कमलाकर सोनटक्के यांनी प्रसिद्ध हिंदी नाटककार असगर वजाहत यांच्या ‘गोडसे @ गांधी डॉट कॉम’ या नाटकाचा विस्तृत परिचय ‘थिंक महाराष्ट्र’वर करून दिला आहे. त्यांनी या कृतीने एका विधायक सांस्कृतिक कार्याला हातभार लावला आहे.
मी ‘नथुराम गोडसे बोलतोय’ या प्रदीप दळवी लिखित नाटकाचा तद्दन खोटेपणा समीक्षक य. दि. फडके यांनी त्यांच्या ‘नथुरामायण’पुस्तकात पुराव्यानिशी उघड केला होता. पण नाटकाला नाटकानेच उत्तर देण्याचे मोलाचे कार्य कोणी मराठी नाटककार करू शकला नाही. राजकारणाशी मराठी नाटककार विशेष निगडित नसतो आणि असला तरी तो त्याच्या राजकीय ज्ञानाचा वापर फक्त राजकीय शेरेबाजीसाठी त्याच्या नाटकातून करतो. अर्थात असगर वजाहत यांनी मराठी नाटकाला उत्तर म्हणून त्यांचे नाटक लिहिले नसणार हे निश्चित, पण आपातत:च ‘गांधी डॉट कॉम’ हा ‘नथुराम’ नाटकाला प्रतिवाद झाला आहे.
‘नथुराम’ नाटक खोटे का? तर त्या नाटककाराने त्याच्या सोयीसाठी सत्य घटना उलट्या केल्या आणि उलटे हेच सुलटे आहे असा दावा प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मराठी नाटक पूर्णतः एकांगी झाले. नथुरामला धीरोदात्त नायक बनवण्याचा मराठी नाटककाराचा प्रयत्न इतका ढोबळ आहे, की तो अखेरीस सावरासावर करूनही लपवता येत नाही.
हिंदी नाटकाची गोष्ट नेमकी उलट आहे. ते नाटक सत्य घटना आणि आभासी वास्तव यांचे अनोखे मिश्रण आहे. त्या नाटकात कोठेही सत्याचा वा इतिहासाचा किंचितही अपलाप केलेला नाही. तेथे कल्पित वास्तव ही शब्दयोजना चपखल बसते. माझ्या दृष्टीने ते ख-या अर्थाने ‘ऐतिहासिक अनैतिहासिक’ नाटक आहे.
या नाटकात गोडसेचे उदात्तीकरण करण्याचा जसा किंचितही प्रयत्न केलेला नाही, तसे त्याचे खलत्वही भडक केलेले नाही आणि गांधीजींचे महात्म्यही अनावश्यक ठसवलेले नाही. गांधीभक्तीचे प्रतिनिधित्व त्या नाटकातील सुषमा या पात्रान्वये करून एक नमुना समोर ठेवला आहे. पण तो तेवढ्यापुरताच. तेथे गांधी देव नाहीत आणि गोडसेही राक्षस नाही. गांधी आणि गोडसे यांच्या रूपाने दोन परस्परविरोधी विचारधारा प्रेक्षकांसमोर येतात. त्यामुळे गांधीजींच्या व्यक्तिमत्त्वाला व विचारांना सखोलपणे समजावून घेण्याचा प्रयत्न तेथे जाणवतो. नाटककार त्या प्रयत्नात प्रेक्षकांना/वाचकांनाही नाट्यपूर्ण रीतीने खिळवून ठेवतो; त्यांना विचार करायला लावतो. गोडसेच्या विचारातील फोलपणा वा उथळपणा स्वाभाविकरीत्या प्रकट होतो, मुद्दाम अधोरेखित न करताही.
गांधी-गोडसे यांची काल्पनिक भेट हे त्या अभिव्यक्तीचे प्रमुख नाट्यकेंद्र आहे. महात्मा गांधी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भेटीचा प्रसंग नाटककार प्रेमानंद गज्वी यांनी त्यांच्या ‘गांधी-आंबेडकर’ नाटकातही चितारला आहे. उपजतच एका विशिष्ट विचारांच्या बांधिलकीमुळे गज्वी प्रयत्न करूनही एका दिशेला झुकते माप देण्यापासून स्वत:ला वाचवू शकलेले नाहीत. तोच धोका या ‘गोडसे-गांधी’ नाटकात लेखकाने टाळण्याचा प्रयत्न केला आहे आणि दोन्ही चरित्रनायकांकडे तटस्थपणे पाहण्यात तो यशस्वी झाला आहे.
