जगात जे मिळत नाही, ते तुळशीबागेत मिळते! किंबहुना ‘पुणे तेथे काय उणे!’ या वाक्याचा संदर्भही तुळशीबागेला अनुसरून आहे. तुळशीबागेशिवाय पुणे अपुरे आहे.
एकेकाळी हिंदुस्तानचे राजकारण हे पुणे शहरातून चालवले जात असे! पेशव्यांनी शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्याचे साम्राज्य केले. मराठी सेना अटकेपार पेशव्यांच्या कारकिर्दीत पोचल्या, भगवा लाल किल्ल्यावर तेरा वर्षें फडकत राहिला तो पेशवाईच्या काळात! पेशव्यांचे वास्तव्य पुण्यात होते. त्यामुळे पुणे शहराला भारतात व विशेषत: महाराष्ट्रात अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले. तुळशीबाग ही पेशव्यांनीच वसवली! आणि त्याला कारणीभूत झाले ते नारो आप्पाजी खिरे तथा तुळशीबागवाले! नारो आप्पाजी हे पेशव्यांचे बुद्धिमान आणि चतुरस्त्र कारभारी होते. पुणे शहरात अन्य देवतांची मंदिरे होती, पण त्यात राममंदिर नव्हते. नारो आप्पाजींनी पुण्यात एकतरी राममंदिर असावे अशी इच्छा पेशव्यांकडे व्यक्त केली आणि पेशव्यांनी त्यास मान्यता दिली. त्याची जबाबदारी नारो आप्पाजी यांच्यावरच सोपवण्यात आली.
नारो आप्पाजी यांनी तुळशीबागेचा एक एकराचा परिसर सरदार खाजगीवाले यांच्याकडून विकत घेतला आणि राम मंदिराच्या उभारणीचे काम सुरू झाले. ते काम बरीच वर्षे चालू होते. तुळशीबागेतील राम मंदिर वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्यातही सर्वात वैशिष्ट्यपूर्ण आहे तो त्या मंदिराचा कळस! विविध देवतांची आणि संतमहंतांची चित्रे त्या कळसावर रेखाटलेली आहेत. तसेच, कळसाचे शिखर अस्सल सोन्याचे आहे.
पेशव्यांनी कात्रजचा तलाव बांधला आणि माठाच्या खापराची पाईपलाईन करून ते पाणी पुणे शहरात आणले. त्याचे उत्सर्ग पुणे शहरात जिवंत आहेत. त्यातील एक उत्सर्ग राम मंदिरातील कुंडात आहे आणि त्याला पाणी येते! त्या पाण्याची चव अतिशय चांगली आहे. पाणी पिण्यायोग्य आहे.
नारो आप्पाजी खिरे यांनी तुळशीबाग उभी केली, त्यानंतर त्यांचे खिरे हे आडनाव मागे पडले आणि त्यांना ‘तुळशीबागवाले’ या नावाने लोक ओळखू लागले. मंदिरात रामनवमीचा उत्सव खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. लोकमान्य टिळक, शिवरामपंत परांजपे अशी थोर मंडळी तेथील रामनवमी उत्सवाला उपस्थित असल्याची नोंद आहे. पुण्यात येणारा प्रत्येक ब्रिटिश अधिकारी राममंदिरात दर्शनासाठी येऊन गेलेला आहे. राममंदिराभोवती तटबंदी बांधली गेली आणि सभोवती बाजारपेठ वसली. बाजारपेठ प्रसिद्ध झाली ती पुणेकरांच्या प्रत्येक गरजेला तुळशीबाग हे एकच उत्तर तयार झाल्यावर!
आयुष्यातील वयाचा प्रत्येक टप्पा आणि त्या त्या वेळच्या गरजेला तुळशीबाग उपयोगी पडत आली आहे. डोहाळेजेवणापासून बाळंतविड्यापर्यंत आणि भातुकलीच्या खेळापासून ते प्रत्यक्ष संसारापर्यंत सर्व गरजा तुळशीबागेकडून पुरवल्या जातात! पूर्वी खेळण्यांची दुकाने फक्त तेथेच असत. भातुकलीचा संच तांबे-पितळे या धातूंपासून तयार केलेला असायचा! नंतर तो अॅल्युमिनियममध्ये मिळे. काळ बदलत गेला तशा भातुकलीच्या संचातील वस्तू बदलल्या! पूर्वी त्यात चूल असायची, आता गॅसच्या शेगड्या आणि सिलिंडर मिळतो. मायक्रोवेव्ह ओव्हन आणि इण्डक्शन कुकर भातुकलीत मिळू लागले तर आश्चर्य वाटण्यास नको.
