इकडे कोरोनाच्या पाहिजे तेवढ्या चाचण्याही केल्या जात नाहीत. म्हणून रोग्यांची संख्या कमी आहे. संख्या कमी असण्याची आणि जी काही संख्या आहे ती असण्याची कारणे बरीच आहेत. इतर देशांप्रमाणेच रुग्णालयात पुरेसे बेड नसणे, फक्त कोविदसाठीचे वॉर्ड नसणे, मुळात लोकसंख्या कमी असल्यामुळे आरोग्य सेवा देणाऱ्यांची कमतरता असे प्रश्न येथेही आहेत. जपान इज ओल्ड पीपल्स कंट्री. यांचे आयुर्मान सगळ्यात जास्त असण्याचे कारण म्हणजे यांचा आहार समतोल आहे. समतोल आहारामुळे येणारी रोग प्रतिकारक शक्ती, शाळेतच दिले जाणारे स्वच्छतेचे,शिस्तीचे, सिव्हिक सेन्सचे धडे किंवा सरकार पुरेशा टेस्ट करत नसल्यामुळे… कारणे काहीही असोत जपानमध्ये कोविदचा विस्तार कमी आणि धीमा आहे. अमेरिकेच्या परिस्थितीमुळे लोकांमध्ये जागरूकता आणि भीती वाढली आहे. त्यामुळे लॉकडाऊन नसूनही रस्त्यावर वाहने क्वचितच दिसतात. आणीबाणी मे अखेरपर्यंत वाढवली असल्याने लोक स्वतःहून कामाशिवाय घराबाहेर पडताना दिसत नाहीत.
मुले घरात कंटाळली आहेत. जपानमध्ये जागेअभावी घरे तशी लहान आहेत. भूकंपासाठी प्रतिरोधक म्हणून घराचे लोडिंग जेवढे कमी करता येईल तेवढे कमी करून बनवलेली घरे आहेत. एका घरातील आवाज दुसऱ्या घरात ऐकू जाईल अशी गृहरचना असल्यामुळे मुलांच्या घरात खेळण्यावर बंधने आहेत. लॉकडाऊन नसल्यामुळे लोकांचे थोडा वेळ मास्क घालून सायकलिंग करणे, वॉक घेणे वगैरे चालू आहे; पण मुलांचे एकत्र पार्कमध्ये खेळणे बंद आहे.
टोकियो हे जगातील महागड्या शहरांपैकी एक शहर आहे. तेथील राहणीमानाचा दर्जा फार उच्च आहे. लॉकडाऊन जरी नसले तरी त्याचा परिणाम सगळ्याच व्यवसायांवर झालेला दिसतो. खूप लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. रोजंदारीवर काम करणाऱ्यांचे फार हाल आहेत. हातात पैसे नसताना राहणीमानाचा दर्जा सांभाळण्यासाठीची धडपड फार कठीण होऊन बसली आहे. त्यासाठी सरकारने मदत म्हणून माणशी काही रक्कम प्रत्येकाला सरकारी कोट्यातून देऊ केली आहे. नोकऱ्या नाहीत, असल्या तर पगार नाहीत, कोविद-19चे भीतीचे सावट यामुळे लोकांचा मानसिक ताण वाढत आहे. त्यातच कौटुंबिक अत्याचारांमध्येही वाढ झाल्याचे वाचनात आले. येथील वर्क कल्चरप्रमाणे लोक बारा-तेरा तास काम करतात आणि आता एकदम घरात बसून राहण्याची वेळ आल्यामुळे कौटुंबिक कलह वाढत असावेत. मुले दिवसभर घरी असल्यामुळे आयांना मानसिक ताण जाणवत आहे. हा एक संस्कृतीचा भाग आहे असे मला वाटते. उलट, माझी कोरोनामुळे मुलीसोबत संपूर्ण वेळ राहण्याची संधी मिळते अशी सकारात्मक भावना आहे.
देश कोठलाही असो या अदृश्य शत्रूशी लढताना येणारे प्रश्न हे सगळीकडे थोड्या फार फरकाने सारखेच आहेत. अजून किती दिवस/महिने असे काढावे लागतील ते माहीत नाही, पण देवाकडे एकच मागणे आहे -सर्वेपी सुखिनः भवतु | सर्वे सन्तुनिरामयाः| सर्वे भद्राणी पश्यन्तु | मा कश्चित दुःखं मा प्नुयात |
– रूपा जोशी टोकियो, जपान. tokyowanderor@gmail.com
रूपा जोशी यांचा जन्म महाराष्ट्रात झाला. त्यांनी इंजीनीयरींगचे शिक्षण घेतले आहे. त्या सध्या जपानमध्ये नोकरी करतात. त्यांना गाण्याची आणि चित्रकलेची आवड आहे. त्यांचे पती अतुल जोशी हेही मुंबईचेच आहेत. ते ‘मिजुहो सिक्युरिटीज’मध्ये कार्य करतात. त्यांना एक मुलगी आहे.
———————————————————————————————————-
हा अनुभव मला पण आहे माझ्या कांहीं दिवसांच्या जपान वास्तव्यात एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की शिस्तपालन हा जपानी लोकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे.देशप्रेम आणि विसरत यांची उत्कृष्ट सांगड घातली आहे.
*शिस्त
रूपा, मोजक्या शब्दांत छान सांगीतलेस. मला स्वतःला जापान स्वच्छता आणि शिस्तप्रियते मुळे आवडतो. तु डोळ्यासमोर चित्र उभं केलंस.विदुला कुलकर्णी.
वाह टेक्निकली तज्ञे देशाला वर्क फ्रॉम होम ची सवयनसल्यामुळे IT'S HARD TO BELIEVE
वा छान लेख .देश विदेशातिल करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती कळते. सौ.अनुराधा म्हात्रे. पुणे.
Very informative write up
हाय रुपा…एका परकियाच्या तरी तिथलेच होऊन जपान मधल्या परिस्थितीचे तु चांगले अवलोकन केले आहेस. छान लिहिलेस. कोरोनाच्या उद्रेकामुळे तु लिहिती झालीस ही जमेची बाजू. ऑलिंपिकचं स्टेटस आता काय आहे. Is it postponed by 2021 ?
धन्यवाद विदुला कुलकर्णींजी!
हाे ना विश्वास बसणार नाही पण खरे आहे. Japanese are very conservative and don’t adapt to changes very easily and willingly. या परिस्थितीनंतर काही बदल घडून येतील अशी आशा आहे.
धन्यवाद अनुराधा म्हात्रेजी!
Thanks a lot!
Thank you very much Medha Padhye. काेराेनाचे संकट टळले तरी या वर्षी हाेतील असे वाटत नाही. त्यामुळे बहुतेक पुढचे वर्षीच हाेतील.
Yes.Rupa you have got writing ability.keep it up.Sandhya Joshi
Thank you
खूप छान अनुभव सोप्या भाषेत शेअर केलाय
रुपा जोशी.कुलकर्णी.खूप छान माहिती.धनंजय चतुर नासिक.आपण धुळे येथे बरोबर होतो.माधुरी व वैशाली तुझ्या मैत्रिणी.
तुझे बाबा फोनवर कायम भेटतात
Babaphonvar भेटतात.