गांधीजींचे सचिव प्यारेलाल. शिवाय पंडित नेहरू, सरदार पटेल, मौलाना आझाद ही सर्वच पात्रे प्रत्यक्षात बोलली असतील, तसेच बोलतात. लेखकाने त्यांचे संवाद अलंकृत केलेले वा सजवलेले नाहीत. नाटकातील बहुतांश संवाद ही प्रत्यक्षातील त्यांची त्यांची विधानेच आहेत. लेखकाने फक्त ती काल्पनिक भेटीच्या पार्श्वभूमीवर वापरली आहेत. त्यांची कौशल्यपूर्ण सांगड घातली आहे.
‘मैली चादर’ या बिहारमध्ये घडणा-या कादंबरीतील बावनदास हे पात्र तसेच ‘सुषमा’ व ‘नवीन’ ही प्रेमकहाणीतील पात्रे, ‘निर्मलादेवी’, या सर्व व्यक्तिरेखा गांधीविचार प्रकट करण्यासाठी नाटककाराने मोठ्या कौशल्याने उपयोगात आणल्या आहेत. कस्तुरबा व गांधीजी यांचा प्रवेश तर नाट्यपूर्णच आहे. स्त्रीच्या दु:खाला गांधीजीच कारणीभूत झाले आहेत असा सरळ आरोप ती गांधीजींवर करते आणि गांधीजींना त्याबद्दल अप्रत्यक्षरीत्या कबुली द्यायला भाग पाडते. गांधीजींना प्रतिछायेच्या रूपात भेटणारी कस्तुरबा म्हणजे गांधीजींच्या मनातील भावनिक कल्लोळ आहे. तेथे नाटकाला थोडी मनोविश्लेषणात्मक डूब मिळते.
संपूर्ण नाटकात गांधीजी निरुत्तर होतात, ते फक्त या एका प्रसंगात.
हिंदी नाटकाची गंमत अशी, की त्यातील प्रत्येक व्यक्तिरेखा एकमेकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न तर करते, पण त्याचबरोबर त्यात व्यक्तिरेखा आस्वादकाशीही मस्त संवाद साधतात. परिणामी प्रत्येक व्यक्तिरेखेचे म्हणणे, मग तिची बाजू कोठलीही असो त्याला पटते. अखेरीस गांधीजी जेव्हा सर्वांचे खंडन करतात, तेव्हा आस्वादक पूर्णपणे गांधीजींच्या बाजूला वळतो. मोठी रेघ काढली की त्याखालची रेघ आपोआप लहान व्हावी, तसेच हे होते. सगळ्या पात्रांबद्दल आत्मीयता वाटण्याचे कारण मुळात नाटककाराला ती प्रत्येक पात्राबद्दल आहे.
यशस्वी नाटकाचे विशेषतः ‘गोडसे @ गांधी डॉट कॉम’ यासारख्या राजकीय नाटकाबाबत तेच व्यवच्छेदक लक्षण असते आणि ते या नाटककाराने प्रकट केल्यामुळे तो यशस्वी झाला आहे.
या नाटकातून प्रकट झालेली गांधीजींची खरीखुरी मते वाचक/प्रेक्षकाला काळाच्या संदर्भात पटण्यासारखी नाहीत, पण म्हणून ती नाटककाराने नजरेआड केलेली नाहीत. स्वराज्य प्राप्त केल्यानंतर काँग्रेसने सत्तास्थान घेऊ नये, ती बरखास्त करावी हे मत त्यावेळी मान्य होण्यासारखे नव्हतेच, पण आज वाटते ते मान्य केले गेले असते तर देशाचे आजचे चित्र वेगळे झाले असते.
प्रेमविवाह, संयम, ब्रह्मचर्य यांबाबतचे गांधीजींचे विचार प्रतिगामी वाटतात. पण त्यांचा एक विशिष्ट दृष्टिकोन म्हणून त्याकडे पाहायला नाटककार आस्वादकाला प्रवृत्त करतो.