‘मिसळ’ या पदार्थाचा जन्मही तुळशीबागेतच झाला आहे. माटेकरांचे हॉटेल 1901 ते 1910 च्या दरम्यान तेथे होते. भज्यांचा चुरा, शेवचिवडा यांच्या मिश्रणावर झणझणीत मटकीची उसळ घालून तो पदार्थ तयार केला जात असे! तो पदार्थ प्रसिद्ध झाला. एखाद्यानी ती मिसळ न चाखणे म्हणजे मोठ्या आनंदाला मुकणे अशी भावना तेव्हा पुणेकरांच्या मनात होती. पुणेकरांना आईसक्रीम हा पदार्थ चाखण्यास शिकवणारे कावरे हे तुळशीबागेतच आहेत. मे महिन्यात तुळशीबागेतील विहाराचा प्रारंभ कावरे यांच्या आईसक्रीमनेच होत असे- आंबा आणि पिस्ता हे दोनच फ्लेवर्स तेव्हा होते.
भांड्यांची तुळशीबागेत असलेली दुकाने शंभर-सव्वाशे वर्षे जुनी आहेत. आणे-पैशांत बिले देणारी ती दुकाने जीएसटीची बिले देत आहेत. देव-देवतांच्या दुर्मीळ मूर्तीही तेथील दुकानात मिळतात. इंद्र, वरुण, अग्नी या वैदिक काळातील देवतांच्याही मूर्ती तेथे मिळतात. गणपती, स्वामी समर्थ अशा लोकप्रिय दैवतांच्याही वेगवेगळ्या आकाराच्या मूर्ती तेथे उपलब्ध आहेत. आयुर्वेदिक औषधांची, कपड्यांची दुकाने तेथे आहेत. पण सौंदर्य प्रसाधनांच्या दुकानांची अक्षरश: रेलचेल आहे. मराठमोळ्या दागिन्यांपासून ते उत्तर भारतीय किंवा दक्षिण भारतीय पद्धतीचे दागिनेही तेथे मिळतात. टीव्ही सिरीयल्समधील नवीन प्रकारचा दागिना दिसला तर तो आठ दिवसांत तुळशीबागेत दाखल होतो. विविध हेअरस्टाईल्स तेथे उपलब्ध आहेत. पिकलेल्या पांढर्या केसांचे गंगावनही तुळशीबागेत मिळते.
तुळशीबागेभोवतालची गर्दी आता भयंकर वाढत चालली आहे. आता तिथून चालणेही दुरापास्त होत गेले आहे. एवढे मात्र खरे, की एकदा का तुळशीबागजवळ गेले की सौंदर्यप्रसाधने, सांसारीक गोष्टी, भाजी-फळे औषधे, प्रसाधने, स्टीलच्या, लोखंडाच्या, लाकडाच्या सर्व प्रकारच्या वस्तू, रांगोळी, कुंकू अगदी मुंडावळीसुद्धा मिळतील. किराणामाल, स्टेशनरी सामान मिळेल. काष्ठौषधी मिळतील. गर्दी सहन करायची तयारी हवी, पण सर्व वस्तू घेऊनच तृप्त मनाने, देवाच्या पाया पडून घरी परतायचे. अन् शांत व्हायचे.
तुळशीबागेभोवती सर्व प्रकारची दुकाने तर आहेतच, पण काही जण टेबलवर वाती, फुलवाती, उद् बत्ती असा आपला माल घेऊन विकायला बसतात. अशी ही तुळशीबाग तिच्या अंतर्गत सर्व प्रकारची दुकाने अन् सर्व वस्तूंच्या दुकानांनी तुळशीबाग वेढलेली अशी सर्व प्रकारची सर्व काही माल मिळणारी दुकाने पाहिली, की वाटते, कोणी कितीही, कशाही, कोणत्याही वस्तूची, कैक प्रकारची केवढीही यादी केली तरी फक्त तुळशीबागेला प्रदक्षिणा घातली तरी त्यांतील एकही वस्तू बाकी राहणार नाही.
हा ही लेख वाचा- पुणे येथील तुळशीबाग श्रीराम मंदिर
तुळशीबागेत आता जाणे जवळ जवळ अशक्यप्राय आहे. तेथे झुंबड म्हणावी अशी गर्दी सतत असते. त्यामध्ये मुख्यत: स्त्रिया व मुली असतात. इमिटेशन ज्वेलरी हे त्यांचे मोठे आकर्षण असते. पुण्यात आलेल्या सुनांना संसाराचा परिपाठ देताना ‘तुळशीबागेला भेट’ हा पहिला धडा असतो. पुण्यात येणार्या मैत्रिणीला, पुण्यातून लग्न होऊन गेलेली सासुरवाशीण, ‘तुळशीबागेत नक्की जाऊन ये गं!’ असा सल्ला आवर्जून देते. पंधरा दिवसांसाठी माहेरी आलेली पुण्यातील माहेरवाशीण, तिच्या मुक्कामात किमान दोनदा तरी तुळशीबागेला भेट देतेच! कारण तिला त्या परिसराविषयी माहेराइतका जिव्हाळा आणि ममत्व वाटतात! पुणेकरांच्या कित्येक आठवणी तुळशीबागेशी निगडित आहेत. तुळशीबाग जर पुण्यातून उणे केली तर ‘पुणे उणेच होऊन जाईल!’ कारण तुळशीबाग हा पुण्याचा आत्मा आहे.
– नरेंद्र काळे 9822819709
narendra.granthali@gmail.com
neha.0928.k@gmail.com