सजल कुलकर्णी गाई-गुरांविषयी काम करतो. त्याची केंद्र सरकारात स्वतंत्र पशुमंत्री असावा अशी मागणी आहे. सजलची नाळ तो ज्या सामाजिक प्रश्नाला भिडू पाहतोय त्या गाईगुरांच्या समाजाशी जुळली आहे. सजल आहे बायोटेक्नोलॉजीचा पदवीधर. त्या पठ्ठ्याला लहानपणापासून जनावरांसोबत खेळण्याचा नाद. सजल सांगतो, “मी गोठ्यात खेळलो, तेथेच लहानाचा मोठा झालो, शाळेतसुद्धा म्हशीवर बसून गेलो. एवढेच काय, पण आईची नागपूरहून भंडाऱ्यास बदली झाली तेव्हा आमच्याकडे गुरे नव्हती, तर मी आमच्या गवळ्याच्या घरी जाऊन त्याच्या गोठ्यात खेळायचो.” म्हणूनच सजल मुक्या जनावरांप्रती सहवेदना बाळगून आहे. त्याला माणसाच्या आयुष्यातील पाळीव जनावरांचे स्थान काय आहे याची जाणीव आहे. सजलला बायोटेक्नोलॉजीचा पदवीधर झाल्यानंतर देखील माणसाच्या आयुष्यातील बायो-लॉजिक कळते!
सजल पदवी शिक्षण पूर्ण होता होता ‘निर्माण’च्या प्रवासात सामावला गेला. सजल “जनावरांविषयी आस्था, जिवाश्म्यांचे औपचारिक शिक्षण आणि ‘माझ्या कामाचा समाजाला काहीतरी उपयोग झाला पाहिजे’ असे म्हणणारी अनामिक ओढ या साऱ्यांच्या संगमावर मला काय करायचे ते सापडले” असे म्हणतो. सजलने त्या शोधाचा भाग म्हणून पुण्याच्या ‘बायफ’ या संस्थेसोबत फेलोशिप केली. तो उरुळीकांचनच्या गोठ्यात चांगला रमला होता. भारतात देशी जनावरांची, विशेषतः गायींची आणि बैलांची उत्पादकता वाढवण्यासाठी विदेशी वाण आणून संकरित पिढी तयार केली जाते. सजलला कृत्रिम बीजधारणेचे (आर्टिफिशिअल इन्सेमिनेशनचे) म्हणजे संकरित जनावरांच्या पुनरुत्पादनाचे आणि संवर्धनाचे तंत्रज्ञान उरुळीकांचनच्या प्रयोगशाळेत शिकण्यास मिळाले. जनावरांच्या देशी जाती स्थानिक भौगोलिक परिस्थितीशी जुळवून घेतात, त्यांना स्थानिक पातळीवर कसे जगायचे आणि अडचणींच्या परिस्थितीत तग धरून कसे राहायचे हे शिकवावे लागत नाही. ते वाण लोकांनीही पिढ्यानपिढ्या जोपासलेले असते, त्याची त्यांना पुरती माहिती असते. त्यामुळे देशी मांस आणि देशी जनावरे परस्पर सहकार्याने सहज जगू शकतात. विदेशी जनावरांचे तसे नाही. त्यांना भारतातील हवा मानवत नाही, त्यांची विशेष काळजी घ्यावी लागते- त्यांत खाणे-पाणी-औषध, देखभाल सारे आले.
सजल राहतो त्या, नागपूर शहराला रोज वीस ते पंचवीस लाख लिटर दूध लागते आणि संपूर्ण विदर्भातील अकरा जिल्हे मिळून जेमतेम सव्वाआठ लाख लिटर दुधाची गंगा वाहते. तेथील स्थानिक गायीचे वाण कोणते, त्यांचे नाव काय-क्षमता किती हेही स्थानिक शेतकर्यांरना, अधिकार्यांगना माहीत नसावे! का हे दारिद्र्य? तो प्रश्न शंभर म्हशी खरेदी करून, एक डेअरी चालवून सुटणार नसेल तर त्याने काय केले पाहिजे? हा प्रश्न बायोटेक्नोलॉजिस्ट सजल कुलकर्णीला अस्वस्थ करतो. तो त्या प्रश्नाचे उत्तर मिळवण्यासाठी कंबर कसून कामाला लागला आहे. सजल विदर्भातील गावरान गायींचे वर्गीकरण करत आहे. तो आदिवासी, गोवारी, कामाठी यांचे परंपरागत पशुधन काय आहे? ती कामे कोणती व किती करतात? दूध किती देतात? त्यांना आजार कोणते होतात? त्यांवर उपाय काय? त्यांचे स्थान लोकसंस्कृतीत काय या सगळ्याचा अभ्यास करत आहे.
सजलचा प्रयत्न विदर्भातील गावरान गाई-बैलांना ‘नॅशनल ब्युरो ऑफ अॅनिमल जेनेटिक रिसोर्सेस’ या संस्थेमार्फत ओळख प्राप्त करून देण्याचा आहे. सजलच्या प्रयत्नातून विदर्भातील गायी-वासरांची सरकारदरबारी दखल घेतली जाईल. त्यामुळे जनावरांच्या संवर्धनाचा, विदर्भामध्ये पुरेशी स्थानिक पशुधनवाढ होण्याचा मार्ग प्रशस्त होईल! सजल विदर्भातील गावठी जनावरांना काहीतरी नाव असेलच ना असे दोन वर्षांपूर्वी म्हणायचा. त्याला तेथील जनावरांना ओळख नाही हे सहन होत नाही. तो म्हणाला, त्यांना कठानी म्हणतात. त्याला तो शोध चामुर्शी नावाच्या गावात लागला.
सजल ‘बायफ’चा फेलो आहे. त्याने मेंढालेखा गावाच्या वनसंपत्तीचे मोजमाप करण्यासाठी माधव गाडगीळ यांना साहाय्य केले. पूर्वजांनी देवराया जंगलांचे संवर्धन व्हावे म्हणून निर्माण केल्या. सजलचे स्वप्न त्याच धर्तीवर स्थानिक पशुधनाची वाढ व्हावी, संवर्धन व्हावे म्हणून ठिकठिकाणी विकेंद्रित पशुसंशोधन-संवर्धन केंद्रे निर्माण व्हावीत, स्थानिक पशूंचे गुणबीज जपणाऱ्या जर्म प्लास्म बँका निर्माण व्हाव्यात असे आहे.
सजल कुलकर्णी – 9730310197, 9881479239
– कल्याण टाकसाळे