गोडसे व गांधी यांचे प्रवेश कमालीचे विचारप्रवृत्त करणारे आहेत. त्यामुळे हे नाटक केवळ राजकीय राहत नाही ते वैचारिकही होते. दोघेही त्यांच्या त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत. येथे कोणीच ‘पडते’ घेत नाही. एके ठिकाणी गोडसेच्या संवादाचा आशय आहे, ‘येथे सर्व काही गांधीच आहे. आरोपी तोच, वकील तोच, न्यायाधीश तोच, शिक्षा देणारा तोच आणि त्याचाच निर्णय सारा देश मान्य करतो.’ करकरे याच्याबरोबरच्या गोडसेच्या या उद्गारांत गांधीजींची नेमकी प्रतिमा उभी केली जाते. गोडसेला गांधी किती आणि कसे कळले होते याचे हे वस्तुनिष्ठ उदाहरण आहे. खरे तर, एका क्षणी असे वाटते, की गांधीजी गोडसेबरोबर जो तात्त्विक वाद घालत आहेत त्यात गोडसेचा काही मतभेद नाही, पण सारे काही पटूनही ते उघडपणे मान्य करायला गोडसेचा हटवादीपणा आड येत आहे. एका दृष्टीने या नाटकातील गोडसे-गांधी वाद हा हट्टाग्रह विरुद्ध सत्याग्रह असा संघर्ष आहे. तो नाटककाराने छोट्यामोठ्या अन्य पात्रांसह नाटकभर खेळवला आहे. त्या नाटकाला ‘सत्याग्रह विरुद्ध हट्टाग्रह’ हे शीर्षक शोभून दिसले असते.
गांधीजी, काँग्रेस बरखास्त करा एवढे सांगून गप्प बसत नाहीत, तर प्रत्यक्षात काँग्रेसचे सरकार उभे राहण्याअगोदर चार स्वतंत्र ग्रामराज्ये उभी करतात आणि त्यांच्या कारभाराला मार्गदर्शन करतात. ती सुरळीत चालतात.
तुरुंगात गांधीजी केवळ गोडसेंबरोबर राहतच नाहीत तर तुरुंगातील सर्व कैद्यांना घेऊन संडास साफ करायची मोहीम सुरू करतात.
एका जागी गप्प बसून फक्त आदेश देणा-यांपैकी गांधीजी नव्हते. प्रत्येक कार्यक्रमात ते जातीने भाग घेत असत. ‘आधी केले मग सांगितले’ या त्यांच्या जन्मजात प्रवृत्तीचे प्रत्यंतरच या दोन छोट्याशा प्रसंगांतून घडते. अखेरीस सोपे उत्तर काढून नाटककार प्रेक्षकांना दिलासा देणारा शेवट करत नाही. दोघेही दोन विरुद्ध दिशेला जातात. मध्येच गांधीजी थांबतात. काय झाले म्हणून गोडसे त्यांच्या मागे जातो. गांधीजींची प्रेक्षकांकडे पाठच आहे. ते गोडसेकडेही बघत नाहीत. त्याचा हात ते त्यांच्या खांद्यावर घेतात आणि दोघे चालू लागतात.
कोण चूक? कोण बरोबर? नाटककार निर्णय प्रेक्षकांवरच सोपवतो. प्रेक्षकांना-वाचकांना अस्वस्थ करत, विचारप्रवृत्त करत संस्कृत पठनाच्या आवाजात नाट्यगृहातील नाटकावर पडदा पडतो. पाच-दहा पुस्तके वाचूनही कळणार नाहीत एवढे महात्माजी या छोट्या नाट्यकृतीत कळतात; बरेच खोलवर आकळतात. गांधीजींच्या नावाने ढोंगबाजीला ऊत आलेल्या आजच्या दिवसांत अशा नाट्यकृतींची पूर्वी कधी नव्हती एवढी गरज आहे. लवकरात लवकर या नाटकाचा मराठी अनुवाद होणे व त्याचे पुस्तक प्रकाशित होणे अगत्याचे आहे. असगर वजाहत यांचे या पूर्वीचे नाटक ‘जिसने लाहोर नही देखा…’ या नाटकाचे रुपांतर नाटककार शफाअत खान यांनी ‘राहिले घर दूर माझे’ या नावाने केले होते. फाळणीच्या प्रश्नावरचे ते नाटक कथानकप्रधान होते. ते व्यावसायिक रंगमंचावर यशस्वी झाले होते.
गांधीजी आपल्यातून निघून गेले. सत्तर वर्षें उलटली तरी ‘गांधी चरखा’ म्हणजेच गांधी चक्र चालतच आहे. असगर वजाहत लिखित अशा कलाकृतीची तिच्या अनुवादाने या चक्रात अधिक चैतन्य निर्माण होईल आणि ढोंगबाजी नामोहरम होईल. हाच एकमेव अहिंसात्मक मार्ग आहे. महात्माजींच्या भाषेत सांगायचे तर ‘चरखा चला चला के… ’
– कमलाकार नाडकर्णी
खुप च interesting लेख …
खुप च interesting लेख …
असे प्रयोग , अशी खूप समीक्षा…
असे प्रयोग , अशी खूप समीक्षा होणं … खरं तर लोकशाहीत अभिप्रेत आहे. पण सध्या माझं तेच सत्य …हुकूमशाहीच्या वातावरणात ..असे विषय स्तुत्यच.
Comments are closed.