मराठीच्‍या नावाने ‘टाहो’ची गरज नाही

1
29
carasole

‘मराठी भाषा दिन’ जवळ आला, की मराठी भाषेच्‍या नावाने उदोउदो करणं किंवा गळे काढणं सुरू होतं. त्‍यानिमित्‍तानं इंग्रजीचं मराठी भाषेवर होणारं आक्रमण, मराठीला समाजमानसात नसलेलं स्‍थान, मराठीचं खच्‍चीकरण, मराठी भाषेवरून होणारं राजकारण आणि मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्‍याचा प्रलंबित मुद्दा अशा अनेक ‘महत्‍त्‍वाच्‍या’ गोष्‍टींवर चर्चा होते. त्‍यात मराठी भाषेची चिंताजन‍क परिस्थिती, म्‍हणजे एकूणच ‘रड’ जास्‍त असते. खरंच परिस्थिती एवढी वाईट आहे?

मराठीवर इंग्रजी भाषेचा वाढणारा प्रभाव अनेकांच्‍या मनात अस्‍वस्‍थता निर्माण करतो. रविवारच्‍या (२६ फेब्रुवारी २०१७) ‘लोकसत्‍ते’ची लोकरंग ही पुरवणी पाहा. सई परांजपे यांनी ‘टोहो’ या मथळ्याखाली लिहिलेल्‍या लेखात इंग्रजीचं मराठीवर आक्रमण होत असल्‍याचा सूर आळवला आहे. (त्‍या लेखाचं उदाहरण यासाठी देत आहे, कारण त्‍यातले विचार हे प्रातिधिक आहेत.) मराठीत इंग्रजीची चलती कशी, चित्रपटांची नावं इंग्रजीतून कशी, बोलता-लिहिताना आंग्‍ल शब्दांचा भडीमार कसा होतो याबाबतचं नको तेवढ्या विस्‍ताराने लिहिलं आहे. पण परांजपे त्‍यावर उपाय सांगत नाही. कारण तो कुणाकडेच नाही. (कल्‍पना असतील हो, पण अंमलबजावणी?)

भाषेच्या विकासात संमिश्रता हा महत्‍त्वाचा घटक आहे. प्रत्‍येक भाषा इतर भाषांच्‍या छटा आत्‍मसात करत समृद्ध होऊन पुढे सरकते. ती प्रक्रिया अमूक एका व्‍यक्‍तीच्‍या हाती नसते. भाषेतले तसे बदल काळाच्‍या ओघात समाज स्‍वीकरत जातो. म्‍हणूनच ‘मेज’ शब्द मागे पडतो आणि ‘टेबल’ रुढ होऊन जातो. तशी कित्‍येक उदाहरणं देता येतात. मराठीत अरबी, फारसी, इंग्रजी, उर्दू, हिंदी अशा विविध भाषांतले शब्‍द आहेत. अनेकदा मूळ शब्‍दांचे अपभ्रंश एखाद्या भाषेत रूढ होतात. लॅटीनमधील कित्‍येक शब्द उच्‍चार बदलून इंग्रजी भाषेत रुळले आहेत. जेम्‍स कॅमेरूनच्‍या ‘अॅवटार’ असा उच्‍चार असलेल्‍या २००९ सालच्‍या जगप्रसिद्ध चित्रपटाचं शिर्षक संस्‍कृत भाषेतील ‘अवतार’ या शब्दावरून उचललं होतं. आपले मराठी किंवा हिंदी शब्‍द इतर भाषांमध्‍ये सामिल केले जातात. तेव्‍हा आपल्‍यासाठी ती अभिमानाची गोष्‍ट असते. मग दुसरे शब्द आपल्‍या भाषेत येण्‍यात कमीपणा कसला? ती देवाणघेवाण सुरूच राहणार आणि राहावी.

