मेधाचं काय करायचं ?
– ज्ञानदा देशपांडे
शिक्षणक्षेत्रात, कॉर्पोरेट जगात, लेखकांच्या संमेलनात, सरकारी कर्मचा-यांच्या समुहात, महाराष्ट्रात-महाराष्ट्राबाहेर, अमेरिकेत, कॉन्फरन्समध्ये किंवा चार इंटुक लोकांबरोबरच्या टॅक्सीच्या प्रवासात एका व्यक्तीबद्दल मी कायम ऐकत आलेली आहे. या व्यक्तीला कधीही न भेटतादेखील तिच्याबद्दल इतकं भरभरून ऐकलंय की त्या माहितीच्या समुच्चयाला एकदा तपासून पाहायला हवं असं वाटत होतं. विचार करणारा प्रत्येक माणूस या व्यक्तिमत्त्वाबद्दल विचार करतो, मत बाळगतो, हिरिरीनं ते मत व्यक्त करतो, तिनं काय करायला हवं होतं याबद्दल अथक सल्लामसलती करतो. मला वाटतं, मेधा पाटकर हे अनेक पिढ्यांच्या चर्चेला पुरून उरेल असं एक व्यक्तिमत्त्व आहे.
माझ्या अँथ्रोपोलॉजिस्ट शिक्षणाचा एक भाग म्हणून मी आय.आय.टी.तल्या विद्यार्थ्यांचा कळप नेहमी तपासत असते. आतापर्यंत प्रत्येक आय.आय.टी.यननं मला ‘मेधा पाटकर‘ या विषयावर मतप्रदर्शन करून माझ्या ‘मेधा-इन्फो डाटाबेस’मध्ये भर टाकली आहे. माझ्या अँथ्रोपोलॉजिकल कुतूहलाचा एक हिस्सा ‘मेधा पाटकर’ हा असल्यामुळे हा गुंतागुंतीचा फिनॉमिना मला सतत खुणावत राहिलाय.
आयुष्यात अनेक जण असेही भेटले, की जे ‘भज मेधा’ पंथातले होते. ‘मेधाताईनं’ एखादी गोष्ट हातात घेतली, की ती कशी ग्रेट आहे याबद्दल सांगून कान किटवण्याची जबाबदारी ते मनापासून पार पाडत असत. ‘भज मेधा’ पंथात गौरी देशपांडेच्या न-राजकीय लेखनावर प्रेम करणा-या आणि मेधाताईंच्या राजकारणाचं लिंबू बसलेल्या कन्यका यांचा मोठा गट आहे. दुसरा गट मेधाच्या कमिटमेंटनं, दुर्दम्य इच्छाशक्तीनं, तिच्या लढा द्यायच्या कुवतीनं भारावलेला, इंजिनीयर ‘दादा’ लोकांचा आहे. मेधाताईंच्या ‘डेव्हलपमेंट पॉलिसी’चा कोणताही क्रिटिक या ‘भज मेधा’ गटाला रुचत नाही. लोकांना फार काळ ताणलेले लढे आवडत नाहीत. त्यांना विकासात्मक मांडवली व्हावी लागते. लढ्यासाठी लढा त्यातली ऊर्जा गमावून बसतो. असं जर ‘मेधाताईं’च्या बाबतीत कोणी बोललं की भज-मेधा गटातली लोकं त्याला ‘साम्राज्यवाद्यांचा हस्तक’ ठरवतात.
मी मेधा पाटकरांचं पहिलं भाषण ऐकलं तेव्हा दिवस ‘एनरॉन’चे होते आणि मेधा पाटकरांची अत्यंतिक कळकळ त्या भाषणातूनही जाणवत होती. पत्रकार म्हणून सभा कव्हर करताना माझ्या डोळयांत एकदाच पाणी आलं ते मेधा पाटकरांच्या भाषणानं. या बाईमधली जेन्युईन ऊर्जा मनाला स्पर्शून जाते.
