रणजीत देसाई यांचे नाव ऐतिहासिक लेखनात पुढे आले ते ‘स्वामी’ ह्या कादंबरीने. ती साहित्यकृती 1970 सालची. ‘श्रीमान योगी’ ही त्यांची कादंबरी ‘स्वामी’नंतर सात वर्षांनी वाचकांपुढे सादर झाली. ती कादंबरी 2019 साली पन्नास वर्षांची झाली.
देसाई यांनी ‘श्रीमान योगी’ लिहिली ती न ठरवता. देसाई यांच्या मनात माधवराव पेशवे यांच्यानंतर होते ते कर्णाचे व्यक्तीमत्त्व. त्या दृष्टीने ‘राधेय’ची टिपणेही काढून झाली होती. पण देसाई यांचे स्नेही बाळासाहेब देसाई यांनी त्यांना शिवचरित्र लिहिण्याविषयी सुचवले आणि शिवाजीराजे प्रथम रणजीत देसाई यांच्या मनात डोकावले.
कादंबरीच्या नावातूनच विषयाचा भारदस्तपणा वाचकांच्या मनाला स्पर्श करतो. शिवाजी महाराजांसारख्या अष्टपैलू, अष्टावधानी युगपुरुषाची व्यक्तिरेखा उभी करणे हे मोठे आव्हानच. कारण इतिहासकारांत शिवचरित्राबाबत जेवढे दुमत आहे तेवढे दुमत असलेले दुसरे चरित्र नाही. शिवाजीराजे यांच्या जन्मापासूनच दुमताची सुरुवात होते. त्याचा परिपाक म्हणजे दोन शिवजयंती. देसाई यांना अशा संदिग्ध वातावरणातून ललित रूपात महाराजांना साकार करायचे होते. त्यातून शिवाजीराजे यांची व्यक्तिरेखा फार मोठी आहे; तिला शेकडो पैलू आहेत. लेखन करताना एक धोका संभवतो. तो म्हणजे शिवाजी महाराज हे अनेकांचे श्रद्धास्थान आहे. जराशा शब्दाने जनतेचा रोष ओढवण्याचा धोका त्या लेखनात संभवतो. पण तशाही परिस्थितीत, रणजित देसाई यांनी मराठी ऐतिहासिक कादंबरीच्या प्रांतात महाराजांना मराठी ललित वाङ्मयात वास्तवरूपात प्रथम चित्रित करण्याचे श्रेय मिळवले आहे.
इतिहास आणि कल्पना यांचा एकत्रित परिपाक म्हणजे ऐतिहासिक ललितकृती. ती उच्च कोटीची करण्यासाठी अपार मेहनत हवी. ‘स्वामी’ ही देसार्इ यांची पहिली कादंबरी त्या कसोटीवर यशस्वी झाली. ‘श्रीमान योगी’ वाचतानाही महाराजांची जी प्रतिमा नजरेसमोर उभी राहते, त्यातून इतिहास आणि काल्पनिकता वेगळी काढता येत नाही. देसाई यांनी शिवाजीराजांबद्दलचा इतिहास, कल्पित दंतकथा, आख्यायिका या सार्यांचा वापर कादंबरी लिहिताना केला आहे. देसाई यांच्या शिवचरित्राची तयारी करताना लक्षात आले, की एवढे मोठे व्यक्तिमत्व, पण त्याच्यावर एकही अधिकृत चरित्र नाही. बाबासाहेब पुरंदरे यांचे शिवचरित्र आहे, पण त्या लेखनात भक्तिभाव अधिक आहे. तसे देसाई यांनी प्रस्तावनेत लिहिले आहे.
लेखक रणजीत देसाईंनी ‘श्रीमान योगी’ लिहिताना महाराजांच्या जीवनातील अनेक बारकावे आवर्जून वर्णिले आहेत. शिवाजी महाराजांचे बालपण, जिजामातांनी केलेले संस्कार, दादोजी कोंडदेव यांच्याकडून घेतलेले युद्धकौशल्याचे धडे, अष्टपैलू, अष्टावधानी, संपूर्ण पुरुष वाचकाच्या डोळ्यांसमोर उभा राहतो. आदर्श राज्यकर्ता, दूरदृष्टी असलेला शासक, आदर्श पुत्र, लोकहितदक्ष राजा, उत्तम लढवय्या, हे गुण शिवाजीराजांकडे होते. त्यातून चारित्र्यसंपन्न राजा तर दिसतोच, पण धर्मांध नसूनही धर्माभिमानी शिवाजीराजे पुढे येतात. शाहिस्तेखानाची फजिती, अफजलखानाचा वध, प्रतापगडावरील पराक्रम असे अनेक प्रसंग वाचताना वाचकाच्या अंगावर रोमांच उभे राहतात. शिवरायांचा 1630 ते 1680 हा जीवनक्रम हुबेहूब उभा केला आहे. ती कादंबरी वाचताना अगदी त्या काळात जाऊन वाचक त्याचाच एक भाग बनून जातो.
