खडकाळ पठारे – जैव भांडारे अपर्णा वाटवे यांचा अभ्यास

0
91
-heading

अल्पजीवी, भक्कम खोड नसलेल्या वनस्पती आणि खडकांच्या भेगेत, फटीत, जमिनीतील खोलगटीत दडलेले साप, बेडूक, सरडे, वटवाघळे हे कीटक, प्राणी… तेसुद्धा निसर्गाचा भाग आहेत, त्यांना त्यांची जीवनप्रणाली आहे आणि त्यांचे ते छोटेखानी जीवनदेखील या विशाल जीवसृष्टीचे चक्र चालू राहण्यासाठी महत्त्वाचे आहे. पुण्याच्या निसर्गप्रेमी अपर्णा वाटवे यांनी या निसर्गजीवनाकडे व त्यातून उद्भवणाऱ्या प्रश्नांकडे पर्यावरणप्रेमींचे लक्ष वेधले.त्या महत्त्वाच्या निसर्ग घटकाकडे अपर्णा वाटवे यांनी त्यांची मांडणी करेपर्यंत सर्वसाधारण माणसांचे दुर्लक्ष झाले होते. त्यामुळे जमिनीचे तसे भाग निर्जीव, उजाड, वैराण ठरत! त्यामुळेच, भौतिक विकासाच्या योजनांसाठी त्या पठारी भागांचा पडिक जमीन म्हणून विचार व वापरही होतो. उदाहरणार्थ, जैतापूरच्या पठारावरील नियोजित अणुऊर्जा प्रकल्प. सडे, खडकाळ पठारे म्हणजे निरुपयोगी जागा समजून तेथे खाणकामाला परवानगी दिली जाते. पठारांवर बाहेरून माती टाकून आंब्याची झाडे लावली जातात. साताऱ्याच्या चाळकेवाडीला पवनचक्क्या उभ्या राहिल्या आहेत. तशी पठारे महाराष्ट्रात पुणे, नाशिक, गोवा, कोल्हापूर, सांगली भागांत आढळतात; तसाच खडकाळ भूभाग कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत समुद्रकाठी आहे. ‘खडकाळ पठारे आणि सडे’ ही स्वतंत्र, स्वायत्त अशी निसर्गप्रणाली आहे आणि जैवविविधतेमध्ये अन्य प्रणालींचे जसे महत्त्व आहे; तसेच, त्याही प्रणालीचे महत्त्व आहे हे अपर्णा वाटवे यांनी ठासून सांगितले. अन्य जीवनप्रणाली कोणत्या? तर समुद्र, नदी, पर्वत, जंगल, जलयुक्त भूमी (wet lands), वाळवंटी प्रदेश… त्यांचा विचार- त्यासंबंधी उपाय असे काही ऐकले-वाचले जाते, परंतु पठारे व सडे या प्रणालीच्या संवर्धनासाठी काहीच होत नव्हते; किंबहुना त्या प्रणालीची तशी वेगळी नोंदही सरकार दफ्तरी नव्हती. पठारे, सडे यांची संभावना निसर्गातील निरुपयोगी, वाया गेलेला भूभाग अशी होत असे!

खडकाळ पठारी भागाला ‘सडा’ पश्चिम घाटात किंवा सह्याद्रीमध्ये म्हणतात. पाचगणीचे सडे म्हणजे तेथील टेबललँड. गोव्याच्या रस्त्यावर कॅसलरॉक, अनमोडचा घाट, तिलारी घाट, कोल्हापूरजवळ मसाई पठार, आंबाघाट, बरकीचे पठार, पुरंदरचे पठार, जुन्नर भागातील किल्ल्यांचा परिसर, कराडजवळील वाल्मिकीचे पठार असे कितीतरी भाग लागतात. त्या सर्व ठिकाणी लोकांनी तेथे फिरत असताना, पावसाळा सोडून अन्य वेळी तपकिरी शुष्क कोरडे खडक आणि सडे, पाहिलेले असतात. खडकाळ दगडांचा तो पसारा उघडा असतो. त्यावर मातीचा थर अल्प म्हणजे काही मिलिमीटर ते तीस सेंटिमीटर इतका असू शकतो. झाडी त्यावर तगून कायमस्वरूपी राहत नाही. एखादे चिवट झुडूप फटीमधून जगतेही, पण फार तर मीटरभर वाढते. काही वेळा, माती खडकांच्या फटींतून, घळींतून, खड्यांीटतून साठते. ती माती बारीक वाळूसारखी असते, अॅकसिडिक असते. उन्हाळ्यात तापमान जास्त, आर्र्ाता कमी; तर पावसाळ्यात जुलै ते सप्टेंबर भरपूर पाऊस असतो. त्या काळात तेथे पाण्याची डबकी, तळी साठतात, जलमय भूमी निर्माण होते. विविध वनस्पती तेथे फुलतात, बहरतात. त्यांचे आयुष्य पावसाळ्यापुरते मर्यादित असते. जादूगाराच्या पोतडीतून बाहेर पडाव्या तशाच भासतात त्या! वनस्पती फटीतून वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहातही फुलतात. शुष्क, तपकिरी, निर्जीव वाटणारे सडे -caption1किंवा खडकाळ भूमी विविध आकार, प्रकार, रंग, रूप, रस, गंध असलेल्या फुलांनी, यक्षपुष्पांनी ओसंडून जातात, भरभरून फुलतात. ठरावीक कालक्रमाने वेगवेगळ्या वनस्पतींचे प्रकार एकापाठोपाठ एक फुलतात. कीटक, भुंगे, मधमाशा, पक्षी यांची लगबग सड्यांवर सुरू होते. उन्हाळ्यातील तप्त, शुष्क सड्याचे रूपांतर पावसाळ्यात रंगीबेरंगी वनस्पतींच्या यक्षभूमीत होते!