नर्मदा आंदोलन जसं जसं जुनं व्हायला लागलं तशी तशी मेधा पाटकरांची ओळख सर्व भारतीयांना झाली आणि मग नर्मदा, एनरॉन किंवा स्वातंत्र्योत्तर भारतातला कुठलाही महत्त्वाचा लढा मेधा पाटकरांच्या सहभागाशिवाय पार पडला नाही. काही वर्षांपूर्वी, सिंगूरनंतरच्या कोलकात्यात मोर्चा निघाला तेव्हा अनेक वान्नाबे मेधा-प्रतिकृतींसह मेधा पाटकरांचं भाषण परत ऐकलं. किती फरक पडला या काळात! आता काहीशी निराशेची झाकही का दिसते त्यांच्या आवाजात? या व्यक्तिमत्त्वाचा गेल्या पंचवीस वर्षांतला प्रवास थक्क करणारा, चढ-उतारांनी भरलेला. ‘भज मेधा’ गटाचा रागच येऊ शकत नाही अशी ऊर्जा या बाईमध्ये आहे. पण मेधामध्ये काहीतरी नाही. ते काय नाही? यावर अनेक मेधा-विरोधक अथक बोलतात. म्हणजे उदाहरणार्थ, मेधा पाटकरांना बेरजेचं राजकारण जमलं नाही. त्यांनी ‘ऑल आर नथिंग’ असा डाव करून लढे टोकाला नेले. मुलगी नुसतीच ‘हट्टी’ नाही तर तिला चळवळ समजते, परंतु लढा देणा-या लोकांना नंतर उत्तरं हवी असतात; ती ‘उत्तरांची आस’ तिला तिच्या लढाऊ प्रतिमेपुढे फारशी महत्त्वाची वाटत नाही. किंवा मेधाचे एक अभ्यासू टीकाकार म्हणाले तसं- जर प्रत्येक ऊर्जा प्रकल्पास तिनं विरोध केला तर त्यातून औद्योगिकीकरण शक्य नाही. पर्यायी ऊर्जा साधनातून जर बहुसंख्याकांची जीवनशैली शक्य होणार नसेल, तर या लढयाच्या बारक्या अक्षरांतल्या तळटीपा मेधा पाटकर लोकांना समजून सांगतात का? सुझलॉन, नर्मदा, एनरॉन, आता जैतापूर- जर ऊर्जा प्रकल्पांना असा कडवा विरोध झाला तर महाराष्ट्राचं, देशाचं पुढे काय होणार? प्रश्न अनेक आहेत. बहुतांश प्रश्न मेधा-लढा-व्यक्तिमत्त्वापुढचे प्रश्न आहेत.
मेधाकडे जी सत्ता आहे ती सत्ता वापरून ती कितीतरी गोष्टी करू शकली असती पण टिपिकल मराठी माणसासारखं तत्वाचा प्रश्न सर्वाधिक उंचीवर नेला की तिचं पोट भरतं म्हणून तिच्यावर रागावणारे देखील खूप जण आहेत. कडव्या डाव्यांच्या मते हे मेधाच्या वन्स अपॉन अ टाइम राष्ट्र सेवा दलाचं फलित आहे. ते काहीही असो पण तिच्यावर कडक टीका करणारे देखील टीका करून झाल्यावर तिच्याबद्दल बरं बोलतात. मला वाटतं हे देखील सेवा दलाचंच फलित आहे!
