महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत तरोटा/टाकळा (casia tora) या वनस्पतीने धुमाकूळ घातला आहे. ती वनस्पती एक प्रकारचे तण (weed) आहे. ती स्थानिकच आहे. ती मध्य भारतात प्रामुख्याने आढळते. ती भाजी टायकळा किंवा टाकळा या नावाने महाराष्ट्राच्या काही भागांत खासकरून कोकणात ओळखली जाते. ती भाजी साधारण एक ते दोन फुटांपर्यंत उंच वाढते. त्याला पिवळसर रंगांची फुले येतात. पाने द्विलिंगी (उभयलिंगी पुष्प) – (एकलिंगी पुष्पात फक्त एक प्रकारचेच प्रजनन अंग असते. त्यामध्ये पुंकेसर किंवा अंडप असते. जर केवळ पुंकेसर असेल तर ते फूल नर म्हणून ओळखले जाईल, तर फक्त अंडपचे (carpel) अस्तित्व असेल तर ते फूल मादी होय. परंतु, द्विलिंगी म्हणजेच उभयलिंगी पुष्पात नर आणि मादी अशा दोन्ही प्रकारच्या प्रजननाचे अंग असते. त्या पुष्पामध्ये पुंकेसर आणि कारपेल अशा दोन्ही प्रकारच्या प्रजननाचे अस्तित्व असते.) ती फुले रात्रीच्या वेळी मिटतात. पाने लांबट- गोल किंवा अंडाकृती-आयताकृती आकाराची असतात. टाकळ्याला काळसर किंवा करड्या रंगाच्या शेंगा असून त्यांचे टोक आडवे कापल्यासारखे असते. मात्र, ते कठीण आवरणाचे असते. वनस्पतीचा वास उग्र असतो.
तिचे दोन प्रकार फोफावताना दिसून येत आहेत. एक – मोठी लांब शेंग असलेला casia tora आणि दोन- लहान शेंग असलेला casia uniflora. ‘कॅसिया टोरा’च्या शेंड्यावर लांब शेंगा असतात आणि ‘कॅसिया युनिफ्लोरा’च्या फांद्यांवर लहान तीन-चार शेंगांचा गुच्छ असतो. लांब शेंगांचे दाणे मेथीच्या दाण्याच्या आकाराचे असतात. छोट्या शेंगांत दाणे लहान असतात. मोठ्या शेंगा मुगाच्या शेंगांप्रमाणे काढून, वाळवून, ठोकून दाणे काढता येतात. लहान प्रकारात फांद्या कापून, वाळवून व नंतर मळणी करून दाणे वेगळे करता येतात. दोन्ही वनस्पतींचे उपयोग अनेक आहेत.
लांब शेंग असलेली कॅशिया टोरा ही वनस्पती कोवळ्या अवस्थेत असताना रानभाजी म्हणून वापरली जाते. तिचे काही औषधी गुणधर्म आहेत. तसे उपयोग आयुर्वेदात सांगितले गेले आहेत. आदिवासी लोक काही भागांत त्या बियांपासून पावडर बनवून त्याचा कॉफी पेय म्हणून वापर करतात. लहान शेंग असलेल्या कॅशिया टोरा वनस्पतीचा उपयोग खळ(adhesive/ gum) म्हणून केला जातो.
मात्र सध्या त्या वनस्पतीचा प्रसार मोठ्या प्रमाणात झाला असून, त्यामुळे जैवविविधता धोक्यात आली आहे. त्या वनस्पतीचा विशेषतः खाद्य गवताच्या उपलब्धतेवर मोठा परिणाम झाला आहे. एकेकाळी गाजर गवताने (काँग्रेस) जो धुमाकूळ घातला होता, त्यापेक्षाही अधिक प्रमाणात तरोटा पसरला आहे (खेड्यातील लोक गमतीने त्याला बीजेपी गवत म्हणू लागले आहेत!). तरोटा रस्त्यांच्या कडेने मोकळ्या जागांवर, शेतांच्या बांधांवर, शेतांमध्ये आढळून येतो. इतकेच काय त्याचा वनक्षेत्रात, विशेषतः कुरणक्षेत्रातही अनेक ठिकाणी प्रसार होताना दिसत आहे. अति-चराईने उद्ध्वस्त झालेली गवताळ माळराने ही परिसंस्था ( grassland ecosystem) धोक्यात आली आहे. तरोट्याच्या अनिर्बंध वाढीमुळे चाराटंचाई तीव्र झाली आहे. पशुधनाला तरोट्याच्या गर्दीतून चारा शोधावा लागतो. त्यापूर्वी गाजर गवत, रान तुळस, घाणेरी इत्यादी अखाद्य वनस्पती, त्याचबरोबर अनिर्बंध वाढणारी वेडीबाभूळ (prosopis) यांनी स्थानिक खाद्य गवतांवर अतिक्रमण करून त्यांची उपलब्धता कमी केली आहे.
