एम.डी. केणी विद्यालय – थेंबे थेंबे तळे साठे

2
36

आमच्या काकाने आम्हा मुलांना लहानपणी प्रत्येकास देखणे गुलाबी रंगाचे प्लास्टिकचे डुक्कर (पिगी बँक) वाटले होते. तो बँकेत काम करत होता. डुकराच्या पाठीवर पैसे टाकण्यासाठी एक छेद होता आणि त्या डुकराचे पोट मोठ्ठे होते. ती सुरूवात होती पैसे साठवण्याची सवय लावणारी. मग मी पावडरचा रिकामा उंच असा डबा घेऊन, त्याच्या तळाला आडवे छिद्र पाडून, त्यात खाऊला, वाढदिवसाला वगैरे मिळणाऱ्या पैशांतून बरेच पैसे साठवले. गंमत म्हणजे तो डबा एके दिवशी फोडला तेव्हा मोठ्ठे घबाड हाती लागले! इतका आनंद झाला ती रक्कम पाहून! आणि थेंबाथेंबाने तळे साचल्याचे आश्चर्यही वाटले.

मी निवृत्त 2016 अखेर होणार, तर त्या होण्याच्या आधी चार ते पाच महिने मुंबईतील भांडुपच्या एम.डी. केणी विद्यालयात दर शनिवारी (कामाच्या सुट्टीच्या दिवशी) इंग्रजी शिकवण्यास जाऊ लागलो. निवृत्तीनंतरचा विरंगुळा म्हणून. मग, निवृत्त झाल्यावर, डिसेंबर 2016 पासून सोमवार ते शुक्रवार दररोज दोन तास ‘इंग्रजी व्याकरण’ आणि ‘संभाषणकला-ओळख व सराव’ हे विषय मुलांना शिकवण्यासाठी तेथे जातो. ते विषय इयत्ता पाचवी ते दहावी अशा सर्व वर्गांना शिकवतो. शिकवतो म्हणजे काय? अजूनही, मीच शिकतोय – कसे शिकवायचे? आणि काय व कसे शिकवायचे नाही? विषय शिकवणे सोप्पे पण विद्यार्थ्यांचे लक्ष विषयाकडे केंद्रित करणे, त्यांच्या आपापसांतील गप्पा थांबवणे हे माझ्या दृष्टीने जिकिरीचे म्हणण्यापेक्षा आव्हानात्मक आहे. कारण ती मुले तळच्या वर्गातून आलेली आहेत. त्या विद्यार्थ्यांच्या घरात असलेला शिक्षणाच्या वातावरणाचा अभाव आहेच, पण पालक आणि मुले यांच्यात संवाददेखील नाही.

शाळेत शिकणारे विद्यार्थी हे त्यांच्या घरातील शिकणारी पहिली पिढी. त्यांचे पालक अजिबात न शिकलेले किंवा जेमतेम दोन-चार इयत्ता शिकलेले. बरे, शिक्षणाची भाषा मराठी, पण बहुतेक घरांत त्यांची गुजराती बोलली जाते. मासी कोळी समाजाचे ऐंशी टक्क्याच्या आसपास विद्यार्थी. बऱ्याच घरांमध्ये आर्इ हा एकच पालक आणि दोघे असतील तर वडील वर्षातून चारेक महिने पूर्व आशियायी देशांत बिगारी म्हणून कामाला जाणारे. कामाची अनिश्चितता, मिळणारी मजुरी जेमतेम, त्यात नाना तऱ्हेच्या वाईट सवयी. त्यामुळे आयाच मोलमजुरी, घरची धुणीभांडी करून घर चालवतात. वडील मंडळी काय करतात हा संशोधनाचा विषय. पण ते दुर्दैवी सत्य.

अशी परिस्थिती असताना किंवा असते म्हणून की काय, मला त्या मुलांच्या हाती दररोज काहीना काही पैसे दिसत. ती शाळेत मिळणारा मोफत आहार घेतात वा घेत नाहीत; पण आजुबाजूच्या दुकानांतून शेव, वेफर, पेप्सीकोला किंवा समोसे इत्यादी खाऊचे पदार्थ मात्र हमखास घेतात. त्यांना दररोज घरून मिळणाऱ्या त्या पैशांकडे बघून मला त्या विद्यार्थ्यांना आवाहन करावेसे मनात आले; ते म्हणजे पैसाबचतीचे. त्यातूनच माझ्या उपक्रमाचा प्रयोग सुरू झाला. उपक्रम सुरू करण्याच्या आधी त्या वर्गाच्या शिक्षक छाया जाधव मॅडम आणि मुख्याध्यापक सावित्री काटकार मॅडम यांना त्या उपक्रमाबद्दल माहिती दिली आणि रीतसर परवानगीदेखील घेतली. उपक्रमाला सर्वानुमते ‘आमची बँक’ असे नाव देण्यात आले.