अपर्णा वाटवे यांनी पुणे विद्यापीठातून वनस्पतिशास्त्र विषयात एम एस्सी, पीएच डी केल्यानंतर दुर्लक्षित अशा विषयाचा- महाराष्ट्रातील ‘खडकाळ पठारे आणि सडे’ यांचा – अभ्यास केला आहे. त्यांना 2003 मध्ये केंद्र सरकारच्या ‘डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी’ची ‘यंग सायंटिस्ट’साठी असलेली विशेष शिष्यवृत्ती मिळाली. अपर्णा यांनी महाराष्ट्रातील तशा बारा भूभागांचा- खडकाळ पठारे व सडे यांचा – तेथील सजीव सृष्टीचा अभ्यास केला, त्यांतील काहींचा तर दिवसाच्या सर्व प्रहरी आणि वर्षाच्या ऋतुचक्रामध्ये केला.

त्यातून त्यांच्या लक्षात त्या प्रणालींचे संरक्षण आणि संवर्धन होण्याची गरज व निकड आली. ती तशा प्रकारची जगातील एकमेव प्रणाली असल्याने ती वाचणे, तिचे अधिवास वाचणे जागतिक दृष्टीनेही महत्त्वाचे होते. त्या सड्यांवर स्थळविशिष्ट वनस्पतींची संख्या बरीच आहे. त्या वनस्पतींत विविधता आहे; कीटक, प्राणी यांचीही संख्या मुबलक आहे. पाणी अल्पकाळ असले तरी त्यात मासे असतात, सरिसृप, वटवाघळे आणि पक्षी यांचेही वेगवेगळे प्रकार असतात. गौ रेडे आणि बिबटे यांचाही वावर तेथे असतो. स्थानिक लोकांची गुरेढोरे तेथे चरतात. धनगरांचे देव, मंदिरे त्या पठारावर असतात. त्यांचे सण त्या पठारावर साजरे होतात. अपर्णा यांनी २००२ पासून दहा वर्षें उत्तर-पश्चिम घाटातील एकोणीस खडकाळ पठारांचा आणि कोकणातील एकोणीस सड्यांचा अभ्यास केला आहे. त्यांनी त्याबद्दल शोधनिबंध लिहून पर्यावरणवाद्यांचे लक्ष त्याकडे वळवले आहे. तो विषय परिषदांमधून उपस्थित केला आहे. त्या त्याचे संवर्धन परिणामकारक रीत्या व्हायला हवे, हे जाणून संशोधकाच्या भूमिकेतून संवर्धकाच्या भूमिकेत गेल्या. त्यासाठी सक्रिय झाल्या.

-diary

अपर्णा वाटवे पुण्याच्या एमआयटी कॉलेजात असोसिएटेड प्रोफेसर म्हणून काम करतात. त्यांचा विभाग ‘इकोलॉजी, सोसायटी अँड सस्टेनेबल डेव्हलपमेंट’ (पर्यावरण, समाज व शाश्वत विकास) असा, त्यांच्या अभिरूचीला धरून असलेलाच आहे. तो विभाग नव्यानेच निर्माण झालेला आहे. खरे तर, अपर्णा यांचे त्या विषयातील शिक्षण-प्रशिक्षणाचे काम आधीपासून अनौपचारिक रीत्या चालूच होते. त्यानिमित्ताने, त्यांचा पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या तरुणांशी व त्यांच्या गटांशी संबंध होता. त्या म्हणाल्या, की त्यामधून त्या विद्यार्थ्यांसाठी उद्योग व प्रशिक्षण अशा दोन्ही गोष्टी एका अर्थाने साधत असत. त्यांतील काही तरुणांनी संस्थादेखील निर्माण केल्या. अपर्णा यांनी त्या दृष्टीने ‘मलबार नेचर काँझर्वेशन क्लब’ व त्याच्या कार्यकर्त्या सायली पाळंदे यांचा उल्लेख केला.

