करजावडेवाडी ही रत्नागिरी जिल्ह्याच्या चिपळूण तालुक्यातील पोफळी गावातील गवळी-धनगर या समाजाची वस्ती आहे. करजावडेवाडीला मोठी परंपरा आहे व ती बाबीबाईपासून सुरू होते. बाबीबाई लक्ष्मण ढेबे हिचे सासर तळसरजवळील डेरवण हे गाव आहे. ते गाव मुंबई-गोवा महामार्गावर चिपळूणकडून गोव्याकडे जाताना पंचवीस किलोमीटरवर लागते. गवळी-धनगर समाज गावातील डोंगरमाथ्यावर राहत आला आहे. बाबीबाईचे माहेर डेरवणला लागून असलेल्या सावर्डा गावात आहे. तिचे माहेरचे आडनाव बावदने. बाबीबाईचा जन्म अंदाजे 1920 सालचा. लग्न तिच्या चौदा-पंधराव्या वर्षी झाले. मात्र ती सावर्ड्यातून डेरवणला 1935 साली दाखल झाली. तिचे सासरी पटेना. ती कुरबुरी वाढत गेल्याने, एक-दोन वर्षें सासरी राहून माहेरी परतली. ती माहेरी किती काळ राहिली ते माहीत नाही. माहेरच्या लोकांनी तिचे दुसरे लग्न लावून देण्याचा घाट घातला. तेव्हा मात्र बाबीबाईने भूमिका घेतली, की “मला दुसरे लग्न करायचे नाही. मला आहे ते सासर व दादला नापसंत नाही. मी पुन्हा नांदण्यास जाण्याला तयार आहे, पण त्या घरातील लोकांनी घरची दरिद्री अवस्था बदलली पाहिजे. मला आहे त्या अवस्थेत राहणे शक्य नाही.” दोन्ही घरांमध्ये समझोता झाला.
बाबीबाई सासरी पुन्हा नांदण्यास 1940-42 च्या दरम्यान आली. तिला पहिला मुलगा अंदाजे 1946 साली तर दुसरा मुलगा 1948साली झाला. बाबीबाई व तिचा नवरा 1952-53 मध्ये पोफळीत स्थलांतरित झाले असावेत. त्या दहा-बारा वर्षांच्या काळात, बाबीबाई डेरवणात खूप कष्ट करत होती. तिचा मुलगा रामा याला त्या काही आठवणी आहेत. तो त्यावेळी चार वर्षांचा होता. रामा हा धाकटा मुलगा. त्याला आईला नेसूचे एकच लुगडे होते हे ठळकपणे जाणवते.
सरकारने जे महत्त्वाचे मोठे प्रकल्प स्वातंत्र्यानंतर सुरू केले, त्यात कोयना जलविद्युत प्रकल्प येतो. त्याच्या कामाला 1950-51 साली पोफळी येथे सुरुवात झाली. तेव्हा बाबीबाईचा नवरा लक्ष्मण कामाच्या शोधात तेथे आला. बाबीबाई तेथील जमिनी, झाडझाडोरा, भरपूर पाला, गवत हे पाहून हरखून गेली. तिला तेथेच गुरेढोरे बाळगून, वस्ती करून राहवेसे वाटू लागले. तिने जमीनमालकांकडे म्हणजे खोतांकडे विचारणा केली. जमीनमालकांनी परवानगी दिल्यावर, काही दिवसांतच, बाबीबाई तिच्या दोन लहान लेकरांना व एका म्हशीला घेऊन आली. बाबीबाईचा स्वतंत्र संसार पोफळी गावात सुरू झाला.
बाबीबाईचा नवरा पोफळी पॅावरहाऊसच्या गोडाऊनवर रखवालदार म्हणून नोकरी करत होता. त्याने तेथे काही महिने रोजंदारीवर नोकरी केली. बाबीबार्इची म्हैस एक दिवस आजारी पडली. म्हणून तिचा नवरा कामावर गेला नाही. म्हशीच्या आजारपणात आठ-दहा दिवस गेले. म्हैस काही वाचली नाही, पण कामावर खाडा झाल्यामुळे कंत्राटदाराने त्याला कामावरून काढून टाकले. त्यानंतर लक्ष्मणने नोकरी किंवा मजुरी केली नाही. दोघांनी दुधाचा व्यवसाय केला. बाबीबाईने भरपूर कष्ट केले. गुराढोरांचा पसारा वाढवला. खोतांशी गोडीगुलाबीने वागून त्यांच्या जमिनीवर शेतीही केली. दूध-दुभत्यावर मिळवलेला पैसा काळजीपूर्वक वापरला; पैशांची बचतही केली.
