सच्चे मानवतावादी मानवटकर डॉक्टर दांपत्य

-heading

चंद्रपुरातील माधुरी मानवटकर आणि प्रकाश मानवटकर हे डॉक्टर दांपत्य ध्येयवेडे आहे. डॉ. माधुरी स्तनाच्या कर्करोगावर जागरूकता निर्माण व्हावी म्हणून त्याच विषयावर नियमितपणे व्याख्याने, सेमिनार आयोजित करतात. त्यांना त्या कामासाठी ‘लोकमत सखी मंच’च्या वतीने ‘सखी गौरव पुरस्कार’ देण्यात आला आहे आणि ‘सकाळ’ वर्तमानपत्रानेही त्यांचा सत्कार केला आहे. पती डॉ. प्रकाश यांची साथ त्यांना त्या सर्व उपक्रमात आहे. त्याशिवाय दोघांची तळमळ गरीब आणि वृद्ध रुग्णांसाठी काही करावे अशी असते. डॉ. माधुरी वरोरा तालुक्यातील शेगाव बुद्रुक या खेडेगावातून आलेल्या आहेत. त्यांचे शिक्षण लहानशा खेड्यात झाले. वडील प्राथमिक शिक्षक शाळेत होते. आई घरकाम व शेतीकाम करत असे. पाच भाऊ व तीन बहिणी अशा कुटुंबातून शिक्षणाला महत्त्व देणारे बाबा, पण शेतातील आणि घरातील सर्व कामांत मुलांना सहभागी करून घेणारी आई. त्यामुळे माधुरीचा शाळेतील वेळ सोडला तर सगळा वेळ शेतात काम करण्यात जाई. त्यामुळे घरातील व शाळेतील, दोन्ही संस्कार त्यांच्यावर झाले. गावाबाहेर गोड पाण्याची एकच विहीर होती. गावातील साऱ्या विहिरी खाऱ्या पाण्याच्या. मुलींना पिण्याचे पाणी दूरवरून आणावे लागे. मुली अनेक चकरा नकोत म्हणून पाणी तीन-चार गुंड (मडकी) एकावर एक ठेवून आणत. मुले त्या त्रासातून सुटत! माधुरीला दहावीच्या वर्गात आहे म्हणून कामातून सूट मिळाली नाही. मात्र तरीही तिचे प्रत्येक वर्गात प्रथम क्रमांकाने पास होणे असे. 

माधुरीला ती बारावी सायन्सला उत्तम रीत्या उत्तीर्ण झाल्यानंतर मेडिकल वा इंजिनीयरिंग अशा दोन्ही शाखांत जाण्यासाठी मार्ग खुले झाले होते, पण इंजिनीयरिंगला असणाऱ्या मोठ्या भावाने माधुरीला वैद्यकीय क्षेत्र निवडण्यास सुचवले. कारण तिला त्या क्षेत्रात समाजकार्य करण्यास अधिक वाव मिळेल! गावातील जुन्या, बुरसट विचारांच्या लोकांनी पेटकरगुरुजींना (म्हणजेच माधुरीचे वडील) सांगून बघितले, की ‘मुलीला शिकवून काय फायदा’, ‘खर्च करा शिक्षणावर आणि मुलगी जाणार दुसऱ्याच्या घरी’ वगैरे; पण पेटकरगुरुजी शिक्षक असल्याने सुधारणावादी होते. माधुरीसाठीपण तिचे बाबा हेच तिचे प्रेरणास्थान होते. माधुरीला जी एम कॉलेज (नागपूर) येथे प्रवेश मिळाला. ती परिश्रम आणि अभ्यास यांच्या जोरावर एमबीबीएस झाली. तिच्यासाठी त्या शिक्षणाच्या काळात सण, कौटुंबिक समारंभ सर्व सर्व बंद होते. डॉ. माधुरी हिने एम एस (जनरल सर्जन), एम एस (ई एन टी) आणि डिप्लोमा इन लॅप्रोस्कोपी अशी त्रिविध तज्ज्ञता मिळवली आहे.

हे ही लेख वाचा-
एक ‘हिंमत’राव डॉक्टर
निर-अहंकारी!

तिने सरकारी नोकरी प्रथम घेतली, पण तेथील अनुभव बिकट होता. तिला सरकारी रुग्णालयात रुग्णांना होणाऱ्या त्रासाचे फार वाईट वाटे. तेव्हा तिने खाजगी प्रॅक्टिस करावी असे ठरवले. रुग्णाला वाजवी दरात सुलभ उपचार मिळावेत ह्या हेतूने खाजगी हॉस्पिटल काढणे हे काम कठीण होते. पण माधुरीची जिद्द मोठी होती. तिने भाजलेल्या रुग्णांवर विशेष शस्त्रक्रिया केल्या. डॉ. माधुरी ही लॅप्रोस्कोपी शस्त्रक्रिया करणारी चंद्रपुरातील पहिली डॉक्टर ठरली. तिने भाड्याच्या जागेत 2001 ला प्रॅक्टिस सुरू केली. तिने रुग्णाला वैद्यकीय सेवेसाठी नागपूरला वा मुंबईला जावे लागू नये ह्या दृष्टीने एकाच छताखाली साऱ्या सेवा आणल्या – स्वतःचे आंतरराष्ट्रीय दर्ज्याचे हॉस्पिटल 2008 मध्ये बांधले. तेथे ज्या रुग्णाजवळ एक पैसा नाही तशाही रुग्णाला उपचार दिले जाऊ लागले. 

