आलोक राजवाडे – प्रायोगिक नाटकातील नवा तारा!

1
52
carasole

आलोक राजवाडे याने वयाची तिशीही गाठलेली नाही, मात्र त्याने वैचारिक प्रगल्भतेचा मोठा पल्ला गाठला असल्याचे त्याच्या बोलण्यावरून जाणवते. आलोकचे काम त्याच्या ‘पुरुषोत्तम’ स्पर्धेतील ‘दोन शूर’ ’सारख्या एकांकिकेपासून ‘गेली एकवीस वर्षें’ या मोठ्या व महत्त्वाच्या नाटकापर्यंत नजरेत भरते. आलोक पुण्यात वाढला, मोठा झाला. त्याने त्याचे शालेय शिक्षण ‘अक्षरनंदन’’सार‘ख्या प्रयोगशील शैक्षणिक संस्थेत पूर्ण केले. त्या शाळेत त्याच्यामधील ‘’वेगळ्या’’ माणसाची बीजे रुजली गेली आहेत. तो वेळ मिळेल तेव्हा ‘अक्षरनंदन’’मध्ये शिकवण्यासही जातो.

आलोकने शाळेत नववीत असताना ‘‘जागर’’च्या एका नाटकात काम केले होते. कॉलेजमध्ये त्यांचा कॉलेजचा ग्रूपच मस्त जमला व तो आपोआप नाटकांकडे वळला गेला. ‘बीएमसीसी’त त्याचे दोस्त होते अमेय वाघ, ओम भूतकर. त्यांनी ‘‘पुरुषोत्तम’’साठी एकांकिका केल्या. ‘‘दोन शूर’’मध्ये रंगमंचावर प्रत्यक्ष एक मोठी बैलगाडी, तिची फिरती चाके, भोवतीच्या मिट्ट काळोखात जंगलाच्या वाटेने गाडी हाकणारा गाडीवान असे दृश्य येते. गाडीत बसलेला असतो शहरी ‘हापिसर’ – सरकारी कामासाठी एस.टी.तून उतरून गावाकडे निघालेला,’ दोघांतील संवाद म्हणजे ती एकांकिका. दोघे आतून टरकलेले आहेत पण स्वतःच्या शूरपणाचे दाखले देऊन परस्परांपासून स्वतःच्या बचावाचा व्यूह रचतायत आणि त्यातून नाट्य घडतंय. ती एकांकिका ‘पुरुषोत्तम’’मध्ये अनेक बक्षिसांची धनी झाली.

तो सांगतो, “’बीएमसीसी’त निपुण धर्माधिकारी, किरण यज्ञोपवित, शशांक शेंडे, सारंग अशा सगळ्यांशी संवाद घडत गेला आणि त्यातून माझे नाटक करणे कल्टिव्हेट होत गेले.” त्याने मग ‘सायकल’’, ‘हू लेट द डॉग्ज्, आऊट’’ ‘या एकांकिका केल्या. मोहित टाकळकरच्या ‘आसक्त’’ या नाट्यसंस्थेशी तो जोडला गेला. ‘बेड के नीचे रहनेवाली’’ नावाच्या त्यांच्या नाटकात त्याने अभिनय केला. ‘‘समन्वय’’बरोबरही तो जोडला गेला. असा तो रंगभूमीवर रंगत गेला. आलोकने वेगवेगळ्या दिग्दर्शकांबरोबर काम केले आहे.

त्याने नाटकाचे औपचारिक प्रशिक्षण कोठेही घेतलेले नाही. त्याने सत्यदेव दुबेच्या काही कार्यशाळा केल्या. पण विविध दिग्दर्शकांबरोबर काम करतच नाटकाचे मोठे शिक्षण झाले असे तो म्हणतो. तो म्हणाला, “मी उमेश कुलकर्णी यांच्याबरोबर ‘विहीर’’ सिनेमात अभिनय केला. सुमित्रा भावे यांच्या दिग्दर्शनाखाली ‘हा माझा भारत’’मध्ये काम केले, अतुल पेठे यांनी सतीश आळेकरांवर जी डॉक्युमेंटरी केली त्यात मी लहान आळेकरांचे काम केले. या मोठ्या दिग्दर्शकांबरोबर काम करताना लक्षात आले, की त्यातील प्रत्येकजण म्हणजे एक ‘स्कूल’ आहे आणि ते अत्यंत ‘कन्व्हिक्शन’ने काम करतायत. प्रत्येकाची कामाची जबरदस्त शिस्त आहे.”

