बहुविद्याशाखापारंगत गणिती भास्कराचार्य

0
98

भास्कराचार्यांनी स्वतःचे जन्मवर्ष आणि ग्रंथलेखनाचे वर्ष ‘गोलाध्याय’ या ग्रंथाच्या ‘प्रश्नाध्याय’ या प्रकरणात अठ्ठावन्नाव्या श्लोकात दिले आहेत. ते लिहितात –
रसगुणपूर्णमहीसमशकनृपसमयेऽभवन्ममोत्पत्ति:|
रसगुणवर्षेण मया सिद्धांतशिरोमणी रचित:||
या श्लोकातील अंक असे आहेत : रस- षडरस = 6, गुण – त्रिगुण = 3
पूर्ण- शून्य =0, मही – पृथ्वी = 1
‘अंकानां वामतो गति:’ हा असा एक नियम आहे, की त्यानुसार अंक उजवीकडून डावीकडे लिहायचे. त्याप्रमाणे भास्कराचार्यांचे जन्मवर्ष येते शालिवाहन शके 1036. शालिवाहन शकाचा प्रारंभ ख्रिस्ताब्द 78 या वर्षी झाला. त्यामुळे शक वर्षात 78 मिळवले, की भास्कराचार्यांचे ख्रिस्ताब्द जन्मवर्ष (साल, इंग्रजी वर्ष) मिळेल. भास्कराचार्यांचे जन्मवर्ष ख्रिस्ताब्द 1036+78= 1114
‘रसगुणवर्षेंण मया सिध्दांतशिरोमणी रचित:’ असे भास्कराचार्य लिहितात.
रस = 6, गुण =3.
‘अंकानां वामतो गति:’ या नियमानुसार भास्कराचार्यांनी ‘सिद्धान्तशिरोमणि’ हा ग्रंथ वयाच्या छत्तिसाव्या वर्षी म्हणजे, ख्रिस्ताब्द 1114+36=1150 या साली लिहिला.
भास्कराचार्यांचा ‘सिद्धांतशिरोमणि’ हा ग्रंथ भारतीय गणित व खगोलशास्त्र या विषयांचा मुकुटमणी आहे. ‘सिद्धांतशिरोमणि’ या ग्रंथात चार उपग्रंथ आहेत:
१. लीलावती, २. बीजगणित, ३. गणिताध्याय, ४. गोलाध्याय हे दोन शुद्ध गणिताचे ग्रंथ आहेत.
आर्यभटाने ख्रिस्ताब्द 499 मध्ये ’आर्यभटीय’ हा ग्रंथ लिहिला. त्यानंतर सहाशे वर्षें उलटली. अनेक खगोलशास्त्रज्ञ भारतात झाले. त्यांनीही खगोलशास्त्रावर ग्रंथ लिहिले. त्या सर्व ग्रंथांमध्ये ‘सिद्धांतशिरोमणि’ हा ‘या सम हा’ असा ग्रंथ आहे. त्या ग्रंथात ग्रह-गोलांचे आवर्तनवाल, युतिवाल आणि गतिवाल अत्यंत अचूक दिले आहेत.
भास्कराचार्यांना ‘कॅलक्युलस’ या विषयाचीही कल्पना आली होती. ‘सिद्धांतशिरोमणि’ हा ग्रंथ भास्कराचार्यांच्या बुद्धिवैभवाची साक्ष आहे.
भास्कराचार्यांच्या चंगदेव या नातवाने लिहून घेतलेला शिलालेख पाटणदेवी मंदिरात आहे. त्यामध्ये भास्कराचार्यांच्या आठ पूर्वजांची नावे आहेत. भास्कराचार्य त्याच परिसरात राहत असावेत अशी शक्यता आहे. सह्याद्री पर्वत हा महाराष्ट्राचा मानबिंदू आहे. त्याची प्रमुख पर्वतशृंखला दक्षिणोत्तर एक हजार किलोमीटर पसरली आहे. सह्याद्रीच्या उपशाखा पूर्व-पश्चिम देशांमध्ये विस्तारल्या आहेत. त्यांपैकी ‘सातमाळा पर्वतशृंखला’ नामक शाखा नाशिकच्या उत्तरेला सुरू होऊन चाळीसगावच्या दक्षिणेपर्यंत जाते. त्या शृंखलेत चाळीसगावपासून सोळा किलोमीटर दक्षिणेला पाटणदेवी नावाचे एक निसर्गरम्य स्थान आहे. त्या परिसरात विज्जलवीड नावाचे नगर नऊ शतकांपूर्वी होते असा विद्वानांचा तर्क आहे.