अपर्णा यांची स्वत:ची ‘बायोम काँझर्वेशन फाउंडेशन’ नावाची संस्था आहे. पर्यावरण शिक्षण-प्रशिक्षण हाच त्या संस्थेचा प्रमुख उद्देश आहे. अपर्णा राष्ट्रीय पातळीवर ‘ए ट्री’ या बंगलोरच्या संस्थेशी 2011-12 सालापासून जोडल्या गेलेल्या आहेत. ‘ए ट्री’ने त्यावेळी ‘क्रिटिकल एकोसिस्टिम पार्टनरशिप फंड’ यांच्या मदतीने सह्याद्रीतील पर्यावरणावर लघुपट बनवला. त्यामध्ये अपर्णा वाटवे यांनी सडे व पठारे या विषयासंबंधीची त्यांची मांडणी सोदाहरण केली आहे.

अपर्णा वाटवे ह्या महाबळेश्वर आणि पाचगणीच्या संवेदनशील निसर्गाच्या संवर्धनासाठी पर्यावरण आणि वन खात्याच्या उच्चस्तरीय अभ्यास समितीच्या सदस्य आहेत. पाचगणीच्या टेबललँडवरही पावसाळ्यात फुलांचा उत्सव साजरा होतो. तेथे पर्यटकांसाठी घोडागाड्या फिरत. ते दुर्मीळ वनस्पतींना घातक होते. अपर्णा यांना त्यासाठी न्यायालयात साक्ष द्यावी लागली होती; अपर्णा आणि इतर यांना पाचगणीचे पठार वाचवण्यात यश आले आहे. त्यांच्या प्रयत्नांनी अंजनेरीचे परिसर पठार आणि माथा यांच्या संवर्धन कामातही यश आले. अंजनेरी हा भाग हनुमानाची मातृभूमी मानला जातो. तो नाशिक – त्र्यंबकेश्वर पट्ट्यात येतो.

कास पठाराला जागतिक निसर्ग वारसास्थळाचा दर्जा मिळाल्यामुळे आता कासच्या बाबतीत लोकांमध्ये पुष्कळ जागरूकता आली आहे. तो भाग राखीव म्हणूनही जाहीर झाला आहे. तेथे संवर्धनासाठी उपाय योजले जाऊ लागले आहेत. काही स्वयंसेवी संस्था स्वत:हून नैसर्गिक प्रणालींच्या संवर्धनाच्या कामात पुढाकार घेत आहेत. आंबोलीचे स्थानिक तरुण एकत्र येऊन जवळच्या चौकुलच्या सड्यांचे संवर्धन करत आहेत. अपर्णा यांना केवळ कायद्याने परिस्थितीमध्ये बदल होणार नाही, लोकसहभागाशिवाय संवर्धन अशक्य आहे, त्यासाठी लोकांचा दृष्टिकोन बदलला पाहिजे असे वाटते.

त्या महाराष्ट्र राज्याच्या जैवविविधता बोर्डाच्या वनस्पतितज्ज्ञ समितीच्या सदस्य २०१७ पासून आहेत. अपर्णा तुळजापूर येथील ‘टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस’मध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम चार वर्षें करत होत्या. त्यांचा सहभाग आंतरराष्ट्रीय परिषदा आणि संमेलने यांत असतो. त्यांचे पती संजय ठाकूर हेही निसर्ग आणि पर्यावरण क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. पक्षी आणि प्राणी हा त्यांचा अभ्यासविषय आहे. त्यांची साथ आणि सोबत अपर्णा यांना सडे आणि खडकाळ पठारे यांच्या अभ्यासभ्रमंतीमध्ये लाभली. त्यामुळे ते त्यांचे जीवन साथीदार बनले. त्या दोघांचे मिळून प्राणी जीवनावरील शोधनिबंध विज्ञानपत्रिकांत प्रसिद्ध झाले -caption 2आहेत. अपर्णा पुण्यात त्यांच्या मूळ ठिकाणी मुलाच्या शिक्षणासाठी परतल्या आहेत. मुलगा दहा वर्षांचा आहे. सध्या त्या ‘सेंटर फॉर वाइल्ड लाइफ स्टडीज’बरोबर एका प्रोजेक्टवर काम करतात. त्यांनी ज्ञानाचा मोठा पल्ला एका वेगळ्या क्षेत्रात गाठला आहे आणि त्यांची मुद्रा तत्संबंधी संशोधन क्षेत्रात जाणकार म्हणून परिचित आहे.

अपर्णा वाटवे – aparnawatve1@gmail.com (020) 25430309, 9822597288

– मूळ लेखन उष:प्रभा पागे ushaprabhapage@gmail.com
(लेखाचा विकास- ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’समूह)

About Post Author