“तुझी बरीचशी नाटकं धर्मकीर्ती सुमंतने लिहिलेली आहेत. तुम्ही दोघं कसे एकत्र आलात.” असे विचारल्यावर आलोक म्हणाला, “धर्मकीर्ती आणि मी शाळेपासून एकत्र होतो. काही काळ एका वर्गातही होतो. नंतर मी ‘बीएमसीसी’ला आणि तो फर्गसनला गेला. पण नंतर नाटकाच्या निमित्ताने पुन्हा एकत्र आलो. शाळेपासून एकत्र असल्यामुळे आम्हाला एकमेकांचे बरोबर कळायचे. तो काय म्हणतो हे माझ्या लक्षात यायचे. त्याच्याबरोबर मी आतापर्यंत तीन नाटके केली.”

‘गेली एकवीस वर्ष’’बद्दल आलोक म्हणाला, “हे एकवीस वर्षांच्या मुलाचे नाटक आहे. त्याचे आईवडील पुरोगामी, डाव्या विचारसरणीचे कार्यकर्ते आहेत. एकविसाव्या वर्षी त्या मुलाला समाज कसा दिसतो, भोवताल कसा दिसतो त्याची ती गोष्ट आहे. त्याच्या आईवडिलांच्या तोंडी विनोबा, जयप्रकाश, लोहिया यांचे विचार सतत येत असतात, पण त्या मुलाला त्यांचा त्याच्या आयुष्याशी असलेला बंध कळत नाही. त्याला पण मी त्याचे काय करू?, माझ्या प्रश्नांचे काय? हे प्रश्न पडतात. प्रश्नव आयडेंटिफाय करता न येणे हाच त्या पिढीचा प्रश्न आहे. आजचे वास्तव त्या तरुणांनी नाटकात मांडलेय.”

नाटकातील मुलाचे आईवडील कार्यकर्ते आहेत, पण ज्या मुलांच्या घरी अशी पार्श्वभूमी नाही त्या मुलांना कोणते प्रश्न पडतात असे मी आलोकला विचारले तेव्हा तो म्हणाला, “धर्मकीर्तीचे वडील गांधीवादी विचारवंत आहेत. आईही कार्यकर्ती आहे पण माझ्या घरी ती पार्श्‍वभूमी नाही. माझी आई ‘बीएसएनएल’मध्ये तर वडील ‘मर्सिडीज बेन्झ’मध्ये काम करतात. मात्र आई खूप वाचणारी, वेगळा विचार करणारी आहे. तिनेच मराठी माध्यमाचा आग्र‘ह धरला. मला ती नेहमी वाचण्यास प्रवृत्त करायची. घरी ‘मिळून सा-या जणी’’ वगैरे मासिके यायची. आई ती मी वाचावी असा आग्र‘ह धरायची. ती काही सामाजिक चळवळींमध्ये ती सहभागीही झाली होती. तर ताईने ‘अभिनव महाविद्यालया’ची चित्रकलेची पदवी घेतली होती. त्या सा-याचा परिणाम माझ्यावर नक्की झाला.”

‘गेली एकवीस वर्ष’’ हे नाटक बसवण्याच्या, समजून घेण्याच्या प्रकि‘येत त्याला समजत गेले असे त्याने सांगितले.

धर्मकीर्ती सुमंत, निपुण धर्माधिकारी, अमेय वाघ, आलोक, अभय महाजन, ओम भूतकर, गंधार संगोराम अशा सगळ्या नाट्यवेड्या तरुणांनी ‘नाटक कंपनी’’ नावाची नाट्यसंस्था स्थापन केली आहे. आलोकची ‘तिची सतरा प्रकरणे’,’ ‘नाटक नको’’ यांसारखी नाटके आली. त्या नाटकांचे दिग्दर्शन त्याने केले. ‘नाटक नको’’ हे धर्मकीर्तीनेच लिहिलेले नाटक. ते नाटक नाटकाच्या हॉलमध्ये नाटकाशी संबंधित सात जणांमध्ये घडते. त्यांच्यातील राजकारण, स्पर्धा, कुरघोडी, कॉम्प्लेक्सेस, सेक्स्शुअल रिलेशनशिप्स, प्रत्येकाचे वैयक्तिक जीवन असा सगळा मिळून ‘‘राडा’’ त्या नाटकात आहे.