-seminar

डॉ. प्रकाश व डॉ. माधुरी यांची ओळख एम एस शिकत असताना झाली. ते दोघे एकाच ऑपरेशन थिएटरमध्ये काम करत असताना एकमेकांचे स्वभाव जुळले, दोघांनी लग्न करण्याचे ठरवले. डॉ. माधुरी यांच्याप्रमाणेच डॉ. प्रकाशही लहानशा खेड्यात जन्मले. त्यांनाही कष्टाची सवय. त्यांनी एखादे काम करण्याचे ठरवले, की ते स्वतःला त्यात झोकून देतात. ते त्यांच्या बिनचूक व निर्दोष काम करण्याच्या सवयीमुळे प्रसिद्ध झाले. त्यांनीही जी एम सी कॉलेजमधून (नागपूर) एम डी डी ए (अॅनेस्थेशिया) केले व त्यात असाधारण प्रावीण्य मिळवले. त्यांना अत्यंत गंभीर रीत्या काळजी घेण्याची गरज असलेल्या रुग्णांवर (क्रिटिकल केअर केसेस) उपचार करण्यामध्ये पारंगत आहेत. प्रकाश वृद्धांसाठी त्यांच्या व्यवसायाबाहेर जाऊन जे ‘उपद्वयाप’ करतात ते माधुरीलासुद्धा पसंत असतात. तिचाही तोच स्वभाव आहे. त्यामुळे दोघांनाही आनंद होतो. माधुरी म्हणते, की डॉ. प्रकाश हे परिपक्व आणि संवेदनशील व्यक्ती आहेत. ते नेहमीच शांत, कधी कोणाला न दुखावणारे असे आहेत. ते कर्मचाऱ्यांशी समानतेने वागतात; चटकन निर्णय घेऊ शकतात. त्यांनी चंद्रपूरसारख्या दूरच्या प्रदेशात अद्ययावत, आंतरराष्ट्रीय दर्ज्याची उपकरणे बसवली. मात्र त्यांच्याकरता पैसा महत्त्वाचा नसून रुग्णाचे समाधान हे महत्त्वाचे आहे. खरे तर, तेच रुग्णसेवेचे सार असे मानणारे ते डॉक्टर दाम्पत्य आहे. त्यांचा लोकमत वृत्तपत्र समूहाने ‘विदर्भ प्रोफेशनल आयडॉल’ म्हणून सत्कार केला आहे.

‘मानवटकर हॉस्पिटल’ चंद्रपूरच्या मध्यवर्ती आहे. तेथे शंभर बेडची सोय आहे. विविध सेवा जसे – चार मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, आय  सी यू मधील प्रत्येक बेडसाठी अद्ययावत उपकरणे, आंतरराष्ट्रीय दर्ज्याचे डायलिसिस केंद्र – तेथे उपलब्ध आहेत. त्या दाम्पत्याची एकुलती एक मुलगी स्पंदन हिने इंग्लंडमध्ये बीए (इंग्लिश लिटरेचर) केले आहे. ती बर्मिंगहॅम विद्यापीठात होती. तिला कायद्याची पदवी तेथूनच मिळवायची आहे. समाजाचे उत्थान आणि कल्याण हेच स्वतःच्या जीवनाचे ध्येय मानणाऱ्या व्यक्तींना आजच्या आत्मकेंद्रित जगात सर्वसाधारण जीवन जगता येत नाही. कारण त्यांना त्यांचा उद्देश आणि कृती माहीत असूनही सामाजिक चौकट सहजासहजी स्वीकारता येत नाही. ते निष्ठेने आणि निर्धाराने कार्यरत राहून त्यांचे इच्छित ध्येय यशस्वीपणे तडीस नेतात. तेच त्यांच्या जीवनाचे वास्तव असते. अनेकजण ज्या व्यक्ती वेगळा मार्ग पत्करतात, तशांना वेड्यात काढत असतात. मानवटकर डॉक्टर दांपत्य हे तसे ‘वेडे’ आहे.

– श्रीकांत पेटकर 9769213913
shrikantpetkar@yahoo.com

About Post Author

Previous articleमेकपची जादू- पंढरीदादा जुकर
Next articleगणित इंग्रजीतून शिकणे, शिकवणे थांबवा
श्रीकांत बापुराव पेटकर हे प्रकाशगंगा महापारेषण मुख्यालय मुंबई (MSEB) येथे कार्यकारी अभियंता पदावर कार्यरत आहेत. पेटकर यांच्या प्रयत्नांमुळे पडघे (तालुका भिवंडी) या वीज केंद्रास सलग तीन वर्षे उत्कृष्ट वीज केंद्राचा पुरस्कार मिळाला. त्यांना लेखनाची आवड असून त्यांची ‘आणि मी बौद्ध झालो‘ या अनुवादित पुस्तकासोबत कल्याण, शांबरीक खरोलिका, चांगुलपणा अवतीभोवती, बेहोशीतच जगणं असतं, गजल अशी दहा पुस्तके प्रकाशित झाली आहेत. पेटकर यांनी चित्रकलेचा छंद जोपासला असून त्यांच्या चित्रांची दोन प्रदर्शने भरली होती. त्यांना ‘कल्याण रत्न’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

2 COMMENTS

  1. Salute to honorable couple…
    Salute to honorable couple who dedicated their educational skills for person who cannot afford costly treatment .
    God bless them and should provide energy to continue their work.

  2. प्रेरणादायी लेख
    प्रेरणादायी लेख

Comments are closed.