सूर्य धनू राशीत भ्रमण करतो, तो म्हणजे धनुर्मास ऊर्फ ‘धुंधुरमास’. आयुर्वेदानुसार मकर संक्रमणाच्या आधी हेमंत ऋतूमध्ये येणाऱ्या या धनुर्मासात सर्वसामान्य लोकांचा जठराग्नी (भूक) भल्या पहाटे जागृत होतो. त्यामुळे त्या महिन्यात पहाटे उठून त्या ऋतूमध्ये मिळणाऱ्या भाज्या, बाजरीसारखी धान्ये खाण्याचे महत्त्व आहे. ते खाणे इतर ऋतूंमध्ये पचण्यास जड असले तरी त्या महिन्यात/ऋतूमध्ये मात्र ‘राजस’ मानले गेले आहे. वर्षभर खाण्यातून मिळणारी ‘एनर्जी’ भारतीय माणसाला फक्त त्या एका महिन्यातील खाण्यातून मिळवता येते, ‘धुंधुरमास’चा उल्लेख ‘कालनिर्णय’मध्ये नाही.
त्या ऋतूत गवार, फरसबी, वांगी, मटार यांच्यासारख्या ‘लेकुरवाळ्या’ फळभाज्या आणि बाजरीसारखी पिठे, पहाटेच्या वेळी जेव्हा पोटातील भूक पूर्णपणे ऐन भरात असते, त्यावेळी खाण्यातील मजा आणि त्यांची सहज होणारी पचनक्रिया ह्यांचा विचार, जेवणाकडे ‘अन्न हे पूर्णब्रह्म’ म्हणत वैज्ञानिक दृष्टिकोनातून बघणाऱ्या संस्कृतीत प्राचीन काळापासून केला गेला आहे. हे लक्षात आले, की त्याबद्दलचा आदर एक ‘फुडी’ म्हणून वाढतो.
धुंधुरमास काही वर्षांपूर्वीपर्यंत अनेक लहान गावांत वेगळ्याच आनंदात साजरा होई. मंदिरात काकड आरत्यांना जोडून नामवंत कीर्तनकारांची कीर्तने होत. सूर्याला अर्ध्य देऊन, नैवेद्य दाखवून पहाटे साग्रसंगीत जेवणं होत. गावोगावी रंगणाऱ्या धुंधुरमासाच्या या जेवणावळी म्हणजे एकत्र कुटुंब व्यवस्थेला बांधून ठेवणारी ‘जान’ होती.
(अंबर कर्वे यांच्या एबीपी माझा ब्लॉग वरून संकलित)