सुरुवात करत होतो म्हणून सातवीचा वर्ग नमुना म्हणून प्रयोगाला निवडला. कारण म्हणजे त्या मुलांना त्या आधीची दोन वर्षें मी जवळून बघत होतो आणि त्यांच्याबद्दल विश्वास वाटत होता. त्यांना ‘थेंबे थेंबे तळे साचे’ या उक्तीचा अर्थ व त्याचे फायदे समजावले. त्या वाक्प्रचारात खरे तर,  मला वाटते ‘साचे’ ऐवजी ‘साठे’ म्हटले पाहिजे, कारण साचणे म्हणजे ज्याचा निचरा व्हायचा आहे ते आणि साठणे म्हणजे वापरता येण्याजोगे. तेव्हा ‘थेंबे थेंबे तळे साठे’ असे म्हणुया. पैसे जमा करण्यासाठी आठवड्यातील एक दिवस ठरवण्यात आला. पैसे किती जमा करायचे त्याचे बंधन नव्हते- अगदी एक रूपयासुद्धा स्वीकारला जाणार होता. योजना विश्वासपात्र आणि पारदर्शी होण्यासाठी एक खतावणी (पासबुक) बनवून प्रत्येक विद्यार्थ्यासाठी एक पान ठेवले. त्यात पैसे दिल्याची तारीख, किती पैसे दिले हे लिहून त्यापुढे प्रत्येक वेळी विद्यार्थ्याची सही घेतली. तसेच, ती माहिती त्यांच्या वहीत लिहून त्यावर पैसे मिळाले म्हणून माझी सही देत होतो. कोणीही त्यासाठी घरातून मुद्दाम पैसे मागायचे नाहीत तर जे खाऊला दिले असतील त्यांतीलच वाचवून पैसे जमा करायचे आणि त्याबद्दल घरामध्ये माहिती द्यायची असे मुलांना बजावले. जमणारे पैसे मध्येच काढता येणार नाहीत असे ठरले आणि मुलांनीही त्याला आनंदाने तयारी दाखवली व होकार दिला.

एकत्रित जमलेल्या त्या पैशांतून विद्यार्थ्यांना सहलीसाठी, स्वत:साठी, भावाबहिणींसाठी; तसेच, आर्इवडिलांसाठी काही घेता येर्इल हा उद्देश मुलांना भावून गेला. उपक्रम जुलै 2018 ला सुरू झाला. तो जानेवारी 2019 मध्ये सहलीच्या आधी थांबवण्यात आला. पैशांचे प्रत्येकास वाटप मुख्याध्यापकांच्या उपस्थितीत आणि त्यांच्या हस्ते करण्यात आले. प्रोत्साहन म्हणून आणि पैसे जमवण्याचा फायदा कळावा म्हणून प्रत्येकाच्या जमलेल्या रकमेवर पाच टक्केप्रमाणे पूर्ण वर्षाचे व्याज माझ्याकडून दिले. विद्यार्थ्यांना ती रक्कम लिफाफ्यात घालून दिली व त्यात त्यांच्या पूर्ण हिशोबाचा कागदही ठेवला. सोबत खाऊपण वाटला. पस्तीस विद्यार्थ्यांच्या वर्गात सव्वीस विद्यार्थ्यांनी उपक्रमात सहभाग घेतला आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांचे त्या अल्पकाळात सरासरी ऐंशी रुपये जमले होते. त्यामध्ये गणपतीची सुट्टी, दिवाळीची सुट्टी, चाचणी परीक्षा, सहामाही; तसेच, मुलांच्या दांड्या हे आलेच. बरे, पुन्हा प्रत्येक वेळी पैसे जमा होतीलच असे नाही. पण त्यांचा उत्स्फुर्त सहभाग आणि सर्वांचा उत्साह कौतुकास्पद तर होताच; पण मलाही प्रोत्साहन देऊन गेला.

उपक्रमाचे ठळक फायदे पुढील प्रमाणे वाटतात –

अल्पबचतीची (सेव्हिंग) स्वतःला मिळणाऱ्या पैशांतून काही पैसे बाजूला काढण्याची मुलांना सवय लागली.
जमलेल्या पैशांतून स्वतःसाठी व त्यांच्या कुटुंबासाठी ते काही घेऊ शकतात असा विश्वास मुलांमध्ये निर्माण झाला.
मुलांना छोट्या छोट्या बचतीतून सरतेशेवटी हातात मोठी रक्कम लागते ही जाणीव झाली.
सही प्रत्येक वेळेस देऊन व घेऊन पैशांच्या व्यवहारात शिस्तीचे पालन कसे करावे आणि व्यवहार कसा चोख ठेवावा हे मुलांना समजले.
त्यांना व्याज दिल्यामुळे गणितातील हिशोबही कसा करावा हे समजले.

या उपक्रमासाठी केणी शाळेच्या मुख्याध्यापक काटकर मॅडम यांनी हा उपक्रम ऐकता क्षणी परवानगी तर दिलीच पण प्रोत्साहनही दिले. तसेच, उद्घाटनाला आणि समारोपाला हजर राहून विद्यार्थ्यांचे कौतुक केले आणि त्यांना याबद्दल उत्कृष्ट मार्गदर्शनही केले. त्यांचे म्हणणे विद्यार्थ्यांनी पैशांचा विनियोग पुस्तकांचे, व्यवसायाचे पैसे यासाठीसुद्धा करावा असे पडले. त्यासाठी या पुढे जेव्हा हा उपक्रम पुन्हा सुरू करू तेव्हा पालकांचा सहभाग कितपत करून घेता येर्इल हे पाहावे लागेल.

हे सर्व पाहून इतर इयत्तांमधील विद्यार्थ्यांनी ‘आमच्या वर्गातपण बँक सुरू करा’ असे सांगणे आणि इयत्ता सातवीचा वर्ग ‘पुन्हा बँक लगेच सुरू करा’ असे म्हणत आहेत हेच या उपक्रमाचे यश म्हणावे लागेल.

– महेश घाणेकर 9892722772
mahesh5611@gmail.com

About Post Author

2 COMMENTS

  1. Very nice article on saving…
    Very nice article on saving habits. Very useful for our young generation.
    Awesome.

Comments are closed.