‘बाळंतपणाला सुईण आणि लग्नकार्याला धवलरिण’ अशी म्हण आहे. मात्र मे महिन्याभरात लग्नांचे अनेक मुहूर्त असल्यामुळे धवलरिणींची कमतरता जाणवू लागली आहे. आगरी-कोळी समाजात धवलरिणींना लग्नकार्यात महत्त्वाचे स्थान असते. लग्नाचे अनेक मुहूर्त आल्यामुळे एका धवलरिणीला दोन-तीन लग्नांच्या सुपा-या स्वीकाराव्या लागत आहेत. एक हजार रुपयांपेक्षा अधिक सुपारी देण्याची तयारी दाखवली तरीही धवलरीण मिळणे कठीण होत आहे.
आगरी-कोळी किंवा कराडी समाजाच्या लग्नसोहळ्यांत प्रत्येक गोष्ट गीतांमधून वर्णन केली जाते. हळद लावणे, चून मळणे, मांडव, तेलवण, देव बसवणे, आठवारवाना असे अनेक विधी हळदी समारंभात केले जातात. लग्नाच्या दिवशी गोवर नाव घालणे, मामा बसवणे, मौअ बसवणे (दाढी करणे), नाव पाडणे (अंघोळ घालणे) आणि आणखीही काही विधी होतात. त्यांचे महत्त्व गीतांतून कथन करण्याचे काम धवलरिणी करतात. पूर्वी समाजातील अनेक महिलांना ही गीते तोंडपाठ असत.
लग्नानंतर घालण्यात येणा-या गोंधळाबाबतही हीच स्थिती आहे. गोंधळी मिळवणे दुरापास्त झाले आहे. लग्नासाठी हॉल मिळाला नाही तरीही दारात मांडव घालून लग्न लावता येऊ शकते. केटरर मिळाला नाही तर नातेवाईक मंडळी पक्वान्न बनवू शकतात. भटजी मिळाला नाही तर मंगलाष्टकांची कॅसेट लावता येते, पण प्रत्येक विधीचे पारंपरिक ढंगात आणि अस्सल गावरान भाषेत वर्णन करणा-या धवलरिणी आणायच्या कुठून हा प्रश्न सध्या वधुवरांच्या नातेवाईकांना पडत आहे.
(‘प्रहार’मधील बातमीवरुन)
About Post Author
दिनकर गांगल हे ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ या वेबपोर्टलचे मुख्य संपादक आहेत. ते मूलतः पत्रकार आहेत. त्यांनी पुण्यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्यांनी आकारलेली ‘म.टा.’ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्यांना ‘फीचर रायटिंग’ या संबंधात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय (थॉम्सन फाउंडेशन) पाठ्यवृत्ती मिळाली आहे. त्याआधारे त्यांनी देश विदेशात प्रवास केला.
गांगल यांनी अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर, अशोक दातार यांच्यासारख्या व्यक्तींच्या साथीने ‘ग्रंथाली’ची स्थापना केली. ती पुढे महाराष्ट्रातील वाचक चळवळ म्हणून फोफावली. त्यातून अनेक मोठे लेखक घडले. गांगल यांनी ‘ग्रंथाली’च्या ‘रुची’ मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. सोबत ‘ग्रंथाली’ची चारशे पुस्तके त्यांनी संपादित केली. त्यांनी संपादित केलेल्या मासिके-साप्ताहिके यांमध्ये ‘एस.टी. समाचार’चा आवर्जून उल्लेख करावा लागेल. गांगल ‘ग्रंथाली’प्रमाणे ‘प्रभात चित्र मंडळा’चे संस्थापक सदस्य आहेत.
साहित्य, संस्कृती, समाज आणि माध्यमे हे त्यांचे आवडीचे विषय आहेत. त्यांनी त्यासंबंधात लेखन केले आहे. त्यांची ‘माया माध्यमांची’, ‘कॅन्सर डायरी’ (लेखन-संपादन), ‘शोध मराठीपणाचा’ (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन) आणि ‘स्क्रीन इज द वर्ल्ड’ अशी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्यांना महाराष्ट्र सरकारचा ‘सर्वोत्कृष्ट वाङ्मयनिर्मिती’चा पुरस्कार, ‘मुंबई मराठी साहित्य संघ’ व ‘मराठा साहित्य परिषद’ यांचे संपादनाचे पुरस्कार वाङ्मय क्षेत्रातील एकूण कामगिरीबद्दल ‘यशवंतराव चव्हाण’ पुरस्कार लाभले आहेत.