बाबीबाईच्या मनात शिक्षणाचे महत्त्व पोफळीला आल्यापासून रुजले गेले. तिने तिची मुले शिकावीत म्हणून त्यांना पोफळीच्या सरकारी शाळेत दाखल केले. घरापासून शाळा चार किलोमीटर दूर होती. नदी ओलांडून शाळेत जावे लागत असे. शाळेतील इतर मुले गावाच्या सधन वर्गातील होती. ती मुले व्यवस्थित कपडे घातलेली, शिस्तीत रांगेत बसणारी, शाळेच्या वातावरणात रूळलेली होती. मात्र बाबीबाईची ही गवळी-धनगर मुले डोक्यावर शेंडी राखलेली, कमरेला लंगोट लावलेली, वर अघळपघळ जुनाट सदरा घातलेली होती. ती शाळेच्या वातावरणात बुजून गेली. त्यांच्या तोंडून शब्द फुटेना. त्यांची धनगरी भाषा इतरांना समजेना. त्या मुलांना शाळेतील प्रमाण मराठी भाषा समजेना. मुले शाळेत थोडे दिवस गेली, पण ती शाळेत रमेनात. ती आईच्या धाकाने घरातून शाळेत जाण्यासाठी निघत; पण इतर मुले चिडवतात, गुरूजी बोलतात ते कळत नाही म्हणून नदीजवळ बसून राहत. बाबीबार्इला ते कळले तेव्हा तिने नाईलाजाने मुलांना घरीच ठेवण्याचा निर्णय घेतला. मुले गुराढोरांच्या कामात मात्र तरबेज झाली. त्यांनी आईला चांगली मदत केली. नदीकाठी वस्ती असतानाच मुलांची लग्ने झाली. तेव्हा नदीच्या वरील अंगाला डोंगरमाथ्यावर करजावडे गावी सात-आठ एकर जमीन विकत घेतली व तिचे बाडबिस्तर 1977 साली तेथे हलवले. बाबीबाईचे नदीकाठी कुटुंब पंचवीस वर्षें राहिले. दुधाचा व्यवसाय वाढत होता. बाबीबाईने दोन मुलांना स्वतंत्र वाडे करून दिले. तिने तिच्या माहेरच्या सोयऱ्यांनाही आणून त्या वाडीत वसवले. बाबीबाईचे दोन भाऊ तेथेच राहू लागले. त्यांचाही दुधाचा व्यवसाय आहे. ते पावसाळी भातशेती करतात.
बाबीबार्इची नातवंडेही शाळेत गेली नाहीत, शिकली नाहीत. करजावडेवाडी पोफळीपासून कच्च्या रस्त्याने तीन किलोमीटरवर आहे. तर, वशिष्टी नदीच्या धरणाच्या काठावरून, उभा डोंगर चढून पायवाटेने वाडीवर अर्ध्या तासात पोचता येते. बाबीबार्इच्या आग्रहामुळे तिला ‘श्रमिक सहयोग’ संस्थेचे सहकार्य लाभले. अनौपचारिक प्राथमिक शाळा 1996 साली सुरू झाली व वाडीत शिक्षणाचा प्रकाश आला! बाबीबाईच्या घराच्या पडवीत शाळा भरू लागली व तिची पंतवंडे शिकू लागली. ‘श्रमिक सहयोग’चे कार्यकर्ते संतोष खरात शाळेत येऊन शिकवू लागले. पंतवंडांपैकी काही मुले पुढे सातवीपर्यंत शिकली. करजावडेवाडीत जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा 2002 साली सुरू झाली. मुले त्या शाळेत शिकू लागली. तेव्हा ‘श्रमिक’ने त्यांची शाळा बंद केली. त्या शाळेत 2018 साली बावीस मुले शिकत आहेत. वाडीतील चार मुले पोफळीतील माध्यमिक विद्यालयात जाऊन आठवीत शिकत आहेत, पण वाडीतील अजून एकहीजण दहावी शालांत परीक्षा उत्तीर्ण झालेला नाही. करजावडेवाडीला एकेचाळीस वर्षें पूर्ण झाली आहेत. एका कुटुंबापासून सुरू झालेल्या त्या वाडीत पंधरा कुटुंबे असून साठ जण राहत आहेत. त्या मागे बाबीबार्इचे कष्ट, दूरदृष्टी, हिकमत, व्यावसायिक कौशल्य व उरात शिक्षणाची जपलेली आस हे सारे काही आहे.
भालचंद्र मुणगेकर मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू झाल्यानंतर चिपळूणमध्ये आले होते. ‘श्रमिक सहयोग’ने त्यांचा छोटासा सत्कार करण्याचे ठरवले. त्यांनी तो सत्कार बाबीबाईच्या हस्ते करायचा असा निर्णय घेतला. बाबीबाईला ते सारे नवीन होते.
तिचे वय त्या वेळेस ऐंशीच्या दरम्यान होते. ती शरीराने थकलेली होती. संतोष खरात यांनी बाबीबाईला पाठुंगळी घेऊन, उभा डोंगर पायी उतरून पोफळीच्या एस.टी. बसस्थानकापर्यंत आणले. पुढील प्रवास एसटीने केला. तो दिवस 26 जून 2000.
मुणगेकर बाबीबाईच्या पाया पडले. रात्री एका कार्यकर्त्याच्या घरी मुक्काम केल्यानंतर चिपळूण ते पोफळी एसटीने व बाबीबाईला पाठुंगळी घेऊन पुन्हा उभा डोंगर चढून संतोष खरात यांनी करजावडेवाडीत सुखरूप पोचवले. बाबीबाईचे वृद्धापकाळामुळे त्या घटनेनंतर दोन वर्षांनी, 20002 साली निधन झाले.
नेपोलियनचा एक किस्सा सांगितला जातो. मोठमोठे राजे व सरदार यांची मैफल रंगात आली होती. नेपोलियनला हिणवण्यासाठी राजे व सरदार यांनी त्यांच्या त्यांच्या घराण्यांची लांबलचक परंपरा सांगायला सुरुवात केली. नेपोलियनची पाळी आली तेव्हा तो म्हणाला, “माझ्या घराण्यालाही फार मोठी परंपरा आहे व ती माझ्यापासून सुरू होते!”
– विद्यालंकार घारपुरे