या विचारामागची मुख्‍य भिती आहे ती आपल्या भाषेची शुद्धता टिकवण्‍याची. तसं केलं तर भाषा ‘जैसे थे’ स्थितीत राहणार. कोणतीही गोष्‍ट ती आहे तशी राहू दिली, की तिच्‍यातील बदलही रोखला जाईल आणि तिची प्रगतीदेखील. भाषाशास्‍त्रज्ञ म्‍हणतात, की भाषा शुद्ध ठेवणं ही अशक्‍य गोष्‍ट आहे आणि भाषिक समृद्धीसाठी ती चांगली बाब नाही. मात्र तरीही तसा अयशस्‍वी प्रयत्‍न सातत्‍याने केला जातो.

भाषिक शुद्धता साधारण तीन प्रकारची असावी. एक व्‍याकरण (लिखित), दोन उच्‍चारण (मौखिक) आणि तीन शब्दसंग्रह (पहिल्‍या दोन्‍ही प्रकारांशी निगडीत). मराठीत पहिल्‍या दोन प्रकारांमध्‍ये आपण सा-यांनीच दिवे लावले आहेत. आपल्या अमृताशी पैजा जिंकणा-या भाषेची लक्‍तरं वेशींवरचे फलक (होर्डींग्‍स्), मालिकांमधले संवाद, वर्तमानपत्रांमधल्‍या बातम्‍या अशी सर्वत्र टांगलेली दिसतात. त्‍यामुळे भाषेच्या आपण शुद्धेतेचा तसा आग्रह धरणं हे दुटप्‍पीपणाचं वाटतं. निदान तिस-या प्रकारात तरी शुद्धता जपावी असा तो प्रयत्न असणार. त्या प्रकारची भाषिक शुद्धता जपण्‍याचे प्रयत्‍न ‘आमची मुलगी आमच्‍याच जातीत लग्‍न करणार’ अशा कालबाह्य विचारांसारखे आहेत.

सांगण्‍याचा मुद्दा एवढाच, की इतर भाषांचं आपल्‍या भाषेवर आक्रमण होत आहे हा भाषेकडे पाहण्‍याचा दृष्‍टीकोन मर्यादीत आहे. जे मराठीच्‍या बाबतीत घडत आहे तेच फ्रेंच, जर्मन, चीनी, स्‍पॅनिश या इतर भाषांच्‍या बाबतीतही घडत आहे. ही जगभरात निर्माण झालेली परिस्थिती आहे. तंत्रज्ञानाच्‍या स्‍फोटोमुळे सांस्‍कृतिक घुसळण वाढली. जग आकुंचन पावण्‍याची प्रक्रिया दिवसेंदिवस वेगानं घडत आहे. त्‍याचा परिणाम भाषांवर होणं अपरिहार्य आहे. भाषेतला तो बदल अस्मितेच्‍या कडवेपणानं पाहणं चुकीचं आहे. कोणतीही भाषा ही मानवी संभाषणाची, संस्‍कृतीच्‍या प्रसाराची आणि माणसाच्‍या व्‍यक्‍तीमत्‍त्व विकासाची गरज असते. ती त्‍याच्‍या अभिव्‍यक्‍तीचं, नवनिर्मितीचं साधनही आहे. पण मराठी भाषा अडकली ती अस्मितेच्‍या वर्तुळात. त्‍या फुकाच्‍या अभिमानाच्‍या पडद्याआड या सा-या गोष्‍टी ‘नजरअंदाज’ होतात. उरतात ते केवळ ‘मराठी असे अमुची मायबोची…’चे गजर! मग भाषिक पातळीवर प्रयत्‍न व्‍हावेत तरी कसे?

सई परांजपे यांनी ‘लोकसत्‍ते’तील लेखात म्‍हणतात, की ‘मी मराठी पुस्तकं वाचीत असे आणि दिवसाकाठी दोन-तीन पानं काहीबाही मराठीतून लिहिण्याची मला सक्ती असे. दुर्दैवाने मला मिळालेला हा वसा पुढे चालू ठेवण्यात मी अपयशी ठरले.’ ती स्थिती आणि अनुभव सार्वत्रिक आहे ते त्‍यांच्‍या ध्‍यानात येत नाही. उलट परांजपे भारतात येऊन मराठी शिकून पूर्ण मराठी होऊन गेलेल्‍या मॅक्‍सीन बर्निस यांचे उदाहरण सार्वत्रिक असल्‍यासारखं सांगतात. बर्निस यांचं काम चांगलं आहे यात संशय नाही. मात्र अशी मराठी माणसांनी इतर भाषांमध्‍ये काम केल्याची उदाहरणं असणारच ना.

