नाशिक जिल्ह्यात सिन्नर तालुक्यात वडांगळी नावाचे गाव आहे. गावाची लोकसंख्या काही हजारांत. त्या लहानशा गावातील साहित्यप्रेमी तरुणांनी लोकांना वाचनाची आवड लागावी म्हणून केलेल्या प्रयत्नांची ही गोष्ट. त्यांच्या धडपडीतून वाचक चळवळ ही वाचनापुरती सीमित न राहता, त्यांनी स्थापन केलेल्या ‘दिग्विजय कला क्रीडा केंद्रा’च्या रुपाने सांस्कृतिक चळवळीत रूपांतर झाले आहे.
रवींद्र खुळे, किरण भावसार, प्रकाश खुळे व अशोक घुमरे हे समविचारी मित्र एकत्र आले आणि त्यांनी वीस वर्षांपूर्वी गावकऱ्यांची वाचनवृत्ती वाढीस लावण्यासाठी त्या लहानशा गावात वाचनालय सुरू करण्याचे ठरवले. त्यांनी आधी सुरू असलेले वाचनालय बंद का झाले होते त्याची कारणे प्रथम शोधून काढली. वाचनालय सुरू करण्याची नवी योजना आखली. वाचनालय म्हटले, की पुस्तकांची जमवाजमव, जागेचा शोध, पुस्तके मिळवणे हे आले. त्या कामांसाठी वर्गणी जमा करण्याचे ठरवले. वर्गणी गोळा करणे सुरू केल्यावर वर्गणीऐवजी लोकांचे सल्लेच जास्त मिळू लागल्याचे रवींद्र खुळे हसत हसत सांगतात. ते म्हणतात, “त्यामुळे नैराश्य तर आलेच; परंतु त्यावर मात करत, अवघ्या पंच्याहत्तर पुस्तकांनी वाचनालय १ ऑगस्ट १९९६ मध्ये सुरू केले. कालांतराने वाचनालयाला शासकीय अनुदानही मिळाले.”
वाचनालयात कथा, कादंबरी, प्रवासवर्णने, अनुवाद, धार्मिक ग्रंथ, संदर्भ ग्रंथ अशी सुमारे नऊ हजार पुस्तके आहेत. तरूण वर्गाची गरज ध्यानात घेऊन स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन करणारी पुस्तकेसुद्धा वाचनालयात उपलब्ध आहेत. त्या पुस्तकांना विद्यार्थी वर्गाचा चांगला प्रतिसाद आहे. स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन करणारे इतर उपक्रम- व्याख्याने, चर्चासत्र- असे आयोजित केले जातात. त्याचा लाभ विद्यार्थ्यांना मिळतो. गावातील एका युवक पी.एस.आय.ची परीक्षा यशस्वीपणे उत्तीर्ण झाला आहे.
वाचनालय पूर्वी पंचायत समितीच्या जागेत होते. ते प्रशस्त जागेत जाणार आहे. आमदार राजाभाऊ वाजे यांनी आमदार निधीतून देणगी दिल्यामुळे वाचनालयाची मोठी वास्तू तयार होत आहे.
वडांगळी गाव लहान असले तरी गावात पूर्वीपासूनच नाटकांची आवड आहे आणि नाट्यपरंपरा जोपासली गेली आहे. ती पुढे चालवण्याचा ध्यास ‘दिग्विजय कला क्रीडा केंद्रा’च्या कार्यकर्त्यानी घेतला. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धांमध्ये भागही घेतला. त्यांनी प्रायोगिक अंगाने रंगभूमीला आधुनिक रूप देण्याचा प्रयत्न गावात केला. नंतर मात्र चळवळ मंदावत गेली आहे.
‘दिग्विजय’च्यावतीने वडांगळीत व्याख्यानमाला होते. ती उत्तमशेठ कुलथे यांच्या वतीने लक्ष्मण तात्या कुलथे यांच्या स्मृत्यर्थ होते. व्याख्यानमाला ही संकल्पना ग्रामीण भागात नवीन असल्यामुळे सुरुवातीला घरोघरी जाऊन श्रोत्यांना बोलावून आणावे लागे. या व्याख्यानमालेला ‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठा’च्या बहिस्थ विभागातून तज्ञ व्याख्याते बोलावले जातात. व्याख्यानांचे विषय मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक यांच्या आवडीचे असतात. तरूणांनी व्याख्यानमालेच्या ज्ञानसत्रात मोठ्या संख्येने भाग घ्यावा असे आयोजकांना वाटते. त्यासाठी ते विविध तऱ्हेचे प्रयत्नही करतात.
‘दिग्विजय कला क्रीडा केंद्रा’तर्फे धार्मिक, बौद्धिक प्रबोधन, ज्येष्ठांसाठी शिबिरे, महिला जागृती शिबिर, आदर्श शिक्षक पुरस्कार, जयकर व्याख्यानमाला असे विविध उपक्रम राबवण्यात आले आहेत.
केंद्रातर्फे कबड्डी, क्रिकेट, व्हॉलीबॉल अशा खेळांच्या स्पर्धा स्थानिक समन्वय साधून भरवल्या जातात.
संस्थापक सदस्य – प्रकाश खुळे 9423969251. अशोक घुमरे – 7350067530
– प्रज्ञा केळकर-सिंग