बारीपाडा हे गाव धुळे जिल्हा ठिकाणापासून चाळीस किलोमीटर अंतरावर आहे. त्या गावात एकशेआठ कुटुंबसंख्या, सातशेचव्वेचाळीस लोकसंख्या आहे. गावाने स्वतःची पर्यटनकेंद्र म्हणून ओळख बनवली आहे. स्थानिक बुद्धिवंत कार्यकर्ता चैत्राम पवार यांनी गावाचा कायापालट पूर्णत: केला आहे. त्यांचे शिक्षण एम कॉम झाले आहे.
गावाची परिस्थिती 1992 सालापूर्वी बिकट होती. पावसाळी शेती फक्त पोटापुरती होत असे. गावातील लोकांना पाणी आणण्यासाठी चार मैलांवर जावे लागे. पावसाळा संपला, की मजुरीसाठी आजुबाजूच्या गावात जाणे होई. कुपोषणाचे प्रमाण मोठे होते. अर्धे गाव दारिद्र्यरेषेखाली गेलेले. शेतात दुसरे पीक घ्यायचे म्हटले तर ते दहा-बारा एकरांवर घ्यावे लागे. शिक्षणासाठी जो गावाबाहेर गेला, तो पुन्हा गावात स्थिरावलाच नाही. गावची शेतीही फारशी विकसित नव्हती. रोजगार नसल्यामुळे व्यसनाधीनता वाढलेली होती.
चैत्राम पवार बारीपाडा शेजारी असलेल्या वारसा गावातील ‘वनवासी कल्याण आश्रमा’च्या कार्यात सहभागी झाले. तेथे डॉक्टर आनंद फाटक यांचा सहवास त्यांना लाभला. फाटक हे एम डी झालेले. ते पूर्ण वेळ समाजकार्यासाठी देत आहेत. त्यांचे काम वारसा केंद्रातून जिल्हाभर सुरू असते. ‘वनवासी कल्याण आश्रमा’चे कार्यकर्ते रवी सहाणे, शंकर राजपूत आणि डॉक्टर आनंद फाटक यांच्या संपर्कात चैत्राम पवार आले आणि त्यांनी चैत्राम पवार यांना सामाजिक कामाकडे वळण्याची दिशा दाखवली. त्यांनी तो संस्कार टिपला.
चैत्राम पवार यांनी गावातील सहकाऱ्यांना सोबत घेऊन पाच ‘ज’च्या व्यवस्थापन नियोजनानुसार कामाला सुरुवात केली. पाच ‘ज’ म्हणजे जल, जमीन, जंगल, जनावर, जन. गावात वृक्षतोड प्रचंड प्रमाणात होत असे, जंगल नाहीसे होत होते. त्यांनी ती वृक्षतोड थांबवावी यासाठी गावातील सात पुरुष आणि सहा महिला यांना संघटित करून अकरा सदस्यांची ‘वनसंरक्षण समिती’ 1993 साली बनवली. ‘वनसंरक्षण समिती’ने नियमावली तयार केली. त्यात कुऱ्हाडबंदी, चराईबंदी केली. वृक्षतोड करणाऱ्यास एक हजार एकावन्न रुपये दंड, लाकडी वाहतूक करणाऱ्यास सातशेएकावन्न रुपये दंड, लाकूडचोरीची खबर देणाऱ्यास एकशेएकावन्न रुपये बक्षीस असे नियम बनवले. वनरक्षणासाठी माणूस नेमणे गरजेचे आहे, म्हणून समितीच्या आणि गावकऱ्यांच्या संगनमताने गावातील दोन व्यक्ती त्या वनांचे संरक्षण करतील असे मान्य केले गेले. गावातील प्रतिपरिवार तीन रुपये शुल्क वनसंरक्षणासाठी म्हणून देण्याचे ठरले. एकूण जमा झालेले शुल्क वनसंरक्षणासाठी नियुक्त केलेल्या त्या दोन व्यक्तींना वेतन म्हणून देण्याचे ठरवले गेले.