आपण सारे मराठी भाषेची सामाजिक पातळीवर व्‍यावहारीक गरज उरलेली नाही हे मान्‍य करत नाही. मराठीची तशी गरज निर्माण व्‍हावी यासाठी प्रयत्‍नही केले गेले नाहीत. मराठी पाट्या लावण्‍याच्‍या आंदोलनांना पाठींबा दिला गेला, मात्र भाषेवर काम झाले नाही. अजूनही ज्ञानेश्‍वरांनी लिहिलेली सुभाषिते, कुसुमाग्रजांच्‍या कविता, पु.ल. देशपांडे यांचे विनोद याच गोष्‍टी आळवल्‍या जातात. त्यानंतर मराठी भाषेत काहीच घडले नाही? आणि जर घडले नाही तर कोणत्‍या मुद्द्यावर काम करणे गरजेचे आहे ती गोष्‍ट स्‍पष्‍ट आहे. पण आपण आपली सारी शक्‍ती-वेळ मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्‍यामागे दवडतो. आपल्‍या भाषेला तो दर्जा मिळावा याला विरोध नाही. मात्र त्‍यामुळे घडणार काय ते कुणीच स्‍पष्‍ट करत नाही. कारण तो दर्जा तर संस्‍कृत भाषेलाही मिळाला आहे. मात्र तिचं व्‍यवहारात स्‍थानचं नाही. ती भाषा ‘प्राचीन भाषे’ची उपाधी घेऊन कोप-यात स्‍वस्‍थ बसून आहे. मराठीचीही तीच अस्‍वस्‍थ होईल. मराठीत भाषिक पातळीवर संशोधन आणि नवनिर्मिती आवश्‍यक आहे. ती इतर भाषा आणि संस्‍कृतींना सोबत घेऊनच करता येईल. त्‍याजोडीला मराठीला व्‍यवहारात स्‍थान मिळण्‍यासाठी वेगळ्या पातळ्यांवर प्रयत्‍न करणे आवश्‍यक आहे. ते कसे केले जाऊ शकेल याचे उदाहरण देणारा लेख प्रा. अनिल गोरे यांनी ‘ग्रंथाली’च्‍या ‘शब्द रुची’ या मासिकाच्‍या फेब्रुवारी अंकात लिहिला आहे. त्‍यांनी दिलेलं उदाहरण असं  –

महाराष्‍ट्राच्‍या विधीमंडळातील कामकाज मराठीतून होण्‍यासाठी ‘महाराष्‍ट्र विधीमंडळ अधिनियम’ १९६४ साली संमत करण्‍यात आला. मात्र बिनमराठी सचिवांनी एकत्र येऊन मराठी शिकण्‍यास वेळ लागेल असे कारण सांगत तो अधिनियम लागू करण्‍याची मुदत वर्षभराने वाढवून घेतली. त्‍या प्रस्‍तावावर तत्‍कालिन मुख्‍यमंत्र्यांनी सही केली. मग दरवर्षी तो प्रस्‍ताव सादर केला जाऊ लागला आणि तो अधिनियम लागू करण्‍याची मुदत वर्षभराने वाढवून घेतली जाऊ लागली. तशी चौतीस वर्षे लोटली. त्‍या काळात विधिमंडळात सादर होणारी सर्व कागदपत्रे इंग्रजी भाषेतून सादर केली जात. मराठीला तेथे दुय्यम स्‍थान होते. महाराष्‍ट्रात सेना-भाजप युतीचे सरकार १९५० साली सत्‍तेवर आले. तेव्‍हाचे मुख्‍यमंत्री मनोहर जोशी यांच्‍यासमोर तो प्रस्‍ताव आला आणि तो अधिनियम अद्याप लागू न झाल्‍याचे पाहून ते आश्‍चर्यचकित झाले. त्‍यांनी त्‍या प्रस्‍तावावर सही करण्‍यास नकर दिला आणि तेव्‍हापासून महाराष्‍ट्रातील विधिमंळाचे कामकाज मराठीतून सुरू झाले.