भास्कराचार्यांनी विज्जलवीड नगराचा उल्लेख ‘गोलाध्याय’ ग्रंथात केला आहे. चंगदेव या त्यांच्या नातवाने विज्जलवीड येथे ‘सिद्धांतशिरोमणि’ ग्रंथाचे अध्यापन करण्यासाठी आश्रम स्थापन केला होता. भास्कराचार्यांच्या दुसऱ्या नातवाचे नाव अनंतदेव असे होते. त्याने चाळीसगावपासून जवळच गिरणा नदीच्या काठी बहाळ या गावी सारजादेवीच्या मंदिरात तशाच प्रकारचा शिलालेख लिहून घेतला होता. दोन्ही शिलालेख मजकुराच्या दृष्टीने सारखे आहेत. त्याचा अर्थ भास्कराचार्य त्या परिसरात राहत असले पाहिजेत. भास्कराचार्य एकोणसत्तराव्या वर्षी दिवंगत झाले.
भास्कराचार्यांनी केवळ गणित आणि खगोलशास्त्र या विषयांचा अभ्यास केला नाही, तर इतरही अनेक विषय आत्मसात केले होते. भास्कराचार्यांनी त्यांनी केलेल्या विद्याभ्यासाचे वर्णन ‘लीलावती’ या ग्रंथात एका श्लोकात दिले आहे. त्यानुसार,
पाणिनीची अष्टाध्यायी किंवा व्याकरणशास्त्रावरील आठ ग्रंथ भास्कराचार्यांनी अभ्यासले असणे शक्य आहे. (अष्टौ व्याकरणानि:)
भास्कराचार्यांनी सुश्रुत संहिता, चरक संहिता, अष्टांग हृदय वगैरे ग्रंथ अभ्यासले असावेत. षट्च भिषजां :  ‘बिभेत अस्मात् रोग: इतिभिषज:|’  अशी भिषज या शब्दाची व्याख्या आहे. ‘भिषज’ हा शब्द वैद्यकीय ग्रंथ दर्शवतो.
तर्कशास्त्रावरील सहा ग्रंथ, त्यामध्ये न्याय आणि वैशेषिक दर्शनांचा समावेश असावा. (षट् तर्कान् 🙂
 आर्यभट, ब्रह्मगुप्त, श्रीधर पद्मनाभ वगैरे गणिती भास्कराचार्यांपूर्वी होऊन गेले. भास्कराचार्यांनी त्यांच्या ग्रंथांचे अध्ययन केले असावे. (गणितानि पंच:)
ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद. (चतुरो वेदान् 🙂
भरतनाट्यावरील पाच ग्रंथ. (रत्नानां त्रितयं व्दयचं: )
पूर्व आणि उत्तर मीमांसा (वेदान्त) भास्कराचार्यांनी अभ्यासले. (मीमांसा ग्रंथ: ) भास्कराचार्यांनी अध्ययन केलेल्या अन्य विषयांची नावे शिलालेखात दिली आहेत. त्यामध्ये सांख्यदर्शन, वैशेषिक दर्शन, छंदशास्त्र, कर्मकांड (कल्पशास्त्र), शिल्पशास्त्र वगैरे विषयांचा उल्लेख आहे.