आलोकने दिग्दर्शित केलेले ‘‘मी गालिब’’ हे नाटक. ओम भूतकर या त्याच्या दोस्ताला गालिबच्या शायरीमध्ये रस वाटू लागला. गालिब महान शायर तर होताच, पण अजूनही काही कुतूहल होते. ते त्याच्या बोलण्यात येई. त्यातून ‘ग्रूपने ‘मी गालिब’’ची निर्मिती केली. ती लेखकाची गोष्ट आहे. तो स्वतः लेखक, त्याचे आयुष्य आणि गालिबचे आयुष्य यांची एक गुंफण त्या नाटकात आहे. लेखक त्याच्या स्वतःच्या इगोशी लढत आहे – लेखकाचा इगो आणि गालिबचा इगो हा त्या नाटकाचा गाभा आहे. ‘मेरी तामीरमेंही मेरी बरबादीकी बुनियाद है’’ गालिब म्हणतो. हे तेच आहे जे बुद्धाच्याही लक्षात आले. ही जी स्वतःशी सुरू असलेली लढाई आहे, त्या लढाईचे ते नाटक आहे. ते नाटक ओमने स्वतः आधी केले होते. नंतर मग त्यावर चर्चा होता होता त्याचा दीर्घांक झाला आणि पुन्हा पुन्हा त्याचे रिइंटरप्रीटेशन होऊन त्याचे दोन अंकी नाटकात रूपांतर झाले.

त्याचे ‘‘शिवचरित्र आणि एक’’ हे नवीन नाटक रंगभूमीवर आले आहे. त्याचे दोन दोन लेखक आहेत – डॉ. सदानंद मोरे आणि धर्मकीर्ती.

“त्याचं असं झालं की मुंबईला दामू केंकरे स्मृतीप्रित्यर्थ एक नाट्यमहोत्सव नेहमी होत असतो. त्यांची फेलोशिप असते. यावर्षी ती फेलोशिप ‘नाटक कंपनी’’ला मिळाली. तेव्हा काय करायचं हा विचार सुरू होताच. दरम्यान डॉ. सदानंद मोरे यांनी जो पहिला अंक लिहिला होता त्याविषयी धर्मकीर्तीला तुला हे बसवायचं असलं तर बघ असं सांगितलं होतं.” आलोकनं सांगितलं.

त्यात एक ब्राह्मण प्राध्यापक आणि त्याचा मराठा जातीचा सहाय्यक आहे. दोघेही स्वतःच्या जातीचा अहंगड सोडून ‘डिकास्ट’ झालेले. विधायक काम करू बघणारे. प्राध्यापकांनी शिवचरित्र लिहिले आहे. पण समाज त्यांची जातीची चौकट सोडून त्यांच्याकडे बघू शकत नाही. त्यांच्यावर जातीयवादी असल्याचा आरोप होतो. त्यांनी लिहिलेले शिवचरित्रही ब्राह्मणी असल्याचा दावा केला जातो. तेव्हा त्या लेखकाची झालेली कोंडी, त्याला पडणारे सॉलिडॅरिटीचे प्रश्ने हा मोरे यांनी लिहिलेला नाटकाचा पहिला अंक होता. ‘गेली एकवीस वर्षं’’मध्ये जो आयडेंटिटीचा प्रश्ने होता तोच परत या लेखकासमोरही उभा ठाकला होता. ‘गेली एकवीस वर्षं’’मध्ये तो म्हणतो, की इतिहास जाळून टाका. इतिहास अस्वस्थता निर्माण करतो. आजच्या काळाशी त्याचे नाते काय हे प्रश्ने निर्माण करतो. पण इतिहास नष्ट होत नाही. मग नष्ट होऊ शकत नसेल तर तो समजून घेतला पाहिजे. येथे डायरेक्टर लेखकाला प्रश्न. विचारतोय. ‘हे नेमकं काय आहे?’ ते जाणून घेतोय. अत्यंत सबकॉन्शस लेव्हलवर हा दुसरा अंक जातो.