स्वराज्याच्या आधी देशात हिंदू राज्ये नव्हती असे नाही. त्यांपैकी काही राज्ये तर ‘साम्राज्य’ म्हणता येतील अशी होती, पण ती परदेशी इस्लामी आक्रमणात नामशेष झाली. विजयनगरचे साम्राज्य हे त्याचे उत्तम उदाहरण. पण शिवाजी महाराजांनी कल्पिले ते स्वराज्य – रयतेचे राज्य. राजांनी पुरंदरच्या तहाने धुळीला मिळालेले ते राज्य पुन्हा उभे केले. देसाई यांनी ते सगळे समर्थपणे रेखाटले आहे. लेखनाच्या तयीरीचा भाग म्हणून स्वत: देसाई यांनी प्रचंड भ्रमंती केल्याचे जाणवते. देसाई आग्रा, आशिरगड, दौलताबाद पासून शिवनेरी, चाकण, जिंजीपर्यंत फिरून आले.
देसाई यांच्या वाट्याला केवळ स्तुती आली नाही. ‘श्रीमान योगी’ प्रसिद्ध झाल्यावर किंचित टीका, नाराजीचा सुरही उमटलाच. तो होता त्यात लिहिलेल्या संवादांबद्दल. देसाई यांनी लिहिलेले संवादच ती पात्रे म्हणाली कशावरून असतील, असा प्रश्न पुढे आला. तो प्रश्न आधी ‘स्वामी’बाबतही उपस्थित झाला होताच. नंतरही तो ‘राऊ’च्या वेळी. आणखीही काही ऐतिहासिक कादंबर्यांच्या वाट्याला तो आला. तसाच तो ‘श्रीमान योगी’बद्दलही.
त्याचाच अर्थ तो प्रश्न ‘श्रीमान योगी’ला नव्हता तर तो त्या प्रकारच्या लेखनशैलीला होता.
श्रीमान योगी’ ही बखर नाही, ते चरित्र नाही, ती आहे ललित कादंबरी. त्यामुळे त्यात काल्पनिकतेचा आधार घेतलेला.
ना.स. इनामदार यांनी ‘राऊ’मध्ये, शिवाजी सावंत यांनी ‘मृत्युंजय’मध्ये आणि विश्वास पाटील यांनी ‘संभाजी’मध्ये घेतला आहेच. ‘श्रीमान योगी’कडे चरित्रात्मक कादंबरी म्हणूनच बघायला हवे आणि त्या कसोटीवरच तिचे यश पन्नास वर्षें टिकून आहे. शिवाजीमहाराज यांचा उदय व उत्कर्ष याचा अर्थ काय हे जाणवलेली समकालीन व्यक्तींमध्ये दोनच माणसे दिसतात. एक मुघल बादशहा औरंगजेब तर दुसरे रामदासस्वामी.
रणजित देसाई हेच कादंबरीचे मुख्य शिल्पकार हे वादातीत सत्य आहे. ते शिल्प साकार होण्यात अनेकांचा हस्ते-परहस्ते हातभार लागला आहे. त्यात प्रमुख नावे दोन – देशमुख आणि कंपनीचे धुरीण रा. ज. देशमुख व विख्यात प्रज्ञावंत नरहर कुरुंदकर. नरहर कुरुंदकरांनी ‘श्रीमान योगी’ हा काय प्रयत्न आहे, हे समजावून सांगणारी प्रस्तावना लिहिली. कारण लेखनाच्या वाटचालीत रणजित देसाई आणि नरहर कुरुंदकर यांच्यात सतत विचारांची देवाणघेवाण होत असे. ती प्रस्तावना वाचून आचार्य अत्रे यांच्यासारख्या साहित्यसिंहाला उचंबळून आले होते. ‘श्रीमान योगी’च्या देशमुख प्रकाशनाच्या आवृत्त्यांमध्ये ही प्रस्तावना होती. पुढे काही परिस्थितीवश प्रकाशन दुसऱ्या संस्थेकडे गेले, त्यात ती प्रस्तावना नाही. मात्र कुरुंदकरांच्या काही प्रस्तावनांचा संग्रह अलीकडे देशमुख कंपनीनेच काढला आहे, त्यात ती प्रस्तावना पुनर्मुद्रित केली आहे.
– अमित पंडित 9527108522, ameet293@gmail.com
अतिशय छान शब्दरचना.
अतिशय छान शब्दरचना.
मस्तच लिखाण पंडीतजी
मस्तच लिखाण पंडीतजी
Comments are closed.