 भास्कराचार्यांनी पाटीगणित (अंकगणित) या ग्रंथाला ‘लीलावती’ हे नाव का दिले? या विषयावर विद्वानांमध्ये कित्येक वर्षे चर्चा सुरू आहे. लीलावती ही भास्कराचार्यांची पत्नी, कन्या, प्रेयसी अशा विविध रूपांनी त्या विषयाचा विचार झाला, परंतु विद्वान लोकांना सर्वमान्य असे उत्तर सापडले नाही. भास्कराचार्यांनी लीलावतीसाठी – बाले, बालकुरंगलोलनयने, मतिमति, कांते, मृगाशी वगैरे विविध विशेषणे वापरली आहेत. त्यामुळे भास्कराचार्य आणि लीलावती यांचा संबंध निश्चित काय होता, हे सांगणे अशक्य आहे. ‘लीलावती’विषयी काही दंतकथा प्रचलित आहेत. त्यांतील दोन दंतकथा –
१. भास्कराचार्यांनी केवळ त्यांच्या पित्याजवळ नाही, तर गुरूच्या घरीही विद्याभ्यास केला होता. गुरूंना लीलावती नावाची सुलक्षणी आणि रुपवती कन्या होती. भास्कराचार्य विद्याभ्यास समाप्त करून स्वगृही जाण्यास निघाले; त्यावेळी लीलावतीने भास्कराचार्यांचे रूप, स्वभाव, बुद्धिवैभव पाहून त्यांच्याबरोबर विवाहाची इच्छा दर्शवली. परंतु भास्कराचार्यांनी ‘बहिणीबरोबर विवाह करू नये’ या शास्त्रवचनाचा आधार घेऊन लीलावतीचा प्रस्ताव स्वीकारला नाही. गुरूचा पुत्र गुरुबंधू आणि कन्या गुरुभगिनी या नात्यांनी भारतात मानले जातात. परंतु भास्कराचार्यांनी लीलावतीला आश्वासन दिले, ‘मी तुला कधीही विसरणार नाही. माझ्या पहिल्या ग्रंथाला तुझे नाव देईन.’ त्यामुळे भास्कराचार्यांच्या प्रथम ग्रंथाला ‘लीलावती’ हे नाव मिळाले!
२. लीलावती ही भास्कराचार्यांची एकुलती एक कन्या होती. भास्कराचार्यांनी लीलावतीच्या विवाहाची वेळ जवळ आल्यावर तिच्या कुंडलीचा अभ्यास केला. भास्कराचार्य फलज्योतिषातही प्रवीण होते. लीलावतीला विवाहानंतर वैधव्ययोग आहे असे त्यांच्या लक्षात आले. एका विशिष्ट मुहूर्तावर विवाह झाला, तरच लीलावतीचा वैधव्ययोग टळणार होता. भास्कराचार्यांनी तसा शुभमुहूर्त शोधून काढला. लीलावती विवाहाच्या दिवशी गौरीपूजनाला बसली होती. परंतु घटिकापात्र पाण्यामध्ये योग्य प्रकारे बुडाले की नाही, हे जाणून घेण्याची इच्छा तिच्या मनात निर्माण झाली. ती उठून घटिकापात्राजवळ गेली. घटिकापात्रात डोकावून पाहत असताना, तिच्या कपाळावर लावलेली कुंकमाक्षत घटिकापात्रात पडली. त्याच्या छिद्रात अडकली. त्यामुळे घटिकापात्रात पाणी शिरणे बंद झाले. घटिकापात्र बुडाले नाही. विवाहासाठी तो मुहूर्त साधता आला नाही. लीलावतीचा विवाह झाला, पण तिला वैधव्य दोन वर्षांत प्राप्त झाले. तेव्हा भास्कराचार्यांनी तिला घरी आणून पाटीगणित शिकवले आणि त्यांनी लिहिलेल्या पहिल्या ग्रंथाला ‘लीलावती’ असे नाव दिले.

– मोहन आपटे 02226592950

(‘राजहंस ग्रंथवेध’ वरून उद्धृत, संपादित – संस्कारित)

About Post Author