आलोक समरसून बोलतो. तो जाणून घेण्याच्या, शिकण्याच्या प्रकि‘येत आहे. त्याच्याजवळ कुतूहल आहे, उत्सुकता आहे. त्यातूनच तो ‘सोशिऑलॉजी’कडे वळला. त्याने पुणे विद्यापीठातून एम.ए. केले. तो म्हणतो, “विद्यापीठात तर डोळेच उघडले. आपण कुठे राहतो आणि भोवती काय परिस्थिती आहे याची जाणीव होऊ लागली. सम्यक साहित्य संमेलनात सहभागी झालो आणि मला उलट प्रश्ना पडू लागले. ‘मी कोण? माझी जात काय? भोवतीच्या मित्रांबद्दलही प्रश्ना पडू लागले. तेव्हा त्रास होऊ लागला. वाटले असे व्हायला नको. मध्ये ‘सत्यशोधक’’ पाहिले. मग मी दिवसेंदिवस विद्यापीठात बसून बरेच काही वाचून काढले, म्हटले-मला कळायलाच पाहिजे हे, काय मुद्दा आहे तो. आणि लक्षात आले, की ज्या समाजात आपण राहतो त्या समाजाविषयी आपल्याला फारच कमी माहिती आहे. आपली जात ठरवणे हे आपल्या हातात नाही. त्या सगळ्याची मुळे इतिहासात आहेत. जात ही गोष्ट एकीकडून खूप घट्ट आहे. माणसांच्या नेणिवेमध्ये जात घुसलेली आहे आणि दुसरीकडून आजची जीवनशैली जातीला विसविशीत बनवत आहे. म्हणूनच ‘शिवचरित्र आणि एक’’ या नाटकात एक वाक्य येते. ‘हा मराठा नसलेला मराठा, मराठी नसलेला मराठी, समाजवादी नसलेला व्यक्तिवादी.”

आलोकला नाटक बसवण्याची प्रकि‘या एक्सायटिंग वाटते. नाटक बसवताना पहिला भाग हा परस्परांशी बसून बोलण्याचा असतो. हा जो बोलण्याचा भाग आहे तो अभ्यासच असतो असे त्याला वाटते. “हे सगळं खरवडणं असतं. इतरांना आणि स्वतःलाही. म्हणूनच वाचनापेक्षाही मला फिरणं, बोलणं जास्त आवडतं. नाटक त्यातूनच आकाराला येते. माझं डायरेक्टर असणे आणि माझे अभिनेता असणं हेही एकमेकांसाठी पूरक असते.” तो सांगतो.

पैसे कमावण्याची गरज तो नाकारत नाही पण त्यासाठी त्याच्यातील प्रयोगशीलता मारून टाकण्याची त्याची तयारी नाही. तो म्हणाला, “अतुल पेठे यांचे एक नाटक मी केले होते. ‘‘आषाढ का एक दिन’.’ माझे ते पहिले तीन अंकी नाटक. कालिदास वगैरे ऐतिहासिक पात्रं पण ती बोलतायत आजच्या परिस्थितीविषयी. सृजनशील माणसाचे सत्तेपाठी गेल्यावर काय होते (माकड) हे अधोरेखित करणारे ते नाटक. पण अतुल पेठे यांची कार्यपद्धत इतकी शिस्तबद्ध की प्रायोगिक नाटक असले तरी व्यावसायिक इतकेच काटेकोरपणे काम केले गेले. मोहित टाकळकर असो वा अतुल पेठे – कॉस्च्युमपासून, शब्दांपासून, मेकअपपासून सगळं व्यवस्थित.” समर नखाते याचे एक वाक्य आलोकच्या डोक्यात कोरले गेले आहे – प्रायोगिक नाटकाचा हेतू स्वतःचा शोध घेणे हा आहे. एका अर्थानं ते रंगभूमीचे आर अँड डी डिपार्टमेंट आहे.

आलोकशी गप्पा मारताना स्पष्टपणे जाणवले, की प्रायोगिक नाटकाच्या क्षितिजावर नव्या पिढीचा सूर्योदय झालेला आहे!

– अंजली कुलकर्णी

Last Updated On – 9th Nov 2016

About Post Author

1 COMMENT

  1. Aalok your story is very
    Aalok your story is very interesting. I think you are on the right path. You are a thinker and will do very well in your field. You are with right type of people. All the best.

Comments are closed.