चोरलेल्या लाकडांचा लिलाव करण्यात येई. लिलावात जमा झालेला पैसा वनसंरक्षण समितीकडे जमा होई. जमा झालेला पैसा गावाच्या विकासासाठी वापरला जाऊ लागला. त्याच दरम्यान, गावकऱ्यांनी वृक्षारोपणाचा उपक्रम केला. वनविभागाच्या खात्यात असलेल्या बंजर जमिनीचे जंगलात रूपांतर केले आहे. त्यात त्यांनी एक लाख रोपांची लागवड केली; तीनशेचाळीस प्रकारची विविध रोपे लावली गेली. त्या रोपांचे वृक्षात रूपांतर होऊन, जंगलच तयार झाले आहे. गावकऱ्यांनी गव्हाच्या शेतीविषयी पहिला प्रयोग 1994 साली केला. तो प्रयोग यशस्वी झाला. त्या यशस्वी प्रयोगामुळे चैत्राम पवार यांना आणि गावकऱ्यांना काम करण्यास ऊर्जा मिळाली, स्फुरण आले. गावकरी शेतीचे वेगवेगळे प्रयोग पाहण्यासाठी दरवर्षी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊ लागले. ते स्वतःच्या गावात तेथील प्रयोग राबवण्याचा प्रयत्न करतात. गावकऱ्यांनी चारसूत्री भात लागवडीचे प्रयोग यशस्वी केले आहेत. बटाटा, कांदा लागवडीची प्रायोगिक सुरुवात करण्यात आली होती. तो प्रकल्पसुद्धा यशस्वी झाला. तेथे ज्वारी, बाजरी, वरई, भादला, कुळीथ, तूर, भुईमूग, हरभरा, पेरमाळ ही पिके घेतली जातात. सध्या तेथील गावकरी इंद्रायणी तांदूळ, फळबाग, हिरव्या पालेभाज्या, गुलाब, स्ट्रॉबेरीची शेती करत आहेत. त्यासोबतच चौदाशे कलमी आंब्यांची लागवडही तेथे केली गेली आहे.
गावात जलसंवर्धनदेखील साधले आहे. गावातील लोकांनी स्वखर्चाने चर खोदण्याचे काम केले. शासकीय मदतीतून ‘तलाव सिमेंटबंधारे’ बांधले गेले. गावात एकशेआठ कुटुंबांसाठी चाळीस विहिरी सामुदायिक वाटून घेतल्या. त्यांनी विहिरीतील पाणीवाटप, दुरुस्ती, मोटरपंप व लाईनदुरुस्ती हे सगळे त्या त्या विहिरीचा वापर करणारे बघतील असा नियम बनवला. दिवाळी आणि उन्हाळी सुट्ट्यांत विद्यार्थ्यांसाठी जंगलसहलींचे आयोजन केले जाते. त्या सहलीत झाडे-फळभाज्या ओळखणे, बांधबंदिस्ती इत्यादी उपक्रम राबवले जातात. सहलींच्या निमित्ताने, विद्यार्थ्यांकडून आठ हजार ‘सीव्हीटी’ बंधारे बांधण्यात आले. त्यातून मुलांना वेगवेगळ्या गोष्टीही शिकण्यास मिळतात.
चैत्राम पवार संघटन करण्याचे एक उत्तम उदाहरण देतात, एकीकडे गावातील लोक समृद्ध होत असताना, गावातीलच चार कुटुंबे गावाबाहेर कामाला जात. त्या कुटुंबांनी गावाबाहेर कामाला जाऊ नये यासाठी गावात एक सभा बोलावली गेली. त्यात लोकांच्या मतानुसार गावात पडीक असलेल्या पाच एकर जमिनीतील प्रत्येकी एक एकर प्रत्येक कुटुंबाला देण्याचे ठरवले आणि त्यांना दिलेल्या जमिनीतच शेती करण्यास सांगितले गेले. कोठल्याही कामांचे नियम गावातील प्रत्येकाच्या संमतीने बनवले जातात. एक मत जरी विरुद्ध असले तरी त्याचा होकार येईपर्यंत ते काम पूर्णत्वास नेत नाहीत. गावात वेगवेगळे उपक्रमही घेतले जातात. महिलांसाठी ‘बचत गटा’ची स्थापना करण्यात आली आहे. त्या ‘बचतगटां’मधून बचतीबरोबरच सामान्य आरोग्य व स्वछता, परिवार नियोजन, प्रौढ साक्षरता, सकस आहार, शिक्षण, रोजगार यांवरील प्रबोधनावर जास्त भर देत असतात. घरकाम, शेतकाम, आर्थिक व्यवहार ते ग्रामसभा… सर्वत्र महिलांचा सहभाग लक्षणीय दिसून येतो. बचतगटांमार्फत येणाऱ्या पर्यटकांसाठी जेवणाची व्यवस्था केली जाते, गावातील उत्साही तरुण पर्यटकांना गाव आणि शेतीतील प्रयोग दाखवण्यासाठी घेऊन जातात. गावात नसबंदीत पुरुषांचे प्रमाण ऐंशी टक्के तर महिलांचे प्रमाण वीस टक्के आहे. गावातील व्यसनाधीनताही कमी झाली आहे. गावकऱ्यांनी स्वतःच्या गरजा कमी केल्या आहेत. गावात याआधी शासकीय योजना येत नव्हत्या. मात्र गाव समृद्ध झाल्यानंतर शासनाच्या ज्या योजना आवश्यक आहेत त्याच योजना गावात राबवल्या जात. गावात पूर्वी एस टी येत नव्हती. गावाच्या कामाविषयी, त्याच्या प्रसिद्धीविषयी समजताच आदिवासी मंत्र्यांकडून गावात एस टीची व्यवस्था करण्यात आली. एस टीचा लाभ गावातील फक्त पाच-सहा जणांना होत असे. त्यात नुकसान सरकारचेच! ते नुकसान होऊ नये म्हणून गावातील लोकांनी एस टीला नकार दिला. माणूस स्वतःच्या गरजा कमी करून गावाला आणि स्वतःला कसे समृद्ध करू शकतो हे बारीपाडा गावातून शिकण्यास मिळते.