मेधा पाटकरांच्या लढ्यावर आक्षेप घेणा-यांनाही तिच्या लढ्याचं महत्त्व, त्यातला ‘नुकसान-भरपाई’चा मुद्दा पटतो. नंतर वाद सुरू होतो तो हे लढे जेव्हा पर्पेच्युअल-न संपणारे-लढे बनतात तेव्हा. गेली अनेक वर्षे अनेक इंटरनेट फोरम्सवर याबाबत चर्चा चालू आहेत. मध्यंतरी एन.बी.ए.ला अरूंधती रॉय, आमीर खान लाभले तेव्हा समस्त एन.आर.आय. इंटुकांनी त्यावर कंटाळेस्तोवर चर्चा केल्या. मेधा पाटकरांच्या ‘सेल्फ रायचसपणा’ची दीर्घ चिकित्सा त्या काळात चर्चेचा भाग बनली. ‘पर्यायी विकासनीती’ म्हणून पाटकर एट आल संप्रदायात जे पर्याय दिले आहेत ते बहुसंख्य भारतीय समाज तूर्तास नाकारतोय. न्याय्य तरीही विकासाला होकार देणारा पर्याय लोकांना हवासा वाटतो. अशा वेळी त्यांनी काय करायचं? झोपडपट्टीवासियांचे हक्क मेधा पाटकरांनी सांगितले, की त्यातलं अतिक्रमणाचं राजकारण कसं हाताळायचं यावर परिसंवाद सुरू होतो.
माझ्या परिचितांमधला एक मोठा वर्ग भारतीय सैन्यदलात काम करणा-यांचा आहे. मी या गटाला एकत्रितपणे दोनच विषयांवर जोरात बोलताना ऐकलंय. एक म्हणजे, सोनिया गांधी पंतप्रधान होतील अशी शक्यता निर्माण झाली तेव्हा आणि दुस-यांदा, नेव्ही नगरपाशी जी झोपडपट्टी होती ती पाडायला विरोध करताना मेधा पाटकर तिथं अवतीर्ण झाल्या तेव्हा. जणू देश, देशहित, मध्यमवर्गीय हित यांच्या विरोधात पाटकरांचा लढा चालू आहे, अशा हिरहिरीनं त्यांनी त्यावेळी वाद घातले.
‘सेझ’चा प्रश्न जसा पुढे आला तसं अनेक मध्यमवर्गीयांनी ‘हा प्रश्न आमचा नाहीच’ असा चेहेरा केला. कित्येक कडव्या डाव्यांनी मात्र ‘सेझ’सदृश गोष्टींची आवश्यकता आहे असं ठासून सांगितलं आणि त्यावेळी कित्येक मेधा-सिंपथायझर असलेल्यांनीही ‘मेधानं आता आपल्या स्ट्रॅटेजीज बदलायला हव्यात’ अशी भूमिका घेतली.
या उपरान्त मराठी भाषिक समुहात एक मोठा गट, ‘मेधा पाटकर‘ या व्यक्तिमत्त्वाची केवळ कार्यकर्ती म्हणून नाही तर ‘माणूस’ म्हणून चिकित्सा करत असतो. मेधांचं माध्यमप्रेम, त्यांचा साध्या साडया आणि बिनइस्त्रीचा ब्लाऊज याबद्दलचा आग्रह, नवश्रीमंत मैत्रिणींबरोबर दीडशे रुपयांचा चहा म्हटल्यावर येणारी अस्वस्थता, त्यांचे विविध तत्त्वाचे प्रश्न, त्यांच्या व्यक्तिमत्त्वानं भारून आंदोलनात गेलेले आणि पुरेसे उद्वेगून आलेले ‘मेधा-विश्लेषक’ या माहितीत भर टाकतात. पूर्वी मला हे तत्त्वत: चूक वाटायचं. परंतु आताशा हा सारा प्रकारच मला ‘कल्ट-फॉर्मेशन’चा भाग वाटतो. आणि कुठेतरी तेंडुलकरांनी याची सुरुवात केली असं वाटायला लागतं. मात्र तेंडुलकरांचं कौतुक प्रत्येकाला झेपलेलं नाही. भलेभले कौतुकोत्तर नाकावर पडले. मेधा पाटकर मात्र जिवंत हट्टीपणानं कल्टनंतरही टिकून राहिल्या.