महाराष्ट्र तीव्र चाराटंचाईला गेली काही वर्षें सामोरा जात आहे. त्याची तीव्रता यावर्षी अधिक जाणवेल, कारण खरीप हंगामातील पिकांच्या अवशेषातून उपलब्ध होणारा चारा ऑक्टोबर व नोव्हेंबर या दोन महिन्यांमधील अवकाळी पावसाने खराब झाला आहे. चाऱ्याचा पुरवठा करणारा सर्वात मोठा स्रोत तो असतो. धुळे जिल्ह्यातील लळिंग कुरणात तरोट्याने निम्म्याहून अधिक क्षेत्र (दोन हजार हेक्टर) व्यापले आहे. राज्यातही अनेक ठिकाणी कुरणे अतिचराईने उद्ध्वस्त झाली आहेत. संरक्षित वनक्षेत्रातही अशा अनेक वनस्पतींची अनिर्बंध वाढ होत असून गवताळ क्षेत्रांची जैवविविधता धोक्यात आहे. त्यावर अवलंबून असणाऱ्या अनेक प्राण्यांचा अधिवास धोक्यात आला आहे.
तरोट्याची वाढ चांगल्या पावसामुळे प्रचंड झाली असून, आता तिला शेंगा आलेल्या असून, त्या परिपक्व झाल्या आहेत. त्यांचे बी आता तयार होत असून तेही पडू लागले आहे. तरोट्याच्या बियांना गुजरात, राजस्थान इत्यादी ठिकाणी बाजारपेठ उपलब्ध आहे. ते गुजरातमधील दाहोद येथे बाजार समितीत खरेदी केली जाते. त्याची बाजारपेठ बडोदा येथेसुद्धा उपलब्ध आहे. त्याची तेथे साधारण दहा रुपये लहान दाणे तर सतरा रुपये मोठे दाणे प्रती किलोने खरेदी होते. जर ‘एक्स्पोर्ट’ सुरू झाला तर भाव वाढून मिळू शकतो.
स्थानिक पातळीवर लहान व्यापाऱ्यांनी ठरवले, तर बियांचे संकलन करता येईल. त्यातून स्थानिक मजुरांना रोजगार मिळेल. व्यापाऱ्यांना नफा कमावता येईल. वनस्पतीच्या वाढीवर नियंत्रण होऊ शकेल. चांगल्या, दाट वाढलेल्या क्षेत्रातून संकलन केले, तर मजुरांना रोजचे दोनशे ते तीनशे रूपये मिळू शकतील. आम्ही धुळे जिल्ह्यात तसा प्रयत्न सुरू करत आहोत.
तरोटा वाढीवर नियंत्रण ठेवण्याचे काही उपाय – 1. शेंगा लागण्यापूर्वीच फांद्या कापून त्यांचे कम्पोस्टिंग करणे, त्यातून चांगले खत होऊन शेतीचा सेंद्रीय कर्ब वाढवता येईल. 2. फांद्या कापून त्यांचे बी वेगळे केल्यानंतर कोरड्या फांद्यांचे लहान तुकडे किंवा भुकटीचे ब्रिकेटिंग (विटा) करून त्यांचा इंधन म्हणून वापर करणे. थ्रेशरचा वापर केला तर बी आणि ब्रिकेटिंगसाठी लागणारी भुकटी, दोन्ही कमी खर्चात उपलब्ध होऊ शकतात. शासकीय पातळीवर त्याला रोजगार हमी योजनेतून किंवा काही विशेष योजना/मोहीम राबवून नियंत्रणासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. त्यात इतरही अनिर्बंध फोफावणाऱ्या स्थानिक व विदेशी वनस्पतींचे निर्मूलन अंतर्भूत करता येईल. शासनाचे याकडे लक्ष वेधण्यासाठी प्रयत्न आवश्यक आहेत.
गुजरातमधील तरोटा व्यापाऱ्यांचे काही संपर्क – गोपालभाई (दाहोद) – 09426047635, राजुभाई -094266250318, प्रकाश भाई- 07802819001/09377245860.
– डॉ. धनंजय विष्णू नेवाडकर 9372810391
dnewadkar@rediffmail.com
अतिशय उपयुक्त माहिती…
अतिशय उपयुक्त माहिती. महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना हायस्कूलमध्ये ही माहिती देण्यात यावी व स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून तरोटा निर्मुलन व बी-संकलन दोन्ही गोष्टी एकाच वेळी साध्य होतील.धन्यवाद.
Comments are closed.