पीएच डीचे, एमएसडब्ल्यूचे विद्यार्थी तेथे संशोधनासाठी येत असतात. अभ्यासकांसाठी आणि पर्यटकांसाठी त्या गावात ‘पर्यावरण अभ्यास केंद्रा’ची उभारणी करण्यात आली आहे. त्यांच्या निवासाचीही सोय करण्यात आली आहे. दर महिन्याला पाचशे ते हजार लोक त्या गावाला भेटी देत असतात. बारीपाडा गावावर पीएच डी करण्यासाठी तीन विद्यार्थी येऊन गेले आहेत. पहिले म्हणजे शैलेश शुक्ला. आनंदवन येथून शिक्षण घेतलेले. सध्या ते कॅनडामध्ये मॅनिटोबा सिटीत प्रोफेसर म्हणून आहेत. ‘वनभाजी महोत्सवा’ची संकल्पना शैलेश शुक्ला यांचीच. दरवर्षी बारीपाड्यात ‘वनभाजी महोत्सवा’चे आयोजन केले जाते. त्या स्पर्धेला भेट देण्यासाठी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांतून लोक येतात. ऑक्टोबर महिन्यात ‘वनभाजी महोत्सव’ भरतो.
दुसरे पुण्याच्या सई हळदुले. त्या जपान, जर्मनी या देशांत शिक्षण घेऊन सध्या जर्मनीत प्राध्यापक म्हणून आहेत. त्यांनी बारीपाड्यावर पीएच डी केली आहे. त्यांचा अभ्यास सुरू आहे. आनंद फाटक यांच्यासमवेत वीस प्राध्यापकांनी बारीपाड्यावर वीस शोधनिबंध लिहिले आहेत. ते सर्व शोधनिबंध नेटवर उपलब्ध आहेत.
गावात बऱ्याच ठिकाणी सौर ऊर्जेचा वापर केला गेला आहे. बारीपाडा गावातून शेजारच्या पाच गावांना पाणीपुरवठा केला जातो. आसपासच्या गावांमध्ये संपर्क व्हावा व लोकसंवाद वाढावा यासाठी ‘कब्बडी स्पर्धे’चे आयोजन बारीपाड्यात केले जाते.
बँकॉक येथे International Fund For Agriculture Development (IFAD) मार्फत ‘ग्रामीण तंत्रज्ञानाचा शोध’ हा विषय घेऊन आशिया पॅसिफिक मधील देशांसाठी स्पर्धा आयोजित केली जाते. त्या स्पर्धेत बारीपाडाचा दुसरा क्रमांक आला होता. पहिला, तिसरा क्रमांक अनुक्रमे चीन आणि व्हिएतनाम यांचा होता. अठ्याहत्तर देशांनी स्पर्धेत भाग घेतला होता. भारतातून ‘नाबार्ड’ने बारीपाडाचे नामांकन केले होते. बारीपाडाला राष्ट्रीय स्तरावरील India Biodiversity चा पुरस्कार अंदमानच्या राज्यपालांच्या हस्ते 2014 साली मिळाला. तसेच, राज्यातील नंदुरबारचा आदिवासी अस्मिता, नागपूरचा संस्कार कवच, पु.भा.भावे स्मृती, गो.नी.दा.स्मृती पुरस्कार, महाराष्ट्र राज्याचा संत तुकाराम वनग्राम हे पुरस्कार देखील मिळाले आहेत. चैत्राम पवार सांगतात, ‘हे कोण्या एकट्याचे काम नाही आहे. ते सांघिक काम आहे. त्या गावाला आदर्श बनवण्यात सगळ्यांचा वाटा मोलाचा आहे.’
चैत्राम पवार यांचा प्रयत्न बारीपाडा हे पॅटर्न अन्यत्र राबवले गेले पाहिजे असा आहे. वनौषधी रोपवाटिका, सामुहिक गोठा, अन्नप्रक्रिया उद्योग, बांबू लागवड व कुरण विकास; तसेच, देशी गाय डांगी प्रजाती संवर्धन, मत्स्यपालन प्रशिक्षण केंद्राची उभारणी अशा योजना राबवण्याचा ध्यास चैत्राम पवार आणि त्यांच्या गावकऱ्यांनी घेतला आहे.
चैत्राम पवार, 9823642713
बारीपाडा, ता.साक्री, जि. धुळे
– शैलेश दिनकर पाटील, patilshailesh1992@gmail.com
Khup chhan lekh lihata tumhi…
Khup chhan lekh lihata tumhi , asach lihat Raha jene -karun aamhala khup chhan chhan
vachalaya
Dada tumhi khup chhan lihata…
Dada tumhi khup chhan lihata asach lihat Raha , jene karun aamhala as khup chhan -chhan vachayala milel .
Comments are closed.