समाजाला ज्‍या गोष्‍टीची गरज आहे ती गोष्‍ट समाज स्‍वीकारतो. मग ती गोष्‍ट कामकाजात, सांस्‍कृतिक जीवनात रुळते. समाज बदलत्‍या काळानुसार त्‍या गोष्‍टीत बदल घडवून आणतो. बदल घडला तर ती गोष्‍ट टिकते, नाही घडला तर समाज त्‍याला पर्याय निर्माण करतो आणि आधीची गोष्‍ट नाकारून नवी गोष्‍ट स्‍वीकारतो. आज समाजाला मराठीची व्‍यावहारीक गरज भासत नाही हे स्‍पष्‍ट आहे. ‘मराठी भाषा टिकवण्‍यासाठी प्रयत्‍न केले पाहिजेत’ असं आपण म्‍हणतो, तेव्‍हा त्‍याच वाक्यात ‘मराठी स्‍वबळावर टिकू शकत नाही’ ही गोष्‍ट स्‍पष्‍ट होते. ती समजून घेणं आणि त्‍या परिस्थितीचा स्‍वीकार करणं आवश्‍यक आहे. त्यावर कृतीही करता येऊ शकेल. एक म्‍हणजे समाजात मराठीला व्‍यावहारीक स्‍तरावर स्‍थान निर्माण करून देणं, जेणेकरून समाजाला तिची गरज भासेल आणि भाषा टिकेल. अन्‍यथा प्रत्‍येकाने आपापल्‍या पातळीवर मराठीचं संवर्धन करणं, तिचा शोध घेणं, असे मार्ग खुले आहेतच.

– किरण क्षीरसागर

About Post Author

Previous articleनक्राश्रू ढाळणे
Next articleमनमोकळी ‘निळ्या डोळ्यांची’ लेखिका शिल्पा कांबळे
किरण क्षीरसागर यांनी ग्रॅज्‍युएशननंतर पत्रकारितेचे शिक्षण घेतले. त्‍यानंतर वृत्‍तसंस्‍था, दैनिक 'मुंबई चौफेर' आणि आकाशवाणी अशा ठिकाणी कामांचा अनुभव घेतल्‍यानंतर 'थिंक महाराष्‍ट्र'सोबत 2010 साली जोडले गेले. त्‍यांनी चित्रपट निर्मितीचे शिक्षण घेतले असून त्‍यांचा 'डिपार्टमेन्‍ट', 'अब तक छप्‍पन - 2', 'अॅटॅकस् ऑफ 26/11', 'क्विन', 'पोस्‍टर बॉईज' अाणि 'शेण्टीमेन्टल' अशा व्‍यावसायिक चित्रपटांच्‍या संकलन प्रक्रियेत सहभाग होता. ते 'बुकशेल्फ' नावाचे पुस्तकांचा परिचय करून देणारे युट्यूब चॅनेल त्यांच्या सहकाऱ्यांसोबत चालवतात. लेखकाचा दूरध्वनी 9029557767

1 COMMENT

  1. लेखक एकांगी विचाराने ग्रस्त…
    लेखक एकांगी विचाराने ग्रस्त आहे असे दिसते. आज महाराष्ट्रात परिस्थिती अशी आहे की साधं बँकेत गेलं तर मराठीत सेवा मिळत नाही.रोजच्या रोज अडचणी किती सोडवणार?? यासाठी सरकारी प्रयत्न व लोकांचा रेटा आवश्यक आहे.त्यासाठीच मराठीवर अन्याय होतो हे उघडकीस आणणे गरजेचे आहे.

Comments are closed.