फायनान्स हाँचो आणि कॉर्पोरेट उच्चपदस्थ यांच्या वर्तुळात मी ‘मेधा पाटकर’ नावाचा भयप्रद दबदबाही अनुभवलाय. कॉर्पोरेट उच्चपदस्थांना दुस-या कोणाची नाही पण मेधा पाटकरांची कशी भीती वाटते हे मी जवळून बघितलंय. व्यक्तिमत्त्वात एवढं प्रचंड पोटेन्शिअल असूनही मेधा पाटकरांनी कधी निवडणूक लढवली नाही, म्हणून त्यांच्यावर टीका करणा-यांचा वर्ग मोठा आहे. ‘राजापूर’ची सीट लढवायची ठरलं होतं, मात्र ऐनवेळी बिनविरोध निवडणूक होणार नाही म्हटल्यावर मेधाताईंनी माघार घेतली. त्यांनी नाही म्हटलं म्हणून नाराज झालेल्या ‘भज मेधा’ कॅण्डिडेटनं एकदा ‘मेधाताईला निवडणुकीचं राजकारण जमत नाही’ हे सांगताना तिच्या बाबांच्या निवडणुकीचा अनुभव तिच्या गाठीशी कसा दीर्घकाळ राहिलाय याचं विश्लेषण केलं होतं!
दुसरीकडे, ‘छप्पन नु छाती’चे अनेक समर्थक सरदार सरोवरानं गुजराथ कसा बदलला याबद्दल बोलतात. त्यांचा कमिटेड ‘मेधा विरोध’ आता माझ्या परिचयाचा झालाय.
मेधा-प्रेमात आणि मेधा-विरोधात, दोन्ही बाजूंना मला प्रश्नचिन्हे दिसतात. यू.आर. अनंतमूर्ती एकदा म्हणाले होते, की आताशा. अती उजव्या लोकांमध्ये मी डावा/रॅडिकल असतो आणि अती डाव्यांमध्ये काहीसा टोपी उडवणारा नफ्फट उजवा. तसं काहीसं. वर्षानुवर्षें ‘मेधा पाटकर’ या फिनॉमेनाला अभ्यासत असताना मला हळुहळू कळलं, की आधुनिक मराठी संस्कृतीचा विचार करताना काही नावं वगळताच येणार नाहीत. तसं, अत्यंत महत्त्वाचं नाव मेधा पाटकरांचं आहे. स्वकर्तृत्वावर मध्यमवर्गीय घरातून मोठे झालेले, सचिन किंवा पु.ल. जसे मराठी आयडेंटीटीचा अविभाज्य भाग आहेत तशीच ही ‘लढाऊ बाई’ मराठी असण्याचा अविभाज्य भाग आहे. त्यामुळे या बाईबद्दल मत असणं ही पण मराठी असण्याचीच एक सिग्नेचर आहे.
भारतीय स्वातंत्र्यलढ्यानंतर मानवी हक्कांचा सर्वांत मोठा लढा ‘नर्मदा बचाव’नं उभा केला. आणि नंतर NAPM ची स्थापना हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. मेधा पाटकरांनी महाराष्ट्रालाच नाही भारतातल्या लढयांना नव्या लढयाची भाषा दिली. परवा ‘मेधा पाटकरांचं काय ठार चुकलं?’ या विषयावर वाद चालू होता. माझी विशीतली मैत्रीण आय.आय.टी.यन बुद्धिमान भावाला झापताना सरकन् म्हणाली, ‘अरे, या पोझिशनल वॉरफेअरमध्ये मेधा पाटकरांनी त्यांची पोझिशन घेतली. तू किती वेळ त्या पोझिशनची टीका करणार आहेस? तू तुझी पोझिशन घे की- हवं तर निवडणुकीच्या राजकारणातही उतर!’ पुढची पिढी या बाईचं योगदान कसं बघेल? अनेक पर्यायांमधला हा सोपा, सरळ डिरेक्ट पर्याय मला आवडला आणि मेधा पाटकरांच्या राजकारणाच्या आवडीनिवडीपलीकडे जाऊन त्या बाईविषयीच्या आदरानं मन भरून आलं. राज्यसभेवर एकजात नमक कम माणसं जात असताना या बाईसाठी आम्ही आग्रह का धरत नाही असं वाटून खंतावलंदेखील.
– ज्ञानदा देशपांडे
भ्रमणध्वनी : 9320233467
dnyanada_d@yahoo.com